विनय जोशी

नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीला बालहनुमानाने ‘आरक्त देखिले डोळां’ म्हणत सूर्याकडे घेतलेल्या झेपेचे स्मरण झाले असेल. आपल्यासाठी सूर्याचा ताप, तेज आणि उष्णता बघता झेप घेणं तर दूर त्याच्याकडे बघणंसुद्धा मुश्कील आहे. म्हणूनच खगोलशास्त्राच्या प्रगतीत चंद्र, इतर ग्रह यांच्या तुलनेत सूर्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास काहीसा उशिरा सुरू झाला असावा. पृथ्वीवरचे जीवन ही सूर्याची देणगी. त्याच्या ऊर्जेने झाडं अन्न बनवतात, त्याच्या उष्णतेने पाऊस पडतो, त्याच्या प्रकाशात आपले जीवन उजळते. म्हणूनच जगभरातल्या सगळय़ा संस्कृतीत सूर्यदेव, रा, अपोलो, मिथ्र अशा अनेक रूपात त्याला देवता मानून पुजण्यात आले. गेल्या काही शतकात निरीक्षणे आणि नंतर विविध मोहिमेतून सूर्याची तपशीलवार माहिती मिळवण्यात आपल्याला यश आले आहे. यातून खगोलशास्त्रातील सूर्याच्या अभ्यासाची स्वतंत्र शाखा ‘सौरभौतिकशास्त्र’ (हेलिओफिजिक्स) विकसित झाली.

Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Sun Planet Transit In Makar | surya gochar 2025
१४ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींना सोन्याचे दिवस; सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने सुख-संपत्तीत होईल प्रचंड वाढ
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

हा तेजोनिधी लोहगोल नसून मुख्यत: हायड्रोजन आणि हेलियम या वायूंचा वायुगोल आहे. व्यासावर १०९ पृथ्वीची रांग आरामात मावेल एवढा मोठा याचा आकार आहे. याच्या गाभ्याचे तापमान पंधरा दशलक्ष सेल्सिअस एवढं प्रचंड असल्याने तिथे हायड्रोजनचे फ्युजन होऊन हेलियममध्ये रूपांतर होतं. या प्रक्रियेत निर्माण झालेली प्रचंड ऊर्जा प्रकाश आणि उष्णता निर्माण करते. तप्त वायूंनी बनलेला सूर्याचा बाह्य पृष्ठभाग म्हणजे प्रकाशमंडल (फोटोस्फियर) याच्याभोवती वर्णमंडल (क्रोनोस्फियर) आणि प्रभामंडळ (कोरोना) या दोन थरांनी बनलेलं सूर्याचं वातावरण आहे. सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याच्या पृष्ठभागावर सौरडाग आणि सौरज्वाला तयार होतात. हे सौरडाग किंवा सनस्पॉट म्हणजे सूर्यावरची तुलनेने कमी तापमानाची चुंबकीय क्षेत्रं आहेत. याच भागातून सौरज्वाळांचीही निर्मिती होत असते.

सूर्यावर घडणाऱ्या घडामोडींचा पृथ्वीवर परिणाम होत असतो. ज्यावेळी सौरडागांची संख्या सर्वाधिक असते (मॅग्झिमा) तेव्हा सूर्यावर मोठय़ा प्रमाणात वादळे होतात, तर त्या उलट सौरडागांची संख्या कमी असताना (मिनिमा) सूर्य तुलनेने शांत असतो. सौरडागांच्या चक्राचा आणि पृथ्वीवरील हवामानाचा संबंध शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. सूर्याकडून एखादी मोठी सौरज्वाळा पृथ्वीकडे झेपावली तर पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांपासून ते जमिनीवरील पॉवर ग्रिड, संदेश यंत्रणा अचानक बंद पडू शकतात. अंतराळातील अंतराळवीरांना सुद्धा सौर वादळाचा धोका असतो. म्हणून सूर्याचे सतत निरीक्षण आणि अभ्यास करणे गरजेचे ठरते.

आकाशातील सूर्याची भासमान गती, वर्षभरात सूर्याच्या स्थानात होणारा बदल यांचा अभ्यास अगदी प्राचीन काळापासून सुरू होता. १७व्या शतकात दुर्बिणीच्या शोधांनंतर सूर्याच्या भौतिक स्वरूपाचा अभ्यास सुरू झाला. थॉमस हेरिएट, जोहान फॅब्रिशियस, ख्रिस्तॉफ शायनर, गॅलिलिओ गॅलिली अशा अनेक खगोल तज्ज्ञांनी टेलिस्कोपमधून सूर्याचे प्रोजेक्शन घेत निरीक्षणे केली. गॅलिलिओने सौरडाग फिरतात यावरून सूर्य स्वत:भोवती फिरतो आहे असा निष्कर्ष काढला. १८४३ मध्ये जर्मनीच्या हेनरिच श्वाब याने अनेक वर्षांच्या निरीक्षणांवरून सौरडागांची संख्या एका ठरावीक काळाने कमी-जास्त होते हा शोध लावला. स्वित्र्झलडच्या रुडॉल्फ वोल्फने सौरडागांच्या आवर्तनाचा काल ११ वर्षे आहे हे निश्चित केले. १९०८ मध्ये अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ जॉर्ज हेल याने हे सौरडाग म्हणजे अत्यंत तीव्र चुंबकत्वाची ठिकाणे आहेत हे शोधले.

