नरेंद्र दाभोलकरांच्या परिवारासमोर मान खाली घालून सॉरी म्हणण्यापलीकडे काही सुचत नाहीए. आम्हाला बसलेला धक्का तितकाच तीव्र आहे. ह्य़ा निलाजऱ्या हत्येचं ‘सुतक’ आपल्याला आजन्म भोगावं लागणार आहे.
किल्लीनी लॅच उघडताना, पाण्याचा घोट घेताना, रस्ता ओलांडताना, गाडीतून उतरताना, जिना चढताना, फोन घेताना, तोंड धुताना, चहा करताना, कुरिअर घेताना किंवा चुकून आरशात डोकावल्यावर स्वत:च्या डोळ्यात बघताना- घण घातल्यासारखं डोक्यात एकच एक वाजतंय.. की परवा दिवशी सकाळी, माझ्या पुण्यामध्ये नरेंद्रकाकांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यांचा खून झाला. ते जखमी नाहीत. ते हॉस्पिटलमध्ये नाहीत.. आता ते नाहीत.. आता ते या जगात नाहीत. ते जिवंत नाहीत. हे वाक्य मान्य करणं फार वेदनादायक आहे. अक्षरश: मागच्या सोमवारी साधना विशेषांकाच्या विमोचन कार्यक्रमाला आम्ही भेटलो होतो. मी फक्त नरेंद्रकाकांसाठी ऑल द वे पुण्याला गेले होते. त्या अडीच-तीन तासांच्या भेटीत कुठलाच सुगावा लागला नव्हता की, हा आमचा माणूस पुढच्या आठवडय़ात नसणार आहे. त्याला कुणीतरी हिरावून घेणार आहे आपल्यातून कायमचं.
गेल्या पंधरा-सोळा वर्षांतली काकांची प्रत्येक भेट मला अधिकाधिक सुशिक्षित, सजग करत आली आहे. मुंबई विद्यापीठातला हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतला प्रचंड मेळावा असो, वैराळे गावातल्या पाच-पन्नास स्त्रियांबरोबरची सभा असो, की अमेरिकेत कुमार केतकरांबरोबर आम्ही केलेले कार्यक्रम असोत.. अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक जागृती याबद्दल ती आस्था, तीच निकड, तीच कर्तव्यतत्पर भाषा. एखाद्या माणसाच्या सहवासानं तिथली हवासुद्धा बदलते असं म्हणतात. अगदी तसंच- नरेंद्रकाकांबरोबर काम करायला शिकताना माझ्याबाबतीत झालं. विचारांमध्ये तुरटी फिरवल्यासारखं. प्रत्येक वेळी गाळ तळाशी जमून स्वत:चे विचार, गृहितकं किंवा विश्वास स्वच्छ करता आले. ‘सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतिचा झडो..’ हे नरेंद्रकाकांच्या बाबतीत शंभर टक्के खरं होतं. गेल्या दीड दशकात जेव्हा जेव्हा मी ‘अंनिस’च्या कार्यक्रमांसाठी त्यांच्याबरोबर प्रवास केला, तेव्हा नरेंद्रकाका, त्यांचे पुष्पा भावे किंवा श्रीराम लागूंसारखे सहकारी किंवा कानाकोपऱ्यातून आलेले- नरेंद्रकाकांसाठी जीव तळहातावर घेऊन झपाटल्यासारखं काम करणारे असंख्य कार्यकर्ते- यांच्या बोलण्यातून एक प्रचंड हुरुप मिळायचा. आत्मविश्वास, सच्चेपणा आणि विचारांमधली पारदर्शकता या पुंजीवर आपण आनंदी जीवन निर्माण करू शकतो याबद्दल नि:संशय खात्री वाटायची.
