बहुतेक जुनी वितुष्टं आठवून सूड उगवण्यासाठी आपले पूर्वज डासांचा जन्म घेत असणार. त्याचा सामना करण्यासाठी ‘मॉस्किटो रिपेलंट’ हय़ा नावाखाली बाजारात जे जे काही उपलब्ध आहे ते विकत घेऊन मी आमचं शस्त्रागार सज्ज ठेवलं आहे. तरीही पराभव ठरलेलाच!
डासांची शिरगणना होते का? ‘डास’ नक्की काय आहे? प्राणी की पक्षी? पाखरू की किडा? डासावरूनच ‘डसणे ’ हे क्रियापद प्रचलित झालं आहे का? हिंदीतल्या मच्छर आणि इंग्लिशमधल्या मॉस्किटो- हय़ा विचित्र शब्दांचा उगम कसा झाला? त्याचप्रमाणे मराठीत ‘डास’ हे नाव कोणाला सुचलं? डासांबद्दल पशुपक्षीप्रेमी संघटनांची काय भूमिका आहे? वाघांची संख्या वाढण्यासाठी जशी त्यांनी मोहीम राबवली होती, तशी डासांची संख्या कमी होण्यासाठी का राबवत नाहीत? साध्या कुत्र्या-मांजराला सिनेमात घेतलं, पळायला लावलं तर तो गुन्हा होतो. पण डास मारला- अगदी जिवानिशी मारला- तरी ती कृती दंडनीय नाही. असे का? मूर्ती लहान म्हणून डासांवर अन्याय होतोय असे तुम्हाला वाटत नाही का? मी डासांची बाजू घेतीए असं तुम्हाला वाटतंय का? जगात एक तरी माणूस भूतदया म्हणून डासांची बाजू मांडायला तयार होईल का? मी हय़ापूर्वी कधीतरी एवढे प्रश्न विचारले आहेत का?
नाही ना? मग आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल की मी किती गांजले आहे! घर का छप्पा छप्पा छान मारा है इन डासों के लिए.. पण टाळीत सापडतच नाहीत! हय़ा वेळी वैविध्यपूर्ण आकाराचे डास दिसून येतायत. अक्राळविक्राळ मोठ्ठे. जे बाग/ ड्रेनेज यांच्या आसपास असतात. मध्यम- जे हॉटेल, एअरपोर्ट, घर, दुकान, कार कुठेही वस्तीला असतात. आणि एक स्पेशल जात म्हणजे लहानखुरे- हलके, जे फक्त घरांमध्ये घोंघावत असतात. यंदा त्यांची लोकसंख्या- आय मीन डाससंख्या खूपच वाढली आहे, असं माझ्या लक्षात आलंय. कारण फक्त दर्शनी खोलीत किंवा बेडरूममध्येच डास दबा धरून बसलेले असतात असं नाही. आता ते स्वयंपाकघरामध्येही मुक्त संचार करतात. हल्ली मला संशय येतो की डासांनीही डाएट बदललंय की काय? म्हणजे फक्त रक्तपिपासूपणा न करता ते आरोग्यासाठी- फळपिपासू, अन्नपिपासूही झाले आहेत की काय? शिवाय २०१३ च्या डासांची विशेष पसंती बाथरूमना आहे. आपण दात घासताना अचानक डोळ्यांसमोरून काहीतरी गेल्यासारखं वाटलं तर घाबरू नका. आय मीन- खूप घाबरा. कारण न चमकणारे हे डास आरशाजवळ घिरटय़ा घालत असतात. ब्रश तोंडात कोंबलेला ठेवून आपण अचानक पाय उडवत लंगडीसदृश नाच करायला लागतो. पुढचं जरा खासगी आहे- टॉयलेटच्या आसपासचं. भक्तगण गुरुदेवांच्या पादुकांवर कसे स्वत:ला झोकून देतात. तसे हे डास आपल्या पावलांचा डाव साधतात आणि अक्षरश: नको त्या वेळेला चावून आपली पंचाईत करतात.
