मे २००९. आंध्र प्रदेश. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला आणि सप्टेंबर महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात रेड्डी यांचा मृत्यू झाला. अगदी तसाच घटनाक्रम तामिळनाडूत. मे २०१६. जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुक पुन्हा सत्तेत आला आणि सप्टेंबर महिन्यात जयललिता अंथरुणाला खिळल्या, त्यातून त्या बाहेर आल्याच नाहीत. रेड्डी यांच्या निधनानंतर आंध्रमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथी झाल्या. आंध्रचे दोन तुकडे झालेच, पण काँग्रेस पार नामशेष झाला. आता तामिळनाडूतील अण्णा द्रमुकचे भवितव्य काय, याचीच चर्चा आहे..

द्रविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्यापासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम या साऱ्यांचा प्रवास बंडाचाच. १९२५च्या सुमारास पेरियार यांनी काँग्रेसच्या विरोधात बंडाचे निशाण रोवले. काँग्रेस पक्ष ब्राह्मणी हित साधतो, असा आरोप करीत द्रविडी चळवळ उभारली. हिंदीविरोधी आंदोलन, स्वाभिमान चळवळ किंवा द्रविडी चळवळीत पेरियार यांची महत्त्वपूर्ण कामगिरी होती. त्यांनी स्थापन केलेल्या द्रविड कळघम पक्षात पुढे फूट पडली. पेरियारविरोधात अण्णादुराई यांनी बंड करून द्रमुक पक्षाची स्थापना केली. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर करुणानिधी यांच्याकडे द्रमुकची सूत्रे आली. त्यानंतर एम. जी. रामचंद्रन यांनी करुणानिधी यांना आव्हान देत अण्णा द्रमुकची स्थापना केली. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जानकी आणि जयललिता यांच्यात नेतृत्वावरून वाद झाला. जयललिता यांच्या निधनानंतर आता पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात जुंपली आहे. दुसरीकडे करुणानिधी यांच्या हयातीतच स्टॅलिन आणि अलागिरी या दोन मुलांमध्ये हेवेदावे सुरू झाले आहेत. तामिळनाडूतील बंडाचा प्रवास सुरूच आहे..

तामिळनाडूचे राजकारण १९६७ पासून आजतागायत द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांभोवतीच फिरते आहे. १९६७ मध्ये भक्तवत्सलम हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री. यानंतर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तामिळनाडूत संधी मिळालेली नाही. १९८४ पासून द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन पक्षांना आलटूनपालटून सत्ता मिळण्याची परंपरा सुरू झाली. ती गेल्या मेमध्ये झालेल्या निवडणुकीत जयललिता यांनी मोडून काढली. त्यांना लागोपाठ दुसऱ्यांदा सत्ता मिळाली. सप्टेंबरमध्ये त्या आजारी पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतरच अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून खदखद सुरू झाली होती. पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री करण्यास पक्षातील काही नेत्यांचा विरोध होता. लोकसभेचे उपाध्यक्ष तंबी दुराई यांच्यापासून अनेकांना महत्त्वाकांक्षा होती. शशिकलांकडे पक्षाची सूत्रे येताच याच मंडळींना त्यांचे कान भरले. पक्षात दोन सत्ताकेंद्रे नव्हती, असे सांगत चेन्नामा म्हणजेच शशिकलांना भरीस घातले. याच दरम्यान जलिकट्टूवरून चेन्नईच्या मरिना बीचवर जनआंदोलन सुरू झाले. त्याचे पडसाद तामिळनाडूच्या अन्य शहरांमध्ये उमटले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. दोन दिवस तर तामिळनाडूतील सारे व्यवहार ठप्प झाले होते. यामागे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचे कारस्थान होते आणि ते उद्योग अण्णा द्रमुकमधूनच झाल्याची चर्चा आहे. गेल्या रविवारी अण्णा द्रमुक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शशिकला यांची निवड करण्यात आली आणि तेव्हापासून राजकीय चित्र बदलत गेले.

