१०० अब्ज डॉलरच्या भारतीय आयटी उद्योगक्षेत्रातील अव्वल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इन्फोसिस’चा ढासळता डोलारा सांभाळण्यासाठी एन. आर. नारायणमूर्ती पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून रूजू झाले. सुमारे दोन वर्षांपूर्वी कंपनीची धुरा इतरांकडे सोपवून मूर्ती यांनी इन्फोसिसमधील सक्रिय सहभागाला रामराम केला. पण त्यानंतरच्या काळात सुरू झालेली कंपनीची घसरण रोखणे कंपनीच्या नव्या धुरिणींना जमले नाही. उलट सर्वच बाजूंनी कंपनीची पिछेहाट होऊ लागली. अशात कंपनीचा ‘कार्यभार’ घेणाऱ्या मूर्तीसमोर आव्हाने मोठी आहेत.

परतण्याचा विचार स्वप्नातही नव्हता
इन्फोसिस समूहात पुन्हा येईन, असे कधी स्वप्नही पाहिले नव्हते. मात्र माझी ही दुसरी इनिंग निश्चितच नव्या आव्हानांनी ओतपोत भरलेली असेल. अध्यक्ष कामत यांनी मला महिन्याभरापूर्वी पुन्हा परत येण्याची गळ घातली. कंपनीच्या हितासाठी ते गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते. यानंतर मी गोपालकृष्णन आणि शिबुलाल यांच्याही चर्चा केली. तेही यासाठी उत्सुक दिसले.
कार्यकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी मी सलग सात वर्षे निभावली आहे. मध्यंतरी अ-कार्यकारी अध्यक्षही राहिलो आहे. त्यामुळेच पुन्हा कार्यकारी म्हणून ‘अ‍ॅक्टिव’ होताना मला त्यात नवीन आव्हाने दिसत आहे. माझ्या प्रौढ आयुष्यातील इन्फोसिचा अंक हा एक यशस्वी कहाणी राहिला आहे.
 एन. आर. नारायणमूर्ती – इन्फोसिसचे संस्थापक व अध्यक्ष

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यासाठी
एकूणच माहिती तंत्रज्ञान उद्योग आणि इन्फोसिसदेखील अनोख्या अशा आव्हानात्मक संक्रमणातून प्रवास करत आहे. त्यामुळे मूर्ती यांच्या अमूल्य नेतृत्वाखालीच यातून अवधोकपणे पार जाता येईल. कंपनीच्या सर्व भागधारकांना, विशेषत: छोटय़ा आणि मोठय़ा गुंतवणूकदारांना हा विश्वास देण्यासाठीच संचालक मंडळाने नव्या अनोख्या फेरबदलाचा निर्णय घेतला आहे.
 -के. व्ही. कामत- मावळते अध्यक्ष

