१५ ऑगस्ट जर राष्ट्रीय सण आहे तर बाकीचे दिवस काय राष्ट्रीय दुखवटय़ाचे आहेत का? सभ्य नागरिकांना राजरोस लुबाडणारा हा देश आहे की चोरांचा मेळावा?
गोरेगाव पश्चिममधल्या अलका कुबल ह्य़ांच्या स्टुडिओमध्ये माझं डबिंग चालू होतं. साधारण साडेबाराला मी काम आवरतं घेतलं. दोन वाजता मला दादरला एक मीटिंग होती. दुपारच्या वेळी साधारण सव्वा तासात पोचू- असा माझा आणि आमचे ड्रायव्हर सुजित ह्य़ांचा अंदाज होता. स्टुडिओचा प्रेमळ स्टाफ जेवून जाण्याबद्दल आग्रह करत होता. मी कसंबसं त्यांना पटवून सांगितलं, की मीटिंगला वेळेवर पोचणं आवश्यक आहे. फार बिझी दिवस आहे. तिथे पोचल्यावर खायला काहीतरी मागवते. हा ओव्हरस्मार्टपणा मी दाखवला आणि तिथेच स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. गोरेगाव वेस्ट ते अंधेरी ईस्ट एवढय़ाशा अंतरासाठी मी तब्बल तीन तास घेतले. मी म्हणजे, त्यावेळी तिथे असणाऱ्या तमाम मुंबईकरांनी. इतका चडफडाट झाला, भुकेनी जीव कासावीस झाला, ईस्टर्न ‘एक्स्प्रेस’ हायवेवरच्या त्या टप्प्यात कुठे बाथरूमला जायची सोय नाही. रेडिओवरची तीच तीच गाणी आणि सतत आजूबाजूला वाजणारे हॉर्न ऐकून ऐकून कावल्यासारखं झालेलं. शिवाय असा भीषण ट्रॅफिक जाम का आहे- ह्य़ाचा कुणालाही अंदाज नव्हता. त्या दिवशी चहाची वेळ उलटून गेली, तरी माझ्या जेवणाचा पत्ता नव्हता. मीटिंगचे तर बारा वाजलेच, पण माझं काय झालं, घरी कधी पोचले. विचारूच नका!
दुसऱ्या दिवशी हुशारी करून, जेवून मी आतल्या रस्त्यांनी निघाले. गोरेगावहून जुहूच्या एसएनडीटी कॉलेजपर्यंत पोचायला दोन तास. कारण समजायला मार्ग नाही. जिथे तिथे खड्डे. गाडय़ांची वाट लागतीए आणि वाहतूक ठप्प. निष्क्रियपणे गाडीत बसून चडफडण्यापलीकडे काय करणार. बॅटरी संपली नसेल तर एसएमएस करत बसता येतं, कुणाला फोन करून चीड व्यक्त करता येते. पण बिचारे ड्रायव्हर एखाद् दुसरं वाक्य बोलून निषेध नोंदवण्यापलीकडे काय करणार. त्यांनाही तहान-भूक-भावना असतात की.
मी कधीही ट्रॅफिक जॅम ह्य़ा विषयाचा बाऊ करत नाही एरवी. म्हणजे मला आपण काही करू शकत नाही, ह्य़ा गोष्टीचा इतका मनापासून तिटकारा आहे, की मी वेळेतच निघते घरून. अनेकदा पाच-दहा मिनिटं आधीच पोचते दिलेल्या वेळेपेक्षा. पण अलीकडे ह्य़ा नष्टर अनुभवांनी कहर केलाय. गलिच्छ नियोजनाचा आदर्श नमुना झालोय आपण. महत्त्वाच्या पाहुण्यांना स्वच्छ आणि सजवलेल्या रस्त्यांवरून घेऊन जातात- आणि आम्हाला साधं ईस्ट वेस्ट ओलांडायला हल्ली दीड-दोन तास लागतायत. ह्य़ाबद्दलचं स्पष्टीकरण कोणीही देत नाही. मीलन सबवेमध्ये अडकून आमची विमानं चुकतात. त्यापायी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. एअरपोर्टवर जाऊन हुज्जत घालत बसावी लागते. ईदच्या रात्री घरी येताना लीलावती हॉस्पिटल ते लिंकिंग रोड एवढंसं अंतर पार करायला मला एक तास २० मिनिटं लागली.
