महाराष्ट्र दिन हा मराठी बांधवांसाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रासाठी प्राण देऊन हुतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली वाहिली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा गायली जाते. मात्र, करोनामुळे यंदा महाराष्ट्र दिनादिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावर मर्यादा आल्या असल्या तरीही मराठी बांधवांनी (अगदी देश-परदेशातील) इंटरनेटचा वापर करून यंदाचा महाराष्ट्र दिन साजरा केल्याचे  दिसले.

अशाच पद्धतीने फेसबुक लाईव्हचा पर्याय निवडत कुवेतमध्ये असलेल्या ‘महाराष्ट्र मंडळा’तील मराठी बांधवांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य’ या विषयावर शिवचरित्र अभ्यासक प्रशांत ठोसर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. त्याअंतर्गत प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून ऑनलाइन हजेरी लावत शिवचरित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन, कॉम्प्युटर या साधनांद्वारे एकमेकांना जोडून घेत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी सांगत प्रशांत ठोसर यांनी प्रत्येकाशी संवाद साधला.

टाळेबंदीमुळे प्रत्यक्ष हालचालींवर बंधने आली असली तरी, महाराष्ट्र आणि छत्रपती शिवराय यांच्याविषयी असलेलं प्रेम, अभिमान आणि ओढ परदेशात राहूनही कुवेत महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. मिलिंद कुलकर्णी आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी फेसबुकवरून लाईव्ह करत अनोख्या पद्धत्तीने महाराष्ट्र दिन  साजरा केला.

Story img Loader