|| मिलिंद मुरुगकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ फेब्रुवारी- रविवारी मुंबईत निघणारा मोर्चा हा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी नसेल, असे आता स्पष्ट झाले आहे. म्हणजे राज ठाकरे यांच्या याआधीच्या भूमिकांशी फारकत घेणारा हा मोर्चा नसेल. पण त्यानंतरच्या राजकारणानेही नवनिर्माणाच्या मूळ संकल्पनांशी फारकत घेणारा ‘सोपा मार्ग’ निवडू नये..
प्रश्न अगदी साधा आहे. आणि याचे उत्तरदेखील सरळ साध्या नैतिक जाणिवेतून आले पाहिजे. राज ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्यातील सुधारणांना समर्थन देणार नाही असे आता म्हटले आहे. पण या कायद्यातील सुधारणांना राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष प्रखर विरोध का नाही करणार, हे समजत नाही. समजा, मुंबईतील रस्त्यावर पावभाजी विकणाऱ्या एखाद्या इरफानकडे नागरिकत्वाचे पुरावे नाहीत म्हणून त्याचा देश त्याच्यापासून हिरावून घेतला आणि त्याच वेळेस त्याच्या शेजारच्या विक्रेत्याकडेदेखील असे पुरावे नसतील तरी तो केवळ मुसलमान नाही म्हणून त्याला भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला झाला, तर त्यात राज ठाकरे यांना मोठा अन्याय नाही दिसणार? इरफान हे नाव मुद्दाम घेतले, कारण काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनीच त्यांच्या त्या वेळेसच्या पक्षध्वजाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ठणकावून विचारले होते की, ‘‘इरफान पठाण केवळ मुसलमान आहे म्हणून त्याच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल तुम्ही संशय घेणार का?’’ आता राज ठाकरे यांना हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो – ज्याच्या पिढय़ान्पिढय़ा तुम्हाला प्रिय असलेल्या महाराष्ट्रात गेल्या, अशा एखाद्या इरफानवर होऊ घातलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी नाही राहणार? मग तुमच्या पक्षातील ‘महाराष्ट्र’ या शब्दाला अर्थ तरी काय?
अवैधरीत्या भारतात राहत असलेले बांगलादेशी आणि पाकिस्तानी शोधून त्यांना त्यांच्या देशांत पाठवायला कोणाचाच विरोध नाही. ती कारवाई वर्षांनुवर्षे सुरू आहेच. ताजा प्रश्न- हे लोक कोण ते ठरवण्याचा निकष काय असावा, असा आहे. नागरिकत्वाचा सुधारित कायदा आणि त्यापाठोपाठ येणारे नागरिकत्व पडताळणीसारखे उपक्रम पिढय़ान्पिढय़ा या देशात राहणाऱ्या लोकांचा देश त्यांच्यापासून हिरावून घेणार आहेत. आणि सर्व धर्मातील गरिबांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मोर्चाची प्रस्तुतता ती काय?
कायदा हा तत्त्वांवर उभा असतो. आणि तात्त्विक स्पष्टता यावी म्हणून काल्पनिक उदाहरण घेणे सयुक्तिक असते, हे राज ठाकरे तर जाणतातच. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत अवैधरीत्या आलेल्या मेक्सिकन लोकांबद्दल अत्यंत असभ्य भाषेत टीका करत असतात. पण आपण ‘मेक्सिकन’ या शब्दाऐवजी ‘महाराष्ट्रीय’ असा बदल करू आणि अशी कल्पना करू की, ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकत्वाची कागदपत्रे नसलेल्या सर्वाना अमेरिकी नागरिकत्व देण्याची सोय केली, पण अशी कागदपत्रे नसलेल्या फक्त महाराष्ट्रीय लोकांना मात्र अमेरिकी नागरिकत्व मिळणार नाही असा कायदा संमत केला. राज ठाकरे यांना प्रश्न असा की, असे झाले तर अमेरिकेचे कायदेशीर नागरिकत्व असलेल्या महाराष्ट्रीय नागरिकालादेखील हा त्याच्यावरील मोठा अन्याय नाही वाटणार? तसे झाले तर भारतात राहत असूनदेखील अमेरिकेतील या गोष्टीचा निषेध राज ठाकरे करतील, याची मला खात्री वाटते. आणि त्यांनी तसे करणे अगदी योग्य आहे. कारण तशा कायद्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठाच धोक्यात येते. आणि राज ठाकरे तर एक कलाकार आहेत. सर्वसाधारणपणे कलाकार तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल संवेदनशील असतात. राज ठाकरे यांना प्रिय असलेल्या युरोपीय शहरांच्या उभारणीत व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य महत्त्वाचे आहे. ते मूल्य मानणाऱ्या संस्कृतीतूनच त्या शहरांची रचना झाली.
