|| विनय सहस्रबुद्धे
विश्वसंस्कृती दिन विशेष
अमेरिकेतील सुप्रसिद्ध ‘केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चे भूतपूर्व अधिष्ठाते जोसेफ नाय यांनी १९९० मध्ये ‘बाउंड टू लीड : द चेंजिंग नेचर ऑफ अमेरिकन पॉवर’ हे पुस्तक लिहिले आणि त्यात त्यांनी पहिल्या प्रथम ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द वापरला. हिंदीत काही ठिकाणी ‘मृदू शक्ती’; असा त्याचा अनुवाद केलेला आढळतो. मराठीत आपण सौम्य-शक्ती असा शब्द वापरू शकतो. पण बहुदा ‘सदिच्छा-संपदा’ हा त्यासाठी अधिक चांगला शब्द ठरावा!
गेल्या जानेवारीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या चार महिन्यांत नव्याने जाणवलेली एक जुनीच गोष्ट म्हणजे भारताबद्दल असलेली विश्वव्यापी सदिच्छा. भारताच्या वाटय़ाला जगात सर्वदूर येणारी फार मोठी सदिच्छा-संपदा पाहता वैश्विक सदिच्छा सूचिकांक कोणी तयार करीत असतीलच तर त्यात भारत सर्वोच्च स्थानी असायला हरकत नाही. सौदी अरेबिया असो वा अफगाणिस्तान, अनेक देशांमधले लोक पाकिस्तान आणि पाकिस्तानी लोकांचा तिटकारा करतात आणि भारतीयांना हसतमुखाने आलिंगन देतात हा अनेकांचा अनुभव आहे. बॉलिवुडमधले सिनेमे भारताचे अनभिषिक्त राजदूत म्हणता येतील एवढी ‘भारत साक्षरता’ वाढविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय खाद्यपदार्थाची मोहिनीही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. एवढं सगळं असूनही विश्वव्यापी सदिच्छा-संपदेच्या या भांडवलावर आपण पब्लिक डिप्लोमसी किंवा लोकनयनाच्या आघाडीवर जेवढी आगेकूच करायला हवी तेवढी करू शकलेलो नाही!
सुमारे वर्षभरापूर्वी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सेंटर फॉर पब्लिक डिप्लोमसीने ‘द सॉफ्ट पॉवर ३०’ नावाचा एक अहवाल प्रकाशित केला, त्यात भारताचा क्रमांक पहिल्या विसातही येऊ शकला नाही, हे वास्तव उल्लेखनीय आहे.
भारताकडे जगाची सदिच्छा-संपदा इतक्या मोठय़ा प्रमाणात असूनसुद्धा विश्वाच्या व्यवहारांवर भारतीय समाज-संस्कृतीची मुद्रा पुरेशी ठळकपणे का उमटत नाही? नेमकी कशाकशाची उणीव आहे? भारताबद्दलचे कुतूहलमिश्रित आकर्षण भारताचा प्रभाव वाढविण्यात जेवढे अपेक्षित आहे, तेवढी महत्त्वाची भूमिका का बजावू शकत नाही? दिनांक २१ मे च्या ‘विश्व संस्कृती दिना’च्या निमित्ताने या प्रश्नांचा मागोवा घेणे उद्बोधक ठरावे.
जोसेफ नाय यांनी सौम्यशक्तीची जी व्याख्या सांगितली आहे, तिही लक्षात घेण्याजोगी आहे. ‘ताकदीच्या, मुजोरीच्या किंवा पैशाच्या माध्यमातून नव्हे तर मने वळवून इतरांना आकर्षित करून घेण्याची आणि त्यांना सामावून घेण्याची क्षमता’ अशा शब्दांत जोसेफ नाय यांनी सौम्यशक्ती व्याख्यित केली आहे!
ही जी (विदेशी लोकांची) मने वळवून इतरांना आकर्षित करून सामावून घेण्याची क्षमता सौम्यशक्तीच्या किंवा सदिच्छा-संपदेच्या केंद्रस्थानी असते ती भारताच्या अंगभूतच असण्याची अनेक कारणे आहेत. भारतीय संस्कृतीची प्राचीनता, तिची विश्वकल्याणाची सैद्धांतिक बैठक, या बैठकीची कालातीतता, भारतीय संस्कृतीतील विविधता, मूलत: निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली, इथे जन्मलेली महाकाव्ये आणि इथेच विकसित झालेल्या लोककला आणि आधुनिक कला हा विविधरंगी विशालपट विश्व समुदायाला आकर्षित करतो. भारतीय संस्कृतीचा चिवटपणा, विजिगीषु आणि या गुणधर्माचे प्राणतत्त्वच म्हणता येईल अशी स्वागतशीलता, या सगळ्याचे आकलन विचारी अ-भारतीयांना खूप मोहक वाटते. ‘नित्य नूतन, चिरपुरातन’ ही आपली ओळख भारताला समजून घेणाऱ्यांच्या मन:पटलावर ठसा उमटविते.
मागे एकदा जर्मनीच्या प्रवासात रेल्वे डब्यात भेटलेल्या एका तरुण जर्मन मुलाने भारतात खूप बेशिस्त, अस्वच्छता, नियमपालनाबद्दल बेफिकिरी आणि भ्रष्टाचार आपण अनुभवला खरा; पण तरीही आपण भारताच्या प्रेमात पडलो आहोत, अशी प्रांजळ कबुली दिली होती. या भारत-प्रेमाचं कारण विचारल्यानंतर तो म्हणाला, ‘तुमच्याकडच्या गरीब, परिश्रमी लोकांच्या डोळ्यातही एक चमक दिसते. या उलट आमच्याकडे बघा. सर्वाचे डोळे निस्तेज..!’ सारांश काय, तर भारतीय लोक व्यवहार आणि लोकजीवनाचेही एक आकर्षण आहे, बहुधा त्यातील रसरशीतपणामुळे!
आक्रमक आणि बदमाश राष्ट्र अशी भारताची ओळख इतिहासकाळातही कधी नव्हती, आजही ती नाही. शिवाय अ-निवासी भारतीयांच्या त्या-त्या देशातील योगदानाचा एक इतिहास आहे. व्यक्तिगत पातळीवर अनेक भारतीय तंत्रज्ञांनी जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रात दिलेलं योगदान हाही एक मुद्दा बनतो. मूलभूत कुतूहल, प्राचीनतेचा दबदबा, अनिवासी भारतीयांचे योगदान भारतीय समाजाच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाची मोहिनी हे घटक भारताच्या संदर्भात जगभर दिसून येणाऱ्या सदिच्छेचे मूलाधार म्हणता येतील.
यात भर पडते, भारतीय प्रदर्शनीय (परफॉर्मिग) कलांच्या आकर्षणाची. प्रत्येक समाजात आणि प्रत्येक संस्कृतीत नृत्ये आहेत, संगीतही आहे, पण भारतीय नृत्ये, संगीत, पारंपरिक भारतीय लोककला, वाद्ये आणि सुरावटी त्यातले नादमाध्युर्य, त्यातून होणारे संप्रेषण आणि सूचन, त्यातली प्राचीनता आणि आध्यात्मिकता देखील या सर्वाना ‘एकमेवाद्वितीय’ बनवते, हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा.
अशीच मोहिनी भारतीय खाद्य वस्तू आणि व्यंजनांचीही आहे. परदेशातले कोणतेही भारतीय उपाहारगृह, व्यवसायाअभावी बंद पडल्याचे उदाहरण नसेल. जगाची बाजारपेठ व्यापण्याची क्षमता असलेला भारतीय संस्कृतीचा आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे भारतीय हस्तकला, ज्यात भारतीय विणकाम, धातुकाम इ. चाही समावेश अर्थातच होतो. जव्हारच्या वारली चित्रकलेपासून छत्तीसगढी धातुशिल्पापर्यंत आणि आसामच्या मेखलेपासून दक्षिणेच्या अनेक प्रांतांमधील कागदी लगद्याच्या मुखवटय़ांपर्यंत कलावस्तू साकारणारे किती तरी ‘कारिगर’ अद्यापही उपेक्षितच आहेत. या सर्व हस्तकलांच्या उत्पादन प्रक्रियेत नव्या बाजार व्यवस्थेशी सुसंगत घटकांचे भान ठेवून सुधारणा करता आल्या, तर जगाची बाजारपेठ त्यांनाही खुली होणे अवघड ठरू नये.
२१ मे हा विश्वसंस्कृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या शतकाच्या प्रारंभी अफगाणिस्तानातल्या बमियानच्या बुद्ध मूर्तीच्या विध्वंसानंतर सांस्कृतिक सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता वृद्धिंगत करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या निमित्ताने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद एक प्रकारे एका नव्या कार्यसूचीचे अनावरण करीत आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंधीच्या विकासाचे गंतव्य स्थान सदिच्छा-संपदेचा किंवा सौम्यशक्तीचा विकास हेच असणार आणि असायला हवे. त्यासाठी एका बाजूला सौम्यशक्तीच्या विकासाची कार्यसूची विस्तृत करायला हवी आणि दुसरीकडे या कार्यसूचीच्या परिघाचा विस्तार करून त्यात आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाजघटकांच्या आकांक्षा, त्यांच्या जीवनशैलीत दडलेले सांस्कृतिक संचित, त्यांच्या सफलतेचे, संघर्षांचे प्रतिबिंब हे सारे ढळकपणे उमटेल हे सुनिश्चित करायला हवे.
यासाठी अर्थातच खूप तयारी करावी लागेल. पारंपरिक लोककलांचे प्र-लेखन, वैश्विक भाषांमधून त्यांचे सादरीकरण, त्यातील रंजकता न गमावता त्याबद्दलचे आकलन वाढविण्यासाठीची र्सवकष योजना, हे सर्व रचनाबद्ध प्रयत्नांशिवाय शक्य नाही. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद येणाऱ्या काळात या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे. भरतनाटय़मची प्रस्तुती असो वा आसाम-अरुणाचलातील..
असणार आणि असायला हवे. त्यासाठी एका बाजूला सौम्य शक्तीच्या विकासाची कार्यसूची विस्तृत करायला हवी आणि दुसरीकडे या कार्यसूचीच्या परिघाचा विस्तार करून त्यात आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाज-घटकांच्या आकांक्षा, त्यांच्या जीवनशैलीत दडलेले सांस्कृतिक संचित, त्यांच्या सफलतेचे, संघर्षांचे प्रतिबिंब, हे सारे ठळकपणे उमटेल हे सुनिश्चित करायला हवे.
यासाठी अर्थातच खूप तयारी करावी लागेल. पारंपरिक लोककलांचे प्र-लेखन, वैश्वित भाषांमधून त्यांचे सादरीकरण, त्यातील रंजकता न गमावता त्याबद्दलचे आकलन वाढविण्यासाठीची र्सवकष योजना हे सर्व रचनाबद्ध प्रयत्नांशिवाय शक्य नाही. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद येणाऱ्या काळात या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे. भरतनाटय़मची प्रस्तुती असो वा आसाम-अरुणाचलातील मिशिंग जमातीचे नृत्य, या प्रकारांचे रंजनमूल्य निर्विवाद आहे. पण प्रेक्षक रियाधचे असोत, टोकियोचे वा मेक्सिकोचे, या नृत्य प्रकारांमागचे विषयसूत्र, पदन्यासांचे सूक्ष्म अर्थ, आविर्भाव आणि हाताच्या हालचालींतून होणारे संप्रेषण हे त्यांना समजणाऱ्या भाषेतून उलगडून दाखविल्याशिवाय भारतीय संस्कृती आणि सभ्यता (सिव्हिलिझेशन) यांच्याबद्दलचे आकलन निर्माण होऊ शकणार नाही. हे घडवून आणणे सोपे नाही, पण अशक्यही नाही! रांगोळीच्या विविध प्रकारांपासून आपल्या शिरोभूषणांपर्यंत आणि शेती संस्कृतीतील नानाविध परंपरांपासून लग्नसमारंभांच्या प्रदेश-विशिष्ट, समुदाय-विशिष्ट पद्धतींपर्यंत आपल्याकडची विविधता समजावून सांगताना हे वैविध्य मूळच्या एकत्वाचेच विविधांगी प्रकटीकरण कसे आहे तेही समजावून सांगावे लागेल!
हे सर्व घडवून आणण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद सक्रिय आहे. विद्यमान आंतरराष्ट्रीय राजकारणात सॉफ्ट पॉवरचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन चीनसारखा देश जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. जगभर त्यांच्या कन्फ्युशियस केंद्राचे जाळे विणले जात आहे आणि विद्यापीठांमधून चीन अध्ययन केंद्रे उघडण्यासाठी वारेमाप पैसा खर्च केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या या नव्या क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण करण्यासाठी नव्या पद्धतीचे प्रयत्न, नव्या उमेदीने आणि परिणामाभिमुखतेचा आग्रह धरून करावे लागतील हे तर उघडच आहे.
अशा प्रयत्नांमध्ये समन्वयाची खूप व्यापक गरज आहे, नेहमीच असते. त्यासाठी सर्वच सरकारी खात्यांना कप्पेबंदी झुगारून पुढे यावे लागेल. त्यासाठीच या महिन्यात नीति आयोगाच्या माध्यमातून एक बौद्धिक विमर्श (ब्रेन स्टॉर्मिग) योजण्यात येत आहे. ‘सामरिक, राजनयिक वा आर्थिक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विकासात सांस्कृतिक संबंध विकासाची केंद्रवर्ती भूमिका’ हे या विमर्शाचे मुख्य सूत्र आहे. उद्योग, वाणिज्य, शिक्षण, संस्कृती, सूचना-प्रसारण, वस्त्रोद्योग अशा नानाविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
सांस्कृतिक संबंधांच्या विकासाची दिशा एक असली तरी प्रत्यक्ष कार्ययोजनेचा तपशील देशानुसार बदलतो, बदलायला हवा. त्या दृष्टीने प्रत्येक देशाशी असलेल्या भारताच्या सांस्कृतिक संबंधांच्या विकासाची येत्या तीन वर्षांसाठीची रूपरेखा भारतीय राजदूतांच्या मदतीने तयार केली जात आहे.
जगात सुमारे ३७ शहरांमधून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची केंद्रे आहेत. यांपैकी अनेक केंद्रांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, भारतीय नृत्ये, हिंदी वा संस्कृत भाषा आणि योग या विषयांचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही चालविले जातात. या अभ्यासक्रमांमध्ये सुसूत्रता यावी व अध्यापनाचे प्रस्तावीकरण व्हावे, मूल्यांकनाची शास्त्रीय व समान पद्धत विकसित व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांमधून ज्या विद्यापीठात भारत, द. आशिया, संस्कृत, योग, हिंदूी वा प्राच्यविद्येचे विभाग आहेत त्या विभागप्रमुखांना एकत्र आणून त्यांचा अभिप्राय समजून घेण्याचीही योजना कार्यान्वित झाली आहे. येणाऱ्या काळात लोककलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी व तशी ती मिळाल्यास त्यात अधिक सफाईदारपणा आणण्यासाठीचे प्रशिक्षण याचेही प्रयत्न देशभरातील १७ केंद्रांमधून घडवून आणण्याची योजना आहे.
भारतातील प्रादेशिक आणि भाषिक, लोक सांस्कृतिक विविधता राज्यकारभाराच्या संदर्भात अनेकदा नवे प्रश्न आणि नवी आव्हाने निर्माण करते. पण चांगली गोष्ट अशी की, या वैविध्याला संपदा मानून सरकारात व सरकारबाहेरही काम करण्याची पद्धत आता पुरेशी रुजली आहे. त्यामुळे अनेक विकसित देशांचे जसे बाह्य़त: अमेरिकीकरण झाले आहे तसे ते भारतात होण्याची शक्यता नाही. भारताची वैशिष्टय़पूर्ण ओळख ज्या घटकांमुळे निर्माण झाली आहे तेच घटक भारतीय सौम्य शक्तीचा वा विश्वपटलावरील भारतीय लोकप्रभावाचा मूलाधार आहेत. उद्याच्या २१ मे रोजी विश्वसंस्कृती दिनाच्या निमित्ताने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पं. दीनदयाल उपाध्याय स्मारक आंतरराष्ट्रीय व्याख्यानाचा शुभारंभ करताना भारतीय लोकप्रभावाच्या संपदेचीच चर्चा करणार आहेत. एखाद्या देशाच्या वैश्विक लोकप्रभावात वाढ होताना त्या देशाविषयीचे स्वाभाविक कुतूहल आणखी जाणून घेण्याची इच्छा हळूहळू आकर्षणात रूपांतरित होते. पण खरी सौम्य शक्ती या आकर्षणाचे रूपांतर आकलनात घडून येते तेव्हाच निर्माण होते. भारताबद्दलचे वैश्विक समुदायाचे सम्यक आकलन वाढविणे हे भारतीय सौम्य शक्तीच्या विकासमार्गापुढचे महत्त्वाचे आव्हान आहे.
सॉफ्ट पॉवरला सौम्य म्हणा, जागतिक सदिच्छा संपदा म्हणून संबोधा किंवा वैश्विक लोकप्रभाव म्हणून तिचे वर्णन करा, या संकल्पनेचा कॅनव्हास खूप मोठा आहे. त्या कॅनव्हासवरचे ठळक ठिपके विश्वसंस्कृती दिनाच्या निमित्ताने समोर यावेत यासाठी हा लेखनप्रपंच!
vinays57@gmail.com
(लेखक भारती सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आहेत.)