अंतराळयुगाच्या आरंभानंतर अनेक मोहिमा राबवून सूर्याचा अधिक सखोल अभ्यास सुरू झाला. काही मोहिमांमध्ये पृथ्वीच्या कक्षेत किंवा सूर्य-पृथ्वीचे बल जिथे समान असते अशा लॅग्रेंज पॉइंटवर दुर्बीण उपग्रह ठेवून सूर्याचे निरीक्षण केले गेले. तर नंतरच्या काळात थेट सूर्याच्या जवळ मानवविरहित अवकाश याने पाठवण्यात आली. १९५० ते १९७० दरम्यान नासाने सूर्यमालेच्या अभ्यासासाठी पायोनियर कार्यक्रम राबवला. या मोहिमांचे प्राथमिक उद्दिष्ट सौर निरीक्षण नव्हते, तरी काही अंतराळ यानांमध्ये सूर्याचे निरीक्षण करणारी उपकरणे होती. पायोनियर ६-ए , ७-बी, ८-सी, ९-डी यांनी सौरवात, कॉस्मिक किरणे आणि सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास केला. खास सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासा आणि जर्मनीची अंतराळ संस्था डीएलआर यांनी एकत्रितपणे हेलियस मोहीम आखली. १९७४ मध्ये हेलियस -१ आणि १९७६ मध्ये हेलियस-२ ही याने सूर्याच्या दिशेने रवाना झाली. हेलियस-२ सूर्यापासून ४३ दशलक्ष किमी अंतरावर जात सूर्याच्या इतक्या जवळ जाणारे पहिले यान ठरले. त्यांनी सौरवात आणि सौरज्वालांचे निरीक्षण करत त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. १९८० मध्ये नासाने सौरज्वालांच्या निरीक्षणासाठी सोलर मॅक्सिमम मिशन हा उपग्रह अंतराळात सोडला, पण काही महिन्यातच तांत्रिक बिघाड होऊन तो जवळपास तीन वर्षे निष्क्रिय होऊन पडला. पुढे १९८४ मध्ये चॅलेंजर मिशन एसटीएस ४१ द्वारा दुरुस्ती होऊन त्याने सूर्याच्या प्रभामंडळाची अनेक छायाचित्रे घेतली.

या सगळय़ा यानांनी आपल्या आयनिक वृत्ताच्या पातळीतून निरीक्षणे नोंदवली होती. सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचे निरीक्षण करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा यांनी एकत्रितपणे युलिसिस प्रकल्प राबवला. १९९० मध्ये सोडलेले युलिसिस हे यान १६ महिने प्रवास करत गुरूजवळ पोहोचले आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे यानाचा वेग आणि कक्षा बदलून हे सूर्याकडे फेकले गेले. जून १९९४ मध्ये ते सूर्याच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचले. सूर्याभोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण करत त्याने अनेक निरीक्षणे केली. मार्च ९५ मध्ये ते सूर्याच्या उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात आले. इथे निरीक्षणे घेत ते पुन्हा गुरूच्या दिशेने गेले आणि २००० मध्ये पुन्हा सूर्याकडे आले. २००९ पर्यंत कार्यरत असणाऱ्या युलिसिसने सूर्याची अनेक गुपिते उघडकीस आणली.

सूर्याचा एक्स रे वेव्हलेन्थमध्ये अभ्यास करण्यासाठी जपानने १९९१ मध्ये योहकोह हा दुर्बीण उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरता ठेवला. खास सौरवाताचा अभ्यास करण्यासाठी १९९४ मध्ये नासाने ‘विंड’ हा दुर्बीण उपग्रह एल १ या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवला. सूर्याच्या अधिक सविस्तर निरीक्षणासाठी नासा आणि ईसा यांनी ‘सोलर ॲण्ड हेलिओस्फेरिक ऑब्झर्वेटरी’ (सोहो) हा प्रकल्प हाती घेतला. १९९५ मध्ये ॲटलास -२ एस या रॉकेटद्वारे हा उपग्रह एल १ या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात आला. दोन वर्षांसाठी नियोजित हा उपग्रह अजूनसुद्धा सूर्याभोवती फिरत कार्यरत आहे. याच्या विविध उपकरणातून सूर्याच्या बाहेरच्या थरातील हालचालींपासून तर गाभ्यातील कंपनांपर्यंत वेगवेगळी निरीक्षणं केली जातात. याच्या कोरोनाग्राफ या उपकरणाने अनेक सूर्याच्या बाह्यावरणातून होणारे प्लाझ्माचे उद्रेक – कोरोनल मास इजेक्शन शोधले आहेत. याच्या सोलर विंड अॅनिसोट्रॉपीज उपकरणाने सौरवातांचे नकाशे बनवून दिले आहेत. एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सौरडागांचे चक्र आणि त्याचा पृथ्वीवरील परिणाम याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पुरवली. ‘सोहो’ कडून येणाऱ्या माहितीचा उपयोग सौरज्वालांचे पूर्व निदान करण्यासाठी होतो.

