मासिक पाळी हा स्त्रीजीवनाचा एक अविभाज्य, अपरिहार्य घटक. पण त्याच्याकडे बघण्याच्या संकुचित दृष्टिकोनामुळे पाळीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होतं. मासिक पाळीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे.

दर महिन्याला येणारे ‘ते’ चार दिवस! कोणासाठी बाजूला बसण्याचे, कोणासाठी प्रचंड त्रासाचे तर कोणासाठी शारीरिक-मानसिक कटकटीचे. ‘त्या’ दिवसांबद्दल कोणालाही न सांगण्याचा आपल्याकडे जणू अलिखित नियमच आहे. एखाद्या स्त्रीचे ‘ते’ दिवस चालू आहेत हे कळलं तरी पाप लागेल अशी धास्ती अनेक महिला घेतात. ‘त्या’ दिवसांबद्दल आजही बरीच गुप्तता पाळली जाते. पण या सगळ्याबद्दल बोललं नाही तर त्याबद्दलच्या गैरसमजुती आणखी वाढीस लागतील. त्यामुळे त्यावर चर्चा होणं, त्याचे परिणाम, कारण याबद्दलची माहिती मिळवणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. ‘ते’ चार दिवस म्हणजे अर्थातच मासिक पाळी! पूर्वीच्या बायका मासिक पाळीत चार दिवस बाजूला बसायच्या. गावात तर त्यांची व्यवस्था घरातल्या पडवीमध्ये केली जायची;  हे चित्र आजही काही ठिकाणी दिसत असेल. पाळीमध्ये बाजूला बसलेली स्त्री बाजूला का बसली असं विचारल्यावर तिला ‘कावळा शिवला आहे’ असं सांगितलं जायचं. हे काही ठिकाणी आजही होत असावं. सांगायचा मुद्दा हा की एखाद्या स्त्रीला मासिक पाळी सुरू झाली की त्याबद्दल स्पष्ट थेट असं बोललं जायचं नाही. आजही तसं बऱ्याच अंशी दिसून येतं. पण आता हे बदलायला हवं. मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलायलाच हवं. मासिक पाळीच्या दुखण्यामुळे तिचा त्रास होतो, त्या दिवसांमध्ये त्रागाही होतो, ती अगदी नकोशी वाटते पण जर तिचा अभ्यास केला, त्याचं महत्त्व समजून घेतलं, त्याच्यामागचं शास्त्र समजून घेतलं, समज-गैरसमज लक्षात घेतले तर म्हणाल, ‘दाग अच्छे है!’

हल्ली टीव्हीवर सर्रास सॅनिटरी नॅपकीन्सच्या जाहिराती दाखवतात. आमच्याच ब्रॅण्डचे सॅनिटरी नॅपकीन कसे रक्त टिपून घेतात, ऑफिसला जाणाऱ्या बायकांना कसा कमी त्रास होतो, कपडय़ांना लाल डाग कसे लागणार नाहीत अशी हमी त्या जाहिरातींमधून दिली जाते. यातली जाहिरातबाजी, मार्केटिंग बाजूला ठेवलं तर खरं तर या जाहिरातींचे आभारच मानायला हवेत. एखादी मालिका बघताना मधल्या जाहिरातींमध्ये आलेली सॅनिटरी नॅपकीनची जाहिरात अख्खं कुटुंब एकत्र बसून बघतं. हे मुद्दाम होत नसलं तरी ते एकत्र बघितलं जातं हे महत्वाचं आहे. ते कदाचित याबद्दल एकमेकांशी काही बोलतही नसतील, पण एकमेकांसोबत बसून ते बघताहेत हेही नसे थोडकं!

मासिक पाळीसंदर्भातील अनेक गैरसमज आजही महिलांमध्ये आहेत. यातील संस्कृती, परंपरा अशा मुद्दय़ांव्यतिरिक्त वैज्ञानिकदृष्टय़ा मासिक पाळीबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे.

मासिक पाळीतला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे तिची नियमितता आणि अनियमितता. मासिक पाळी अनियमित असल्याची अनेकींची तक्रार असते. एखाद्या महिन्यात पाळी लवकर किंवा उशिरा आली तर त्याबद्दल कोणी फारसं गंभीर नसतं. एखाद्या महिन्यात होतं असं, असं म्हणून अनेक जणी ते सोडून देतात. पाळीतल्या या अनियमिततेत सातत्य राहिलं तर त्याचं रूपांतर गंभीर आजारात होऊ शकतं, हे विसरता कामा नये. स्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार सांगतात, ‘एखाद्या स्त्रीला मासिक पाळीत खूप त्रास होत असेल तर तिला तिच्या आजूबाजूचे लोक सांगतात की ‘लग्न झाल्यानंतर सगळं ठीक होईल.’ इथे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जर असा लावला की लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्नानंतर शारीरिक संबंध आल्यानंतर त्रास कमी होईल; तर तो गैरसमज आहे. पण याच्यामागचं खरं कारण दुसरं आहे. लग्नानंतर एखादी स्त्री गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल, पण त्यात नियमितता नसेल, त्या उलटसुलट घेतल्या जात असतील किंवा अधेमधे घ्यायच्या राहात असतील तर मासिक पाळीत निश्चितपणे अनियमितता असते. तसंच लग्नानंतर अनेकींचं वजन वाढतं. या वाढलेल्या वजनाशीसुद्धा मासिक पाळीच्या अनियमिततेचा संबंध आहे. पण थेट लग्नाचा म्हणजे शारीरिक संबंधांचा (हा अर्थ लोकांनी गृहीत धरलेला असतो) मासिक पाळीच्या नियमिततेशी आणि अनियमिततेशी काहीही संबंध नाही. लग्नानंतर मासिक पाळीत काही बदल होत नसले तर स्त्रीच्या पहिल्या प्रसूतीनंतर तिचं मासिक पाळीच्या वेळचं दुखणं कमी होणं, बंद होणं हे अंशत: बरोबर आहे. ज्या कारणांमुळे पाळीच्या दिवसांमध्ये दुखतं त्यापैकी काही कारणं पहिल्या प्रसूतीनंतर कमी होतात’, अशी माहिती डॉ. निखिल दातार देतात. पण त्याच वेळी सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही, अशीही महत्त्वपूर्ण पुस्तीही ते जोडतात.

मासिक पाळीची अनियमितता म्हणजे काय, हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं. तिच्यात अनियमितपणा का येतो, याचंही कारण लक्षात घ्यायला हवं. तसंच ही अनियमितता कोणत्या वयात सामान्य आहे आणि कोणत्या वयात चिंताजनक आहे यातला फरकही माहिती असायला हवा. सर्वसाधारणपणे पाळीचं चक्र २८ दिवसांचं मानलं जातं. पण खरं तर हे चक्र २२ ते ३५ इतक्या दिवसांचं असतं. याबद्दल डॉ. पद्मजा सामंत सविस्तर माहिती देतात, ‘सगळ्याच स्त्रियांची शरीररचना एकसारखी नसते. प्रत्येकीच्या शरीररचनेनुसार मासिक पाळीचं चक्र बदलत असतं. काहींसाठी हे २२ दिवसांचं तर काहींसाठी ३५ दिवसांचं असतं. पण, २२ दिवसांचं चक्र ३५ दिवसांचं होणं आणि ३५ दिवसांचं २२ दिवसांवर येणं हे वाईट आहे. तसंच रक्तस्राव होण्याचंही एक प्रमाण आहे. पण तेही प्रत्येकीच्या शरीररचनेनुसार वेगवेगळं असतं. खरं तर मासिक पाळीतला रक्तस्राव मोजण्याचं विशिष्ट असं साधन नाही. पण साधारणपणे ३० मिली ते ८० मिली इतका रक्तस्राव व्हायला हवा. पण यातही ३० चं ८० आणि ८० चं ३० झालं तर मात्र ते वाईट आहे.’ रक्तस्राव मोजण्याचं विशिष्ट साधन नसलं तरी त्याची मोजणी आपण पॅड्सच्या माध्यमातून करू शकतो. एका दिवसाला चार ते पाच पॅड्स पूर्ण भरत असतील, प्रचंड थकवा येत असेल, हिमोग्लोबिनचं प्रमाण अकराच्या खाली राहत असेल तर त्याची वेळेवर दखल घ्यायला हवी. असे बदल दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

बऱ्याचशा मुलींची मासिक पाळीविषयी पहिली तक्रार असते त्या दिवसांमधलं दुखणं. कंबर, पोट दुखत असल्यामुळे त्यांचे सुरुवातीचे किमान दोन दिवस प्रचंड त्रासात जातात. या दुखण्यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. स्नायू आकुंचन पावल्यामुळे आणि आतमध्ये फायब्रॉइड किंवा काही इन्फेक्शन असल्यामुळे मासिक पाळीत दुखतं. सोनोग्राफी केल्यानंतर दुखण्यामागचं कारण समजून त्यावर उपचार केले जातात. साधारण पहिल्या दिवशी या दुखण्याचा त्रास सगळ्याच महिलांना होत असतो. पण कधी या दुखण्याची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घ्यावा. अशा काळात विशिष्ट योगासनांचा फायदा होत असतो. पण ही योगासने तज्ज्ञांकडूनच शिकावीत. मासिक पाळीत अशक्तपणा वाटत असेल तर त्या दिवसांमधील सेवन करत असलेल्या आहाराचे परीक्षण करणं गरजेचं ठरतं. अनेक मुलींच्या डोक्यात डाएटचं खूळ असतं. वजन वाढण्याच्या विचाराने अनेक मुली सकस आहार घेत नाहीत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. पुन्हा इथेही व्यक्तिसापेक्षाचा मुद्दा येतो. मासिक पाळीत प्रत्येकीला दुखतच असं नाही. मासिक पाळीत बाहेर पडणारं रक्त दूषित असतं. त्यामुळे ते जितकं जास्त जाईल तितकं चांगलं आहे, जास्त रक्तस्राव होणं शरीरासाठी चांगलं आहे, अशी गैरसमजूत आहे. या गैरसमजुतीमुळे नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला तरी अनेक महिला डॉक्टरांकडे येणं टाळतात.

आजच्या तरुणांचं राहणीमान खूप वेगळं आहे. दहा-बारा तासांची नोकरी, स्पर्धेमुळे कामातली चढाओढ, स्पर्धेचा ताण, आर्थिक-कौटुंबिक समस्या अशा अनेक गोष्टींना एकाच वेळी ते हाताळत असतात. पण या सगळ्याचा नकळतपणे त्यांच्या शरीरावर परिणाम होत असतो. या सगळ्याचा तरुणींच्या मासिक पाळीवर खूप परिणाम होतो. पीसीओडी म्हणजे पोलिसिस्टिक ओवेरिअन सिण्ड्रोम हा आजार आजच्या तरुणींमध्ये सर्वाधिक आढळतो. डॉ. निखिल दातार याविषयी सांगतात, ‘वाढलेलं वजन, कामाचा ताण, निकस खाणं, व्यायामाची कमतरता, व्हिटॅमिन डीचा अभाव या सगळ्या कारणांमुळे तरुणींमध्ये पीसीओडी आढळून येतो. पीसीओडी (ढ’८ू८२३्रू ड५ं१्रंल्ल ऊ्र२ीं२ी) ) असलेल्या तरुणींचं प्रमाण सध्या खूप आहे. याला त्यांची लाइफस्टाइल सर्वाधिक कारणीभूत आहे. आमच्याकडे पीसीओडी असलेल्या तरुणींना ‘तुमची लाइफस्टाइल बदला’ असं सांगितलं तरी कोणी फारसं मनावर घेत नाही. ‘औषधाने काही होत असेल तर सांगा प्लीज’ असं त्यावर आम्हाला उत्तर दिलं जातं. फार कमी रुग्ण गंभीरपणे आमचं म्हणणं मनावर घेतात. पण या आजारावर जीवनशैली काही अंशी तरी बदलणं हाच प्रमुख इलाज आहे.’  पीसीओडीमध्ये मुख्यत: हार्मोन्सचे संतुलन बिघडलेले असते. दर महिन्याला बीजाशयात बीज बनत नाही. पाळी अनियमित येणे, वजन वाढणे, इन्सुलिनचा परिणाम कमी होणे, पुरुष संप्रेरकांचे (मेल हार्मोन्स)चे प्रमाण शरीरात वाढणे, खूप मुरुमे, केस विरळ होणे ही या विकाराची लक्षणं आहेत. पीसीओडी हा दुर्लक्षित करण्यासारखा आजार नाही. पीसीओडी असलेल्या विवाहित तरुणींमध्ये बीज नियमित बनत नसल्याने त्या गर्भ धारण करू शकत नाहीत. तरुणींमध्ये असलेला मानसिक ताण हा मासिक पाळीच्या अनियमिततेशी संबंधित आहे. मानसिक ताणात ठरावीक संप्रेरकांचं (हॉर्मोन्स) प्रमाण कमी-अधिक होत असतं. या बदलामुळे मासिक पाळी पुढे-मागे होत राहते. अनेक तरुणी आता नोकरीच्या ठिकाणी शिफ्ट्समध्ये काम करतात. अशा वेळी उशिरा झोपणं, उशिरा उठणं, कधीही खाणं, काहीही खाणं या सगळ्याचा मासिक पाळीवर मोठा परिणाम होत असतो. नोकरीच्या वेळा बदलणं तरुणींच्या हातात नसलं तरी खाण्या-झोपण्याचं योग्य वेळापत्रक बनवणं आणि सकस आहार घेणं हे मात्र त्यांच्याच हातात आहे.

पीसीओडीसारखंच तरुणींमध्ये थायरॉइडचं प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर दिसून येतं. थायरॉइडची ग्रंथी आपल्या गळ्यात श्वासनलिकेच्या पुढे असते. त्यातील थायरॉइड हार्मोन्सचे अति प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात बनणे मासिक पाळीवर विपरीत परिणाम करते. पाळी येतच नाही, लवकर येते किंवा उशिराने येऊन भरपूर रक्तस्राव होतो. विशिष्ट रक्त तपासणी करून याचे निदान होते. थायरॉइड आढळून आल्यास त्यावर योग्य तो इलाज घेऊन मासिक पाळी नियमित व नियंत्रित होऊ  शकते. मासिक पाळीच्या संपूर्ण यंत्रणेत ओव्हरी (अंडाशय) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पीसीओडी, गरोदरपणा, मोनोपॉझ प्रीव्हेन्शन (रजोनिवृत्ती प्रतिबंध) या साऱ्यांच्या दृष्टीने अंडाशय अतिशय महत्त्वाचे आहे. अंडाशय म्हणजे संप्रेरकांची फॅक्टरीच असते आणि संप्रेरकांवर संपूर्ण शरीर, गर्भाशय, गरोदरपणा अवलंबून असतो. अंडाशयाचे हे महत्त्व डॉ. पद्मजा सामंत समजावून सांगतात.

मासिक पाळीतल्या आजारांपासून सुटका हवी असेल उत्तम पौष्टिक आहार आणि व्यायाम या दोनच गोष्टी प्रामुख्याने करणं महत्त्वाचं आहे. डॉ. दातार एक खंत व्यक्त करतात, ‘अनेक जण हेल्थ चेकअपच्या विविध सुविधांशी संबंधित असतात. त्यामार्फत ते ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, डोळे अशा तपासण्या करत असतील. पण त्यामध्ये गर्भाशयाशी संबंधित तपासणी केलेले फार अभावानेच दिसतील. असं होता कामा नये. गर्भाशयासंबंधित तपासणीही ठरावीक कालावधीनंतर व्हायला हवी. तपासणीआधी शरीरात कुठेही गाठ असेल, काही वेगळेपण जाणवलं तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याबद्दल सजगता असेल तर पुढच्या अनेक समस्यांना आळा बसेल.’ आपल्याला प्रत्यक्षपणे शारीरिक त्रास होत नाही तर औषधं कशाला घ्यायची अशीही एक समजूत लोकांमध्ये आहे. पण हे चुकीचं असल्याचं डॉ. दातार सांगतात.

आता सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती बघताना जसा संकोच नसतो तसाच मासिक पाळीबद्दल बोलण्यातही तो नसावा, यासाठी प्रयत्न करायला हवेत. हा संकोच आणखी एका गोष्टीमुळे दूर होतोय असं वाटतं. मेडिकलमधून सॅनिटरी नॅपकिन्स विकत घेतल्यानंतर ते काळ्या पिशवीत किंवा कागदात गुंडाळून दिले जातात. पण आजच्या तरुणी बिनधास्तपणे सॅनिटरी नॅपकिन्सचं पॅकेट कोणत्याही कागदात किंवा पिशवीत न गुंडाळता घरी घेऊन जातात. दुसरा आणखी एक बदल सांगावासा वाटतो. तो म्हणजे त्यांच्यासाठी हेच नॅपकिन्स त्यांच्या घरातले पुरुषही विकत घेऊन जाताना दिसतात. हे सगळेच बदल स्वागतार्ह आहेत. मुळात त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की वागणुकीतही आपसूकच बदल दिसून येईल. मासिक पाळीबद्दल बोलताना ‘प्रॉब्लेम’ असा उल्लेख केला जातो. या दिवसात कोणी काही विचारलं तर, ‘नाही जमणार गं प्रॉब्लेम आहे’, असं सांगितलं जातं. पण मासिक पाळी हा ‘प्रॉब्लेम’ कसा असू शकतो? मासिक पाळी नियमितपणे आली नाही, रक्तस्राव योग्य प्रमाणात बाहेर पडला नाही, पाळीचं चक्र व्यवस्थित नसलं, गर्भाशयात काही आजार असतील तर ‘प्रॉब्लेम’ असतो. त्यामुळे मासिक पाळी प्रॉब्लेम वाटणं बंद होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ‘दाग अच्छे है’ असं वाटू लागेल!

काही महत्त्वाचे :

मासिक पाळीत दुखणं वाढलं, खूप रक्तस्राव झाला तर ते चांगलं मानलं जातं. पण हा गैरसमज आहे. यामुळेच कितीही दुखलं, रक्तस्राव झाला तरी काही स्त्रिया तो त्रास सहन करतात पण औषध घेत नाहीत, त्यावर काहीच उपायही करत नाहीत. असं न करता वैद्यकीय सल्ला घेऊन औषधे घ्यावीत.

गर्भाशय, मासिक पाळी यातल्या कोणत्याही गंभीर आजाराची किंवा कर्करोगाची सुरुवात मासिक पाळीतील अनियमिततेपासून होते. म्हणूनच त्यावर सुरुवातीलाच उपचार करायला हवेत. ती गोष्ट अंगावर काढण्यासारखी नाही.

वेळच्या वेळी मासिक पाळी न आल्यामुळे वजन वाढतं ही आणखी एक गैरसमजूत आहे. असं नसून वजन वाढल्यामुळे पाळी अनियमित होते. पाळी येऊन गेल्यानंतर वजन कमी होतं आणि पाळी येण्याआधी वजन वाढतं अशीही एक चुकीची समजूत आहे.

४०-४५ वर्षांनंतर पाळीत होणारे त्रास स्वाभाविक असले तरी ते दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाहीत. असं दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांचा आजार त्या डॉक्टरांकडे जाईस्तोवर एखाद्या आजाराच्या विशिष्ट मर्यादेपलीकडे गेलेला असतो. पंचेचाळिशीनंतर मासिक पाळीसंबंधित काही गोष्टी स्वाभाविक आहेत, असं समजून अनेक महिला त्यांना होणाऱ्या त्रासाकडे गंभीरपणे बघत नाहीत. तर असं न करता त्यांनी वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com@chaijoshi11

Story img Loader