ते मूर्तिमंत निर्भिडता होते असं म्हणताना मला आवर्जून सांगावसं वाटतं- की त्या निडरपणामध्ये बेफिकीरी किंवा डिवचण्याची गुर्मी कणभरही नव्हती. विचाराला शस्त्र नव्हे तर अलंकारासारखं वापरणारा, मानणारा माणूस होता तो. वैचारिक आव्हानांना विवेकानं भिडणारा खरा कार्यकर्ता होता तो. मी सुरूवातीला माझ्या कितीतरी हास्यास्पद वाटू शकणाऱ्या शंका त्यांना विचारल्या होत्या. त्यावर काकांनी कधीच फॉम्र्युला तयार असल्यासारखी उत्तरं दिल नाहीत. त्यांनी कायमच मला विचार करायला भाग पाडलं. अनेकदा-पुढारी म्हणतो- बंद पुकारा नेता म्हणतो- संप करा- म्हणून अंधपणे अनुयायी अनुकरण करतात. हा मुद्दाच कधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात आला नाही. आपली आपल्यालाच प्रचिती आल्यामुळे असंख्य कार्यकर्ते ‘घरचं काम’ असल्यासारखे जोडले गेले होते. फसवले गेलेले, लुबाडले गेलेले, भोंदूपणाच्या नादी लागून भिकेला लागलेले, जादूटोण्याच्या नादात स्वत:चा जीवलग गमावलेले किंवा चक्क या विषयाची आस म्हणून जनजागृती करण्यात रस असलेले- काकांनी गोळा केलेले सुहृद. असा स्वत:ला प्रत्यय आलेला एखादा माणूस जेव्हा समोरच्याला विचार करण्याचं आवाहन करतो, तेव्हा त्यात तळमळ असते. आळस झटकण्याची विनंती असते. कारण थोतांडांच्या मागे लागणं म्हणजे आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकणं. तुम्ही माझ्यातर्फे विचार करा, निर्णय घ्या. थोडक्यात आमची सोय वाढवा. मंत्र तंत्र करून आमचं मनोरंजन करा! या अशा वृत्तीमुळे आपण कधी शोषित वर्गात गणले जायला लागतो कळतही नाही.
मुद्दा कधीच श्रद्धेचा नव्हता. तो वाद नव्हताच. काकांनी आजतागायत एकदाही मला- भाषणात कोणते मुद्दे मांड, कशावर भर दे- हे सांगितलं नाही. माझ्यावरच काय पण परिघात आलेल्या कुठल्याच माणसावर त्यांनी पढवलेली पोपटपंची करण्याचे संस्कार केले नाहीत. त्यांनी कायम विचारांना चालना दिली. आकलन वाढावं यासाठी खाद्य पुरवलं. मी त्यांना काका म्हणतीए. कारण ते माझ्या मैत्रिणीचे- मुक्ताचे बाबा. मुक्ता आणि मी फग्र्युसन कॉलेजात शिकायला एकत्र होतो. अगदी गेल्या सोमवारीच साधना विशेषांकाच्या कार्यक्रमाला आम्ही भेटलो, बोललो. या कार्यक्रमाबद्दल मी फेसबुकवर लिहिलं. ट्वीट केलं. नेहमीप्रमाणे मनाला स्पर्शून जाणारं, ताजं करणारं काकांचं वागणं. तीच ऋजुता, तीच तळमळ, निग्रह आणि प्रॅक्टिकल अप्रोच. लहानशी गोष्ट, पण मी कार्यक्रमात म्हणालेसुद्धा- की इतर ठिकाणी पाहुण्यांसमोर प्रत्येकी एक अशा मिनरल पाण्याच्या बाटल्या आणून ठेवतात, पण नरेंद्रकाकांच्या कार्यक्रमात मात्र सामायिक असं पाण्याचं एक तांब्याभांडं असतं फक्त. एकही पैसा, एकही प्रयत्न, एकही थेंब, वाया जाऊ न देण्याची वचनबद्धता.. अंनिसच्या कुठल्याही दौऱ्यात मी कधी हॉटेल/लॉजवर राहिले नाही. मुक्काम कायम कार्यकर्त्यांच्या, काकांच्या सुहृदांकडे. त्यामुळे विविध स्तरांवर माणसं माणसांशी- विचारांशी जोडली गेली कायम.
