साऱ्या जगातल्या संगीताला गवसणी घालण्याचे स्वप्न साकारण्यासाठी आपले सर्जनाचे आणि प्रतिभेचे सारे बळ एकवटणारा कलावंत ही झाकीर हुसेन यांची खरी ओळख. अल्लारखा यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे तबलानवाज वडील असण्याचे भाग्य लाभले, तरी भारतीय संगीताच्या क्षेत्रातील एका अतिशय देदीप्यमान तबलावादनाच्या परंपरेचा अभ्यास हाताच्या बोटांमध्ये उतरवण्यासाठी झाकीर हुसेन यांनी घेतलेले अपरिमित कष्ट त्यांच्या सांगीतिक जीवनाचा अविताभाज्य घटक होते. संगीताच्या मैफलीत साथसंगत करण्याचे वाद्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालवाद्याला उस्ताद अहमदजान थिरकवा, उस्ताद अल्लारखा, प. सामता प्रसाद, पं. किशन महाराज यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. पण झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक संगीतात असे काही मिसळले, की दुधात केशर मिसळल्याचा साक्षात्कार व्हावा.
सत्तरच्या दशकात म्हणजे १९७४-७५मध्ये मिकी हार्ट या पाश्चात्य संगीतातील ख्यातनाम वाटकाबरोबर झाकीरजींनी एकत्र काम करायला सुरुवात केली. त्यापूर्वी १९७३मध्ये ‘ऑन्सॉम्बल’ हा विविध गायक वादकांचा वाद्यावृंद त्यांनी सुरू केला होता. त्याचे नाव बदलून ‘दिगा रिदम बँड’ असे करण्यात आले आणि त्याद्वारे ‘दिगा’ या अल्बमची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर जगभरातल्या अनेक वादक-गायकांबरोबर झाकीर हुसेन यांनी फ्युजन संगीताचे प्रयोग केले. त्यामुळे केवळ भारतीय वाद्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तबल्याला जगभर मान्यता मिळत गेली. पण झाकीरभाईंनी आपली भारतीय संगीताशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. वर्षातील काही महिने भारतीय संगीताच्या क्षेत्रात नियमितपणे दिसणाऱ्या या तबलावादकाला भारतीय रसिकांनीही अक्षरश: डोक्यावर घेऊन आपल्या प्रेमाची पावती दिली.
हेही वाचा >>>‘संगीतकार’ उस्तादांची अपरिचित कामगिरी…
असे सांगतात, की झाकीर हुसेन पाळण्यात होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी, अल्लारखा यांनी त्या पाळण्याला छोटे छोटे तबले आणि डग्गे टांगून ठेवले होते. इतक्या लहान वयातच संगीताशी गट्टी जमलेल्या झाकीरभाईंनी अखेरपर्यंत तालातील मात्रांचा हिशोबही स्वरांच्या संगतीत सौंदर्यपूर्ण करून ठेवला. त्या मात्रांचा गणिती हिशोब ते अशा काही नजाकतीने मांडत की लेखा परीक्षण अहवालाचीही कादंबरी व्हावी! संगीताच्या सात स्वरांची ओळख जन्मजात असली, तरीही त्यातील अथांगता समजण्याची क्षमता झाकीरभाईंना फार लहानपणीच प्राप्त झाली. गायकाची बलस्थाने, त्यांच्या घराण्याची वैशिष्ट्ये, त्यांचे वेगळेपण याबद्दलची त्यांची समज फार वरची होती. त्यामुळेच गायनाला साथ करताना त्यांचे वादन त्या कलावंताला आश्वस्त करणारे असे. वाद्या संगीतातील साथसंगतीत ते असे काही खुलून येत, की त्यामुळे तबला आणि सतार-सरोद-बासरी ही सारी वाद्योच काय पण समोरचे रसिकही अक्षरश: डोलू लागत. अवघ्या सात-आठ वर्षांचे असताना, भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या या असामान्य बुद्धिमत्तेच्या सर्जनशील कलावंताला तरुण वयातच जागतिक संगीताबद्दल कमालीची उत्सुकता वाटू लागली. पं. रविशंकर यांच्या अमेरिकेतील कार्यक्रमात झाकीर हुसेन यांनी जेव्हा पहिल्यांदा साथ केली, तेव्हा, पाश्चात्य जगातील संगीतकारांनाही भुरळ पडली. त्यानंतर उस्ताद अली अकबर खाँ यांच्याबरोबरही त्यांनी जगभर प्रवास केला. पं. भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर ही तर त्यांची दैवतेच. पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली या मागच्या पिढीतील दिग्गजांबरोबर त्यांची गट्टी जेवढी जमली तेवढीच नव्या दमाच्या कलाकारांबरोबरही. त्यांचे व्यक्तिमत्वच असे, की वादक कलावंताला त्यांच्या प्रतिभेचे दडपणच वाटू नये.
जागतिक कीर्तीच्या पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात झाकीरभाई दहा-अकरा वर्षांचे असताना, त्यांना कडेवर घेऊन पं. भीमसेन जोशी जेव्हा स्वरमंचावर आले, तेव्हा पुणेकर रसिकांनी टाळ्यांचा पाऊस पाडल्याची आठवण अनेकदा सांगितली जाते. भीमसेनजी आणि अल्लारखा यांची गाढ मैत्री असल्यामुळे या महोत्सवात झाकीर हुसेन अनेकवेळा येत असत. अनेकदा त्यांचा मुक्काम सवाई गंधर्वांचे जामात डॉ. नानासाहेब देशपांडे किंवा भीमसेन जोशी यांच्या घरीच असे. याच महोत्सवात भीमसेनजींच्या शेवटच्या गाण्याला त्यांनी केलेल्या बहारदार साथसंगतीची चर्चा आजही होतच असते. तबल्यातील तालाची अफाट आणि अचंबित करणारी दुनिया आणि सप्तस्वरांचे तेवढेच ताकदवान आणि सर्जनाची कास धरणारे जग झाकीर हुसेन यांनी आपलेसे केले. केवळ तालाच्या मात्रेत गुंतून न राहता त्यातून संगीत शोधण्याच्या त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांचा तबला गात असे. तबल्यातूनही संगीत पाझरण्याची त्यांची सर्जनशीलता जगातील कोट्यवधी रसिकांनी अनेकवेळा अनुभवली आहे.
पाश्चात्य संगीताचा व्यासंग करत असताना, त्यामध्ये तबला हे वाद्या कसे मिसळून जाईल, याबद्दलचा त्यांचा विचार प्रगल्भावस्थेतला होता. त्यामुळेच अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर तेथील अनेक कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती रसिकांना उत्फुल्लित करून टाकणारी असे. भारतीय अभिजात संगीतात प्राण फुंकून ते पुढील काळात टिकवून ठेवणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये झाकीर हुसेन यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, याचे कारण संगीतासारख्या कलेत सतत नव्याचा शोध घेण्याची त्यांची शोधक वृत्ती हे आहे.
ज्या थोर कलावंतांचे नाव घेतानाही कानाच्या पाळ्यांना आपोआप हात लागतात, त्यांच्या बरोबर साथसंगत करण्याचे भाग्य झाकीरभाईंना मिळाले. त्या कलाकारांनीही त्यांच्या कलात्मकतेला भरभरून दाद दिली. भारतीय संगीताचे जागतिक तालदूत ठरलेल्या या असामान्य प्रतिभेच्या कलावंताला श्रद्धांजली.
‘एकदा रात्री मी लहान असताना माझ्या खोलीत झोपलो होतो. पाणी प्यायला मी उठलो तेव्हा अब्बा आणि अम्मा बोलत होते, ते मला ऐकू आलं. ते अम्माला सांगत होते, ‘कभी तुम्हारा झाकीर ऐसा कुछ कर जाता है स्टेजपर, के मैं हैरान हो जाता हूँ, के ये कहां से आया? अब्बांना झालेला आनंद आणि वाटलेला अभिमान माझ्या आईला सांगावासा वाटत होता! – झाकीर हुसेन
मुकुंद संगोराम