मितेश जोशी
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत पांडू या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी झालेला अभिनेता तथा उत्तम लेखक प्रल्हाद कुरतडकर आजच्या ‘फुडी आत्मा’मध्ये कोकणातल्या गणेशोत्सवादरम्यानची खवय्येगिरी सांगतो आहे.
प्रल्हादच्या दिवसाची सुरुवात चहा बिस्कीटने होते. नाश्त्याला मेदुवडा चटणी किंवा ऑम्लेट असेल तर माझा दिवस उत्तम जातो असं प्रल्हादचं म्हणणं आहे. डाएट झेपत नाही, असं म्हणणाऱ्या प्रल्हादचं जेवण भाताशिवाय अपूर्ण आहे. कोकणात भात हा खावाच लागतो, कारण तो धर्म आहे, असं त्याचं स्पष्ट मत आहे. पोळी भाजी, वरण भात आणि घरचं लोणचं हा त्याच्या जेवणाचा थाट असतो. बाहेरच्या लोणच्याच्या डब्यात आंब्याची कोय सापडल्यावर त्याचा सात्त्विक संताप होतो, म्हणून तो बाहेरचं लोणचं खात नाही. शिवाय, घरच्या लोणच्यात घरचा मसाला वापरल्याने त्यात एक आपलेपणा असतो, असं तो म्हणतो.
हेही वाचा >>> तंदुरुस्तीचा आहार मंत्र
भोपळा, पडवळ आणि कारलं या भाज्या प्रल्हादला आवडत नाहीत, त्या माझ्यासाठी नाहीतच असं म्हणणाऱ्या प्रल्हादला नॉनव्हेज प्रचंड आवड़तं. नॉनव्हेजचे काही वार पाळण्याचा त्याचा शिरस्ता मोडून काढण्याचा मित्रांकडून वारंवार प्रयत्न होतो. तव्यावर तळणाऱ्या छान बोंबीलाचे एकंदर वर्णन ऐकल्यावर काही मिनिटांत माझं मन वळवण्यात मित्र यशस्वी होतात, असं सांगणाऱ्या प्रल्हादचं बाहेर नॉनव्हेज खाणं वाढल्याने त्याच्या पत्नीने त्याला डबा द्यायला सुरुवात केली आहे. संध्याकाळी मीटिंगच्या दरम्यान त्याला वडापाव हवाच असतो, करी रोडला कार्यालयात मीटिंग असली की काळाचौकीवरून वडापाव येतो. त्याविषयीचा एक किस्सा तो सांगतो, ‘गरमगरम वडापाव खायला मला आवडत असल्याने महाराष्ट्रात कुठेही मीटिंग असली तरी मी तिथल्या आसपासच्या वडापावच्या ठेल्यावर जाऊन किंवा कोणाला तरी पाठवून वडापाव आणू शकतो. झी मराठीचं कार्यालय करीरोडला एका उंच इमारतीत आहे, तिथे इतरही कंपनीची कार्यालयं आहेत. माझं वडापाव प्रेम त्या इमारतीत इतकं व्हायरल झालंय की एकदा मला काळाचौकीचा वडापाव खाण्याची हुक्की आली आणि मिटिंगची वेळही झाली होती. या कठीण प्रसंगात मी त्याच इमारतीत दुसऱ्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या चाहत्याला वडापाव आणायला पाठवलं. आणि तो ही बिचारा बाईकवरून गेला व त्याने वडापाव आणून दिला. त्यामुळे वडापाव खाण्यासाठी काहीही !! असाच किस्सा एकदा खरवसाच्या बाबतीत झाला. मिसळ थाळीमध्ये आजकाल खरवस देतात. मी एकदा नॉनव्हेज खायला गेलो होतो. आणि मला तिथे ‘आय लव्ह मिसळ’ येथील मिसळ थाळीतला खरवस खाण्याची इच्छा झाली. मी तिथल्या वेटरला प्लीज मला तिथला खरवस आणून द्या अशी गळ घातली. त्यानेही लगोलग जाऊन माझी खरवसची हौस भागवली. मित्रांनी मला मूर्खात काढलं, पण हौसेला मोल नाही’ असं तो सांगतो.