आपल्याला शहाणं करणारा, त्याचं क्रेडिट न मागणारा विचारी माणूस होता तो.. ‘होता’ हा शब्द लिहिताना मला किती यातना होतायत सांगू शकत नाही. मागच्या सोमवारी आम्ही एकत्र होतो. त्यांचं भाषण अजून माझ्या कानात आहे. आम्ही जे निरोपाचं बोललो ते अजून मनात ताजं आहे. एकही गोष्ट इफेक्टसाठी/प्रदर्शनासाठी नाही. आभाराचे, औपचारिकतेचे फोन/एसएमएस नाही. आपल्या हेतूंविषयी काठोकाठ गांभीर्य भरलेलं. ‘‘बरं झालं तू आलीस.. चांगलं बोललीस..’’ या पार्टीग नोटवर निघताना, मी प्रत्येक वेळी हजार वाक्य मनाशी बोलत परतीचा प्रवास केला आहे.. परत कधीही बोलवा काका.. प्लीज मला बोलवा. मला माझ्यासाठी खूप काही मिळतं. कमजोर होण्याच्या कुठल्याही क्षणाकडे मी डोळ्यात डोळे घालून बघू शकते. आयुष्यात कधी कुणी भेकडासारखं अपमान करणं असो की गेल्या महिन्यात माझ्या मुलीला खूप खूप बरं नसणं असो. गळामिठी फक्त स्वच्छ विचारांनाच घातली. माफी/भीती/प्रेम ही प्रत्येक भावना प्रचंड ताकदीनं जगता आली काका. त्यात तुमचा फार मोठा हात आहे. अठरा वर्षांनंतर अनेक हक्क उपलब्ध होतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपण कायद्याने सज्ञान म्हणवून घेण्याचा हक्क. आता मला कुणी प्रतिप्रश्न करू शकत नाही, मी मनमानी करणार. या हट्टापायी अनेकजण स्वत:ची कबर स्वत: खोदतात. हिंसेला शरण जातात. मग ती मानसिक हिंसा का असेना.. काकांना भेटल्यावर प्रत्येक वेळी ही कृतज्ञता उचंबळून यायची की मी त्यातून वाचले. हा वाचण्याचा दिलासा कायम बुलंद आवाहन करायचा.. की आपल्या प्रश्नांसाठी देव/गुरू/बाबा यांना साकडं घालणं, नवस बोलणं, आत्मक्लेष करून घणं यामुळे- आपण फक्त पळ काढतो समस्येपासून. तिथे घट्ट रोखून उभं राहण्यात कमालीची ताकद आहे. त्या ताकदीत बदलाची मोठी आशा आहे.
चमत्कारांनी जग बदलेल अशा बजबजलेल्या मानसिकतेत बदल घडवणाऱ्या, संयतपणे चिकाटीनी शास्त्रीय कारणमीमांसा करू धजणाऱ्या, गलथान कारभाराविरुद्ध घट्ट रोवून उभ्या असलेल्या या विचारप्रवर्तक ज्येष्ठ नागरिकाला गोळ्या घालून कुणाला काय मिळालं आहे? स्वच्छ विचारांना इतके घाबरतो आपण? आपल्या भोंदू/जादूटोणायुक्त बुवांना झाकणं आपल्याला इतकं अनिवार्य आहे? या लांच्छनास्पद कटामागे जी कुणी डोकी आहेत, त्यांनी एवढंच जाणावं की त्यांनी एक अतिशय निंदनीय, अभद्र कृती घडवली आहे. त्यातून कुणाचाही, कशाचाही फायदा होणार नाहीए. सिनेमा तयार झालाय माझ्या मनात त्या घटनेचा. शिरस्त्याप्रमाणे प्रभातफेरीला निघालेले नरेंद्रकाका.. त्यांच्या डोक्यात नक्की सक्रीय विचार असणार.. अंधश्रद्धा मुळापासून खुडण्यासाठीचा नवा निर्धार असणार.. घरच्यांची आठवण असणार कदाचित.. मनातल्या सिनेमात सकाळचं पुणं दिसतं.. काकांचं चालणं दिसतं.. मोटारसायकलवरून आलेले दोन तरुण दिसतात.. त्यांनी काका बेसावध असताना त्यांच्यावर धरलेला नेम दिसतो. त्यातून सुटलेल्या गोळ्या दिसतात.. पुढे काही क्षण डोळ्यासमोर अंधार येतो आणि आधीपासूनच सुरू असलेली छातीतली कळ पुन्हा एकदा सुई टोचल्यासारखी कचकचून दुखते. मग पेपरात आलेला- रक्ताच्या थारोळ्यात धारातीर्थी पडलेला- काकांचा फोटो दिसतो. किती मोठा विश्वासघात आहे हा.. पाण्याचासुद्धा एकेक थेंब वाया न घालवणाऱ्या माणसाचंच रक्त आपण वाहू दिलं? आपल्या नवसांसाठी कीडामुंगीचाही जीव जाऊ नये म्हणून आयुष्य वेचलेल्या माणसाचाच आपण जीव घेतला? ज्या हजारो, लाखो माणसांच्या हितासाठी हा माणूस अहोरात्र झटला.. त्यातल्याच दोन अनोळखी चेहऱ्यांनी, त्यांच्या हातांनी काकांना गोळ्या घालण्याचं धाडस करावं? या कटातल्या प्रत्येक अन् प्रत्येक माणसाची लेडी मॅक्बेथसारखी विनाशाकडे वाट चालू झाली आहे हे नक्की.
