श्रेयस वागळे

नमस्कार. मला पहिल्यापासूनच रसायनशास्त्रात खूप रस होता. अकरावी-बारावीत असताना याच क्षेत्रात करिअर करायचं पक्कं ठरलं होतं. मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’मध्ये मला टेक्स्टाईल केमिस्ट्री शिकण्याची संधी मिळाली. त्या काळात पॉलिमरबद्दल शिकताना ‘सिंथेटिक पॉलिमर’ या विषयात अधिक रस वाटू लागला. पदवीनंतर परदेशात शिकल्यास तिथल्या या क्षेत्रातल्या घडामोडी कळू शकतील, असा विचार मनात होता. टेक्स्टाईल केमिस्ट्रीच्या क्षेत्रातून प्युअर केमिस्ट्रीकडे वळणं, ही गोष्ट तितकीशी सोपी नव्हती. हा अभ्यासबदल करून परदेशी शिकणं अधिक सोईचं होतं. शिवाय जर्मनीत केमिकल इंडस्ट्रीमधल्या अनेक संस्था वैविध्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत असल्याने चांगल्या संधी उपलब्ध व्हायची शक्यता होती.

माझ्या निर्णयाला घरच्यांनी ठाम पाठिंबा दिला. मला निर्णयस्वातंत्र दिलं. मी चार-पाच ठिकाणी अर्ज केले होते. त्यातले दोन मान्य झाले. त्यातही हाले-विटेनबर्गमधल्या मार्टिन ल्युथर युनिव्हर्सिटीमध्ये केवळ रसायनशास्त्र शाखेचा अभ्यास करता येणार होता. त्यामुळे तिथेच दोन वर्षांच्या एम. एस. पॉलिमर मटेरिअल सायन्स या अभ्यासक्रमासाठी मी प्रवेश घेतला. तिथे विद्यार्थ्यांच्या कष्टांचं नेहमी कौतुक केलं गेलं. कधी काही चुकलं तरी ती चूक नीट समजावून सांगितली गेली. शिकवण्याच्या ओघात सातत्याने दिले जाणारे संदर्भ आणि अनेक एक्सरसाईजमुळे त्या त्या संकल्पना समजायला सोप्या जात. एक्सरसाईज पूर्ण करण्यात काही अडचण आलीच तर प्राध्यापकांच्या मदतीचा हात कायम पुढे असायचा. त्यांना बिनधास्त शंका विचारता यायच्या. प्राध्यापक वुल्फगँग एच. बिंडेर यांच्या मार्गदर्शनाखाली मी मास्टर थिसिसचं संशोधन केलं. विविध माध्यमांमधल्या कोटिंग्जमध्ये तडे गेल्याच्या प्रक्रियेची जाणीव होणं आणि रासायनिक घटकांचा वापर करून त्यात स्वयंसुधारणा कशी करता येऊ  शकेल, याविषयी हे संशोधन होतं. हे संशोधन करताना शिस्त आणि नियमांचं पालन करणं या गोष्टी विद्यार्थ्यांकडून कटाक्षाने पाळल्या जाणं अपेक्षित होतं. प्रयोग जरूर करा, पण मानवी आयुष्याचं मोल जाणा, हे जणू तिथलं ब्रीदवाक्य होतं. प्रयोग करताना मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता सुरक्षेला प्रचंड महत्त्व दिलं जायचं. आपल्याकडेही हा विचार होणं गरजेचं आहे.

