मना तुझे मनोगत
मला कधी कळेल का.
तुझ्या परि गूढ सोपे
कोणी, मला मिळेल का.
सौमित्र
अनेक समारंभांना आपण केवळ नाही म्हणता येत नाही म्हणूनच फक्त जातो. ओळखीच्या, नात्यातल्या. अनेक माणसांचे अनेक कार्यक्रम निघतात. लग्नं, मुंज, वाढदिवस, डोहाळजेवण, बारसं, साठी, पंच्याहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, वास्तुशांत काय काय निमित्त निघू शकतात! त्याशिवाय भिशी, अॅन्युअल गॅदरिंग, माजी विद्यार्थी मेळावा, सेण्ड ऑफ. मारुतीच्या शेपटीसारखी आहे ही यादी. अनेकदा घरात चक्क विभागणी करून घ्यावी लागते- की या कार्यक्रमाला मी जाते- त्या फंक्शनला तू जा म्हणून. तर कधी यजमान कुटुंबाशी चक्क घासाघीस करावी लागते- की अक्षता आणि रिसेप्शन- दोन्हीला नाही हो येऊ शकणार. एकच काहीतरी जमेल. प्रत्येकाला आपल्याकडचं कार्य ‘न भूतो न भविष्यति’ असं साजरं करायचं असतं. त्यामुळे प्लॅनिंग आणि आग्रह या दोन्हीला ऊत आलेला असतो.
आजकाल सिनेमा-नाटकांना कुणी निमंत्रण दिलं काय किंवा नाही दिलं काय फारसा फरक पडत नाही. जे पाहावेसे वाटतात ते नाटक-सिनेमे गाठतोच आपण केव्हातरी. ‘तुला बोलवलंय का. नाही का. मला आहे बुवा इन्व्हाइट.’ असल्या चर्चा करून कोण जास्त वजनदार किंवा जवळचं ह्य़ाचं मोजमापही नकोसं वाटतं. फारतर शंभर-दोनशे माणसं बोलवू शकणार असतात प्रीमिअरवाले. त्यात कुठे मानपमान वाटून घेत बसायचा?
पण ना. मधे एकदा माझ्या काही मैत्रिणींनी गेट-टुगेदर ठरवलं. सगळ्या जणी आपापल्या व्यापातून वेळ काढून भेटल्या. खूप दिवसांनी वगैरे. गंमत म्हणजे त्यांनी मला कळवलंच नाही. नंतर कधी तरी कुणाच्या तरी ओझरत्या उल्लेखातून कळलं, फेसबुकवर एक फोटो पाहिला. मला फार वाईट वाटलं. काहीच गैरसमज नसलेल्या या माझ्या चांगल्या मैत्रिणी. त्यांनी मला का सांगितलं नसेल?- ह्या रुसव्यानं पाणीच तरळलं डोळ्यांत. फोन, फेसबुक, एसएमएस, ई-मेल किती तरी मार्ग आहेत निरोप देण्याचे. नंतर कधी तरी एक मैत्रीण अधांतरी बोलत म्हणाली. ‘‘तू काय गं. किती बिझी असतेस. शूटिंगमधून कसा वेळ काढणार ना.’’ मी येऊ शकण्याची शक्यताच नाकारली गेली होती. यापूर्वी मी कधी येते येते म्हणून ऐन वेळी दगा दिला होता असंही नाही. किंवा बिझी असण्याचं कारण पुढे केलं होतं असंही नाही, पण मी येऊच शकणार नाही- असं गृहीत धरून, ठरलेल्या भेटीबद्दल सांगायची तसदीसुद्धा न घेणं- हे मला जरा दुखावून गेलं. अनेकदा आपण जाऊ शकणार नसलो, तरी मनानी तिथे असण्याची तसंच आपल्या सुहृदांनी एकत्र असण्याची भावनासुद्धा किती आनंददायी असते मनाला.
मला स्वत:चं हे दुखावणं जाणवून जरा आश्चर्य वाटलं. एरवी इतक्या कार्यक्रमांची निमंत्रणं येतात की नको नको होतं. मग न मिळालेल्या निमंत्रणात वाईट वाटण्यासारखं काय आहे? अक्षरश: वर्षांतले तीनशे पासष्ट दिवस म्हटलं तर रोज काही ना काही कार्यक्रम असतो. संयोजक नम्र अजिजी करत असतात. त्यांचा स्नेह, मन मोडणं कितीदा जिवावर येतं. शिवाय अनेक कार्यक्रम फ्लॅश होतात ते वेगळंच. नेमका कुठला तरी प्रीमियर असतो आणि त्याच दिवशी जवळच्या मैत्रिणीचं लग्न! एखादा महत्त्वाचा फॅशन शो आणि त्याच दिवशी आपल्या कॉलेजमधल्या सरांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. प्रत्येक वेळी मन आणि बुद्धी दोन्ही ताळ्यावर ठेवून निवड करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण फक्त व्यावसायिक यश मिळवून समाधान लाभणार नसतं आणि फक्त पारिवारिक सुखाचा, आप्तेष्टांचा विचार करत बसल्यानी काम मिळणार नसतं.
ज्या वेळी आपल्याला स्वत:बद्दल असं कौतुक वाटतं ना. की किती छान मॅनेज करतोय आपण आपलं आयुष्य. किती आघाडय़ांवर आपण संतुलन सांभाळतोय. माणसं, काम, मैत्री, पैसा, प्रगती सगळं कसं हातात हात घालून चाललंय. त्याच वेळी अशी एखादी लहानशी घटनासुद्धा आपली शांती ढळवते. खरं म्हणजे माझ्या मैत्रिणींनी काही माझ्याविरुद्ध कट रचला नव्हता किंवा मुद्दाम मला न बोलवण्याचा घाट घातला नव्हता. नंतर तर एक मैत्रीण फार हळहळलीसुद्धा. पण तरीही असं उगीचच वगळलं जाणं मला फार अन्याय्य वाटत होतं. कुणाला जाब विचारावा, भांडावं असं काही नाहीए त्यात. किंवा माझ्या मैत्रिणींनी त्या भेटीत विशेष काही केलं असंही नाही. पण फार दिवस सल लागल्यासारखं झालं होतं. तुम्हाला सांगताना किंचित संकोच वाटत होता- पण सांगितल्यावर आता हलकं वाटतंय. अशा घटना म्हणजे मोठं होण्यातली एक पायरीच असेल. ती चढली पाहिजे. फार निराकरण न करता पुढचं पान उलटलं पाहिजे. ते करताना जाणवतंय की किती लकी आहे मी. की अशी खासगी, वळचणीतली बोच शेअर करायला तुम्ही सगळे आहात माझ्यासाठी आणि कुठे तरी खात्रीही आहे, की माझ्या अशा भावनांना तुम्ही हसणार नाही. थँक यू मित्रा.