योगाचार्य बीकेएस अय्यंगार  यांचे अलीकडेच निधन झाले. सध्याचे योगविषयक तत्त्वज्ञान हे अय्यंगार गुरुजींच्या खांद्यावर उभे आहे. गुरुजींनी ‘बाबागिरी’ कधीही केली नाही. अष्टांगयोगाचे आजच्या काळाला साजेल असे पुनरुत्थान त्यांनी केले आणि लाखो लोकांना योग मार्गास लावले, रोगमुक्त केले.  या असामान्य प्रतिभावंताच्या कार्यकर्तृत्वाला त्यांच्या एका शिष्याने केलेला सलाम..
ॐ  योगेन चित्तस्य पदेनवाचां
 मलं शरीरस्य च वैद्यकेन।
 योऽपाकरोत्तंप्रवरंमुनीनां
  पजञ्जलिरानतोऽस्मि॥
 आबाहु-पुरुषाकारं
 शङख चक्रासि-धारिणम्।
 सहस्रशिरसंश्वेतं
  प्रणमामिपतञ्जलिम्॥
 हरी: ओऽऽऽऽऽऽऽम
 ही प्रार्थना जगातील प्रत्येक योग केंद्रात योगासने सुरू करण्याच्या अगोदर भक्तिभावाने म्हटली जाते.
योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार गुरुजींना ‘योगाचार्य’ ही पदवी खरे तर आचार्य प्र. के. अत्रे यांनी दिली. अत्रेसाहेब जेव्हा आपल्या गाडीतून पुणे शहरात फिरत तेव्हा त्यांना रस्त्यावर अय्यंगार गुरुजी दिसले की, गाडी हळू करून आपल्या दणदणीत आवाजात ते त्यांना ‘योगाऽऽऽऽचार्य’ अशी हाक मारीत. पुण्यातले योगाचार्य अय्यंगारांचे योगविद्या केंद्र, योगसंस्था तेव्हा झाली नव्हती. गुरुजी मुंबई-पुणे असा प्रवास रोज करून मुंबईतील योगी विद्यार्थ्यांना शिकवून आपला योगक्षेम चालवीत. पुढे ‘एशियन पेंट्स’च्या अश्विन दाणी कुटुंबीयाने आणि मोतीवाला कुटुंबाने पुढाकार घेऊन हे पुण्याचे योगकेंद्र उभारण्यास आíथक मदत केली. आज या योग केंद्रात येणारे ५० टक्क्यांहून अधिक योगी हे परदेशी असतात. मुख्यत: जर्मन, अमेरिकन व चिनी. आज योगाचार्याच्या संपूर्ण भारतात मिळून शंभरेक शाखा असतील; तर एकटय़ा कॅलिफोíनया प्रांतात शंभरपेक्षा जास्त योगकेंद्रे आहेत. सामान्य माणसाला झेपेल अशा रीतीने गुरुजी योग शिकवीत. त्यात रोप (दोरखंड), ब्रिक्स (लाकडी विटा), बेल्ट्स (कॅनव्हासचे जाड पट्टे), हॉर्स (घोडय़ाच्या प्रतिमेवरून बनवलेला लाकडी घोडा), ब्लँकेट (जाडे जाजम) तसेच रबर मॅट (रबराची चटई) अशा अनेक साधनसामग्रीचा आणि अवजारांचा (यात लोखंडी वजनेही आली) वापर केला जातो. आजमितीस अमेरिकेत काही हजार योगकेंद्रे गुरुजींची अवजारे कॉपीराइट चुकवण्यासाठी रंग बदलून वापरतात. त्या काळी पेटंट घेतले नसल्यामुळे गुरुजींची ही अवजारे उजळ माथ्याने फुकटात वापरतात व अय्यंगार योग शिकविला जातो. रंगांचा वापर केल्यामुळे गुरुजींना त्या अवजारांवर पेटंटही मिळत नव्हते. पण गुरुजींना त्याचे काही सुख-दुख नव्हते. पशाच्या मागे असलेला योगगुरू, पातंजल योग शास्त्रात कुठेही बसत नाही हेच खरे.
