शेजारील देशांत विशिष्ट रोगांच्या साथी आहेत इथपासून ते ऋ तू बदलतो आहे इथवरची माहिती सरकारकडे नसतेच असे नाही.. पण त्या माहितीचा अर्थ लावून वेळीच विविधांगी उपाययोजना आखल्या जाणे हे सध्या दुरापास्त आहे. स्वाइन फ्लूमुळे उडालेली घबराट पाहिल्यास, या साथीतून आपल्याला शिकण्याजोगे बरेच काही आहे हे लक्षात यावे..

लखनौमध्ये गेलो असता, उत्तर प्रदेशमधील स्वाइन फ्लूच्या बातम्या वाचत होतो. उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयाने स्वाइन फ्लूच्या सर्व रुग्णांना सरकारने मोफत औषधे द्यावी तसेच मोफत मास्क द्यावेत, असा आदेश दिल्याचेही वाचले. त्याच दरम्यान एका डॉक्टर (तोही इन्टेन्सिव्हिस्ट) मित्राच्या बायकोने मित्राला व त्यांच्या मुलांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस द्यावी का, अशी विचारणा केली. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर तर स्वाइन फ्लूपासून बचावाच्या पोस्ट ओसंडून वाहत आहेत. त्यात कापूर, तुळस, विलायचीपासून ते आयुर्वेद- होमिओपथी- युनानीच्या औषधांपर्यंत सर्व रामबाण उपायांची जंत्री वाचण्यात आली! यात प्रसारमाध्यमांनीही आपला वाटा उचलला. जनमानसात स्वाइन फ्लूची एवढी भीती निर्माण झाली की रस्त्यारस्त्यावर लोक तोंडाला फडके बांधून फिरताना दिसायला लागले. अशास्त्रीय माहितीचा एवढा मारा समाजमनावर झाला की ‘स्वाइन फ्लू’ हा एक सौम्य विषाणूजन्य आजार आहे असे म्हणण्यास सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचीही जीभ पुढे रेटेना. त्यामुळेच स्वाइन फ्लूविषयी काही शास्त्रीय माहिती देण्यासाठी हा लेखनप्रपंच! अगदी खरे पाहता हा लेख म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ अशा स्वरूपाचा आहे, कारण हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांतच कदाचित स्वाइन फ्लूने आपला निरोप घेतलेला असेल.
इन्फ्लुएन्झा हा एक विषाणूजन्य रोग आहे. या विषाणूचे ए, बी व सी असे तीन प्रकार आहेत. आजवर आलेल्या सर्व महाभयंकर साथी या ‘ए’ प्रकारच्या विषाणूंमुळे आल्या आहेत. थंडी वाजून ताप येणे, थकवा येणे, स्नायुदुखी, ताप व खोकला ही या रोगांची मुख्य लक्षणे आहेत. १९१८, १९५७ व १९६८ मध्ये इन्फ्लुएन्झाच्या मोठय़ा साथी आल्या. यात लाखो लोकांचे बळी गेले. इन्फ्लुएन्झाचा विषाणू हा स्वत:चे प्रारूप बदलत राहतो. त्यामुळे वर्षांनुवष्रे या रोगाच्या लहान-मोठय़ा साथी येत राहतात.
इन्फ्लुएन्झाची सध्याची महासाथ ही मार्च २००९ पासून सुरू झाली. आता सध्या आपण महासाथोत्तर संक्रमणातून जात आहोत. दरवर्षी इन्फ्लुएन्झाच्या छोटय़ा-मोठय़ा साथी हिवाळ्यात येत राहणार हे भाकीत साथरोग शास्त्रज्ञांनी तेव्हाच केले होते. २००९ पासून २०१४ पर्यंतची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, भारतात दरवर्षी काही हजार रुग्ण रुग्णालयात भरती झाले व त्यापकी ८०० ते १४०० व्यक्ती मरण पावल्या. साथीच्या काळातील अभ्यास असा सांगतो की, अशा वेळी समाजातील १० ते २०% प्रौढ व २० ते ३०% बालकांमध्ये विषाणू संसर्ग होतो. यापकी गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते व त्यापकी काही जण दगावतात. ढोबळमानाने सांगायचे तर एक लाख व्यक्तींना संसर्ग झाला तर त्यापकी एक हजार व्यक्तींना रुग्णालयात भरती करावे लागते व त्यातील ५० ते ६० व्यक्ती मरण पावतात. यावरून या रोगाचे गांभीर्य लक्षात यावे.साथ ‘अनपेक्षित’ नव्हे..
