विनय जोशी

आदिम रानटी अवस्थेपासून आपल्याला अंतराळात जाण्याची इच्छा होती असे दिसून येते. ही इच्छा पूर्ण व्हायला मात्र विसावे शतक उजाडावे लागले. स्पेस रेसमुळे अंतराळ मोहिमांची स्पर्धा सुरू झाली, पण नंतर मात्र संशोधन आणि विश्वाचे गूढ उकलण्यासाठी अनेक स्पेस मिशन्स पार पडली. नव्या सहस्र्कात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवकाश मोहिमांची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे. अशाच काही भन्नाट स्पेस मिशन्स आणि अवकाश तंत्रज्ञानातील घडामोडींचा वेध घेणारे हे सदर!

Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
tibetean plateau
तिबेटच्या पठारावरून विमाने का जात नाहीत? वैमानिकांच्या भीतीचे कारण काय?
Loksatta kutuhal Blue Planet Earth British Geologist Dr Arthur Holmes
कुतूहल: निळा ग्रह : आपली पृथ्वी
moon of Venus , Akola, space lovers Akola, Venus ,
काय सांगता? भरदिवसा शुक्राच्या चांदणीचे दर्शन! अवकाशप्रेमींसाठी अनोखी पर्वणी

‘आसमाँ के पार शायद और कोई आसमाँ होगा..’ अंतराळात काय असेल याचे आपल्याला वाटणारे कुतूहल जणू गुलजारांनी या शब्दात मांडलं आहे. अंतराळ म्हणताच डोळय़ासमोर येते अंधारलेली, गूढ, अमर्याद पोकळी! आपली पृथ्वी, संपूर्ण सौरमाला, आकाशगंगेसारख्या असंख्य दीर्घिका, थोडक्यात सगळय़ा ब्रह्मांडाला या अवकाशाने व्यापले आहे. जेव्हा देश, भाषा, धर्म, जाती अशा कुठल्याच चौकटीने माणूस विभागला गेला नव्हता त्या आदिम रानटी अवस्थेपासून आपल्याला अंतराळात जाण्याची इच्छा होती असे दिसून येते. काही अश्मयुगीन गुंफाचित्रांत चंद्रतारे यांच्यासोबत माणसाला अवकाशात उडताना दाखवून आपल्या पूर्वजांनी ही हौस भागवली. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हळूहळू अंतराळाविषयीच्या भीतीची जागा कुतूहलाने घेतली आणि अंतराळात जाण्याची आपली इच्छा जास्तच प्रबळ होत गेली.

अनेक लेखकांनी आपल्या लिखाणातून अंतराळाची सफर घडवून आणली आहे. १८६५ मध्ये फ्रेंच लेखक ज्यूल्स व्हर्न यांनी ‘फ्रॉम द अर्थ टू द मुन’ या कादंबरीतून मोठय़ा तोफेतून अंतराळवीरांना चंद्रावर पाठवता येईल अशी कल्पना केली होती. तोफेऐवजी शक्ती रॉकेट वापरून अंतराळात जाता येऊ शकेल असे रशियन क्रांतिकारक किबाल्शीश याला वाटत होते. कॉन्स्टॅन्टिन त्सिओल्कोव्हस्की या रशियन अभियंत्याने याच संकल्पनेला अधिक व्यापक केले आणि द्रवरूप इंधन आणि क्रमश: जळत जाणारे रॉकेट वापरल्यास अधिक लांबचा पल्ला कमीत कमी शक्तीने गाठता येईल असे १९०३ सालामध्ये सुचवले. ही मूलभूत संकल्पना पुढील सगळय़ा अंतराळ मोहिमांचा पाया ठरली आणि कॉन्स्टॅन्टिन त्सिओल्कोव्हस्की अंतराळ प्रवासाचे जनक मानले जाऊ लागले. याच विषयात संशोधन करून रॉबर्ट गोदार्द या प्राध्यापकाने तुटपुंज्या साहित्यातून छोटे रॉकेट बनवले आणि १६ मार्च १९२६ ला ते यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून दाखवले. त्याचे हे रॉकेट ताशी १०० किमी वेगाने १८४ फूट उंच उडाले. गोदार्दच्या रॉकेटची ही चिमुकली झेप अवकाशात जाण्याच्या प्रयत्नात एक मोठे पाऊल ठरली. गोदार्दच्या संशोधनाला अमेरिकन सरकारचा पािठबा मिळाला नाही. त्यामुळे रॉकेट संशोधनात अमेरिका मागे पडली; पण जर्मन तंत्रज्ञ त्याच्या कामावर लक्ष ठेवून होते. जर्मनीतील एका रॉकेट क्लबने विकसित केलेलं ‘व्ही -२’ हे रॉकेट २० जून १९४४ रोजी भूपृष्ठापासून १७४ किमी उंचीपर्यंत गेलं आणि कार्मन रेषेपलीकडे अंतराळात जाणारं ते पहिलं रॉकेट ठरलं.

