वाचन ही सवयच नव्हे तर संस्कार असतो. लहान वयातच तो केला तर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर त्याचा चांगलाच परिणाम होतो.

एक प्रसंग. एका स्टोअरमधला. एक आई आणि तिचा मुलगा. टिपिकल उच्चमध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील असावेत. मुलाचे वय साधारण साताठ वर्षांचे असावे. म्हणजे तसा लहानच पण अगदी अजाण नाही. काही किरकोळ खरेदी करण्यासाठी आई स्टोअरमध्ये आली असावी. पण त्या दोघांची स्टोअरच्या प्रवेशद्वारातच काही बोलाचाली चाललेली होती. त्यांचं बोलणं विशेष प्रयास न करताही ऐकू येत होतं. त्यावरून लक्षात आलं की मुलाला भूक लागली होती आणि तो आईपाशी अर्थातच कुठल्या तरी ‘जंक फूड’ साठी हट्ट करत होता. ती सुजाण आई काही ते जंक फूड द्यायला तयार नव्हती. अखेर काही वाटाघाटींनंतर घरून आणलेला डबा संपवणे आणि त्या बदल्यात जंक फूड नाही तर (निदान) प्रोटिन बार असा काहीसा तह झाला असावा; कारण त्या मुलाने कोपऱ्यातली एक खुर्ची गाठली आणि दप्तरातला डबा काढून खाऊ लागला. इकडे त्याची माउली स्टोअरच्या दुसऱ्या भागात अंतर्धान पावून मिनिटाभरातच प्रोटिन बार घेऊन परतली व तो लेकाच्या स्वाधीन करून ती नििश्चतपणे आणि कृतकृत्य भावनेने परत खरेदीकडे वळली. इथे हा प्रसंग संपायला हवा होता. आणि लौकिकदृष्टय़ा तो संपलाही होता. पण तेवढय़ात मला दिसले की त्या चिरंजीवांनी त्यांच्या दप्तरातून एक ‘हॅरी पॉटर’ सदृश कपोलकल्पित, अद्भुत, अवास्तव अशा कथांच्या पुस्तकाचा ठोकळा काढला होता आणि डबा खाता खाता त्याने वाचन चालू केले. त्याची आईही फोनवर न खेळता वाचतोय या कौतुकभरल्या दृष्टीचा एक प्रेमळ कटाक्ष टाकून तिच्या कामात व्यस्त झाली. एकूणच वाचन कमी होत चाललेल्या जगात लहान मुलांच्या वाचनाकडे एक नजर टाकली तर, बहुसंख्य मुले ही सध्या या प्रकारचे साहित्यच जास्त करून वाचताना दिसतात हेही तितकेच खरे! सध्याची नवी पिढी काय वाचते याविषयी आजूबाजूस निरीक्षण केलं तर हेच साहित्य दिसतं! मराठी पुस्तकांच्या दुकानांत तर नव्या पिढीची अनुपस्थिती लक्षणीयच असते, पण क्रॉसवर्ल्ड, लॅण्डमार्कसारख्या इंग्रजी पुस्तकांच्या दुकानांत (दुर्दैवाने हीही आता बंद पडत चालली आहेत!) नजर टाकली तर मुले, वर उल्लेख केलेल्या प्रकारची पुस्तकेच नाकाला लावून (तिथेच) वाचत बसलेली दिसतात.  म्हणूनच हा प्रसंग हा सध्याच्या पिढीचा प्रातिनिधिक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आणि हो, वर लहान मुलाचं उदाहरण दिलं असलं आणि या लेखाचा मुख्य उद्देश लहान मुलांच्या वाचनात योग्य बदल घडवून आणणे हा असला तरीही हा लेख जितका लहान मुलांसाठी आहे, तितकाच तो मोठय़ांसाठीही आहे. कारण चांगल्या वाचनाने चांगले विचार, चांगल्या कृती हातून होण्यास वयाची अट नसते!

खाणे आणि वाचन

खाण्याविषयी सध्याच्या जमान्यात बरीच जागरूकता आहे. आरोग्यविषयाला वाहून घेतलेल्या टीव्ही वाहिन्या, मासिके, वृत्तपत्रीय लेख, अनुभवी आहारतज्ज्ञ डॉक्टरांची पुस्तके आणि समाजमाध्यमांवर फुकट(चे) सल्ले देणारे आहारशास्त्राच्या आहारी गेलेले लोक, अनेक स्वयंघोषित आहारतज्ज्ञ पाठवीत असलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश यांमुळे काय खावे, काय खाऊ नये याचे निदान प्राथमिक ज्ञान तरी समाजात मोठय़ा प्रमाणावर फैलावले आहे. वळत नसलं तरी कळलं नक्की आहे.

