बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती.. तुकारामांच्या युक्तीतील हे मर्म वाईतील निकमवाडी शाळेतील मुलांनी चांगलेच अंगी बाणवलेले आहे. या शाळेत गुणवत्तेचा झरा सतत पाझरत ठेवण्याचे काम केले आहे गणेश लोकरे या शिक्षकाने. उपक्रमांमधली कल्पकतेबरोबरच स्वत:च्या पेशाशी निष्ठा, विद्यार्थ्यांविषयीची आस्था, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची तळमळ असलेल्या सहशिक्षक धनवंती लोकरे, संतोष निकम या शिक्षकांची साथ मिळाली आणि ज्ञानरचनावादी शिक्षणातून त्यांनी निकमवाडी शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला.
पुणे-सातारा महामार्गावर भुईज गावापासून पूर्वेला किसन वीर साखर कारखान्याला वळसा घालून जांब गावच्या पुढे असणारे बागायती ८३५ लोकवस्तीचे गाव म्हणजे निकमवाडी. एका साध्यासुध्या इमारतीत पहिली ते पाचवीपर्यंतच्या या तीनशिक्षकी शाळेचा २००७ मध्ये पट होता ३९. आज या शाळेत ९७ विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी गावातील ४५ आणि उर्वरित ५२ बाहेरच्या तीन तालुक्यांतील १४ गावांतून येतात. यापकी २५ मुले इंग्रजी माध्यमातून मराठीकडे वळलेली.
तालुक्यात ‘वाई पॅटर्न’ म्हणून ८२ शाळांत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. निकमवाडीची शाळा त्यापकीच एक. यात मुलांना फळ्यावर शिकविण्याचे प्रमाण फारच कमी. त्याऐवजी मुलांना गटागटांत बसून शिकविले जाते. प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी वेगळा उपक्रम राबविणारे शिक्षक येथे आहेत. गणिताच्या बेरीज-वजाबाकीबरोबरच मराठी आणि इंग्रजी भाषांसाठी रोजच्या वापरातील शब्दांचा वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. यातूनच ‘वाई पॅटर्न’ पुढे आला.
गणिताच्या ‘कळा’ आम्हाला नाहीच!
इथली पहिलीच्या वर्गातील सहा वर्षांची मुले जेव्हा एकक-दशकापासून शेकडा, हजार, लाख, कोटी आणि अब्जापर्यंतची संख्या लिहून-वाचून दाखवितात तेव्हा या शाळेत आजूबाजूच्या गावांतून मुले का येतात, याचे उत्तर मिळते. ही मुले फळ्यावर पूर्णाक-अपूर्णाकाची गणिते सहज सोडवितात. प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत व्यवहारातून कळावी म्हणून मुलांना विस्तारित किंमत देण्याचे धाडस लोकरे सर दाखवितात. साहजिकच गणिताच्या पेपरच्या दिवशी पोटात ‘कळ’ येण्याचे कारण सांगणारा विद्यार्थी येथे शोधूनही सापडत नाही, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया प्राथमिक वर्गामध्येच पक्का होऊन जातो.
आशय एक, दृष्टिकोन अनेक
विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढावी यासाठी आशयातील संगती, विसंगती, पुनरावृत्ती, क्रम, रचना, सौंदर्य, नवी माहिती शोधण्याची शोधक वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न असतो. त्याकरिता शाळेच्या व्हरांडय़ात विविध तक्ते, लिटरची मापे, वजने, लाकडी ठोकळे, प्रत्येक घटकानुसार तक्ते, शब्दकोडे, वाक्यकोडे, चित्रे ठेवलेली आहेत. वस्तूंच्या हाताळणीतून, त्याचा प्रत्यक्ष वापर करत मुलांचे स्वयंअध्ययन सुरू असते. निरीक्षणाआधारे तो वहीत लिहितो. लाकडी ठोकळ्याद्वारे मुले पाढे तयार करतात. अपूर्णाकांच्या चकत्यांचा वापर करून उदाहरणे सोडवितात. वस्तूंच्या वापराद्वारे ज्ञाननिर्मिती करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात येते. एकाच आशयाकडे विविध दृष्टिकोनांतून पाहण्याची क्षमता मिळवणे हा या सगळ्याचा उद्देश. हे करत असताना शिक्षकाची भूमिका असते मदतनीसाची, कारण शिक्षक केवळ विद्यार्थ्यांला शिकण्यासाठी उद्युक्त करतो, त्यात उत्सुकता, जिज्ञासा निर्माण करतो, या ज्ञानरचनावादाच्या तत्त्वावर इथल्या शिक्षकांचा पूर्ण विश्वास आहे.