गुरुजींचे नाव बेल्लुर कृष्णम्माचारी सुंदरराज अय्यंगार (बी. के. एस. अय्यंगार). गुरुजींचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी बेल्लुर येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा पहिल्यांदा योगसाधनेशी संबंध आला. त्यांनी त्यांचे मेव्हणे तिरुमल्लाई कृष्णमाचार्य यांच्याकडून योगप्रशिक्षणाचे धडे घेतले. हे गुरुजींचे गुरू १०८ वष्रे जगले. नेपाळ-तिबेटच्या सीमेवर तिरुमल्लाई कृष्णमाचार्यानी एका तिबेटी लामाकडून दीक्षा घेतली होती.
१८व्या वर्षी गुरुजी योगसाधनेसाठी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर अय्यंगार यांनी योग क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. १९७५ मध्ये अय्यंगार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने पुण्यात अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिटय़ूटची स्थापना केली. सरकारकडून अय्यंगार यांना सर्वप्रथम १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर २००२ मध्ये ‘पद्मभूषण’, तर २०१४ मध्ये ‘पद्मविभूषण’ने  त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचे गुरुजी १०८ वष्रे जगले, तेव्हा गुरुजी शंभर वष्रे तरी जगतील असा सर्व शिष्यांचा कयास होता. त्यांचे अचानक जाणे, हा सगळ्या शिष्यांसाठी एक मोठा मानसिक धक्का होता. अनेक लोकांना मी सांगत असे, तुम्हाला जर हनुमान कसे दिसत असतील, याचा प्रत्यय घ्यायचा असल्यास पुण्यात गुरुजींचे दर्शन घेऊन या. हनुमानासारखे बाहू व रुंद छाती, चेहऱ्यावर एक प्रकारचे मंद तेज, शेवटपर्यंत ३२ दणकट दातांची सोबत, असे गुरुजी ताडासनात उभे राहिले की, जणू वीर हनुमानच समोर उभा आहे असे मनापासून वाटायचे. गुरुजींचे पाच पट्टशिष्य आहेत. त्यात जवाहर बंगेरा, झुबिन झरीतोष्टूमानेस, बिर्जू मेहता व त्यांच्या भगिनी राजवी मेहता असे चार आणि पाचवा शिष्य बिरिया पॅरिसमध्ये आहे. बिरिया (वीर्य) हे नाव त्याला गुरुजींनीच दिले होते. बिरियाची गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे. बिरियाचे वडील हे अयातुल्ला खोमेनीच्या अत्यंत जवळ होते. खोमेनींनी बिरियाकडून दोन डॉक्टरेट्स करवून घेतल्या. त्यातील एक ही न्यूक्लीअर एनर्जीवरील तर दुसरी क्रायोजेनिक रॉकेट्सवरील! खोमेनींना अण्वस्त्र बनवून ते रॉकेट्सवर चढवून (वॉरहेड) त्याचा मारा त्यांच्या दुश्मनांवर करावयाचा होता. यासाठी बिरियाला त्यांनी या दोन शास्त्रांतील डॉक्टरेट्स केलेल्या हव्या होत्या. तसेच बिरिया हा खोमेनीचा ड्रायव्हर म्हणून काम करत असे, कारण खोमेनींचा त्याच्यावर अढळ विश्वास होता. कालांतराने खोमेनीचे िहसक आचार-विचार आणि वर्तन पाहून बिरियाला उपरती झाली. तो तेहरानवरून पळाला आणि सरळ हिमालयात आला, हिमालयातले प्रकांडपंडित, योगींना तो भेटला. त्यातील एक अष्टांग योगी असा होता की, तो आठ फूट बाय आठ फूट जागेत बांधलेल्या झोपडीत राहायचा. सूर्यास्ताला तो शीर्षांसनात जात असे, ते तडक सूर्योदयाला शीर्षांसनातून तो मोकळा होई. म्हणजे रात्रभर तो शीर्षांसनात असे. पण बिरियाला काही शिकविण्यास मात्र त्याने नकार दिला. शेवटी त्याला कोणीतरी योगाचार्य बी. के. एस. अय्यंगारांचा पुण्यातील पत्ता दिला. तो गुरुजींबरोबर काही काळ राहिला, शिकला आणि त्यांचे पट्टशिष्यत्व मिळेपर्यंत गुरुजींच्या आदेशाखाली योगासने करीत राहिला. आता तो पॅरिसचे अय्यंगार योग सेंटर चालवतो.