खाण्याचा, आहाराचा एवढा विचार होतो, हे चांगलेच आहे. पण जसे खाणे हा शरीराचा आहार, अन्न आहे तसंच वाचन हे मेंदूचे, मनाचे अन्न आहे. निदान मेंदूच्या अन्नाचा एक फार मोठा भाग तरी नक्कीच आहे. या दृष्टीने आपण वाचनाकडे बघतो का? बघत नसू, तर वाचनाविषयी असा दृष्टिकोन असणे का आवश्यक आहे हे आधी बघू.

ज्ञानस्रेतांत वाचनाचे महत्त्व

आपण आपल्या ज्ञानेन्द्रियांद्वारे जे काही मिळवतो – बघतो, ऐकतो, वास घेतो, चव घेतो, स्पर्श करतो – ते सर्व ज्ञान, अनुभव हे आपल्या मेंदूसाठी, मनासाठी अन्नच असते.

आता यांपकी शेवटची तीन ज्ञानेंद्रिये – नाक (गंधज्ञान), जिव्हा (अर्थात चवींचे ज्ञान) आणि त्वचा (स्पर्शज्ञान) यातून केवळ त्या-त्या विशिष्ट अनुभूती मिळतात; मानवनिर्मित भाषांमधील माहिती या तीन ज्ञानेन्द्रियांमधून आपल्याला घेता येत नाही. उदा. केवळ वासाने वा स्पर्शाने आपण एखादे पुस्तक वाचू शकत नाही. (ब्रेलसारख्या अंध व्यक्तींसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपी असल्या तरी त्यातही स्पर्शातून केवळ काही आकारांची अनुभूती होते. ही अनुभूती मेंदूने दृश्य माहितीत रूपांतरित केल्यावर एखाद्या अक्षराचा, शब्दाचा अनुभव येतो. व त्या अक्षरांमुळे मग मजकुराचे ज्ञान होते. नुसत्या छापील पुस्तकावरून हात फिरवून वा ते हुंगून वाचण्याचे तंत्र आज तरी अस्तित्वात नाही! असो.). त्यामुळे मानवी मनावर, विचारशक्तीवर या तीन इंद्रियांचा अतिशय मर्यादित प्रभाव पडत असल्याने त्यांचा इथे विशेष विचार करण्याचे कारण नाही.

आता मुख्य ज्ञानेंद्रिये दोन – डोळे आणि कान. यांद्वारे येणाऱ्या माहितीवर सहसा (टीव्ही बघतानाची वेळ सोडून) आपले नियंत्रण नसते. म्हणजे आजूबाजूचे बघणे आणि ऐकणे या प्रतिक्षिप्त क्रिया आपले शरीर करीतच असते. पण यांतील दृष्टीद्वारे होणाऱ्या ज्ञानापकी वाचनाचे मात्र तसे नाही. वाचन हे आपोआप होत नाही. त्यासाठी आपल्याला विवक्षित शारीरिक हालचाली कराव्या लागतात. उदा. पुस्तक/वर्तमानपत्र उचलणे, पाने उलटणे. तसेच व त्यामुळेच काय वाचायचे व काय नाही याचा निर्णय सर्वस्वी आपला असतो. त्यामुळे वाचन हे इतर ज्ञानस्रोतांहून वेगळे ठरते. तसेच हल्लीच्या काळात लौकिक शिक्षण, बँकादी आíथक व्यवहार इथपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञान इथपर्यंतचे बहुतेक सर्व ज्ञान हे वाचूनच होते. त्यामुळे इथून पुढे इतर सर्व ज्ञानस्रोत बाजूला ठेवून तूर्तास फक्त वाचनाचा विचार करू. आता आधी खाणे आणि वाचन यांतील साम्य बघू.