शाळा परिसराचा नेटका वापर
शाळेचा परिसर फक्त तेवीस गुंठय़ांचा आहे. याचा नीटनेटका आणि पुरेपूर वापर केला आहे. तीन वर्गखोल्या, व्हरांडा, मुख्याध्यापक कार्यालय आणि मुलामुलींचे स्वच्छतागृह, अपंग मुलांसाठी वेगळे स्वच्छतागृह, स्वतंत्र कमोड चेअर, हँडलिंग रॅम्प शाळेने नेटकेपणाने बसविले आहेत. शौचालयाच्या भिंतींवर विविध संदेश देणारी बोलकी चित्रे काढलेली आहेत. शालेय परिसर अतिशय स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते. शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची सभा नियमित होते. पालकांच्या सहभागामुळे शाळेला तीन संगणक, एलसीडी प्रोजेक्टर मिळाला. प्रत्येक परीक्षेनंतर पालकांना मुलांची आकलनशक्ती, ती कुठे कमी पडतात याची माहिती दिली जाते. सरकारचे विविध उपक्रम उदाहरणार्थ शिक्षणाचा अधिकार, बालकांचा हक्क, नागरिकांची सनद, माहितीचा अधिकार, शाळेतील अनुदाने, शासकीय योजनांची माहिती करून देऊन त्यांच्यावर उद्याच्या सजग नागरिकाचे संस्कार नकळत केले जातात.
वाचा आणि अभिप्राय द्या
शाळेचे सुसज्ज असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयात ४४१ साने गुरुजींचीच पुस्तके आहेत. मुले दर आठवडय़ाला वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय ‘माझी आवड’ या सदरात लिहितात. ‘पुस्तक परीक्षण’ दररोजच्या परिपाठात केले जाते. त्यामुळे मुलांना आवडलेले पुस्तक, वाचलेले पुस्तक, त्यावर भाषण किंवा निबंध उत्कृष्टरीत्या सादर करता येतात. अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविले जाते.
शाळेला आतापर्यंत १५०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. ‘ग्रामीण गुणवत्ता विकास’ कार्यक्रमाअंतर्गत शाळेला सलग तीन वर्षे पहिला क्रमांक मिळाला आहे. पुढच्या वर्षीचे प्रशस्तिपत्र लावण्यासाठी शाळेच्या िभतीवर आत्ताच जागा आरक्षित करून ठेवण्याइतका आत्मविश्वास या शाळेकडे आहे.
खरे तर हा आत्मविश्वास वाईच्या मातीतच आहे. इथेच केवलानंद सरस्वती यांच्या ‘प्राज्ञपाठ शाळे’ने गुरुकुल पद्धतीतून देशाला महान विभूती दिल्या. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून ज्ञानाचा हा वारसा पुढे नेला. वाईची निकमवाडीची शाळादेखील नव्या ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीतून ही परंपरा जपते आहे. निकमवाडीबरोबरच वाईतील सहा शाळा ‘आयएसओ’ प्रमाणपत्रधारक होण्यामागे बहुधा हीच प्रेरणा असावी. म्हणूनच शिक्षणाचा हा ‘वाई पॅटर्न’ समजून घेण्यासाठी आज राज्यभरातून शिक्षणतज्ज्ञांची येथे जत्रा भरते आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वास पवार
reshma.murkar@expressindia.com

विश्वास पवार
reshma.murkar@expressindia.com