एजाजहुसेन मुजावर
शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानासह होत असलेले प्रयोग अचंबित करणारे आहेत. पिकांच्या अनेक सुधारित वाणांच्या साह्याने वाढत्या लोकसंख्येला पूरक असे भरघोस शेती उत्पादन घेतले जात आहे. पिकांच्या रंग, रूप, आकारामध्येही बदल करणारे प्रयोग होत आहेत. उदाहरणार्थ काळा गहू, पेरू, किलगड, द्राक्षे, बोर इत्यादी. याच मालिकेत आता पांढऱ्या जांभळाची भर पडली आहे, याविषयी..
शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानासह होत असलेले प्रयोग अचंबित करणारे आहेत. पिकांच्या अनेक सुधारित वाणांच्या साह्याने वाढत्या लोकसंख्येला पूरक असे भरघोस शेती उत्पादन घेतले जात आहे. पिकांच्या रंग, रूप, आकारामध्येही बदल करणारे प्रयोग होत आहेत. उदाहरणार्थ काळा गहू, पेरू, किलगड, द्राक्षे, बोर इत्यादी. याच मालिकेत आता पांढऱ्या जांभळाची भर पडली आहे. इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने हे पांढऱ्या रंगाचे जांभूळ पिकविले असून फळबाग उत्पादकांमध्ये सध्या हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
आतापर्यंत आपण जांभळय़ा रंगाचे जांभळाचे फळ पाहात आणि खात आलो आहोत. परंतु जांभळय़ाऐवजी पांढऱ्या रंगाचे जांभूळ समोर आले तर? होय, आता पांढऱ्या रंगाचे जांभूळ खायला मिळू लागले आहे. इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाचे जांभूळ पिकविले आहे. झाडाला लटकलेले घड पाहून एखाद्याला अॅपल बोर लटकत असतील असे वाटेल. पण ही पांढऱ्या रंगाची जांभळे आहेत, असे सांगितल्यानंतर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. आतापर्यंत आपणास जांभळाचा पारंपरिक रंग जांभळा हेच माहीत होते आणि आपण पाहात आलो आहोत. परंतु इंदापूरच्या भारत वामन लाळगे या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाचे जांभूळ पीक यशस्वीपणे घेतले आहे. स्वत:च्या वडिलोपार्जित साडेतेवीस एकर जमिनीपैकी अवघ्या एक एकरभर क्षेत्रात त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळाची फळशेती केली आहे. यापुढचा काळ बाजारात जे विकेल तेच पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. याची चुणूक भारत लाळगे यांच्या शेती प्रयोगातून दिसून येते. त्यांची पांढऱ्या जांभळाची शेती आगामी काळासाठी वरदान ठरावी.
सोलापूर-पुणे महामार्गावर दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर इंदापूर तालुक्यात सरडेवाडी आणि सराफवाडी येथे लाळगे यांची शेतजमीन आहे. यापूर्वी लाळगे कुटुंबीयांनी डाळिंब, पेरू, केळी, सीताफळाची शेती केली होती. विशेषत: आठ-नऊ एकर क्षेत्रात डाळिंब बाग फुलविली होती. परंतु डाळिंबावर तेल्या रोग, मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सलग चार वर्षे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. शेवटी नाइलास्तव डाळिंब बाग काढावी लागली. त्यानंतर एखादे नवीन आणि आर्थिक फायद्याचे पीक लावता येईल काय, याचा विचार भारत लाळगे यांच्या मनात घोळत होता. गरज ही शोधाची जननी असते, असे म्हणतात. लाळगे यांनी आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नवीन पिकाचा शोध घेत असताना त्यांना पांढऱ्या रंगाच्या जांभळाची माहिती मिळाली. पारंपरिक जांभळय़ा रंगाचे जांभूळ माहीत होते. पण पांढऱ्या रंगाचे जांभूळ कसे असेल, या विचाराने लाळगे चकित झाले. एका रोपवाटिकाचालकाकडून मिळालेल्या माहितनुसार पांढऱ्या रंगाच्या जांभळाची रोपे ओडिशात मिळतात,असे समजले. त्याचा नीट अभ्यास करून पांढऱ्या रंगाच्या जांभळाची रोपे आणण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर लाळगे यांनी ओडिशातून संबंधित रोपवाटिकाचालकाशी संपर्क साधला आणि ३०२ रोपे मागविली. ही गोष्ट तीन वर्षांपूर्वीची, २०१९ मधील. शेतात आंतरपीक म्हणून त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळाची लागवड केली. ठिबक सिंचनावर १२ बाय १२ फूट अंतरावर लागवड केलेली झाडे शंभर टक्के यशस्वी होऊन विकसित झाली. गेल्या एप्रिलमध्ये झाडांना फळांचा पहिला बहार आला. २ ते ५ सेंटीमीटर आकाराचे हे फळ आहे. महिनाभर बहार चालला. पहिल्यांदा उत्पादन बेताचे येणे साहजिकच होते. एका झाडाला चार ते पाच किलो जांभळाचे रसाळ, टपोरी, गरदार फळ आले. पुण्याच्या गुलटेकडीत मार्केट यार्डामध्ये लाळगे यांनी ही पांढरी जांभळे विकली. प्रतिकिलो ३०० ते ४०० रूपये भाव मिळाला. यात एकूण उत्पादन खर्चापेक्षा जास्त पैसा पदरात पडला. पुण्यासह मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आदी महानगरांमध्ये पांढऱ्या जांभळाची बाजारपेठ उपलब्ध आहे.
