३१ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि नवीन वर्षाला सुरुवात झाली. वर्ष २०२५ ! नवीन वर्ष, नवी उमेद, जगण्याची नवी दिशा !! खरंतर प्रत्येक नवीन वर्ष हे सगळं घेऊन येतच असतं, पण २०२५ हे वर्ष मात्र अजून खास आहे, कारण हे वर्ष नवीन पिढीला घेऊन आलं आहे. १ जानेवारी २०२५ पासून जन्माला येणारी पिढी आहे जनरेशन बीटा. इंटरनेट, सोशल मीडिया आणि कृत्रिम प्रज्ञा जन्मत:च सोबत घेऊन येणारी पिढी. आणि पुढचं २२ वे शतक बघू शकणारी ही पिढी !

वैयक्तिक जीवनात पणजोबा -आजोबा – वडील – मुलगा- नातू अशा स्वरूपात पिढ्या मांडल्या जातात. समाज शास्त्रीयदृष्ट्या एका विशिष्ट कालखंडात जन्माला येणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला पिढी म्हणून पाहिले जाते. साधारण समान कालखंडात जन्माला येणाऱ्या लोकांनी आपल्या बालपणी समान ऐतिहासिक घटना, एकसमान सांस्कृतिक प्रवाह तसेच सारखेच सामाजिक, तंत्रज्ञानविषयक बदल अनुभवलेले असतात. याचा परिणाम त्यांच्या दृष्टिकोनावर आणि विचारसरणीवर होतो. यातून या प्रत्येक पिढीची एक विशिष्ट ओळख तयार होते.

youth earning source villages
ओढ मातीची
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
culture loksatta article
लोक-लौकिक : लोचा आहे का मेंदूत?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
why new year starts on 1st January
काळाचे गणित : नवं कॅलेंडर
Santosh Deshmukh muder case
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक; सूदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा : ओढ मातीची

एकाच काळात जन्मलेल्या लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान असतो, हा सिद्धांत हंगेरियन समाजशास्त्रज्ञ कार्ल मॅनहाइम यांनी पहिल्यांदा मांडला. ‘द प्रॉब्लेम ऑफ जनरेशन’ (१९५२) पुस्तकातून त्यांनी जनरेशन कॉन्शसनेस ही संकल्पना मांडली. पुढे ९०च्या दशकात विल्यम स्ट्रॉस आणि नील हॉवे या लेखकांनी ही संकल्पना अजून व्यापक करत स्ट्रॉस-हॉवे जनरेशन थिअरी हा सिद्धांत मांडला. १९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेल्या पिढीसाठी ‘मिलेनिअल्स’ हा शब्द तयार करण्याचे श्रेयदेखील याच जोडगोळीकडे आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात, नॉर्मन रायडरसारख्या समाजशास्त्रज्ञांनी जनसांख्यिकीय बदलांना सांस्कृतिक बदलांशी जोडून जनरेशन थिअरीचा अधिक विस्तार केला. सामाजिक विश्लेषक आणि जनसांख्यिकी अभ्यासक मार्क मॅकक्रिंडल यांनी तंत्रज्ञान आणि इंटरनेट यांच्याबरोबर जन्माला आलेल्या आधुनिक पिढींविषयी संशोधनपर मते मांडली आहेत. नव्या सहस्राकातील पिढ्यांसाठी ग्रीक वर्णमालेतील अल्फा, बीटा, गॅमा अशी अक्षरे योजण्याची कल्पना देखील यांची आहे.

गेल्या दीड शतकात जे जागतिक बदल घडले त्या अनुषंगाने जगभरातील विविध वयोगटातील लोकसंख्येला विविध जनरेशनच्या नावांनी संबोधण्यात येते. १८८८ ते १९०० या कालावधीत जन्मलेल्या आणि पहिल्या महायुद्धात होरपळून गेलेल्या पिढीला अमेरिकन कादंबरीकार गर्ट्रूड स्टीन यांनी ‘लॉस्ट जनरेशन’ म्हटलं. यानंतर १९०१ ते १९२७ या कालवधीतली पिढी ही ‘ग्रेटेस्ट जेनरेशन’ म्हणून ओळखली गेली. या पिढीतल्या बहुतांश लोकांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. या पिढीने युद्धानंतर आपल्या आपल्या देशाला पुन्हा उभारी देण्याचे मोलाचे कार्य पार पाडले. यांनतर १९४५ पर्यंत जन्माला आलेली पिढी म्हणजे द सायलेंट जनरेशन. युद्धानंतरची मंदी आणि महागाईची झळ या पिढीने सोसली. शांतपणे कार्य करत तंत्रज्ञान प्रगतीला गती दिली आणि आर्थिक समृद्धीचा पाया घातला.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. या बदलामुळे १९४६ ते १९६४ या काळात जन्माला आलेल्या पिढीला ‘बेबी बूमर्स’ असे नाव देण्यात आले. अमेरिकेतील बूमर्सनी स्पेस वॉर अनुभवले. रेडिओ आणि टीव्ही ही संपर्काची प्रमुख साधने होताना पाहिले. या पिढीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, मूलभूत हक्क या अशा तत्त्वांचा पुरस्कार करत आधुनिकता स्वीकारली.