खाणे- वाचन यातील साम्य

यात आधी अन्नपचन आणि वाचन या प्रक्रिया बघू. त्यातून खाणे आणि वाचन यामधील साम्य स्पष्ट होईल. आपण अन्न खातो. ते तोंडावाटे पोटात पचनसंस्थेमध्ये पोहोचून तेथे त्यावर विविध स्राव काम करून अन्नाचे विविध पौष्टिक घटकांत विघटन करून अन्नरसात रूपांतर करतात. त्यानंतर हा अन्नरस शरीरात शोषला जाऊन त्याचा योग्य उपयोग शरीरधारणेसाठी केला जातो. बाकीचा अन्नातील भाग (प्रामुख्याने चोथा) शरीरातून बाहेर टाकून दिला जातो. ज्या प्रमाणात अन्नात पौष्टिक घटक असतात त्या प्रमाणात शरीरासाठी ते उपयुक्त असते. थोडक्यात, अन्न जितके सकस, पौष्टिक तितकी शरीरप्रकृती सुदृढ, ठणठणीत! याउलट, अन्न जितके सत्त्वहीन, निकृष्ट तितके ते शरीराला निरुपयोगी, नव्हे अपायकारक असते. उदा. दोन जुळ्या भावा/बहिणींपकी एका/एकीला सहा महिने केवळ वडापाव, भेळ, सामोसे, अशा निकृष्ट आहारावर ठेवले आणि त्याच्या जुळ्या भावंडाला त्याच काळात अत्यंत सकस, पौष्टिक अन्न दिले तर कोणाची प्रकृती जास्त ठणठणीत, निरोगी राहील?

आता अन्नाप्रमाणेच, वाचनातून मिळणाऱ्या ज्ञानाचे, माहितीचे आहे. मघाच्या खाद्यान्नाच्या उदाहरणाशी या संदर्भात तुलना करायची तर वाचलेली सर्व माहिती (अन्न) डोळ्यांकडून मेंदूकडे मज्जासंस्थेद्वारे पोहोचवली जाते. मेंदू त्या माहितीचे विश्लेषण (पचन) करतो व त्यातून काही महत्त्वाचा सारांश (पोषक द्रव्ये) स्मृतीमध्ये साठवला जातो. बाकीची माहिती विसरून मनाबाहेर टाकली जाते. उदा. एखादा लेख आपण वाचतो, त्यानंतर तो पूर्ण लेख आपल्याला शब्दश: आठवत नाही; परंतु त्यातले महत्त्वाचे मुद्दे मात्र (बहुतेक सगळे) लक्षात असतात.

‘वाचन = मेंदूचे/मनाचे अन्न’ हे सोदाहरण बघितल्यावर, ज्याप्रमाणे ‘जसे अन्न, तशी शरीरप्रकृती’ असते, त्याचप्रमाणे ‘जसे वाचन तशी मन:प्रकृती’ हे ही उघडच आहे. उदा. एखाद्या लहान मुलाला जर सतत गुन्हेगारी कथा वाचायची सवय लागली, तर पुढे पुढे त्याच्या विचारपद्धतीवरही त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. किंवा उलटपक्षी, जर एखाद्या मुलाला चांगले, सकस वाचन करण्याची सवय लावली तर त्याचा सुयोग्य परिणाम त्याच्या विचारांवर झालेला दिसून आल्याशिवाय राहायचा नाही. मघाचेच जुळ्या भावांचे उदाहरण द्यायचे तर समजा एकाला फक्त काल्पनिक कथा, कादंबऱ्या वाचायला दिल्या आणि त्याच्या जुळ्या भावाला विज्ञान, कथा, इतिहास, कला इ. सर्वागीण साहित्य वाचायला दिले, तर कोणाशी गप्पा मारणे तुम्हाला अधिक आनंददायी वाटेल?

वरच्या परिच्छेदात ‘सकस’ हा शब्द अन्न आणि वाचन या दोन्हींच्या संदर्भात आलाय. मला वाटते, सकस अन्न म्हणजे काय ते आपल्या सर्वाना नीटपणे माहित आहे. तेव्हा ‘सकस’ वाचन म्हणजे काय अभिप्रेत आहे ते बघू. इथेही उत्तर सोप्पे आहे. जसे ‘सकस’ अन्न असते अगदी तसेच ‘सकस’ वाचन असते. म्हणजे- मनाच्या निकोप वाढीसाठी ते अत्यंत आवश्यक असते. त्याचा मनावर विपरीत परिणाम होत नाही.

सकस वाचन म्हणजे काय ते स्पष्ट होण्यासाठी सकस वाचनाची काही उदाहरणे पाहू.

यांतील पहिले उदाहरण म्हणजे नीतिपर गोष्टी. सुदैवाने मराठीत तरी नीतिपर गोष्टीरूप वाङ्मयाचा फार मोठा साठा अगदी सहज उपलब्ध आहे. ‘वेदांतील गोष्टीं’पासून ते रामायण-महाभारतातील नीतिपर कथा, ते हितोपदेश, पंचतंत्र, इसापनीती, देशोदेशीच्या नीतिपर कथा असे अफाट वाङ्मय उपलब्ध आहे. लहान वयात असे वाङ्मय वाचल्याने मुलांचा नतिक पाया पक्का होतो. चांगले काय वाईट काय याची जाण त्यांना येते, चांगल्या-वाईटाची पारखही त्यांना हळूहळू करता येऊ लागते.

दुसरे उदाहरण म्हणजे चरित्रे. थोर लोकांची चरित्रे वाचल्याने मुलांच्या मनावर फार चांगले संस्कार होतात. या थोर लोकांनी लहानपणीदेखील अडचणींवर केलेली मात, त्यांच्या ध्येयाप्रति लहान वयातही दिसून येणारी त्यांची अविचल निष्ठा, त्यांची जिद्द व अतिशय बळकट इच्छाशक्ती, त्यांची तीव्र बुद्धिमत्ता, शौर्य, निडर वृत्ती, आपल्या अंगीकृत कार्यासाठी अफाट कष्ट करण्याची तयारी, उच्च नतिकता, अत्युच्च यश प्राप्त केल्यावरही त्यांच्या अंगी असणारी विनम्रता इ. गुणांचा लहान मुलांवर फार परिणाम होऊन नकळत ती मूल्ये त्यांच्या मनात रुजत जातात. थोर लोकनेते, जगभरच्या देशांतील स्वातंत्र्यलढय़ाचे नेते, विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक, साहसी मोहिमा काढणारे दर्यावर्दी (Explorers), जागतिक कीर्तीचे कलाकार, कवी, लेखक यांची चरित्रे/आत्मवृत्ते या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात. मोठेपणी आपण काय(काय) करू शकतो याची नेमकी कल्पनाही या चरित्रांनी येते. मुलांनी मोठेपणी काय करायचे आहे ते नक्की केले असेल (किंवा त्या त्या वयात त्यांना जे वाटत असेल) त्या क्षेत्रातील थोर लोकांची चरित्रे/आत्मवृत्ते वाचून मुलांची मनोभूमिका आपोआप तशी तयार होत जाते. किंवा उलटपक्षी, असे चरित्र वाचून त्यांच्या स्वप्नाची त्यांना स्वत:लाच यथार्थ, वास्तविक कल्पना येऊन ‘मला आधी तसे वाटत होते; पण आता मला ते नाही करायचे’ अशी वास्तविक जाणीवही होते. व अशी वास्तविक जाणीव होणे फार महत्त्वाचे असते. कारण कुठल्याही भ्रमावर, कल्पनेवर आधारलेली स्वप्ने, निर्णय फार काल टिकत नाहीत.

तिसरे उदाहरण म्हणजे इतिहास-भूगोलाचे ज्ञान – राष्ट्रांचे, प्रदेशांचे, युद्धाचे इतिहास. जे इतिहासापासून काहीही शिकत नाहीत, त्यांनी त्याची पुनरावृत्ती करावी लागते (Those who do not learn from history, are compelled to repeat it.) अशी एक इंग्रजी म्हण आहे. पूर्वीच्या लोकांनी, समाजांनी, राष्ट्रांनी केलेल्या चुकांतून शिकून त्या भविष्यात टाळायच्या असतील तर इतिहासाचे निदान वाचन तरी अनिवार्य आहे. त्याशिवाय निखळ ज्ञानवर्धक मनोरंजन म्हणून जगातल्या विविध राष्ट्रांचा इतिहास वाचण्यास अतिशय चित्ताकर्षक असतो.

चौथे उदाहरण म्हणजे सकस अभिजात साहित्य – कथा, कादंबऱ्या, मळलेल्या वाटेवरचं चाकोरीबद्ध आयुष्य सोडून जीवनाचं दाहक वास्तव मांडणारं ग्रामीण दलित साहित्य हेही वाचणे अतिशय आवश्यक आहे.

सकस वाचनात एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे विनोदी वाङ्मय. समर्थानी ‘टवाळा आवडे विनोद’ म्हटले असले तरी ते ‘टिंगल-टवाळी’ या सदरातल्या विनोदाला उद्देशून असावे; कारण दासबोधात विविध ठिकाणी त्यांनी मारलेल्या कोपरखळ्या बघता, सर्वच विनोदाचे त्यांना वावडे असावे असे वाटत नाही. विनोदी वाङ्मय वाचण्याचे फायदे तर अफाट आहेत! हसण्यामुळे शरीरात ताण-नाशक स्राव (हार्मोन्स) पाझरतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण, विशेषत: मस्तकातील वाढते. शिवाय विनोद समजताना मेंदूचे अनेक विभाग कार्यान्वित होतात; त्यामुळे बौद्धिक वाढीसही चालना मिळते. स्वत:ला विनोद करता आला की जीवनाकडे पाहण्याचा एक खेळकर दृष्टिकोन मिळतो. यामुळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत त्यापेक्षा मोठय़ा समजून त्यापुढे दबून जाऊन काही तरी चुकीची कृती करण्याऐवजी, त्या अडचणी फार काही मोठय़ा नाहीत, अशी खिलाडू, सकारात्मक वृत्ती तयार होऊन त्या अडचणींचा नेटाने सामना करण्याची मनोवृत्ती तयार होते. असो. लेखाचा विषय विनोदी वाचनाचे फायदे असा नसल्याने याबाबत जास्त लिहिणे हे विषयांतर होईल.