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. स्वाइन फ्लूची ही साथ अचानक किंवा अनपेक्षितपणे आली का? याचे उत्तर नाही असेच आहे. अशा साथी दरवर्षी येणार हे तज्ज्ञांनी वारंवार सांगितले होते व सांगत आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे ‘स्वाइन फ्लूशी लढण्यासाठी आपण व्यक्ती, समाज व आरोग्ययंत्रणा म्हणून तयार होतो का,’ या प्रश्नाचे उत्तरही दुर्दैवाने ‘नाही’ असेच द्यावे लागेल. स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी लसीकरण, विषाणूविरोधी औषधी, मास्क, आरोग्य शिक्षण या सर्वच पातळ्यांवर आपली प्रतिक्रिया ‘नी-जर्क रिस्पॉन्स’ प्रकारची आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला आता लस पुरवण्याविषयी सांगण्यात आल्याची बातमी याचेच निदर्शक आहे. मुख्य म्हणजे आता ही लस देऊन काय होणार? उपचार करणारे बरेचसे डॉक्टर, परिचारिका व बरीचशी जनता यांना विषाणू संसर्गाने आधीच प्रतिकारशक्ती आलेली असणार! मग या लसीची ५० ते ७० टक्के परिणामकारकता व काही दुष्परिणाम यांसह कोण लस घ्यायला धजावेल? २००९ मध्ये लसींचा पुरवठा करूनही त्यातील पुष्कळ साठा वायाच गेला होता. एन-९५ मास्कचा पुरवठाही साथ संपता संपता झाला होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर अशी माहिती पाहायला मिळाली की इंडोनेशिया, बांगलादेश आदी देशांमध्ये बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही माहिती सर्वाना उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग कसा करायचा? आपल्या कोंबडय़ांमध्ये हे विषाणू आढळत आहेत का यासाठी देशभरातील काही कोंबडय़ांचे नमुने विषाणू तपासणीसाठी ठरावीक कालावधीनंतर पाठवायला हवेत. नाही तर अंदाजपंचे लाखो कोंबडय़ा मारण्याची वेळ परत आपल्यावर येईल, जशी दहा वर्षांपूर्वी आली होती! यावरून हे लक्षात घ्यायला हवे की, रोगांच्या साथी अगदीच काही अनपेक्षितपणे येत नाहीत.
स्वाइन फ्लू हा एक सौम्य विषाणूजन्य रोग आहे. अनेक व्यक्तींमध्ये तर रोगाची लक्षणे ओळखणेही शक्य नसते. गरोदर स्त्रिया, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या व्यक्ती यांच्यात रोग गंभीर रूप धारण करू शकतो. अशापकी काही व्यक्ती रोगामुळे दगावू शकतात. साधे सर्दी-पडसे व स्वाइन फ्लू यात फरक करणे पुष्कळच कठीण आहे.
स्वाइन फ्लूविरोधात आपण काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे माहीत नसलेल्या, खातरजमा न केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर न पाठवणे. दुसरे म्हणजे सर्दी-पडसे झाल्यास विश्रांती घेणे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे. वारंवार हात साबण-पाण्याने धुणे व चेहऱ्याला स्पर्श करण्याचे टाळणे. हस्तांदोलन न करता लांबून नमस्कार करणेही महत्त्वाचे ठरेल. भरपूर पाणी पिणे, पोषक आहार घेणे हेही फायद्याचे आहे. स्वाइन फ्लूचे निदान झालेल्या रुग्णाला भेटायला गर्दी करू नये, हे अगदी कळकळीने सांगावेसे वाटते. सर्दी-तापाचे औषध घेऊनही बरे न वाटल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जावे व त्यांच्या सल्ल्याने पुढील उपचार घ्यावेत.

माहितीसंकलन ‘सार्थ’ व्हावे..
दुसरा उपाय हा दूरगामी असा आहे. राज्य पातळीवर एक तज्ज्ञ समिती असावी. या समितीत सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ असावेत. यात आरोग्य सेवेतील निवृत्त अधिकारी, वैद्यकीय शिक्षणातील विशेषज्ञ तसेच स्वयंसेवी संस्थांतील सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ यांचा समावेश असावा. या समितीचे काम संभाव्य साथीबाबतची माहिती संकलित करणे, राज्याच्या दृष्टीने त्या माहितीचा अर्थ लावणे, साथीच्या विरोधात विविध उपाययोजना सुचवणे, तसेच आरोग्य शिक्षणासाठीची माहिती तयार करणे आणि या सर्व बाबतीत सरकारी यंत्रणांना सल्ला देणे असे असावे.
असे झाल्यास स्वाइन फ्लूच काय पण इतर कोणत्याही संभाव्य साथीला आपण समर्थपणे तोंड देऊ शकू. कारण अनपेक्षितपणे आलेली साथ जशी हजारोंच्या बळींचे कारण ठरू शकते तसेच ती गोरगरीब जनतेच्या व सरकारांच्या आíथक शोषणाचे कारणही ठरू शकते. स्वाइन फ्लूच्या साथीमुळे शिकायचा धडा तो हाच की ‘तहान लागल्यावर विहीर खणून उपयोग नसतो!’
लेखक   सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आहेत.