बेबी बूमर्स जनरेशनची मुले म्हणजे जनरेशन एक्स. कॅनेडियन लेखक डग्लस कूपलँड यांनी त्यांच्या ‘जनरेशन एक्स: टेल्स फॉर अॅक्सिलरेटेड कल्चर’ या पुस्तकात १९६५ ते ८० दरम्यान जन्मलेल्या लोकांच्या संदर्भात जनरेशन एक्स ही संज्ञा वापरली होती. हेच नाव पुढे प्रसिद्ध झाले, याच धर्तीवर पुढच्या पिढ्या जनरेशन वाय आणि जनरेशन झेड ठरल्या.

हेही वाचा : संकल्पांचे नवे धोरण

जेन एक्सच्या काळात कॉम्युटर स्थिरस्थावर होऊ लागला होता. या पिढीने अॅनालॉग ते डिजिटल हा टप्पा अनुभवला. या मंडळींनी त्यांच्या आयुष्यात अटारी व्हिडीओ गेम्स, फ्लॉपी डिस्क सीडी, मायस्पेस आणि ब्लॅकबेरी सारख्या तंत्रज्ञानाचा उदय आणि अस्त होताना पाहिले आहे. पारंपरिक मूल्य आणि आधुनिकता यांची सांगड या पिढीने घातली, ही मंडळी आज तंत्रज्ञानाच्या महापुरात स्वत:ला अपडेटेड ठेवायचा प्रयत्न करत आहेत.

यानंतरची महत्त्वाची पिढी, जनरेशन वाय म्हणजेच मिलेनियल्स. १९८१ ते १९९४ या कालखंडात जन्मलेल्या या पिढीने डायल -अप ते फाइव्ह-जी इंटरनेट आणि फ्लॉपी डिस्क ते क्लाउड स्टोरेज असे भन्नाट बदल अनुभवले आहेत. मिलेनियल्सच्या बालपणात कॉम्प्युटर, टीव्ही, टेलिफोन, केबल नेटवर्क हे जीवनाचा भाग झाले होते. यामुळे इंटरनेटच्या आगमनानंतर झालेले मोठे बदल त्यांनी सहज स्वीकारले. इंटरनेट, सोशल मीडिया आणि स्मार्टफोनला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारणारी ही पहिली टेक्नो सॅव्ही पिढी होती. जागतिकीकरणाच्या काळात वाढलेल्या, मिलेनियल्सचा दृष्टिकोन जागतिक आणि व्यापक ठरला. आर्थिक दबाव, नोकरीची अनिश्चितता आणि बदलत्या सामाजिक नियमांमुळे या पिढीने लग्न, स्वत:चे घर आणि कुटुंब वाढवणे यासारखे पारंपरिक टप्पे पार पाडण्यात काहीसा विलंब केला. सध्या तिशी आणि चाळिशीत असणारी ही मंडळी जगभरातल्या अर्थव्यवस्थांचा कणा आहेत.

डिजिटल युगात जन्माला येऊन वाढणारी पहिली पिढी म्हणजे जनरेशन झेड किंवा झूमर्स. १९९५ ते २००९ या कालखंडात जन्मलेल्या या जेनझीजनी जगभरातली तरुणाई व्यापली आहे. तिशीच्या आतली ही मंडळी जगभरातल्या सोशल मीडिया, शॉपिंग साइट यांचा भरभक्कम आधार आहेत. जनरेशन झेड ही खऱ्या अर्थाने पहिली जागतिक पिढी आहे. पूर्वीच्या पिढ्यांसाठी फक्त संगीत, चित्रपट किंवा खाद्यापदार्थ यांच्या पुरतेच जागतिक ट्रेंड फॉलो केले जायचे. जनरेशन झेड मात्र सामाजिक जाणिवा, भाषा, फॅशन याबाबतीत देखील जागतिक आहे. करिअरच्या बाबतीत ही मंडळी रुळलेल्या पर्यायांपेक्षा वेगळी वाट चोखाळताना दिसतात.

संपूर्णपणे एकविसाव्या शतकात जन्मलेली पहिली पिढी म्हणजे जनरेशन अल्फा. २०१० ते २०२४ पर्यंत जन्माला आलेली ही मंडळी खरे डिजिटल नेटिव्ह आहेत. मोबाइल आणि इंटरनेट हे तर यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. आधीच्या पिढ्यात बालपणी रडल्यावर समोर येणाऱ्या खुळखुळ्याऐवजी या पिढीच्या हातात मोबाइल्स आले. परिणामी या पिढीने चालायला लागायच्या आतच टचस्क्रीनवर प्रभुत्व मिळवले आहे. कोविडमुळे आता मोबाइल्स यांच्या शिक्षणाचाही भाग झाले आहेत. सोशल मीडियाच्या सहज उपलब्धतेमुळे ही मंडळी सामाजिकदृष्ट्या जागरूक आहेत. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनेपासून तर जागतिक घडामोडींपर्यंत जेन अल्फा व्यक्त होतात.