इतर अधिक गहन विषय म्हणजे धर्म, तत्त्वज्ञान, निसर्ग-पर्यावरण, विविध कला, विज्ञान, तंत्रज्ञान, प्राचीन संस्कृती, विविध भाषा. मानवी ज्ञानाच्या शेकडो शाखा आहेत. यातील सगळ्याच विषयांची मुलांना वाचता येतील अशी पुस्तके नसतील; पण जसं वय वाढत जाईल तशी हे नवनवीन विषय पचवण्याची मुलांची शक्तीही वाढत जाते. शिवाय सगळ्यांनी सगळंच वाचावं असं शक्य नसतं; तसा प्रयत्न जरी पालकांनी केला तरी अट्टहास मात्र करू नये. पण तरीही वाचनात जेवढी विविधता, तेवढा मुलांचा मानसिक विकास चांगला होतो असा अनुभव आहे. शिवाय या चौफेर वाचनाने मुलांना जगात असलेल्या अफाट ज्ञानभांडाराचे अंशमात्र का होईना दर्शन होते, जगाबद्दलच्या त्यांच्या जाणिवा जास्त प्रगल्भ होत जातात. अशी चौफेर वाचन असलेली मुलं पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये चमकली नाहीत तरच नवल! पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वाचनाने एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जी जडणघडण होते, ती संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या कामी येईल. उत्तम, चतुरस्र वाचनाचा काय परिणाम होतो, हे खालील ठळक दोन-तीन उदाहरणांवरून दिसून येईल. भारताच्या अर्वाचीन इतिहासात थोर राजकीय/सामाजिक नेते अनेक झाले; पण राजकारण असो वा समाजकारण, आपल्या मुख्य कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांतही ज्यांची प्रज्ञा तितक्याच प्रखरपणे चमकली, असे लोकोत्तर नेते कमी आहेत. त्यांतील दोन-तीन ठळक, सर्वज्ञात उदाहरणे पाहू व त्यांच्या आयुष्यात वाचनाचे काय स्थान होते ते पाहू.

लोकमान्य टिळक लहानपणापासून चौफेर वाचन करीत. वयाच्या आठव्या वर्षांपूर्वीच (सुमारे १८६४ साली) त्यांचा पूर्णाक-अपूर्णाकांपर्यंतचे गणित, संस्कृत रुपावलीकोश, समासचक्र, निम्मा अमरकोश आणि ब्रह्मकर्माचा बहुतेक भाग पाठ झाला होता, यावरून त्यांच्या वाचनाच्या आवाक्याची कल्पना येऊ शकेल! पुढेही आयुष्यभर त्यांचा व्यासंग कायम राहिला. १५० वर्षांपूर्वीच्या त्या काळात त्यांच्या स्वतच्या लग्नात, आषाढपाटीच्या प्रथेतील वस्तूंऐवजी तितक्या किमतीची उपयुक्त पुस्तकेच द्या, असा आग्रह लोकमान्य धरून बसले होते, ही गोष्टही त्यांच्या वाचनप्रेमाची साक्ष देते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाचनदेखील असेच चतुरस्र व अफाट होते. लहानपणी त्यांचे वडील त्यांना राणा प्रताप, शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी नि पोवाडे वाचून दाखवत असत. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षांपर्यंत त्यांनी इतिहासापासून ते आरण्यक-उपनिषदांपर्यंत विविध विषय वाचले होते! त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की ‘पुस्तके आणि वृत्तपत्रे यांच्या वाचनाचे त्याला इतके वेड होते, की हाताशी लागलेले प्रत्येक पुस्तक वा वृत्तपत्र तो साद्यंत वाचून काढत असे.’ इतके चतुरस्र व अफाट वाचन त्या काळातही अपूर्व असेच होते!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वाचनव्यासंगही दांडगा होता. त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील त्यांना रामायण, महाभारतातील कथा वाचून दाखवत. मोरोपंत, मुक्तेश्वर हे पंडित कवी तर नामदेव, तुकाराम या संतकवींचे अभंग पाठ केल्यामुळे मुलांच्या (डॉ. आंबेडकर आणि भावंडे) संस्कारक्षम मनावर उत्तम ठसा उमटला. हळूहळू वडिलांच्या शिकवणुकीचा, शिक्षणाविषयीच्या तळमळीचा आंबेडकरांवर परिणाम होऊ लागला. त्यांना अभ्यासाची तसेच अभ्यासेतर वाचनाची आवड उत्पन्न झाली. पुस्तकांसाठी ते हट्ट करू लागले. त्यांचे वडीलही अशा वेळी खिशात पसे असोत वा नसोत, तत्काळ पुस्तक आणण्यास बाहेर पडत. खिशात पसे नसल्यास ते त्यांच्या थोरल्या (लग्न झालेल्या) मुलीकडे जात. तिच्याकडून पसे उसने घेत. तिच्याकडेही पसे नसल्यास, तिला दिलेल्या दागिन्यांपकी एक दागिना तिच्याकडून घेऊन तो एका ठरावीक मारवाडय़ाकडे गहाण ठेवत. पसे मिळताच पुस्तक घेऊन घरी येत. महिनाअखेर निवृत्तिवेतन हाती येताच दागिना सोडवून आणून न चुकता परत मुलीस द्यायचा असा त्यांचा परिपाठ असे. जो संस्कारी पिता आपल्या मुलाच्या वाचनासाठी इतके अपार कष्ट घेतो, त्याच्या मुलाने आयुष्यात खूप मोठे होऊ नये तर काय?