मी जिमची मेंबरशिप रद्द करायच्या विचारात आहे. जिममध्ये एक्सरसाइज करण्यापेक्षा घरातल्या घरातच सर्व खोल्यांसधे डासांच्या शोधात पळून, त्यांना पकडण्यासाठी उडय़ा मारून, टाळ्या वाजवून- सर्व प्रकारचे कार्डिओ वर्क आऊट आणि कॅलरी बर्निग साध्य होतील असा मानस आहे. आता आपण डासांचा अजून एक फायदा बघू. ‘दृष्टी.’ ज्यांना चष्म्याचा नंबर घालवायचा आहे, त्यांनी डोळे दिवसातून चार वेळेला स्वच्छ धुणे, निरांजनाच्या ज्योतीकडे एकटक पाहणे इ. गोष्टींबरोबर ‘डासमारी’ हा नवा व्यायाम केला पाहिजे. त्यात- झोपेचं सोंग घेतलेल्या मांजरासारखं- डासांचं निरीक्षण करत स्तब्ध बसायचं. फक्त डोळ्यांनी डासांच्या हालचालींवर सतर्क नजर ठेवायची आणि टप्प्यात आल्यावर चटकन टाळी वाजवून डाव साधायचा. हय़ामुळे दृष्टी अत्यंत स्वच्छ आणि तीक्ष्ण होते असा माझा सिद्धांत आहे.
मध्ये एकदा डासांवर संतापून मी एक अघोरी प्रकार केला. सकाळी घरातून बाहेर पडताना बाथरूमसकट प्रत्येक खोली-पॅसेजमध्ये कासवछापचं एक एक सुदर्शनचक्र लावून ठेवलं.. अपेक्षा अशी होती की डासांचा कायमचा नायनाट होईल. संध्याकाळी परत आल्यावर डास जाऊ देत पण आम्हीच गुदमरून बेशुद्ध पडतो की काय अशी परिस्थिती होती. धूर इतका गच्च भरला होता घरभर- की त्यासमोर नाटक-सिनेमातली स्मोक मशीन लाजावीत. खोकत-शिंकत आम्ही खिडक्या उघडायला गेलो. ते जवळजवळ धुक्यात हरवल्यासारखे गुप्तच झालो. तोंडात धुराची कडवट चव यायला लागली. एकुणात प्रयोग सपशेल फसला आणि झोपेचं खोबरं व्हायचं ते झालंच.
एखाद्या माणसाला दुसऱ्याच्या कौतुकासाठी टाळ्या वाजवण्याची दानत नसेल तर अशांचाही डास वचपा काढतात. त्या सर्व न वाजवलेल्या टाळ्या रात्री-अपरात्री आपल्याच घरात आपल्याला वाजवाव्या लागतात. तरी डास बेमालूमपणे गुप्त होण्यात यशस्वी होतात. आत्ता हा लेख लिहिताना मला किती यातना होत असतील कल्पना करा. माझ्या लिखाणाच्या टेबलाखाली डोकं घालून डास मारण्यातच माझा निम्मा वेळ जातोय. मला आता जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी डासच दिसतात. ओडोमास फासून फासून माझा व्ॉक्सचा पुतळा होईल असं वाटायला लागलंय. डेंग्यू, मलेरिया हय़ा सगळ्यातून वाचून जिवंत आणि सुखरूप राहिले तरच पुढचा लेख लिहीन. कारण ‘नभ डासांनि आक्रमिले.’ कारण ‘डासोच्छिष्टं जगत् सर्वम.’ तरीही डासरूपी-माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू. जिंकू किंवा मरू..
सो कुल : ‘डास-कॅपिटल’
बहुतेक जुनी वितुष्टं आठवून सूड उगवण्यासाठी आपले पूर्वज डासांचा जन्म घेत असणार. त्याचा सामना करण्यासाठी ‘मॉस्किटो रिपेलंट’ हय़ा नावाखाली बाजारात जे जे काही उपलब्ध आहे...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 19-07-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mosquito capital