दोन वर्षांपूर्वी मी राज ठाकरे यांचे भाषण नाशिकला ऐकले. सभेला प्रचंड गर्दी होती. त्या वेळेस राज यांनी डोळ्यांत पाणी आणणारे चित्र मोठय़ा पडद्यावर सर्वाना दाखवले. एक महिला थोडय़ाशा पिण्याच्या पाण्यासाठी खोल विहिरीत उतरली होती आणि ती कळशी डोक्यावर घेऊन, जीव धोक्यात घालून केवळ सळ्यांच्या छोटय़ा पायऱ्यांवर पाय देऊन वर येत होती. राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता की, आज नाशिकजवळच्या माझ्या या माताभगिनींना जर असे जगावे लागत असेल, तर काय अर्थ आहे विकास, प्रगती या शब्दांना? त्यांचे ते वाक्य आणि ते दृश्य पाहून संपूर्ण सभागर्दी हेलावून गेली होती. वातावरण निवडणुकांचे होते. पण राज यांच्या वाक्याने राजकारणाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. सभेत एक उदास गंभीर वातावरण पसरले होते. ती स्त्री कौसल्या असेल किंवा एखादी कौसरदेखील असू शकेल. दु:ख सारखेच. मूलभूत प्रश्न सारखेच. आणि महाराष्ट्रात नवनिर्माणाचे स्वप्न पाहणाऱ्या मनसेसारख्या पक्षाने हे प्रश्न महत्त्वाचे नकोत का मानायला? त्या कौसल्येच्या किंवा कौसरच्या वतीने जाब विचारा ना राज्यातील महाविकास आघाडी सरकारला. तुटून पडा त्यांच्यावर या गरीब महिलांच्या हितासाठी.. हेच नाही का विकासाचे, नवनिर्माणाचे खरे खोलवरचे राजकारण ठरणार? की ‘राज्य’कारणासाठी केवळ आपण नवनवीन शत्रू शोधत राहायचे?
राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व अनेक तरुणांना भुरळ घालते. त्यांच्यासारखे वक्तृत्व आज महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्याकडे नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला राजकीय यश नसेल मिळाले, पण राज ठाकरे यांचा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे. सर्व जाती-धर्मात आहे. मनसे या पक्षात तर आर्थिक प्रश्नांची जाण असलेले लोकदेखील आहेत. म्हणूनच राज ठाकरे यांच्याकडून जास्त खोलवरच्या विकासाच्या राजकारणाची अपेक्षा आहे.
आज देशाची आर्थिक अवस्था अतिशय बिकट आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. शेतीची अवस्था बिकट आहे. देशाची अर्थव्यवस्थाही अतिदक्षता विभागात असल्यासारखी आहे, असे मोदी सरकारमध्येच देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमणियन आपल्याला सांगतायेत. तरुणांसमोर बेकारीचे संकट तोंड वासून उभे आहे. अशा वेळेस त्या तरुणाईला आपण आर्थिक प्रश्नांवर संघटित करायचे की समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाकडे वळवायचे? तेढ निर्माण करणे तर नेहमीच सोपे असते.
राज ठाकरे यांना विनंतीपूर्वक सांगायचे आहे ते हे की, तुम्ही हा सोपा मार्ग नका निवडू. राजजी, तुम्ही योग्य निवड करा. लोकांचे प्रश्न आर्थिक प्रश्नांवरून दुसरीकडे वळवणाऱ्या ‘नागरिकत्वा’च्या मुद्दय़ावरल्या राजकारणाला बळ देऊ नका. तुम्ही जाहीर केलेला मोर्चा नेमका या राजकारणाला बळ पुरवतो. भारताची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट असताना हा मोर्चा मूलभूत प्रश्नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणाऱ्या राजकारणाला बळ पुरवेल. नवनिर्माणाचे ध्येय त्यामुळे धोक्यात येईल.
असे राज ठाकरे यांनी होऊ देऊ नये, ही विनंती!
लेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत. ईमेल : milind.murugkar@gmail.com