दर काही महिन्यांनी ऋतू पालटला की स्वत:ला ‘रिचार्ज’ करावं लागतंय.. ‘रिबूट’ करावं लागतंय. ‘डम्प’ केलं जातंय. इतके एक्झॉर्स्ट का होतोय आपण?

तंद्री लागली होती माझी. कुंडीतली रोपं.. रस्त्यावरची झाडं.. त्यातून झिरपणारा प्रकाश.. सूर मारून आलेले दोन पोपट.. बराच वेळ रुंजी घालणारं एक निळं फुलपाखरू.. काय काय दिसत होतं.. खांदे सैल झाल्यासारखे वाटत होते. पाठ टेकून निवांत बसले होते मी. अर्धा-पाऊण तास झाला आणि माझं घडय़ाळाकडे लक्ष गेलं. दुपारचे चार वाजले होते. भर शहरात, सुट्टीच्या दिवशी, ऐन शॉपिंगच्या तासांना- कधी नव्हे ते मी एक नीरव शांतता अनुभवली. फार आश्चर्य वाटलं. कानांना, डोळ्यांना सवयच राहिली नाहिए. शांततेचे तास फक्त मध्यरात्रीच असतात असं समीकरण झालंय मनात.. किंवा फार तर दहशतीच्या दिवसांमध्ये. पण तेव्हा मन शांत नसतं. कधी- कुठे- केव्हा- काय होईल सांगता येत नाही अशा धास्तीत स्वत:ला घरात डांबून बसलेले असतो आपण. बेचैन असतो. टीव्ही लावायचा, बातम्या सहन न होऊन बंद करायचा.. धड चांगलं काही खायची इच्छा होत नाही. मस्त सिनेमा पाहात बसावंसं वाटत नाही.. ना दुपारची झोप लागते. काहीही केलं तरी ‘बंद’मुळे गालबोट लागल्यासारखी अस्वस्थपणाची छाया राहते सगळ्या गोष्टींवर..
पण परवा होळीच्या दिवशी सुदैवानं अलीकडे पलीकडे काही अघटित घडलं नव्हतं. रंग खेळणारेही अचकट विचकट वागत नव्हते. घरच्यांबरोबर पुरणाची पोळी खाताना मला जाणवलं.. असे किती कमी क्षण मिळतात हल्ली आपल्याला.. जेव्हा निव्वळ आनंदासाठी आपण सगळे एकत्र असतो. कुणाच्याच मनात भीती नसते, कटुता नसते, डाव नसतो. कशाचं प्रेशर आलंय आपल्या सगळ्यांवर? सतत दडपणाखाली असतो आपण. बाकी कशाच्या नाही, तरी वेळेच्या दबावाखाली तर असतोच असतो.
मुंबईत तर आपल्याला असं ताणयुक्त जगण्याची सवय लागलीए आणि जर ताण नसेल तर उलट काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना आपण जेव्हा केव्हा भेटतो, तेव्हा अगदीच जाणवतं हे. गप्पा मारताना धक्कादायक बातम्यांचीच चर्चा होते. सेन्सेशनल माणसंच हीरो होतायत. मध्ये एका कलाकाराबद्दल आम्ही काही जण कौतुकाने बोलत होतो. तर एक मित्र फटकन् म्हणाला.. ‘छे! आता त्याला मुख्य भूमिका कोण देतंय- तो झाला कॅरेक्टर अॅक्टर..’ मला गुदमरल्यासारखं झालं. आपण साधंसरळ जगणाऱ्या माणसांवर फुली मारायला लागलोय. गुन्हेगारांचा उदोउदो करायला लागलोय. माझा नवरा म्हणतो तसं आता जमाना वाल्या कोळ्यांचा आहे. चार-सहा घोळ घातलेली, कुणाकुणाला उल्लू बनविलेली माणसंच आता कर्तृत्ववान आणि सन्मान्य वाटायला लागली आहेत. पापभीरू माणसं दुर्लक्षपात्र झाली आहेत.
अशा जगण्याच्या, वाटण्याच्या, व्यक्त करण्याच्या सवयी हलकेच अंगवळणी पडत चालल्या आहेत. थोडक्यात, डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगणंच पुरुषार्थाचं व्हायला लागलंय. पण त्यासाठी आपण नसलेल्या तलवारींच्या शोधात हरवतोय की काय ते तपासून पाहायला पाहिजे. ‘बिझी असणे’ हा अलीकडच्या काळातला शिसारी आणणारा शब्दप्रयोग झाला आहे. बिझी नसलात तर तुम्ही जणू निरुपयोगी आहात अशी धारणा होते अनेकांची. बिझी नसलेली माणसं कारण नसताना दिलगिरीने जगतात. मोबाइल हा तर बिझी माणसांच्या शरीराचा आधुनिक अवयव झालाय. दहा मिनिटं बसून शांतपणे जेवणंही मुश्किल झालंय. कुणाचा तरी फोन कशासाठी तरी वाजतोच. एसएमएस, पिंग, बझ, मेल, बीबीएम, फेसबुक अपडेट, ट्विट्स नाहीतर कॉल तरी! जमलेल्या समूहामध्ये काही मिनिटंसुद्धा एकसंधपणा राहात नाही. फुलपाखरासारखे बागडत, बडबडत, खात, झोपत, जगत राहतायत लोक.
अनेक अनेक दिवसांनी, किंचित्काळ तरी असं विचलीत न होता सुरळीत वेळ घालवला मी. कितीतरी दिवसांनी जेवणाआधी प्रार्थना म्हटली दोन मिनिटं.. कितीतरी दिवसांनी चवीनं जेवल्यासारखं वाटलं. घास पोटात ढकलले नाहीत, पाचकळ शेरेबाजी केली नाही. मनात उणीदुणी आली नाहीत. खरंच असं वाटलं की, आदल्या रात्री जिथे कुठे होळी पेटली असेल त्यात स्वाहा झालं असेल हे बिझी असणं, तलवारी शोधणं, मनातलं तिखट, कडवट आणि बोचणारं सगळं. लहानपणी पुण्यात आमच्या कॉलनीत मोठी होळी पेटायची. तेव्हा सगळी तरुण मुलं नावडत्या गोष्टी आणि माणसांच्या नावांनी शेलक्या चेष्टेत एक मोठी बोंब ठोकायची.. तसंच आताही करूया.. बिझी असण्याच्या, स्ट्रेसच्या, स्पर्धेच्या, ईष्र्येच्या नावानंऽऽऽऽऽ

२‘’@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे