येरळा नदी ही खानापूरच्या घाटमाथ्यावरून धावत येऊन कृष्णेला मिळणारी एक उपनदी. बारमाही नसली तरी हंगामी पिकांसाठी वरदान ठरणारी, पण उथळ असल्याने खळखळाटही अति करणारी म्हणून ओळखली जाते. याच नदीवर श्रमदानातून बळीराजा धरण उभे केले ते संपतराव पवार यांनी. मात्र सिमेंटची जंगले जशी शहरातून गावखेडय़ापर्यंत विस्तारली, तशी या नदीचा प्राण असलेल्या वाळूला सोन्याचा भाव आला. वाळू उपसा करण्यास कायद्याने मनाई असली तरी येरळा ही वाळू तस्करीसाठी अधिक बदनाम होऊ लागली. महसूल खात्यासाठी वाळू एक वरकमाईचे साधन होऊन बसले आहे. वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल विभाग दक्ष असतो. अगदी सुट्टीदिवशीही गस्त घातली जाते. पण याच गस्तीवेळी जर राखणदारच वाळूची तस्करी करताना आढळला तर आपलेच दात आणि आपलेच ओठ. कारवाई कोण आणि काय करणार?
काँग्रेस सेवादलातील ‘बौद्धिक’
देशकाल स्थिती लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष सक्रिय होताना दिसत आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सेलनिहाय बैठका होत आहेत. त्यातून कार्यकर्त्यांना पक्ष क्रियाशील होण्याचे आवाहन केले जात आहे. याकरिता प्रमुख नेत्यांना निमंत्रित केले जात आहे. अशीच एक बैठक कोल्हापुरात पार पडली. सेवादलाचे राष्ट्रीय महासचिव लालजी मिश्रा यांना निमंत्रित केले होते. काँग्रेसचे सेवादल हे खरे तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असलेले एकेकाळचे प्रभावी संघटन! हल्ली ते बरेचसे निष्प्रभ झाले आहे; तो भाग अलाहिदा. अधिवेशन, शिबिरादी कार्यक्रमावेळी प्रमुख नेते आले की सफेद कपडे, टोपी परिधान करून सलामी देणे इतकेच काम सेवादलाकडे उरले आहे. अशाही कार्यकर्त्यांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रेरक सल्ला, मार्गदर्शन मिळणे अपेक्षित. पण वक्त्याच्या लेखी ते राहिले दुय्यमस्थानी. त्यांनी शिव, अध्यात्म यावरच प्रवचन झोडायला सुरुवात केली. आणि ते पाहून पुरोगामी विचारसरणीत वाढलेले कार्यकर्ते अचंबित झाले. सेवादलासाठी सुद्धा आता बौद्धिक सुरू झाले की काय? असा प्रश्न त्यांना नकळत पडला.
काका सर्वाचे चांगले, पण..
महाराष्ट्राच्या राजकारणात पुतण्यांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख वारंवार केला जातो. परंतु, जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पुतण्यांना काका नव्हे तर, कोणाला भाऊ, कोणाला बहीण नडत असल्याचे पाचोरा येथे आयोजित बूथप्रमुख, शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांच्या मेळाव्यात सांगितले. अर्थात, आमदार पाटील यांनी स्वत:चेही दु:ख मांडले. काका सर्वाचेच चांगले, असा निर्वाळाही त्यांनी दिला. राज्यातील धनंजय मुंडे-पंकजा मुंडे, अजित पवार-सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे-राज ठाकरे अशी वाद उद्भवलेली काही उदाहरणेही त्यांनी दिली. आमदार पाटील यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्यावर त्यांची चुलतबहीण वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाची धुरा सांभाळली आहे. वैशाली या माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आहेत. काका आर. ओ. तात्यांमुळेच किशोर पाटील हे राजकारणात पुढे आले. त्यामुळे काका चांगलेच असतात, असे त्यांनी म्हटले आहे.
अजितदादा, उदयनराजे अन् वाघनखे
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजप व शिंदे शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि खासदार उदयनराजे यांनी आपले जुने मतभेद, मनभेद, वैरत्व सर्व काही विसरून अजित पवार यांचे अभिनंदन केले. उदयनराजे म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तसाच मित्रही नसतो. त्याप्रमाणे त्यांनी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र अजितदादांना दिलेल्या शुभेच्छांचीच चर्चाच जास्त झाली. खासदार उदयनराजे यांनी ट्वीटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा देत आपला स्नेह वाढवत असल्याचे दाखवून दिले. लवकरच अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना भवानी तलवार आणि वाघनख देणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. तसे तर त्यांनी राष्ट्रवादीतून अजित पवार गट फोडला म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवार आणि वाघनख भेट दिली. आता अजितदादा तलवार आणि वाघनख घेऊन कोणाला फोडणार हा नवा प्रश्न चर्चेत आहे.
(सहभाग : दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे, दीपक महाले, विश्वास पवार)