चांगले, सकस अन्न आणि वाचन यांचे अनुक्रमे शरीर आणि मन यांवर होणारे चांगले परिणाम आपण पाहिले. आता याउलट निकृष्ट अन्न, निकृष्ट वाचन यांचे काय दुष्परिणाम होतात ते थोडक्यात पाहू. ज्याप्रमाणे निकस, निकृष्ट अन्नामुळे शरीराचे कुपोषण होऊन वाढ खुंटणे, कमी रोगप्रतिकारशक्ती इ. लक्षणे दिसतात, त्याचप्रमाणे निकृष्ट, निकस साहित्याचे वाचन करत गेल्यास – मानसिक अस्वास्थ्य, कमकुवत मन:प्रकृती, एकांगी विचार इ. लक्षणे व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. हल्ली लहान लहान १५-१६ वर्षांच्या मुलांमध्येही एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडल्यावरून आत्महत्या करण्याची चिंताजनक उदाहरणे वाढीस लागली आहेत, असे वृत्तपत्रातील बातम्यांवरून सहज दिसून येते. या घटना नि:संशय शोकजनक असल्या तरी त्यांच्या कारणांच्या मुळाशी जाऊ पाहिल्यास असे दिसून येते की या मुलांच्या समोर जीवनात आदर्श म्हणून चांगली मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वे नव्हती. रोजच्या जीवनातल्या अपेक्षित असलेल्या अडचणी न सोडवता आल्यामुळे त्यांच्यावर घरीदारी दबाव नकळत येत असतो. हळूहळू या कोवळ्या मुलांचे मन म्हणजे वास्तविक जग आणि कल्पनेतले जग यांच्यातील संघर्षांची जणू युद्धभूमी बनते. बरं, कोणाशी याबाबत बोलावं तर बोलता येईल, अशी ऐकून समजून घेईल अशी व्यक्ती सगळ्यांच्याच आयुष्यात असते असे नाही. असली तरी तिच्याशी बोलले पाहिजे हेही अनेकदा सुचत नाही. आयुष्यात अडचणी सर्वानाच येतात. पण त्यावर मात करायची तर त्यासाठी काही गुण अंगी असावे लागतात, अंगी बाणवावे लागतात. थोर व्यक्तींची, राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचल्यावर मनावर आपोआप या गुणांचे संस्कार होत असतात. पण या मुलांच्या वाचनात या प्रकारच्या ‘कंटाळवाण्या’ साहित्याचा समावेश जवळजवळ नसतो. याचा परिणाम म्हणजे काळ जातो तशी अशा मुलांची मन:स्थिती अतिशय तरल, नाजूक होत जाते. एक प्रकारे ती स्वत:च नकळत विणलेल्या कोशात अडकत, बंद होत जातात. त्यातूनच मग, घरच्यांनी हवा असलेला फोन घेऊन दिला नाही, किंवा परीक्षेत कमी मार्क पडले अशा आयुष्याच्या संदर्भात क्षुल्लक अशा गोष्टींनीही मानसिक ताण घेऊन टोकाची कृती करून बसतात!