ह्य़ात आपल्या मनाची जी ओढाताण होते, ती कुठल्या सरकारला, कुठल्या मंत्र्यांना सांगायची? नवरा घरी काळजीने वाट बघत असतो. बाळाला बरं नसतं, प्रामाणिकपणे काम करून, नियम पाळून, अवाच्या सव्वा टोल भरून, दमून भागून घरी परतणाऱ्या आम्हा निरुपद्रवी नागरिकांची अशी क्रूर थट्टा करून ह्य़ा शासनाला काय मिळतंय? आम्ही ट्रॅफिकमध्ये तासन्तास खोळंबलेले असताना, हे अधिकारी/मंत्री लाल दिव्याच्या गाडय़ांच्या ताफ्यात कुठकुठल्या भूमिपूजन, अॅवॉर्ड फंक्शन आणि आश्वासनांच्या कार्यक्रमाला जात असतात- ते आमच्या जिवावरच ना? मग त्यांना सगळ्या सोयी, सुविधा, लक्झरी आणि आमच्या वाटय़ाला अशी भुक्कड, निलाजरी परवड का?
पोलीस असतात अनेकदा. नाही असं नाही. पण हल्ली बऱ्याचदा टोलपाशी उभं राहून मद्यसेवन तपासणी म्हणून ड्रायव्हरला नाव विचारतात आणि पुढे आपल्याला आपल्या नशिबावर सोडून देतात. परवा ठाण्याच्या प्रयोगासाठी मी तीन तास आधी निघाले होते. पोचल्यावर एक छोटी मीटिंगही होती. आधी तर सोडाच, मी प्रयोगाच्या वेळेपेक्षाही पाच मिनिटं उशिरा पोचले. गाडीत बसल्या बसल्या वेळेच्या प्रेशरनी मी रडकुंडीला आले. ब्रेक आणि धक्के, खडे, ताण ह्य़ांनी पोटात कळ यायला लागली. गाडीतच मेकअप करून, प्रेक्षकांना दिलगिरी व्यक्त करून, झटकन कपडे बदलून, तिसरी घंटा होऊन नाटक सुरू केलं- तरी मी जी बझ्झ्ड् होते. आणि ह्य़ाबद्दल कितीही वाईट वाटून घेतलं तरी स्वत:ला अपराधी मानता येत नाही. चूक माझी नव्हती. मी वेळेत निघाले होते. तीन-साडेतीन तासात नाशिक/पुण्यालाही पोचता येतं. तर इथल्या इथे राहून एका उपनगरातून दुसऱ्यात पोचायला इतकी रडारड?
यंदाच्या १५ ऑगस्टला मला खरंच ह्य़ा देशाची लाज वाटली आहे. सगळ्यांच्या बोलण्यात येत होतं. उद्या सुट्टी आहे १५ ऑगस्टची. नसेल ट्रॅफिक. तीनशे पासष्टपैकी फक्त स्वातंत्र्यदिनाचा एक दिवसच ट्रॅफिक नसणार असेल तर पारतंत्र्यात राहणंच बरं होतं म्हणायचं. संस्कृती आणि समृद्ध परंपरेवर प्रेम असून उपयोग काय? इतिहास किती काळ गोंजारणार? रहावं तर इथे वर्तमानात, खड्डय़ात लागतंय ना? नुसते पैसे खाऊ नका. सुरळित व्यवस्थापन द्या. पापं फेडायला तुम्ही मेल्यानंतर नरकात जाल. पण जिवंतपणी आम्हाला अशा नरकयातना देऊ नका. प्रशासन शेम शेम!
सो कुल : राष्ट्रीय खोळंबा!
१५ ऑगस्ट जर राष्ट्रीय सण आहे तर बाकीचे दिवस काय राष्ट्रीय दुखवटय़ाचे आहेत का? सभ्य नागरिकांना राजरोस लुबाडणारा हा देश आहे की चोरांचा मेळावा?
First published on: 23-08-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai traffic jam