– सुनिता कुलकर्णी
आजपासून ‘अर्थव्यवस्थेला चालना’ मिळणार असल्याने राज्यात ‘आनंदी आनंद गडे’ अशी परिस्थिती आहे. अर्थव्यवस्थेविषयी काहीही कळत नसलेले नतद्रष्ट लोक तेवढे या स्थितीविषयी चडफडाट करताना दिसत आहेत.
‘अखिल चला बसू या’ मंडळाने आजपासून तातडीने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हातभार लावायचा निर्णय घेतला आहे. गेला दीड महिना किराणा-भाजीसाठी रांगा लावून दमलेल्या बायकोला घरी बसवून उन्हातान्हाची पर्वा न करता आनंदद्रव्यासाठी ठिकठिकाणीरांगा लावल्या आहेत.
अर्थव्यवस्थेतले महिलांना काहीही कळत नसल्यामुळे त्यांचा अर्थव्यवस्थेला चालना द्यायला विरोध आहे. पुरूषमंडळींकडून ही चालना घरी बसूनच दिली जाणार असल्यामुळे ती देताना जो खडखडाट, गडगडाट होणार आहे, तो देशासाठीदेखील सहन करायची महिलांची तयारी नाही, असे दिसते.सबब हातात एकच प्याला घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे एकीकडे आणि त्या प्याल्याला स्पर्शही न करता उलट विरोध करणारे एकीकडे यातून कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही हे स्पष्ट झाले असून आता या शब्दांची नव्याने व्याख्या करण्याची गरज उरलेली नाही.
एकंदरीत जास्तीतजास्त पुरूष आणि काही महिला अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या आणि म्हणून देशभक्त आहेत तर जास्तीतजास्त महिला आणि काही पुरूष अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे हे न पाहवणारे आणि म्हणून देशद्रोही आहेत हे यासंदर्भातील न केल्या गेलेल्या पाहणीतून सिद्ध होते आहे.
आनंदद्रव्याची विक्री सुरू करायला विरोध करणाऱ्या मंडळींच्या अजूनही हे लक्षात येत नाही की ‘बसू या मंडळ’ आपली सदर देशभक्ती आपापल्या घरी बसूनच करणार आहे आणि त्यातच जास्तीत जास्त वेळ घालवणार आहे, त्यामुळे आपोआपच टाळेबंदीला हातभार लागणार आहे.
भाषाप्रभू म्हणून गौरविल्या गेलेल्या राम गणेश गडकरी यांनाही अर्थव्यवस्थेमधले काहीच कळत नव्हते हे इतक्या वर्षांनी करोनामुळे समस्त मराठी मंडळींच्या लक्षात आले आहे. कारण तसे त्यांना कळते तर त्यांनी ‘एकच प्याला’ असे नाटक न लिहिता ‘अनेक प्याले’ असे नाटक लिहून सुधाकराएवजी तळीरामाला नायकत्व बहाल केले असते. आणि सिंधूने त्याला कंपनी देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे कसे आवश्यक आहे, हे तमाम मराठी माणसाला पटवून दिले असते.
दरम्यान मित्रवर्य सॅबी परेरा यांनी देशाच्या ‘अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या वाईन शॉप्सवर येत्या रविवारी संध्याकाळी विमानातून पुप्षवृष्टी करण्याचा इव्हेंट आयोजित करावा’ अशी बहुमोल सूचना केली आहे