योग्य वाचन केल्याने अत्यंत कठीण परिस्थितीतही अविचल राहून, तर्कशुद्ध, योग्य निर्णय घेणारे, परिस्थिती बदलेपर्यंत दीर्घकाळ चिवटपणे झुंज देणारे विवेकशील मन घडवता येते. जितके सुदृढ शरीर असणे आवश्यक असते तितकेच, किंबहुना अधिकच आवश्यक असते सुदृढ, कणखर, निरोगी मन असणे. आणि सुदृढ निरोगी शरीर जसे आहार-व्यायामाने कमवावे लागते तसेच कणखर, निरोगी मनही योग्य वाचनाने बनवावे लागते आणि तसे ते बनवता येते!

वाचन = व्यायाम(ही)

वरच्या परिच्छेदात आपण व्यायामाचा उल्लेख पाहिला. उत्तम शरीरस्वास्थ्यासाठी नुसते चांगले अन्न पुरेसे नसून चांगला व्यायामही तितकाच आवश्यक असतो. आणि शारीरिक व्यायाम वेगळा करावा लागतो. तो अन्न खाताना आपोआप होत नाही.

मनाच्या संदर्भात, वाचनाचे मात्र वैशिष्टय़ असे की वाचता वाचता आपोआप मेंदू त्यावर विचार करू लागतो व मेंदूला, त्याच्या विविध केंद्रांना चालना मिळून मेंदूला व्यायाम होतो. ज्याप्रमाणे उत्तम व्यायामाने शरीराची ताकद, सुदृढता वाढते, त्याचप्रमाणे मेंदूला चालना देणाऱ्या, विचारप्रवर्तक, नावीन्यपूर्ण संकल्पना असलेल्या वाचनाने मानसिक वाढ उत्तम होऊन मन:प्रकृती सुदृढ, कणखर होते, विचारपद्धती सुधारते, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. याचाच अर्थ, वाचन हे मनासाठी अन्न व व्यायाम दोन्हीचे काम करते!

यावरून मनाच्या वाढीसाठी व मनाच्या उत्तम आरोग्यासाठी वाचनाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. म्हणून पूर्वी मुलांना लहानपणी थोरामोठय़ांच्या कथा चरित्रे सांगत. जिजाऊंनी लहान शिवबाला रामायण-महाभारतातील धर्माच्या, शौर्याच्या, वेळी कर्तव्य म्हणून स्वजनांशीही लढण्याच्या गोष्टी सांगितल्या म्हणून त्यांच्यापुढे ते आदर्श निर्माण झाले.

आजच्या लहान मुलांना कोणत्या गोष्टी वाचायला, पाहायला मिळतात? चांगल्या वाचनातून त्यांच्यावर चांगले संस्कार होणार नसतील तर अशा संस्कारहीन मनांमधून शिवाजी, राणा प्रताप, टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकरांसारखे चारित्र्य तर जाऊच दे, पण निदान जबाबदार, कणखर नागरिक तरी कसे घडणार? भारत हा जागतिक महासत्ता व्हावा, असे सगळ्यांनाच वाटते. पण भारत देश म्हणजे काही दिल्लीत लाल किल्ल्यात बसलेला कोणी एक प्राणी नाही. देशाचे नागरिक मिळून देश बनतो. जोपर्यंत देशाचे नागरिक सुधारत नाहीत, तोपर्यंत देश कसा सुधारणार? या दृष्टीने आपण वाचनाकडे बघतो का? रस्त्यावरचे अस्वच्छ, निकृष्ट पदार्थ खाल्ले तर फार तर एक-दोन दिवस पोट बिघडते, जुलाब होतात, विषकारक पदार्थ पडून जातात. शरीर पुन्हा ठीक होते. शरीरावर सहसा कोणताही कायमचा वाईट परिणाम होत नाही. पण वाईट वाङ्मय वाचले आणि पूर्ण विसरले असे सहसा होत नाही कारण जे वाचतो त्याचा मनावर, विचारशक्तीवर कळत-नकळत अगदी लहान का होईना पण परिणाम, संस्कार होत असतो. निकृष्ट दर्जाचे साहित्य वाचून विचारशक्तीही तशीच निकृष्ट होऊ लागते, होत जाते.

