परीक्षेत असायचं ना. खालीलपैकी कुठल्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहा.
पुढीलपैकी कुठल्याही एका विषयावर निबंध लिहा. पर्याय निवडण्याचं बाळकडू
आपल्याला शालेय जीवनातच पाजलं जातं म्हणायचं..
परवा मी स्टीलची ताटं घ्यायला एका दुकानात गेले होते. तिथे फक्त एकाच प्रकारची-वेगवेगळ्या आकारांची टिपिकल ताटं होती. मी विक्रेत्याला म्हटलं, ‘अजून दाखवा.’ तो म्हणाला, ‘ताट बोलेंगे तो येही है.’ मी म्हटलं, ‘असं कसं होईल? लहान मुलांसाठी छोटय़ा ताटल्या नाहीत का?’ तो म्हणाला, ‘थाली? है ना.’ मग त्यानी थाळ्या दाखवल्या. मी कप्प्याची ताटं विचारली. ती पण होती त्यांच्याकडे- गोल आणि आयताकृती. उसपे डिझाईन है, ये ताट नही डिश है, उसको तो प्लेट बोलते है, इसको काठ नही मिलेगा, ये पावभाजी की है.. असं म्हणता- म्हणता माझ्यासमोर छान सात-आठ ऑप्शन्स ऊर्फ ‘ताट’ ह्य़ा गटात मोडणाऱ्या विविध परिघांच्या गोलाकृती जमल्या. मी चांगल्या दमानी त्यातल्या मला हव्या त्या निवडल्या आणि समाधानानं बाहेर पडले.
डिश/ प्लेट/ ताट/ ताटली. नावं काहीही असोत. पण दोन किंवा अनेक पर्याय समोर असतात आणि आपण त्यातून एकच- आपल्याला रुचेल, पटेल ते घेतो. हे असं निवडणं किती सुखावह असतं. आपण आपल्या पसंतीला मान देऊ शकतो. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्य़ा म्हणीनुसार कुणाला काय आवडेल सांगता येत नाही. कुणाला कॉटनच्याच साडय़ा आवडतात, तर कुणाला फुलाफुलांच्या! कुणाला झुळझुळीत साडय़ांचा संताप येतो, तर कुणाला काठाच्या साडय़ा बॅकवर्ड वाटतात. पण दुकानात गेल्यावर जेव्हा आपल्यासमोर असंख्य साडय़ा आणल्या जातात. तेव्हा त्यात अनेक न पटणाऱ्याही असतात. त्या खरेदीच्या वेळेला फार महत्त्वाची भूमिका बजावतात- आपल्याला न आवडण्याची. थोडक्यात, आपलं ‘आवडणं’ अधोरेखित करण्यासाठी नापसंत होण्याची.
दिवाळीला काय घ्यायचं, मुलांना कुठल्या शाळेत घालायचं, कुठल्या फूडमॉलवर थांबायचं. ह्य़ा सगळ्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात. ते किती ‘बरं वाटवण्याचं’ काम करतात नाही? गाडी कुठली घ्यायची ह्य़ावर तर आपण सहज सहा-आठ महिने घालवू शकतो. आपल्या बजेटमधल्या गाडय़ांचे पाच-सहा तरी ऑप्शन असतात बाजारात. आपण सतत रस्त्यावरच्या गाडय़ा निरखत राहतो. एखादी कार बसकीच वाटते, दुसरी फार छोटी वाटते, एखादीचा रंगच मनात भरतो पण टेस्ट ड्राइव्हमधे ती पास होत नाही. खूप दिवस सगळ्या पर्यायांचा सखोल विचार केल्यानंतर आपण जेंव्हा ‘आपली’ गाडी घेतो, तेंव्हा आपण जग जिंकलेलं असतं. कारण बाकीचे पर्याय नाकारून ‘द बेस्ट कार’ घेतली आहे ह्य़ाबद्दल आपण ठाम होतो.
हल्ली स्पर्धेच्या काळात आणि माध्यमांच्या भडिमारात आपल्याला पर्यायांचा अभ्यास जास्त थेट आणि पटापटा करावा लागतो. कुठला ब्रॅण्ड आवडतो, कुठला गायक, कुठला क्रिकेटर, सीझन, सुट्टीचं ठिकाण, पदार्थ. कुठला छंद. एक ना दोन! मुलाखतींमधे अशी एका शब्दातली उत्तरं म्हणजे मला निव्वळ मटका वाटतो. त्या क्षणी आठवेल ते मोस्ट फेव्हरिट! जरा गडबडच उडते आपली. कारण अनेकदा एक पर्याय निवडताना बाकीचे नावडलेलेच असतात असं नाही.
अनेकदा पर्याय खिशातून आलेले असतात. आपल्याला अंथरुण पाहूनच पाय पसरावेसे वाटतात किंवा लागतात. उदाहरणार्थ : घर घेणं. इतरही आवडली असली, तरी परवडणारा पर्याय निवडणंच भाग असतं. कारण पैशाच्या बाबतीत आपली धाव तेवढीच पोचणार असते. पण पैशाव्यतिरिक्त आज कुठले कपडे घालावेत, कुठली भाजी करावी. हे अनपेक्षितपणे भेडसावणारे प्रश्न पर्यायांचा गुंता करून ठेवतात. आमच्या घरी स्वैपाक करणाऱ्या ताईंना मी कधी- तुम्हाला आवडेल/ वाटेल तो स्वैपाक करा- असं लिहिलं, तर त्या हमखास गोंधळून जातात. त्यामुळे अक्षरश: रोज- म्हणजे दर दिवशी- भाज्यांचा आढावा घेऊन, आठवडय़ात रिपीट झालेले नाहीत अशा नव्या पर्यायांचा मेन्यू लिहीत बसणं मला न कंटाळता करावं लागतं. फार विचार न करता कुणीतरी लिहून दिलेलं टास्क पूर्ण करणं अनेकांना सोपं वाटतं. ऑफिसांमधे वगैरे तर खासकरून पर्यायांना सामोरं न जाणं हासुद्धा अनेकांना चांगला पर्याय वाटतो!
एकाच बाबतीत आपल्याला पर्याय मिळत नाही. ते म्हणजे आपले जन्मदाते निवडणं. आपण जन्माला येताना आपले आईबाबा निवडले गेले असतात. आणि अर्थातच आईवडिलांच्या पोटी येणारी मुलगी/ मुलगा. गंमतच आहे. आपल्या जन्माला कारणीभूत असणारी, पर्यायच नसणारी ही गोष्ट, ही नाती- आपण किती सहज, स्वाभाविकपणे स्वीकारतो नाही..