पांढऱ्या जांभळाच्या लागवडीसाठी लाळगे यांनी सुमारे सव्वा लाखाचा खर्च केला होता. रोपे, ठिबक सिंचन, खत, मातीचा झालेला हा खर्च पेरू बागेतील उत्पन्नातून भरून निघाल्याचे लाळगे सांगतात. पांढऱ्या जांभळाची झाडे पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये वाढतात. गायरानाच्या हलक्या व पडिक जमिनीपासून ते सुपीक, मध्यम काळय़ा आणि माळाच्या जमिनीत ही झाडे चांगली वाढतात. माफक तापमान असलेले वातावरण ही झाडे वाढायला पोषक ठरते. कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी औषधामध्ये हे फळपीक पदरात पडते. फळमाशी आणि खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठीही जास्त काही करावे लागत नाही. आपल्या बागेत तर पांढऱ्या जांभळाच्या झाडांना सुदैवाने कोणत्याही प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव झाला नाही, असा दावा भारत लाळगे यांनी केला आहे. एरव्ही, पारंपरिक जांभळय़ा रंगाचे जांभूळ पावसाळय़ात सुरुवातीला खाण्यासाठी उपलब्ध होतात. परंतु पांढऱ्या रंगाचे जांभूळ त्या अगोदरच म्हणजे उन्हाळय़ात शरीर थंड ठेवण्यासाठी एप्रिलमध्येच चाखायला मिळते. सुरुवातीला काही क्विंटलमध्ये माल निघाला. पुढील वर्षांपासून टनामध्ये माल निघेल. एकरी सुमारे तीन-चार लाख रुपयांपर्यंत शाश्वत उत्पन्न मिळेल, पुढील काळात १२ ते १५ वर्षांपर्यंत या पांढऱ्या रंगाच्या जांभळाचा आर्थिक आधार मिळू शकेल, असा विश्वास त्यांना वाटतो.
जगात मधुमेही रुग्ण वरचेवर वाढत आहेत. त्यामुळे जांभळाचे महत्त्वही अबाधित राहणार आहे. शेतीकारणाचा विचार करताना शेतात काय पिकते, यापेक्षा बाजारात काय विकते, हे ज्या शेतकऱ्याला कळते, तोच शेतकरी खऱ्या अर्थाने प्रगतशील म्हणून ओळखला जातो, पांढरे जांभूळ शेती शेतकऱ्यांना प्रगतशील म्हणून ओळख निर्माण करून देताना त्यांची आर्थिक पत वाढविण्यासाठी निश्चितच हातभार उचलण्यास नवा आदर्श ठरण्याची अपेक्षा आहे. विशेषत: नैराश्येतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विचार महत्त्वाचा वाटतो. लाळगे यांच्या पांढऱ्या जांभूळ बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी ते स्वत: आणि बंधू दीपक लाळगे, वैशाली लाळगे, स्मिता लाळगे या कुटुंबातील सदस्यांनी हातभार लावला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपिकांबरोबरच नवीन पिके घेण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. लाळगे कुटुंबीयांचे हेच सांगणे आहे.
पांढऱ्या जांभळाची वेशिष्टय़े
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम क्युमिनी’ (Syzygium cumini) असे आहे. ‘मिरटशिए’ नावाच्या कुळातील हे जांभूळ रानमेवा प्रकारात मोडते. हे जांभूळ प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये आढळते. आपल्याकडे महाराष्ट्रात जांभळासह करवंदे, आवळे, रायआवळे, फणस, ताडगोळे अशा स्वरूपातील रानमेवा विदर्भ, कोकण, मराठवाडा आदी भागात पिकतो. मुंबई, ठाणे तसेच डहाणू परिसरात जांभळे, करवंदे यांचा बहार येतो. उन्हाळय़ात अंगाची लाही लाही झाल्यानंतर पावसाळय़ाच्या तोंडावर जांभूळ, करवंदे यांसारखी रसाळ, गोमटी फळे खायला मिळतात. जिभेवर हमखास चव रेंगाळेल असा हा रानमेवा हवाहवासा वाटतो. त्यात जांभूळ हे तर औषधी गुणधर्मानी युक्त फळ असल्यामुळे त्याचे महत्त्व काही औरच असते. पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे महत्त्व पारंपरिक जांभळाप्रमाणे आणखी वैशिष्टय़पूर्ण ठरते. आंबट, तुरट, मधूर, रसाळ आणि गरदार अशा या फळामध्ये ‘व्हिटामिन सी’ २२ टक्के तर’’व्हिटामिन ए’ ११ टक्के यासारखे औषधी गुणधर्माचे विविध उपयुक्त घटक आहेत. जांभूळ मधुमेहावर विशेष गुणकारी मानला जातो. जांभळाच्या बियाणांचे चुर्ण मधुमेहावरील उत्तम औषध ठरते. जांभूळ रक्त शुध्द करते. यकृत मजबूत होते. मूत्राशयासारखे आजारही नाहीसे करते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप व अन्य उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभूळ पाचक आहे. जांभूळ झाडाची पाने शरीराच्या स्नायूंचे दुखरेपण कमी करण्यास मदत करतात. साधारणपणे १२ मीटर उंचीच्या एका झाडावर ७०० किलोपर्यंत जांभूळ फळे लगडतात.
aejajhusain.mujawar@expressindia.com