गुरुजींच्या जगातील कोणत्याही योग केंद्रात कोणी माणूस गेला आणि सांगू लागला की मला चक्रे उद्दीपित करायची आहेत किंवा मला समाधी अवस्थेत जायचे आहे, तर त्याला घरचा रस्ता दाखवण्यात येतो. योगसाधनेत या क्रिया अतिशय उच्च दर्जाच्या आणि मिळवण्यास महाकठीण आहेत. ‘आमच्या केंद्रात या मानसिकतेतून आम्ही फक्त योगासने शिकवितो, तुम्हाला केंद्रात यायचे तर या,’ असे स्पष्टपणे सांगितले जाते. अय्यंगार योग केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या ‘झटपट’ योगप्राप्तीचे आश्वासन आणि अक्सीर इलाज दिले जात नाहीत. या संदर्भात इतर योग केंद्रांचा विचार करता, ते पहिल्याच दिवशी चक्रे जागृत करणे, समाधी अशा कठीण गोष्टी छातीठोकपणे शिकवतात. खरे तर समाधी अवस्था ही परमावस्था आहे. एकदा माणूस त्यात गेला की भौतिक सुखाच्या पलीकडे जातो. सगळा गर्व, अभिनिवेश, इच्छा गळून पडतात. असे समजले जाते की, तुमची भक्ती ज्ञानेश्वर माउलींवर असेल तरी तुम्ही अंशरूपाने का होईना, तुम्ही माऊलीच बनता. अन्यथा भारतीय िहदू अध्यात्म योग परंपरेतील योगीराज कृष्ण, योगीराज हनुमान किंवा फारच वरची पायरी म्हणजे योगीराज गौरीशंकर, (शिवात) विलीन होता. या अवस्थेपर्यंत जायला माणसाला एकापेक्षा अधिक जन्मही घ्यावे लागतात.
 तेव्हा समाधी, अनुलोम-कुंभक-विलोम, प्राणायाम, चक्रसाधना, कपालभाती, खेचरीमुद्रा या अवस्थांच्या सामान्य माणूस सहजासहजी वाटेला जाऊ शकत नाही. बी. के. एस. गुरुजींसारखा उच्चप्रतीचा साधक योगी किंवा त्याच्या पंचप्याऱ्यांपकी कोणी तुम्हाला गुरू म्हणून लाभला तर कदाचित यातील काही पायऱ्या तुम्ही चढून जाऊ शकता इतकेच.