पहिल्या दोन सेमिस्टरनंतर उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांंना ‘हाले यंग पॉलिमर सायंटिस्ट’ ही वार्षिक शिष्यवृत्ती दर महिन्याला दिली जाते. ही शिष्यवृत्ती पॉलिमर मटेरिअल सायन्स हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोघांनाच दिली जाते. ती मला मिळाली होती. तेव्हा प्राध्यापक बिंडेर यांनी माझं कौतुक केलं होतं. प्रयोगशाळेत कसं वावरावं हे चांगल्या रितीने शिकायला मिळालं. काम आणि आयुष्याचा समतोल साधायला शिकलो. कामाच्या वेळी कामावर लक्ष केंद्रित करणं आणि उरलेल्या काळात आयुष्य एन्जॉय करणं अपेक्षित असतं. कधीकधी घरीही काम करावं लागतं, नाही असं नाही. पण तसं क्वचित घडतं. सुट्टीत वेळात वेळ काढून मित्रांसोबत फिरायला जायचो. कारण एरवी अभ्यासामुळे वेळच मिळायचा नाही. परदेशी येऊन स्वयंपाक, घरकामासह एकूण स्वावलंबन शिकलो. जबाबदारीने वागणं म्हणजे काय ते कळलं. क्वचित फुटबॉल खेळायचो. व्यावहारिक कारणांपुरती जर्मन भाषा शिकलो.

एमएस झाल्यानंतर पीएचडीसाठीचे पर्याय शोधायला लागलो. ३-४ ठिकाणी मुलाखतींना गेलो. मग इस्रायलमधील तेल अवीव युनिव्हर्सिटीच्या जागेसाठी जाहिरात आली. ती मला चांगली वाटली. त्यातली संशोधन करताना इतर संशोधकांशी भेटीगाठी होणं, संशोधन विषयांवर आधारित परिषदांना हजर राहायची संधी मिळणं ही गोष्ट मला अधिक भावली. मी अर्ज केला. मग स्काईपवर मुलाखत झाली. आठवडय़ाभरात त्यांचा होकार आला. या युनिव्हर्सिटीत माहितीचं आदानप्रदान होणं, एकमेकांच्या कामासंदर्भात सूचना देता येणं या गोष्टी होतात. प्राध्यापकांशी संवाद साधता येतो, संपर्क वाढतो आणि पुढे त्यामुळे संशोधनाला गती येते. हे अशा प्रकारचं विचारमंथन संशोधनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं. नवनवीन संधींची दारं किलकिली होऊ  शकतात.

काही प्राध्यापकांनी मिळून एका प्रकल्पावर काम करून ते मेरी क्युरी फंडिंग ऑर्गनायझेशनला सुपूर्द केलं. तो प्रकल्प मंजूर झाला. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाच्या कामात विद्यार्थी सहभागी व्हावेत म्हणून पदभरतीची जाहिरात दिली. तेव्हा मी अर्ज केला आणि मला त्यात सहभागी व्हायची संधी मिळाली. कॅन्सर अर्थात कर्करोगावर चालणाऱ्या औषधोपचारात रसायनशास्त्रातील तत्त्वांचा प्रामुख्याने वापर करणं हे या प्रकल्पाचं ध्येय आहे. कर्करोगात केल्या जाणाऱ्या औषधोपचारांचे शरीराच्या अन्य भागांवर दुष्परिणाम होतात. कर्करोगग्रस्त भाग वगळून शरीराच्या अन्य भागांवर होणारे दुष्परिणाम होणं टाळता कसं येईल, या संदर्भात आमचं काम सुरू आहे. यासाठीच्या विविध मुद्दय़ांवर अनेक ग्रुप अन्य काही विद्यापीठांमध्ये काम करत आहेत. आमचा ग्रुप पॉलिमरच्या गोळ्यात (नॅनोमीटर साईज्ड) रासायनिक परिवर्तन होऊन ते टय़ुमर असणाऱ्या जागीच कार्यरत होतील आणि बाकीच्या अवयवांवर त्याचा दुष्परिणाम टाळता येईल, याविषयी काम करत आहे. या संशोधनाच्या संदर्भात सगळ्यांना प्रत्येक मुद्दय़ाची माहिती असेलच असं नाही. ती देण्यासाठी साधारण सहा महिन्यांनी ट्रेनिंग इव्हेंटचं आयोजन केलं जातं. त्यामुळे इतरांच्या कामाची माहिती मिळते, आपल्या कामाची दिशा कळते, नवनवीन गोष्टी कळतात आणि संशोधनाला अधिक चालना मिळते. अलीकडेच मी केमिकल ट्रान्सफॉर्मेशन ही थीम असणाऱ्या इव्हेंटसाठी स्वित्झर्लंडच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ बासेल’ला जाऊन आलो.

पीएचडीची सुरुवात होऊन आता वर्ष होईल. या वर्षभरात खूपच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. माझे पीएचडीचे मार्गदर्शक प्रा. रॉय जे. अमीर  हे खूप शांतपणे मला त्यांचे मुद्दे समजावून सांगतात. ते कायम माझ्याशी चर्चा करायला तयार असतात. एरवी विद्यार्थी-प्राध्यापक यांच्यातल्या संवादात आढळतो तसा कोणताही अडथळा आमच्यात कधीच येत नाही. आमच्या ग्रुपमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. तर एकमेकांना मदत आणि सहकार्य केलं जातं. नेदरलॅण्ड, आयलँण्ड, ग्रीक, चीन, रुमानिया, रशिया, इटली, स्पेन आणि भारत या देशांतली ही मित्रमंडळी आहेत. संध्याकाळी आम्ही फिरायला जातो. कॅफेत जातो. तेव्हा थोडं कामाबद्दल, करिअरविषयीचे प्लॅन्स आणि कुटुंबाविषयी, खाद्यजगताबद्दल भरपूर बोलणं होतं. मी भारतीय विद्यार्थ्यांसोबत अपार्टमेंट शेअर करतो आहे. सुट्टी कशी मिळते आहे, त्यानुसार मी फिरायला जायचा बेत आखतो. युरोपमध्ये फिरणं खूप सोईचं आणि फायदेशीर ठरतं.

आमचं पहिलं ट्रेनिंग होतं नेदरलॅण्डमध्ये आइंडहोवनला. तिथे पहिल्यांदाच सगळे प्राध्यापक भेटले. त्या संवादांतून प्रत्येकाच्या कामाबद्दलची माहिती कळली आणि त्या विषयी अधिक रस वाटू लागला. माझं सध्याचं काम मला खूप आवडतं आहे. मला उगाच रिकामटेकडेपणा आवडत नाही. सतत कामाचं व्यवधान असणं मला अधिक भावतं. आता वर्ष संपत आल्याने विद्यापीठाला वार्षिक आढावा द्यायचा आहे. सध्या त्या कामाची गडबड सुरू आहे. शिवाय खूप गोष्टी करायला आणि शिकायला मिळत आहेत. आयुष्यातली एक चांगली संधी मला मिळाली आहे. त्यामुळे मेहनत प्रचंड करायला लागते आहे, मात्र त्याविषयी माझी काहीच तक्रार नाही. चुकून फावला वेळ मिळालाच तर रिसर्च पेपर – बुक्स वाचतो किंवा गाणी वगैरे ऐकतो. वृत्तपत्र वाचतो. क्वचित मालिका बघतो. आराम करतो. चक्कर मारायला जातो. हिब्रू शिकणं थोडं अवघड असून तेवढा वेळ आणि ताकद नाही. वर्षभरात हिब्रू कळायला लागली आहे, पण येते असं म्हणता येणार नाही. लोक इंग्रजी बोलत असल्याने काही अडत नाही. नंतर वेळ मिळाला तर शिकेनही कदाचित. साधारणपणे साडेतीन-चार वर्ष पीएचडीसाठी लागतील असा अंदाज आहे. नंतर पोस्ट डॉक करायचा विचार आहे. विश मी लक.

कानमंत्र

* पीएचडीसाठी अर्ज करताना सखोल चौकशी करून मग निर्णय घ्या. विशेषत: पैशांच्या संदर्भात सुस्पष्टता असायला हवी.

* पीएचडी करताना होणाऱ्या चढ-उतारांची मानसिक तयारी करायला हवी. सिनिअर्सशी संवाद साधून या प्रक्रियेची सविस्तर माहिती करून घ्या.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

Story img Loader