दुसरं महायुद्ध संपलं आणि शीतयुद्धाची नांदी झाली. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अंतराळ हे नवीन क्षेत्र निवडलं. या ‘स्पेस रेस’मध्ये बाजी मारत सोव्हिएत रशियाने ४ ऑक्टोबर १९५७ साली ‘स्पुटनिक’ नावाचा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडून अंतराळ प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामध्ये बसविलेल्या रेडिओ ट्रान्समीटरद्वारे प्रसारित होणाऱ्या ‘बीपबीप’ संदेशाने अमेरिकेची झोप उडाली. अमेरिका या धक्क्यातून सावरायच्या आत ३ नोव्हेंबर १९५७ ला ‘स्पुटनिक-२’मधून लायका नावाची एक कुत्री अंतराळात सोडण्यात रशियाने यश मिळवले. पुढे ‘स्पुटनिक-५’मधून बेल्का आणि स्टेल्का हे दोन श्वान, ४२ उंदीर, ससे, वनस्पती अंतराळात जाऊन सुखरूप परत आले. दरम्यान, १९५८ मध्ये अमेरिकेने अंतराळ संशोधनासाठी ‘नासा’ या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आणि ‘एक्स्प्लोरर’ हा पहिला उपग्रह अंतराळात पाठवला. लगेच ‘स्कोर’ हा पहिला संचार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. त्याद्वारे अमेरिकेचे अध्यक्ष ड्वाइट आयझेनहॉवर यांच्या आवाजातील ख्रिसमस संदेश प्रसारित करून अमेरिकेने जगाचे लक्ष वेधून घेतले.

अवकाशात यान पाठवण्याचा हा सिलसिला पुढे असाच वाढत राहिला. सोव्हिएत रशियाने अंतराळात माणसाला पाठवण्यासाठी ‘व्होस्टोक’ प्रकल्पाला गती दिली आणि अखेर शतकानुशतके मानवाने पाहिलेले स्वप्न सत्यात आलं. १२ एप्रिल १९६१ रोजी अंतराळाला मानवी स्पर्श झाला. रशियाचा युरी गागारीन हा अंतराळप्रवास करणारा पहिला मानव ठरला. ‘व्होस्टोक-१’ या यानातून त्यांनी १०४ मिनिटं पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि ते सुखरूप परत आले. रशियाला उत्तर म्हणून लगेच अमेरिकेने ‘मक्र्युरी’ मोहिमेअंतर्गत अॅलन शेपर्डला ५ मे १९६१ रोजी अंतराळात धाडलं. तर १९६३ मध्ये रशियाने व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा यांना अंतराळात पाठवून अंतराळात जाणारी पहिली महिला हा मान पटकावण्याचं श्रेय स्वत:कडे घेतलं. यानंतर चंद्रावर सर्वात आधी पोहोचण्याची स्पर्धा सुरू झाली. यात चंद्रावर उपग्रह अलगद उतरवण्यासाठी अमेरिकेला १९६६ साली तर रशियाला १९७० साली यश आलं. या संपूर्ण दशकात कमालीची मेहनत घेऊन अमेरिकेने एक इतिहास रचला. ‘अपोलो – ११’ या यानाद्वारे नील आर्मस्ट्राँग या पहिल्या मानवाचे पाऊल चंद्रावर पडले. १९७१ साली अंतराळात पहिलं अवकाश स्थानक ‘सॅल्युट-१’ पाठवून रशियाने पुन्हा बाजी मारली. त्याला उत्तर म्हणून १९७३ साली अमेरिकेने ‘स्कायलॅब’ हे स्थानक अंतराळात पाठवलं. यानंतर रशिया आणि अमेरिकेमध्ये अंतराळात यान पाठवण्याची आणि इतर ग्रहांवर आपला उपग्रह पोहोचवण्याची अहमहमिकाच सुरू झाली. हळूहळू इतर देशसुद्धा या स्पर्धेत सहभागी होऊ लागले. भारताने १९ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या मदतीने ‘आर्यभट १’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडून अंतराळ मोहिमेचा श्रीगणेशा केला.

अखेर १९७५ मध्ये ही स्पेसरेस थांबली. अवकाशात आता कुठलीही स्पर्धा असणार नाही, असं या दोन्ही महासत्तांनी जाहीर केलं. रशियाचं सोयुझ आणि अमेरिकेचं अपोलो अवकाश स्थानक अवकाशात एकत्र जोडले गेले. एकमेकांशी स्पर्धा करत अंतराळ संशोधन करण्यापेक्षा परस्पर सहकार्यातून असे प्रकल्प राबवले तर वेळ, पैसा यांची बचत होऊन सगळय़ांनाच त्याचा फायदा होऊ शकेल हे या अंतराळ स्पर्धेमुळे एव्हाना सगळय़ा देशांच्या लक्षात आलं होतं. यामुळे ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे तत्त्व स्वीकारून अनेक संयुक्त मोहिमा राबवल्या गेल्या. अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपीयन अवकाश संस्था यांनी संयुक्तरीत्या तयार केलेली हबल दुर्बीण २४ एप्रिल १९९० रोजी अवकाशात सोडण्यात आली. १९९८ मध्ये जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. नव्या सहस्रकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवकाश मोहिमांची व्याप्ती अधिक व्यापक झाली आहे. हबलची उत्तराधिकारी म्हणून २०२१ मध्ये अवकाशात स्थापित केलेल्या जेम्स वेब दुर्बिणीने विश्वाची रहस्यं उलगडायला सुरुवात केली आहे. पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी मिशन आर्टेमिस तयारीत आहे. अंतराळ मोहिमांमध्ये ‘स्पेसएक्स’ सारख्या खासगी अंतराळ संस्थांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे सरकारी मक्तेदारी कमी होते आहे. या सगळय़ा पार्श्वभूमीवर नव्या वर्षांत ‘आसमाँ के पार’ नेणाऱ्या या स्पेस मिशन्सचा वेध घेणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल !!
viva@expressindia.com

Story img Loader