पुढे काय?

तामिळनाडूत पुढे काय होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. सध्याच्या राजकीय अस्थिरतेमागे वेगवेगळे राजकीय कंगोरे आहेत. जयललिता यांचे नेहमीच भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध होते. संसदेत अण्णा द्रमुकने मोदी यांना अनुकूल अशी भूमिका अनेकदा घेतली. जयललिता यांच्या मृत्यूनंतर भाजपचे डोळे तामिळनाडूच्या दिशेने  लागले आहेत. गेल्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूत भाजपची पाटी कोरीच राहिली होती. शेजारील केरळातही एकच जागा कशीबशी निवडून आली. कर्नाटकाचा अपवाद सोडल्यास दक्षिण भारतात भाजपला हातपाय पसरण्यास वाव मिळालेला नाही. आता तामिळनाडूतील राजकीय घडामोडींमध्ये भाजपला अधिक रस आहे, तो म्हणूनच. पन्नीरसेल्वम हेच मुख्यमंत्रिपदी राहावेत ही त्यासाठीच भाजपची खेळी आहे. भाजपचा हा डाव लक्षात घेऊन शशिकला यांनी काँग्रेसशी दिल्लीत संपर्क साधला. शशिकला आणि त्यांचे पती काँग्रेसच्या अधिक जवळ जात असल्यानेच केंद्रातील सत्ताधारी भाजपने खोडा घातला. अशा अस्थिर राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालपद हे केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या तालावर नाचणारे बाहुले ठरते. तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे सी. विद्यासागर राव हेही त्याला अपवाद नाहीत. सध्या थांबा आणि वाट पाहा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

काय होऊ शकते?

शशिकला यांना लगेचच शपथ देण्यास राज्यपाल तयार नाहीत हे स्पष्टच आहे. मुख्यमंत्र्यांना कधी शपथ द्यायची याचे राज्यपालांकडे स्वेच्छाधिकार असल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी नोंदविलेले मत बोलके आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांच्याबरोबरच शशिकला याही आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने लवकरच निकाल देण्याचे सूतोवाच केले आहे. शशिकला दोषी ठरल्यास सुंठेवाचून खोकला जाईल. दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांच्यामागे आमदारांचे पुरेसे संख्याबळ व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भाजपने मदतही सुरू केली आहे. भाजपने पन्नीरसेल्वम यांच्यामागे ताकद लावल्याने आठ आमदार असलेल्या काँग्रेसने शशिकला यांना पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. शशिकला यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आणि पन्नीरसेल्वम यांना आमदारांचे पुरेसे पाठबळ मिळाले नाही तर राज्यपालांचाही नाइलाज होऊ शकतो. पण सारी यंत्रणा कामाला लावून शशिकला यांच्या गटाने एकत्र ठेवलेल्या आमदारांना पन्नीरसेल्वम यांच्या मागे उभे करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पन्नीरसेल्वम यांच्या माध्यमातून भाजपला तामिळनाडूत हातपाय पसरायचे आहेत. तामिळनाडूत लोकसभेच्या ३९ जागा असून, पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या जास्त राहील, असा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. या दृष्टीनेच अण्णा द्रमुकची शकले करण्याची भाजपची खेळी दिसते.

अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यांच्याशी वेळोवेळी मैत्री करून आपले संख्याबळ वाढविण्याचा काँग्रेसने गेल्या तीन दशकांमध्ये केलेला प्रयत्न फार काही यशस्वी झालेला नाही. द्रमुकचे  ९४ वर्षीय नेते करुणानिधी हे आता थकले आहेत. त्यांचे पुत्र स्टॅलिन यांचे नेतृत्व अद्याप सर्वमान्य झालेले नाही. अशा परिस्थितीत अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडून हातपाय पसरण्याची भाजपची खेळी असली तरी द्रविडी जनता कितपत साथ देते यावरच सारे अवलंबून राहील.

 

Story img Loader