प्रल्हाद हा मूळचा कोकणातील कणकवलीनजीक तोंडवली गावचा असल्याने तिथल्या गणेशोत्सवाच्या वातावरणाबाबत तो सांगताना म्हणाला, ‘कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. नागपंचमीच्या आसपास गणपतीचा पाट हा गणेश कारखान्यात जमा करावा लागतो. कोकणात गणपती बसवण्याची जागा देवघरात ठरलेली असते. तिकडे पारंपरिक कापडी पडदे, रानफुले, नारळ आणि द्वारपालांनी गणेशाची खोली झगमगू लागते. शेवटचा हात फिरवून सफाईदारपणा आणला जातो आणि अखेर सगळय़ांचे गणपती एकत्र घराघरात येतात. मुलाबाळांचा जल्लोष सुरू होतो. एका बाजूला उद्यापासून ‘भजनाक जावक व्हया’ म्हणून भजनी मंडळी पेटी, तबला, मृदुंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. त्यांची एक वेगळीच लगबग चतुर्थीच्या आदल्या दिवशी सुरू असते. या वर्षी कुणाकडे किती दिवस गणपती असणार? याचा अंदाज देवळात जमलेली मंडळी घेत असतात. त्याप्रमाणे रोजच्या भजनांचं आणि आरतीचं नियोजन हे सगळं गणेश चतुर्थीच्या आधी त्यांना करायचं असतं. इथे पेटी वाजवणारा आणि ती उचलून घरोघरी नेणारा यांची विशेष खबर काढली जाते. तो पूर्ण दिवसांसाठी उपलब्ध आहे ना याची खातरजमा केली जाते. तबल्यावरची शाई या वर्षीही तशीच उडालेली आहे म्हणून एकेकांकडे कटाक्ष टाकले जातात. ‘जावदे पुढच्या वर्षांक काय तरी व्हयाच नाय?’ असं म्हणून तो विषय संपवण्यात येतो. शेवटी वाडीतल्या घरांचा क्रम ठरतो, वेळेवर हजर राहण्याची तंबी दिली जाते’. आजकाल या भजनी मंडळींचे खानपानसुद्धा बदलले आहे, असं तो सांगतो. ‘गणेशोत्सवात कोकणात खाण्यापिण्याची अक्षरश: रेलचेल असते. सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत वेगवेगळय़ा टप्प्यात खाणं पेश केलं जातं. त्यातलाच एक भाग भजनाचे पदार्थ. पूर्वी भजनाला वेगवेगळे शेंगदाणा, शेवाचे लाडू, करंजी दिली जायची. प्रत्येक घरी कोकणी मेव्याचा स्पर्श असलेले पदार्थ भजनाच्या वेळी चाखायला मिळायचे, पण आजकाल या पदार्थाची जागा बटाटेवडे, पावभाजी, मिसळ पाव यांनी घेतली आहे. या पदार्थामुळे घरोघरी चढाओढ सुरू झाली असून या पदार्थावरून एक वेगळीच चर्चा बायकांमध्ये रंगलेली दिसते. त्यामुळे हल्ली तरुण भजन मंडळी अगदी आनंदाने व उत्साहाने एकमेकांच्या घरी जाऊन भजन करतात आणि नंतर पदार्थावरही ताव मारतात. कोकणातल्या भजनांना हल्ली चांगले दिवस आले आहेत’ असं तो गमतीने म्हणतो.
हेही वाचा >>> फुडी आत्मा: जिव्हा करा रे प्रसन्न!
गणेशोत्सवात कोकणातल्या खाद्यसंस्कृतीच्या विविध गंमतीजमती तो सांगतो. भजनात पूर्वी कान असलेल्या स्टीलच्या कपांतून चहा फिरवला जायचा, आता त्याची जागा प्लॅस्टिकच्या कपाने घेतली आहे. आणखी एक महत्त्वाचा विषय या दिवसांत असतो तो दुपारच्या जेवणाचा. कोकणातल्या मोठय़ा कुटुंबाची विभागणी छोटय़ा छोटय़ा कुटुंबात झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबाचं एक नैवेद्याचं ताट गणपतीसमोर असतं. अशी असंख्य ताटं आणि त्या ताटातले वेगवेगळय़ा पदार्थाचे सुवास देवघरात घुमत असतात. अख्खं देवघर नैवेद्याच्या ताटांनी सजलेलं असतं. मग सगळेजण आपापलं ताट घेऊन माजघरात गोलाकार बसतात व प्रत्येकाच्या नैवेद्यातला पदार्थ हा मुलाबाळांच्या ताटात येतो. नात्यांमधली वीण या नैवेद्याच्या ताटाने अधिक बळकट होते. उकडीचे मोदक नैवेद्यात फिक्स असतातच. उकडीचे मोदक तयार करणं सर्वानाच जमतं असं नाही. या मोदकांचं गुळाचं सारण जमावं लागतं. पारीही जमावी लागते. पाकळय़ा तयार करणं हे देखील मोठय़ा कौशल्याचं काम असतं. कोकणी स्त्रिया याबाबत कुशल असतात, त्यामुळे तिथे केवळ उकडीचेच मोदक असतात. इतर कोणत्याही प्रकारच्या मोदकांची शाखा खपवून घेतली जात नाही. त्याचबरोबर गणेशोत्सवातला प्रसाद हाही खूप महत्त्वाचा असतो. आज मुंबईच्या चाकरमान्यांकडून, उद्या दुसऱ्या, परवा तिसऱ्या अशा प्रत्येकाच्या प्रसादाच्यासुद्धा पाळय़ा असतात. मोदक, पेढे, फुटाणे असे प्रसादाचे पदार्थ असतात, असं त्याने सांगितलं.