हेही वाचा : सफरनामा : मधु इथे अन्…

या सगळ्या पार्श्वभूमीवर २०२५ च्या उंबरठ्यावर अनेक सामाजिक बदल होत आहेत. सामाजिक विश्लेषक आणि जनसांख्यिकी अभ्यासक मार्क मॅकक्रिंडल यांनी यावर आपल्या ब्लॉगमधून प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, आता बूमर्स निवृत्तीचे आयुष्य सुखाने जगत आहेत. चाळिशी-पन्नाशीत असणारे जेन एक्स आपल्या उद्याोगधंद्यात महत्त्वाच्या पदावर आहेत. ऐन उमेदीच्या वयातील मिलेनिअल्स जगाला आकार देत आहेत. तारुण्यातले जेन झी शिक्षण, उच्चशिक्षण आणि करिअरच्या मार्गावर आहेत. १६ वर्षाच्या आतले जेन अल्फा इंटरनेट आणि मोबाइलसह आपले बालपण जगत आहेत आणि २०२५ पासून जनरेशन बीटा ही नवी पिढी जन्माला येणार आहे.

२०२५ ते २०३९ या चौदा वर्षांच्या कालावधीत जन्माला येणारी ही पिढी म्हणजे जनरेशन बीटा. जनरेशन बीटा ही एआय आणि ऑटोमेशन दैनंदिन जीवनाचा नैसर्गिक भाग असलेल्या जगात वाढणारी पहिली पिढी असेल. बालपणी खेळायला एआय आधारित खेळण्यांपासून पुढे शाळांमध्ये एआय ट्युटरपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार आहे.

आधीच्या पिढीला आश्चर्यकारक वाटणारे आभासी वास्तविकता (Virtual reality) आणि संवर्धित वास्तविकता (Augmented reality) यांसारखे तंत्रज्ञान या पिढीसाठी सामान्य बाब असेल. जेन बीटा याहीपुढे जात ए. आर. आणि व्ही. आर. तंत्रज्ञानामुळे वर्गात बसल्या बसल्या सौरमालेची आभासी सफर करू शकतील. मागील पिढ्यांच्या तुलनेत ही नवी पिढी जन्मत:च स्मार्ट डिव्हाईस आणि इंटरनेटने वेढली गेली आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटीशिवाय जग ही कल्पना त्यांना स्वप्नवत वाटू शकते, पण यामुळे जनरेशन बीटासाठी डिजिटल आणि वास्तविक जग यांच्यातली सीमारेषा अधिकच धूसर होईल. सोशल मीडियावरचे डिजिटल विश्व त्यांच्या खऱ्या आयुष्याचा अविभाज्य भाग असेल. मार्क मॅकक्रिंडल यांच्या मते २०३५ पर्यंत जगात जेन बीटाची एकूण संख्या १६ टक्के असेल. या पिढीला पर्यावरणातील बदल, वेगाने होणारी लोकसंख्या वाढ, झपाट्याने होणारे शहरीकरण, मानसिक ताणतणाव अशा अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागेल. सगळ्याच क्षेत्रात एआयचा प्रचुर वापर परंपरागत नोकऱ्यांवर गदा आणेल. परिणामी या पिढीला करिअरसाठी नव्या वाटांचा विचार करावा लागेल. बापसे बेटा सवाई या नैसर्गिक तत्त्वाप्रमाणे प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा अधिक प्रगत आणि हुशार असते. अश्मयुगात आगीच्या वापराचा शोध लागून सुरू झालेल्या प्रगतीच्या वारूवर अनेक मानवी पिढ्या आरूढ होत आज २०२५च्या उंबरठ्यावर आपण पोहचलो आहोत. या घोडदौडीत वेगाच्या नादात शाश्वत मूल्यांच्या शिदोरीची गाठ सुटून वाटेत विखुरली गेली तर नाही ना हेही बघणे आता गरजेचे ठरते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे बाळकडू पीत मोठे होणाऱ्या बीटा जनरेशनला या जीवनमूल्यांची आणि मानवी भावभावनांची निकड कदाचित सर्वाधिक भासेल. पुढची पिढी भावनाशून्य ‘रोबोट जनरेशन’ न होता भावनाप्रधान माणूसच राहावी ही जबाबदारी देखील यांच्या खांद्यावर असेल.

हेही वाचा : सरत्या वर्षातले फॅशन ट्रेंड्स

पर्यावरणीय बदलाविषयी जागरूकतेच्या काळात वाढवल्या जाणाऱ्या या पिढीसाठी शाश्वतता (sustainability) हा महत्त्वपूर्ण घटक असेल. पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान, नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर हे त्यांच्या जीवनशैलीचा भाग असतील असा समाजशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. भूतकाळातील युद्ध आणि निसर्गऱ्हासातून बोध घेत ही पिढी शाश्वत मूल्यांची कास धरेल अशीही त्यांना आशा आहे.

वसंत बापटांच्या ‘नवी पिढी’ या कवितेतल्या शब्दांत सांगायचे तर,

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

२०२५ पासून उदयाला आलेली ही नवी पिढी मानवजातीचे क्षितिज अधिक प्रकशित करो या नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

viva@expressindia.com

Story img Loader