काकांना न दिलेल्या वचनाला स्मरून इथेच काय, आयुष्यात कुठेही अपशब्द वापरता येत नाहीत.. शाप देण्याची कुवत नाही, इच्छा नाही. पण आमच्या हृदयाला पिळवटून टाकणारी, माणुसकीला कलंक लावणारी हिणकस गोष्ट तुम्ही का केलीत याचा जाब मात्र हवा आहे. आमच्या माणसाला मारलंत तुम्ही?! जमिनीवर कोसळलेल्या फोटोत दिसणाऱ्या त्यांच्या पाठमोऱ्या देहानं जागासुद्धा जास्त व्यापली नव्हती. पाय मुडपून कुशीवर शांत झाले होते. हे काहीही म्हणताना, लिहिताना- अंगावरचा काटा शमत नाही, डोळ्यातलं पाणी आवरत नाही. साधी राहणी आयुष्यात एरवीच्या सुखसोयी सोडा पण कधी लक्झरी बस घेतली नाही. कायम एसटीनं प्रवास केला. रस्त्याच्या कडेला उभं राहून दोन घास खाल्ले, कुठलंही पाणी प्यायले. सामान्य नागरिक असणं मानाचं मानलं. त्या सर्वसामान्य जगण्याला स्वत:च्या विचारांनी सन्मान्यत प्राप्त करून दिली. लाखो आया-बहिणी भावांची फसवणूक होऊ नये म्हणून जीवाचं रान केलं. अशा या आमच्या प्रेमळ, प्रवर्तक, व्यासंगी माणसाचा खून करण्याची मास्टर माईण्ड योजना कशाला आखत बसलात भ्याडांनो? जगात पुष्कळ गुन्हेगार आहेत. बॉम्बहल्ले करणारे, निरपराधांचा जीव घेणारे, व्यसनं करणारे, आया-बहिणींवर बलात्कार करणारे, सरकारचे पैसे खाणारे, दरोडे घालणारे, पाशवी चाळे करणारे.. अगणित आहेत. ते मोकाट सुटलेले असताना, आम्हाला धीर देणारा, आशेचा किरण दाखवणारा, शांतताप्रिय माणूस तुम्हाला इतका डेंजरस वाटलाच कसा???
कलियुग म्हणा, पाताळयंत्री माणसं म्हणा.. हा रक्तरंजित दिवस घडवून आपला अधोगतीकडे जाणारा रस्ता आपणच अधोरेखित केला आहे. आता तुम्ही खूप नाटकं कराल. खुन्यांनो.. लपून बसाल, गुन्हेगारांना शोधायचा प्रयत्न कराल.. कुठल्या तरी माणसाला खुनी म्हणूनही पुढे कराल.. कदाचित कायदासुद्धा कराल पुढे-मागे.. म्हणजे कराच.. पण हे सगळं होत असताना हृदयात खुपसलेली सद्विचारांची सुई एकच धोषा लावून आहे- की आता आमचा माणूस नाही ना हो! आमच्या नरेंद्र दाभोलकरांचा या महाराष्ट्रात खून झाला. त्यांच्यासारख्या विचाराच्या निर्मळ झऱ्याला नैसर्गिक मृत्यू आला नाही, त्यांना मारण्यात आलं.. कधी जाणवलंच नव्हतं की या मानवतावादी माणसात माझा इतका जीव गुंतलाय.. त्यांच्यासाठी श्रद्धांजलीची भाषा वापरण्याची ताकद माझ्यात नाही. ‘खून झाला’- या कारणासाठी ते आपल्यात नाहीत हे मान्य करण्याचं बळ माझ्यात नाही. ते आहेत. माझ्यात आहेत. तुमच्यात आहेत. असलेच पाहिजेत. त्यांच्यासाठी मर्ढेकरांची कविता.. माझी सगळ्यात आवडती प्रार्थना-
भंगू दे काठिन्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे..
येवू दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे..
धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जे जे पाहाणे
वाकू दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे.
सो कुल : घात झाला
नरेंद्र दाभोलकरांच्या परिवारासमोर मान खाली घालून सॉरी म्हणण्यापलीकडे काही सुचत नाहीए. आम्हाला बसलेला धक्का तितकाच तीव्र आहे. ह्य़ा निलाजऱ्या हत्येचं ‘सुतक’ आपल्याला आजन्म भोगावं लागणार आहे.
First published on: 30-08-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of narendra dabholkar