कोकणातलं हे खाद्यपुराण इथेच संपत नाही. प्रल्हाद याविषयी भरभरून बोलतो. ‘ऋषिपंचमीच्या दिवशी घरातल्या चुली धगधगतच राहतात, कारण सकाळी गणपतीचा नैवेद्य करून झाल्यावर सर्व महिला मंडळांची गर्दी ऋषीची भाजी बनवण्याकडे वळते. बैलाच्या कष्टाचे, नांगराचा वापर केलेले अन्न या दिवशी वापरत नाहीत. ठरावीक पालेभाज्या, भेंडी, भोपळा अशा जमिनीवर उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी केली जाते. यात लाल भोपळा, भेंडी, पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. कोणी यात मटारचे किंवा मक्याचे दाणे, शिजवलेले शेंगदाणे घालतात. चवळी, आंबट चुका या पालेभाज्यासुद्धा वापरतात, मात्र यात पालक, मेथी, शेपू यांसारख्या उग्र चवीच्या भाज्या वापरू नयेत. ही भाजी चवीला सौम्य असते, या भाज्यांचा वापर केल्यास चव बिघडते. या भाज्यांमध्ये खनिजांचे व जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असल्याचे सृदृढ आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते’ हे तो खास सांगतो.
हेही वाचा >>> फुडी आत्मा : रोजच्या जेवणातला हिरो
‘गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकजण आवर्जून घरी जेवायला येतात. आजही कोकणातल्या अनेक घरांत या दिवशी गावातल्या गरीब लोकांना जेवू घालण्याची परंपरा आहे. शेवटच्या दिवशी बाप्पा त्यांच्या रूपानं घरात जेवायला येतो असं म्हणतात. म्हणूनच माणसात असलेल्या त्या देवापुढे नतमस्तक होऊन त्याचं मन तृप्त होईपर्यंत जेवू घालण्याची परंपरा इथे आहे. ‘तू कोण?’, ‘तुला आमच्या घरी जेवायला कोणी बोलावलं?’ असं बोलण्याची पद्धत इथे नाही. एकवेळ घरचे उपाशी राहतील, पण या दिवशी दारात आलेला प्रत्येक जण तृप्त होऊनच घरातून बाहेर पडतो. असं दृश्य कोकणाव्यतिरिक्त क्वचितच एखाद्या घरघुती गणपतीत पाहायला मिळत असेल’ अशी खास आठवणही प्रल्हादने सांगितली.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधील पांडू या व्यक्तिरेखेमुळे प्रल्हाद घराघरात पोहोचला. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानची खवय्येगिरी सांगताना तो म्हणाला, ‘मालिकेच्या सेटवर माझ्यासाठी चाहते डबे पाठवायचे. एकदा एका चाहत्याने मला येऊन विचारलं, ‘सर परवाच्या दिवशीचा डबा परत करा ना’. मी एक मिनिट गोंधळलोच. त्याला मी गोंधळलेल्या स्वरातच विचारलं, ‘परवाच्या दिवशीचा कोणता डबा?’ तर तो म्हणाला, ‘सर मी परवा तुम्हाला डबाभर जवळा करून पाठवलेला, तो डबा मला रिटर्न करा. तेव्हा मी सेटवर त्याच्या डब्याची चौकशी केल्यावर कळलं की इतर कलाकारांनी माझ्यासाठी आलेल्या डब्यावर आधीच ताव मारला होता.आणि मला त्याचा पत्ताही नव्हता. एकदा उन्हाळय़ात मला त्रास होईल म्हणून एका मावशीने बॉक्स भरून लस्सीची पाकिटं आणि श्रीखंडाचा एक मोठा डबा पाठवला होता. तेव्हा संपूर्ण टीमने मौज केली होती. चाहते कलाकारांचे लाड करतात ते असे..’अशी आठवण त्याने सांगितली.
शहरातल्या कानठळय़ा बसवणाऱ्या मिरवणुकांचा अट्टहास, बेफाम होऊन अश्लील गाण्यांवर बाप्पाच्या पुढय़ात नाचणारी तरुणाई, भयंकर गर्दी, यापासून कोकणातला गणेशोत्सव कैक पावलं दूर आहे. म्हणूनच कोकणी माणूस दरवर्षी गणपतीत गावी का पळतो हे समजून घ्या असं सांगतानाच आग्रहाचं बोलावणंही करतो, ‘खवय्येगिरी करण्यासाठी गणपतीत कोकणात एकदा तरी येवूकच व्हया !’
viva@expressindia.com