‘परीक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे’ असे सांगणाऱ्या सॉक्रेटिसच्या (इ.स.पू. सुमारे ४७०-३९९) स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र संघाने दर वर्षी नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या तत्त्वज्ञान या विषयाची स्थिती कशी बिकट झाली आहे आणि त्यावरील संभाव्य उपाय कोणते असू शकतात, याचे काटेकोर परीक्षण होणे आवश्यक आहे. त्याची ही प्रस्तावना.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘तत्त्वज्ञान या विषयाच्या अध्ययन-अध्यापनाची आज महाराष्ट्रात जी अवस्था आहे ती फारशी स्पृहणीय नाही, ही गोष्ट या विषयाचे अध्यापक स्वत: सहजी मान्य करतील असे मला वाटते’’ हे प्रा. मे. पुं. रेगे यांचे विधान (१९९४); ‘महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ हा प्रा. दि. य. देशपांडे यांचा लेख (१९९६), ‘तत्त्वज्ञान- एक स्वदेशी विलापिका’ हा प्रा. प्रदीप गोखले (हयात) यांचा लेख (१९८८) आणि ‘तत्त्वज्ञान या विषयाबाबतचा विद्यार्थ्यांचा कल पाहण्यासाठी केलेले सर्वेक्षण व संशोधन’ हा प्रा. माधवी कवी यांचा एक लेख (१९९३), अशा प्रातिनिधिक लेखांमधून महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची अवनती स्पष्ट होते. ती दोन प्रकारची आहे. पहिली तत्त्वज्ञानात्मक अवनती आणि दुसरी भौतिक अवनती. दोन्ही बाजूंनी हा विषय अतिशय व्यापक व गंभीर आहे.
महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानात्मक अवनती हा अतिशय गहन, गंभीर, शिस्तशीर आणि बऱ्याचशा बंदिस्त चर्चेचा विषय असल्याने तो विषय येथे घेण्याचे कारण नाही. येथे चर्चा करावयाची ती भौतिक अवनतीची.
तत्त्वज्ञानाची भौतिक अवनती ही महाराष्ट्रीय समाज, राज्य शासन, विद्यापीठ प्रशासन, त्यांची सत्तामंडळे, शिक्षणसंस्था, महाविद्यालये, तेथील अन्य विषयांचे सहाध्यायी प्राध्यापक या घटकांच्या तत्त्वज्ञानाच्या काहीशा द्वेषातून आणि विद्यार्थी वर्गाच्या अज्ञान व अनास्थेतून जाणवते.
भौतिक अवनतीचे हे सर्वच घटक सत्ताधिकारी असल्याने अतिशय प्रभावी आहेत. सध्या मुंबई, पुणे, शिवाजी, अमरावती, नागपूर, उत्तर महाराष्ट्र, सोलापूर अशा केवळ सात विद्यापीठांत तत्त्वज्ञान हा विषय आहे. शिवाजी आणि सोलापूर विद्यापीठांच्या काही महाविद्यालयांत हा विषय शिकविला जातो, पण खुद्द विद्यापीठांत मात्र तत्त्वज्ञान विभाग नाहीत. भारतीय तत्त्वज्ञानाचा वारसा जपणाऱ्या टिळक विद्यापीठात हा विषय नुकताच आनंदाने बंद केला गेला.
कला शाखेत तत्त्वज्ञान हा विषय जनरल आणि स्पेशल अशा दोन स्तरांवर मराठी आणि इंग्लिश माध्यमांतून शिकविला जातो. ग्रामीण भागांत स्पेशलसाठी एक-दोन, शहरी भागांत चार-पाच आणि जनरलसाठी दोन्हीकडे एक ते दहा-बारा अशी विद्यार्थी संख्या असते. काही महाविद्यालयांत जनरलसाठी २०० ते ५०० अशी विद्यार्थी संख्या आहे, तर विद्यापीठात, उदाहरणार्थ पुणे विद्यापीठात ५०-८०! या अवाढव्य संख्येचे कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयाचा पर्याय नसतो. विद्यापीठातील भव्यदिव्य संख्येचे कारण त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी वसतिगृह मिळते हे. सर्वत्र उपस्थिती मात्र पाच-सहाच्या वर कधी जात नाही. मग ते उत्तीर्ण कसे होतात? भारतात ज्या रीतीने इतर विषयांचे निकाल लागतात, तसे इथेही लावतात!