पॅरिसमधील बिरिया या शिष्याने गुरुजींची पॅरिसमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. योगायोगाने त्याच दिवसाच्या ‘ला मोंडे’मध्ये (फ्रेंच भाषेतील प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र) गुरुजींनी आयफेल टॉवरवर एका पायावर आदल्या दिवशी केलेल्या एका आसनाबद्दल ‘रबरमॅन’ म्हणून फ्रंट पेजवर हिणवले होते. गुरुजींना ते फारसे रुचलेले नव्हते. दाखला म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेतील सर्वात उंच अशा माणसाला व्यासपीठावर बोलावले. त्याची उंची साडेसहा फूट होती. गुरुजींची उंची साडेपाच फूट होती. गुरुजींनी त्या माणसाला एक हात छताच्या दिशेने उंचावत न्यायला सांगितले. त्याने तसे केले. गुरुजी त्या माणसाला म्हणाले, अजून वर कर, अजून वर कर! मग गुरुजींनी आपला उजवा हात तसाच छपराच्या दिशेने ताणत ताणत नेला आणि त्या उंच माणसाच्या हातापेक्षा तो सहा इंच वर गेला. हे पाहताना पत्रकारांचा विश्वासच त्यांच्या डोळ्यांवर बसेना, पण ते सत्य होते. या घटनेमुळे म्हणा अथवा त्यांचा दांडगा शिष्यगण आणि त्यांनी रोगमुक्त केलेले हजारो जण [प्रस्तुत लेखकाला मानेजवळ मणक्याचा विकार (स्पाँडिलायटिस) अनेक वष्रे लाइट आणि ट्रॅक्शन (तणाव) घेऊन बरा होत नव्हता. अय्यंगार योग करून मणक्याचा विकार तर बरा झालाच, परंतु नव्याने उद्भवलेल्या मधुमेहाचेही   (टाइप १) पूर्ण उच्चाटन झाले. ते आजपर्यंत!]
 २००४ साली ‘टाइम’ मासिकाने जगातील सर्वाधिक प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांचा समावेश केला आहे. त्यांच्या शिष्यांपकी काही मोठी नावे म्हणजे जयप्रकाश नारायण, ज्येष्ठ विचारवंत जे. कृष्णमूर्ती, व्हायोलीनवादक यहुदी मेनुहीन, अच्युतराव पटवर्धन, राणी एलिझाबेथ, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, दिग्दर्शक भालजी पेंढारकर, नसिरुद्दीन शहा, अभिनेत्री तब्बू, चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर, सचिन तेंडुलकर, अंतरा माळी, अनिल कुंबळे इत्यादी होती. तसेच लंडन, स्वित्र्झलड, पॅरिस यांसह जगातील अनेक शहरांत-देशांत त्यांनी योगविद्य्ोचे धडे दिले. अय्यंगार योग, पातंजल योग, प्राणायाम आदी योगासनांशी संबंधित विषयांवर त्यांनी १५ पुस्तके लिहिली असून ही पुस्तके जगातील १७ भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत.
एका उच्चप्रतीच्या पातंजल योगाचे पुनरुत्थान करणाऱ्या योगचार्यानी आयुष्यात रूढार्थाने ज्याला ‘चमत्कार’ म्हणतात असे चमत्कार कधीही केले नाहीत. योगाचार्याचा विश्वास भारतीय परंपरेप्रमाणे एक शास्त्र म्हणूनच योगाचे शिक्षण घेतले पाहिजे, असा होता. त्यांच्याकडे स्वत:कडे मोठी आत्मिक शक्ती आणि अतींद्रिय आत्मसिद्धी होती. सध्याचे योगविषयक तत्त्वज्ञान हे अय्यंगार गुरुजींच्या खांद्यावर उभे आहे. गुरुजींनी मात्र ‘बाबागिरी’ कधीही केली नाही. अष्टांगयोगाचे आजच्या काळाला साजेल असे पुनरुत्थान त्यांनी केले आणि लाखो लोकांना योग मार्गास लावले, आनंदित केले, रोगमुक्त केले.
जगद्विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सगळे उपचार करून थकल्यावर गुरुजींकडे गेला आणि गुरुजींनी त्याच्या खांद्याचे दुखणे दूर केले. असा अय्यंगार योगाचा अनुभव हजारो लोकांना आलेला आहे. मानवी पाíथव देहाचे काही अंशी देवत्वात परावर्तित करणारे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या उंचीचा असा प्रतिभावंत दुसरा योगी नजीकच्या भविष्यात या विश्वात काही प्रकाशवष्रे तरी पुन्हा होणे अशक्य आहे.
[‘लाइट ऑन योगा’ या योगविषयक प्राथमिक ग्रंथाचे मराठीकरण, राम पटवर्धन यांनी ‘योगदीपिका’ या नावाने केलेले आहे. (प्रकाशक : ओरिएंट ब्लॅकस्वान)]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा