सुनिता कुलकर्णी
रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस, टाळेबंदी राबवण्यासाठी काम करणारे पोलीस हे सध्याच्या काळात समाजामधले महत्त्वाचे घटक आहेत. पण ठिकठिकाणी त्यांच्यावर हल्ले होताना दिसतात. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने गेल्याच महिन्यात ‘साथरोग कायदा १८९७’ मध्ये दुरुस्ती केली.
तत्कालीन ब्युबोनिक प्लेगला आळा घालण्यासाठी १२३ वर्षांपूर्वी तत्कालीन कौन्सिल ऑफ गर्व्हर्नर जनरल ऑफ इंडियाने कोणत्या परिस्थितीत ‘साथरोग कायदा १८९७’ हा कायदा केला याचा शोध इंडियन एक्स्प्रेसचे श्यामलाल यादव यांनी जुनी कागदपत्रे धुंडाळून घेतला आहे.
२८ जानेवारी १८९७ रोजी कौन्सिलचे सदस्य जे वुडबर्न यांनी साथरोगासंबंधीचे विधेयक मांडले. या विधेयकामुळे देशातल्या सगळ्या प्रांतांमधल्या स्थानिक प्रशासनाला विशेषाधिकार मिळणार होते. ट्रेनने तसेच समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही ते तपासणी करू शकणार होते. प्लेगच्या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये दाटीवाटीने राहणारे लोक, स्वच्छतागृहांकडे, सांडपाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष, अस्वच्छ गोठे, तबेले हे प्रश्न हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासनांना अधिक अधिकार हवे होते, त्यातून हा कायदा करण्यात आला.
या विधेयकासंबंधीच्या चर्चेदरम्यान ब्युबोनिक प्लेगमुळे निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व असली तरी हे विधेयक घाईघाईने मांडले गेले आहे, असा आरोप दरभंगाचे महाराजा लक्ष्मीश्वर सिंग तसेच रहिमतुल्ला मोहमद सयानी या सदस्यांनी केला होता.
बाबू जय गोविंद या सदस्यांनी मक्केला जाणाऱ्या मुस्लीम यात्रेकरूंवर कडक निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली होती. यावर मुस्लीम सदस्यांनी याबाबत काहीच मतप्रदर्शन केले नाही, यावर आश्चर्य व्यक्त करून बंगालचे गर्व्हर्नर अॅलेक्झांडर मॅकेंझी यांनी सरकार धर्माच्या प्रश्नात ढवळाढवळ करणार नाही असे स्पष्ट केले. तेव्हा रहिमतुल्ला मोहमद सयानी यांनी जोपर्यंत ब्युबोनिक प्लेगचा धोका टळत नाही, तोपर्यंत इस्लामधर्मीयांनी आपली यात्रा स्थगित करणेच योग्य आहे असे स्पष्ट केले.
प्लेगने आजारी स्त्रियांचं विलगीकरण ही खूप मोठी समस्या आहे, असा मुद्दाही या चर्चेदरम्यान मांडला गेला. विलगीकरणापेक्षा स्त्रिया तसेच अनेक भारतीय मरण पत्करतील असंही सांगितलं गेलं. तेव्हा वुडबर्नने स्पष्ट केलं की, प्लेगने आजारी असलेल्या एखाद्या स्त्रीसाठी आम्ही संपूर्ण गावाला प्लेगच्या साथीच्या तडाख्यात लोटू इच्छित नाही.
मुंबईतून सुरू झालेला हा रोग वेगाने देशभर पसरला. ब्रिटिश सरकारला तेव्हाची राजधानी असलेल्या कोलकात्याची जास्त काळजी वाटत होती. त्या काळात ब्रिटिशांनी बाकीच्या सगळ्या देशांना भारतातल्या परिस्थितीची ताबडतोब कल्पना दिली होती.