एखाद्या शिक्षणसंस्थेत नव्याने विषय सुरू होणे दूरच, निवृत्त प्राध्यापकांच्या रिकाम्या जागाही भरल्या जात नाहीत. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. ज. रा. दाभोळे हे शिवाजी विद्यापीठात तत्त्वज्ञान विभाग सुरू होण्यासाठी गेली चाळीस वर्षे प्रयत्न करीत आहेत; पण अनेक कुलगुरूंनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना वाटेला लावले आहे!
अवनतीची विविध कारणे
या भौतिक अवनतीची विविध कारणे आहेत. पहिले- या विषयाच्या व्यावहारिक उपयुक्ततेविषयी व्यापक समाजाचे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षणसंस्था चालकांचे, प्राचार्याचे समज-गैरसमज. दुसरे कारण- गैरसमजात भर घालणारे क्लिष्ट, नव्याशी कसलेही नाते नसणारे जुनाट अभ्यासक्रम. तिसरे कारण- पाठय़पुस्तके, नोट्स, पूरक अध्ययन साहित्य उपलब्ध नसणे, असले तरी ते इंग्लिशमध्ये असणे = मराठीत नसणे. चौथे- अध्यापकांच्या ज्ञानाच्या, भाषेच्या, अभिव्यक्तीच्या मर्यादा, त्यात तास न घेणे, टाळाटाळ करणे इत्यादी. (ही अर्थात सनातन तक्रारमय वस्तुस्थिती सर्वच विषयांच्या बाबतीत आहे!) विद्यार्थ्यांच्या बाजूने अनेक भयंकर तक्रारी आहेत.
संभाव्य उपाय
‘तत्त्वज्ञान हा विषय शिकणे-शिकविणे या व्यवहारावर दर वर्षी किती पैसा खर्च होतो? आणि त्यापासून फलित काय मिळते?’ असा प्रश्न प्रा. रेगे उपस्थित करतात. त्याचे उत्तर लाजिरवाणे आहे, असे ते म्हणतात. त्या तात्त्विक कारणांमध्ये न जाता ते बाजूला ठेवू. मला सुचतात ते काही उपाय असे आहेत.
१) पहिले म्हणजे तत्त्वज्ञान विभागाचा नामविस्तार करावा. नवे नाव ‘धर्म आणि तत्त्वज्ञान विभाग’ असे काहीसे असावे. तेच पदवीचे नावही असावे.
२) हा विभाग केवळ विद्यापीठात असावा, महाविद्यालयात असू नये. तो स्वायत्त असावा.
३) तत्त्वज्ञानातील पदवी ही पदव्युत्तर (प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष) स्तरावरील नसावी; तर ती पदव्युत्तर पदवी असावी. कोणत्याही विषयाचा पदवीधर (कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी) ही तत्त्वज्ञानाच्या पदवीची प्रवेश पात्रता असावी.
४) तत्त्वज्ञानातील पदवीनंतर एम.ए., मग पीएच.डी. अशा पदव्या असाव्यात.
५) ही नवी रचना वास्तवात येईपर्यंत विद्यमान पदवी कार्यक्रमात बदल करावा: ग्रामीण, निमशहरी भागांतील आणि एकाच शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत असणारा तत्त्वज्ञान हा विषय बंद करून केवळ विद्यापीठाच्या शहरात एकाच महाविद्यालयात हा विषय असावा. तेथे मराठी-इंग्लिश दोन्ही माध्यम असावे.