‘सोहो’कडून सूर्याच्या पृष्ठभागाचे सतत फोटो काढले जात असले तरी या इमेजेस २डी असतात. सूर्याचे एकाच वेळी दोन वेगवेगळय़ा ठिकाणांवरून निरीक्षण करत थ्रीडी स्कॅिनगसाठी ‘सोलर टेरिस्टियल रिलेशन ऑब्झर्वेटरी- स्टिरिओ’ मोहीम राबवली आहे. २००६ मध्ये अंतराळात झेपावलेली ‘स्टिरिओ -१’ आणि ‘स्टिरिओ -२’ ही जुळी याने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सूर्याला प्रदक्षिणा करत सूर्याच्या प्रतिमा टिपत आहेत. यांच्या मदतीला २०१० मध्ये सूर्याभोवती सोलर डायनॅमिक ऑब्झर्वेटरी ही वेधशाळा दाखल झाली. यांच्या मदतीने सूर्याचे थ्रीडी निरीक्षण शक्य झाले.

सूर्याच्या अधिक जवळ जात प्रभामंडळाच्या अभ्यासासाठी नासाने ऑगस्ट २०१८ मध्ये पार्कर सोलर प्रोब हे यान सूर्याच्या दिशेने सोडले. सौरवातांविषयी मूलभूत संशोधन करणारे वैज्ञानिक युजीन पार्कर यांच्या सन्मानार्थ त्यांच्या हयातीत त्यांचे नाव या प्रकल्पाला दिले गेले. विशिष्ट कार्बनी संयुगाच्या हिटशिल्डमुळे प्रचंड उष्णतेत देखील ते सुरक्षित राहू शकते. २०२१ मध्ये पार्करने सूर्याच्या बाह्य वातावरणात यशस्वी प्रवेश करत सूर्याला जणू स्पर्श केला. सूर्यापासून फक्त ८.५ दशलक्ष किमी अंतरावरून जात सूर्याच्या सर्वात जवळ जाणारी वस्तू होण्याचा मान मिळवला. ताशी ७ लाख किमी या वेगाने फिरणारे पार्कर सर्वात वेगवान मानवनिर्मित यान ठरले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने २०२० मध्ये सोडलेल्या सोलार ऑर्बिटर यानाने सूर्याच्या ध्रुवीय प्रदेशाच्या जवळून प्रतिमा घेण्यात यश मिळवले आहे. सोहो, स्टिरिओ, पार्कर, ऑर्बिटर ही याने सूर्याभोवती फिरत आपल्या या ताऱ्याविषयी नवनवीन माहिती पुरवत राहतील.

सूर्याच्या निरीक्षणाच्या शर्यतीत भारत देखील मागे नाही. इस्त्रोने भारताची पहिली सौर मोहीम ‘आदित्य एल १’ घोषित केली आहे. सात उपकरणांनी सुसज्ज हा उपग्रह एल १ या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येईल. यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सने बनवलेले व्हिजिबल इमीशन लाइन कोरोनाग्राफ उपकरण प्रभामंडळाचे निरीक्षण करेल. आयुका द्वारा निर्मित सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप २०० ते ४०० नॅनोमीटर तरंगलांबीत सूर्याचे निरीक्षण करत सूर्याच्या वातावरणातील विविध थरांची इमेज तयार करेल. सौरवाताचा अभ्यास करण्यासाठी यावर फिसिक्स रिसर्च लॅब अहमदाबादने बनवलेले आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपिरीमेंट उपकरण आहे. उदयपूर सोलर ऑब्झरवेटरीने बनवलेले हाय एनर्जी एल-१ ऑर्बिटिंग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर सौर कणांचा तर मॅग्नेटोमीटर सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करेल.

सूर्यनमस्कार ते सूर्याला थेट स्पर्श हा प्रवास मानवाच्या बुद्धिमत्तेची साक्ष देतो. या आणि अशा विविध सौर मोहिमेतून सूर्याविषयी अनेक नव्या ज्ञानाचे दालन आपल्यासाठी उघडत जाणार आहे. सूर्यमालेला प्रकाशित करणारा हा ‘सवितृ’ आपल्या बुद्धीला नेहमीच प्रेरणा देत राहो !!!

Story img Loader