वरच्या फळीतील पोकळी
वयाची ६५ वर्षे गाठल्यानंतर एन. आर. नारायणमूर्ती हे २० ऑगस्ट २०११ रोजी इन्फोसिसमधून निवृत्त झाले होते. आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्ष के. व्ही. कामत यांच्याकडे सूत्रे सोपवून ते कंपनीचे अ-कार्यकारी अध्यक्ष बनले होते. नंदन निलेकणी आणि मोहनदास पै हे देखील समूहातून बाहेर पडले. निलेकणी यांची भारत सरकारच्या नव्याने अस्तित्वात आलेल्या विशेष ओळखपत्र प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर मनुष्यबळ विकास विभाग समर्थपणे हाताळणारे पै हे मणिपाल विद्यापीठाचे सर्वेसर्वा म्हणून रुजू झाले.
घसरता आशावाद
भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाची शिखर संघटना नॅसकॉमने तमाम क्षेत्राची वाढ दुहेरी आकडय़ात अपेक्षित केली असताना खुद्द इन्फोसिसने ती निम्म्यावर असण्याचा अंदाज बांधला होता. चौथ्या तिमाहीसह गेल्या आर्थिक वर्षांचे कंपनीचे वित्तीय निष्कर्षही विश्लेषकांच्या आशावादाला लाजविणारे ठरले. मूर्ती बाजूला होण्यापूर्वीच निलेकणी आणि पै हे दोन मोहरे समूहातून दूर झाले होते. त्याचे प्रतिबिंब कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांवर अपेक्षितपणे पडलेच. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत अवघी ६ टक्के वाढ नोंदविली. शिवाय दर तिमाहीला कंपनी आगामी अंदाज खुंटवू लागली.
दुसरे स्थान डळमळीत
१०० अब्ज डॉलरच्या घरात असलेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगातील इन्फोसिसची वाटचाल काहीशी मंदावत चालली. अमेरिकेच्या भांडवली बाजारात एकमेव सूचिबद्ध असलेल्या इन्फोसिसचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान डळमळीत होऊ लागले. उलट पहिल्या स्थानावरील टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसची उलाढाल ११ अब्ज डॉलरचा पल्ला पार करती झाली. हीच स्थिती विप्रो, टेक महिंद्रची असताना एचसीएल, कॉग्निझन्टसारख्या छोटय़ा कंपन्यांनीही एकूणच भारतीय माहिती तंत्रज्ञान यादी विस्कळीत केली. महसुली उत्पन्नाच्या बाबत अद्यापही इन्फोसिस दुसऱ्या स्थानावर असली तरी तिचे स्थान अस्थिर होण्याच्या हालचाली भोवताली वाढल्या. जोडीला मार्च २०१३ अखेर संपलेल्या तिमाहीतील कंपनीचा नफा आधीच्या तिमाही तुलनेत ३१.२ टक्क्यांवरून २३.६ टक्क्यांवर विसावला.
गुंतवणूकदारही धास्तावले
प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये रिलायन्सबरोबर सिंहाचा वाटा राखणारा इन्फोसिसचा शेअर निकालाच्या दिवशीही २१ टक्क्यांनी आपटला होता. २०१३ मध्ये निकालापर्यंत समभाग मूल्य ४ टक्क्यांनी वधारले असले तरी एकूण माहिती तंत्रज्ञान निर्देशांक तसेच अन्य आयटी कंपन्यांच्या समभाग मूल्याच्या तुलनेत त्यातील वाढ रुंदावलेलीच आहे.
कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता
इन्फोसिसमध्ये नोकरी म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी असा सर्वसामान्य समज एके काळी होता. दिवसेंदिवस हा मान मात्र कमी होत गेला. अमेरिकेतील मंदीपोटी डॉलरमध्ये मिळणारे उत्पन्नही रोडावू लागले. कंपनीतील कर्मचारी गळती दशकातील सर्वोच्च स्थानावर पोहोचली. ती रोखण्यासाठी समभागाच्या रूपात कर्मचाऱ्यांना बक्षिसी देण्याचा उद्योगातील पहिलाच प्रघातही ओसरू लागला.  

मूर्ती यांच्यासमोरील आव्हाने
* अमेरिकास्थित कॉग्निजंट, टाटांची टीसीएस यांसारख्या कंपन्यांच्या तुलनेत घसरलेला नफ्याचा आकडा सुधारणे
* अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या व्हिसाच्या खटल्यांची सोडवणूक
* गेल्या काही वर्षांमध्ये माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले बदल आत्मसात करणे, त्यांच्याशी जुळवून घेणे
* सर्व भागभांडवलदारांचा विश्वास संपादन करणे
* इन्फोसिसतर्फे तिमाही आणि वार्षिक पद्धतीने दिले जाणारे मार्गदर्शनपर सल्ले, जे सध्या बंद केले गेले आहेत, ते पुन्हा सुरू करणे

नियमांत दुरुस्ती
नारायण मूर्ती यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदी येता यावे यासाठी ‘इन्फोसिस’ने आपल्या नियमात काही बदल केले. त्यानुसार,  कार्यकारी अध्यक्षांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ७५ वर्षांवर करण्यात आले आहे. तर स्वतंत्र संचालक म्हणून के. व्ही. कामथ यांना कार्यरत राहता यावे यासाठी संचालकांचे निवृत्तीचे वयही ६० वरून ७० वर्षांवर आणण्यात आले आहे.

कॉपरेरेट गव्हर्नन्सचे प्रणेते
नारायण मूर्ती यांचा जन्म १९४६ साली झाला. त्यांनी मैसूर येथून अभियांत्रिकीतील पदवी आणि आयआयटी कानपूर येथून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. १९८१ साली सहा सहकारी अभियंत्यांसह त्यांनी अवघ्या १० हजार रुपयांच्या भांडवलावर ‘इन्फोसिस’ या कंपनीची स्थापना केली. विशेष म्हणजे, या सहाही जणांनी बहुतेक भांडवल आपापल्या पत्नीकडून उभे केले होते. मूर्ती यांनी १९८१ ते २००२ या कालावधीत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. सन २००२ ते २०११ या कालावधीत त्यांनी इन्फोसिसचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. भारतात कॉर्पोरेट-गव्हर्नन्सची सुरुवात करणारे प्रणेते म्हणून नारायण मूर्तीची नोंद घ्यावी लागेल. सन २०१२ मध्ये ‘फॉच्र्युन’ नियतकालिकातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सर्वोत्तम १२ उद्योजकांच्या यादीत त्यांचा समावेश होता. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. १ जून २०१३ पासून येती पाच वर्षे मूर्ती एक रुपया वार्षिक वेतनावर काम करतील.

Story img Loader