६) विद्यमान अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत. त्यामुळे अध्ययन साहित्य निर्माण करता येत नाही. ती अडचण दूर होण्यासाठी सर्व विद्यापीठांत एकात्म व्यापक आधुनिक अभ्यासक्रम असावेत. त्यात विपुल पर्याय असावेत.
७) अभ्यासक्रमात वैदिक हिंदू, बौद्ध, जैन दर्शने यांच्यासह भारतीय इस्लाम, सूफी तत्त्वज्ञान, भारतीय ख्रिश्चन तत्त्वज्ञान, शीख धर्म तत्त्वज्ञान असे घटक असावेत.
८) विद्यमान प्राध्यापकांनी सामाजिक माध्यमांची मदत घ्यावी. संकेतस्थळे, अनुदिनी (ब्लॉग्ज) निर्माण करून शासन, विद्यार्थिवर्ग व समाज यांना सतत अध्ययन-अध्यापन, संशोधन इत्यादींची आणि त्यांच्या उपयुक्ततेची, उपयोजनांची माहिती सतत देत राहून स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करावी.
९) शासनाने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांस विशेष शिष्यवृत्ती, शुल्कमाफी, वसतिगृह, ग्रंथखरेदी अनुदान द्यावे. विविध ग्रंथालयांनी अशाच सवलती द्याव्यात.
१०) या बदलामुळे तत्त्वज्ञानात आशय आणि अभिव्यक्ती दोन्हींबाबतीत वैविध्य येईल. अध्ययन-अध्यापनाला आंतरविद्याशाखीय गती लाभेल. या विषयाची अपकीर्ती संपेल. तिला तिचा अंगभूत दर्जा लाभेल. त्याचबरोबर अध्यापकांचा दर्जा उंचावेल.
११) अशा व्यापक सर्वसमावेशक अभ्यासक्रमातून निर्माण होणारा तत्त्वज्ञानाचा भावी अध्यापक वर्ग अत्यंत उच्च दर्जाचा साक्षेपी असेल, त्यामुळे तत्त्वज्ञानात्मक अवनतीला आपसूकच आळा बसेल.
हे काम कुणी करावे?
आता, ‘हे काम कुणी करावे,’ असा प्रश्न निर्माण होईल. का, असा प्रश्न विचारायचे कारण नसावे, कारण तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणजे शहाणपणाचे प्रेमिक (लव्हर ऑफ विज्डम). त्यांनी शहाण्यासारखा पुढाकार घ्यावाच. त्यांची प्रतिनिधी असलेली महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद ही या कामी जबाबदारी घेऊ शकणारी सामाईक संस्था आहे. ती तत्त्वज्ञानाच्या सर्व प्राध्यापकांचे नियंत्रण करते, असे नाही; पण ती त्यांच्यातील एक महत्त्वाचा ज्ञानात्मक दुवा आहे. साहजिकच तिच्यावर नैतिक जबाबदारी येते; पण संस्थेवर जबाबदारी येते, याचा अर्थ केवळ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी येते, असे नसून तिच्या प्रत्येक सदस्याची आणि हितचिंतकांची ही कर्तव्यता आहे, असा अर्थ होतो. दुसरा पुढाकार खुद्द शासनाने अत्यंत प्रेमाने घ्यावा. या नव्या रचनेमुळे वेतन, आस्थापना, ग्रंथालय इत्यादींवरील खर्च आटोक्यात येईल.
महाराष्ट्र हे प्रागतिक राज्य असल्याचा पुरावा या बदलामुळे देता येईल. त्याचा आदर्श देशाला घेता येईल. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रीसर्च ही शिखर संस्था अथवा भारतीय दर्शन परिषद ही संस्था हे काम राष्ट्रीय पातळीवर करू शकते.
सॉक्रेटिसने तत्त्वासाठी कडवट विष घेतले. इथे जिवंत राहण्यासाठी कडवटपणा घेण्यास हरकत नसावी!
श्रीनिवास हेमाडे
shriniwas.sh@gmail.com
लेखक संगमनेर येथील महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.