म्हणून वाढत्या, संस्कारक्षम वयात जसे पौष्टिक सत्त्वयुक्त अन्न अत्यावश्यक असते अगदी तसेच चांगले, उत्तम आदर्श निर्माण करणारे सकस साहित्य वाचणे अत्यावश्यक आहे !!. भेळ, भजी पाव खाऊन ज्याप्रमाणे पलवानी शरीर कमावता येत नाही त्याप्रमाणेच कसहीन लेखन वाचून सुसंस्कृत, विचारक्षम, प्रगल्भ मन तयार होणे केवळ अशक्य आहे!

मग आता एक प्रश्न असा येईल की याचा अर्थ कसहीन वाचायच्याच नाहीत का? तर याला उत्तर म्हणून परत एकदा अन्न आणि वाचन यांतील साम्य वापरून उदाहरण देतो. डॉक्टरांनी कितीही सांगितलं तरी आपण रस्त्यावर भेळ-पाणीपुरी खाणं पूर्णपणे बंद करतो का? नाही ना? पण म्हणून आपण रोज उठून भेळ-पाणीपुरी खातो का? तर नाही. आपण कधी तरी महिना दोन महिन्यांतून एखादे वेळी खातो. जेव्हा खातो तेव्हाही (त्यातल्या त्यात) स्वच्छ, माहितीच्या ठिकाणी खातो. आणि खातो तेव्हाही प्रमाणात खातो. ही पथ्ये सांभाळून भेळ-पाणीपुरी खायला जशी हरकत नसते, त्याचप्रमाणे अशीच पथ्ये सांभाळून मधून मधून निखळ करमणूक म्हणून असलेले साहित्य वाचायलाही काहीच हरकत नसते.

यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे भेळ-पुरी खाण्याचे प्रमाण ठरवून घेणे. उदा. मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाणे महिन्यात किमान अमुक इतकी अमुक विषयांवरची पुस्तके वाचण्यास द्यावीत. त्यांना कंटाळा असल्यास सुरुवातीला त्यांना ती वाचून दाखवावीत. हळूहळू गोडी लागून ती स्वत:च अशी पुस्तके आवडीने वाचू लागतील. उदा. सातवी -आठवीतील मुला/मुलीला महिन्यात  एक चरित्र/आत्मचरित्र (जे त्यांना वाचावेसे वाटेल ते), एक इतिहासाचे पुस्तक (ऐतिहासिक कादंबरी नव्हे!) वाचण्यास सांगावे आणि ही दोन पुस्तके वाचल्यावर मग महिनाभर त्यांना वाटतील ती पुस्तके वाचू द्यावीत. अनुभव असा आहे की एकदा या पोषक साहित्याची मुलांनाच सवय लागली की इतर सामान्य साहित्याकडे ती आपणहूनच पाठ फिरवतात. तेव्हा, मुलांना घडवायचे असेल तर पालक म्हणून तुम्हाला खूप काही अचाट करण्याची गरज नाही. फक्त त्यांना चांगले वाचन आणि सामान्य वाचन यातला फरक समजावून द्या. पुढचे बहुतेक सगळे काम ते वाचनच पार पाडेल!

म्हणून परत एकदा कळकळीचं आवाहन करतो की जसा मुलांनी काय खावं काय नाही याचा विवेक बाळगता, तसाच मुलांनी काय वाचावं काय नाही हाही विवेक बाळगा!

शेवटी, यावरून साने गुरुजींच्या प्रसिद्ध ‘श्यामची आई’ मधल्या एक प्रसंगाची तीव्रतेने आठवण झाली, ती थोडक्यात सांगून हा लेख संपवतो.

लहानग्या श्यामला अंगणात आंघोळ झाल्यावर मातीच्या अंगणातून घरात जाताना ओल्या पायांना माती लागून ते घाण झालेले अजिबात आवडत नसत. म्हणून तो आंघोळ झाल्यावर आईला दगडावर पदर अंथरायला लावून त्यावर पाय कोरडे करत असे. श्यामची आई त्याचा हा हट्ट पुरवताना त्याला म्हणाली, ‘श्याम, पायांना घाण लागू नये म्हणून जसा जपतोस, तसा मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो!’

मुलांवर उत्तम संस्कार व्हावे म्हणून सतत जागरूक असणारी श्यामची आई आज असती तर ती माउली कदाचित हेच म्हणाली असती की ‘श्याम, शरीराची चांगली जडणघडण, चांगले पोषण व्हावे म्हणून जसे सकस, पौष्टिक अन्न खातोस, तसे या वयात मनाचे पोषण व्हावे म्हणून चांगले सकस, दर्जेदार साहित्यही वाच हो!’
मंदार उपाध्ये – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader