मितेश जोशी
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, परीक्षक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या प्रसाद ओकची फिल्मी कारकीर्द रंजक आणि वैविध्यपूर्ण आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. अशा चतुरस्र अभिनेत्याबरोबरच्या खाऊगप्पांनी ‘फुडी आत्मा’ या सदराचा समारोप करतो आहे..
जसं अन्न तसं मन आणि जसं मन तशी आपली वागणूक आणि जशी आपली वागणूक (कर्म) तसं आपल्या आयुष्याचं फलित. एकदम सोप्पं समीकरण आहे. म्हणूनच जर आयुष्यात ‘खऱ्या अर्थाने’ यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या अन्नाचा विचार नको का करायला? आहार हा प्राण धारण करणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये अग्रगण्य होय, असा वेद, पुराण आणि आयुर्वेदात उल्लेख आहे. शरीरातील प्रत्येक अणुरेणूचे पोषण, वाढ ही अन्नाद्वारेच होऊ शकते. शरीर जिवंत ठेवणारे मेंदू, हृदय, फुप्फुसंदेखील आहारामुळेच जिवंत असतात अशी आहाराची महती आहे. त्यामुळे प्रत्येकानेच आपला आहार आपल्या शरीराचे पोषण करण्यास समर्थ आहे ना? हे तपासणं गरजेचं आहे. कलाकार म्हणून आहाराची काळजी घ्यावीच लागते, मात्र वैयक्तिकरीत्याही प्रसाद आपल्या आहाराबाबत दक्ष आहे. त्याच्या प्रसन्न दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने होते. सध्या प्रसाद ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे डाएटवर आहे. सकाळी उठल्यावर तीन बदाम, दोन खजूर आणि दोन आक्रोड एवढीच त्याची न्याहारी असते. त्यानंतर सकाळी दहाच्या आसपास मेथीची भाजी, मुगाची आमटी आणि दोन ज्वारीच्या भाकऱ्या खाऊन तो दुपारचं जेवण उरकून घेतो. त्यानंतर दिवसभर जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा दोन-तीन डाळिंबं, भरपूर ताक, ब्लॅक कॉफीचं सेवन प्रसाद करतो. रात्रीच्या जेवणात सूपचा समावेश असतो. जेव्हा प्रसाद डाएटवर नसतो, तेव्हाही तो भाकरी पालेभाजीच खातो. त्याला कधी तरी भाकरीबरोबर झुणका, चिकन, मासे खायलाही आवडतात.
हेही वाचा >>> ऐकू आनंदे
आवडीचं जेवण कुठलं, असा प्रश्न कोणीही त्याला विचारला तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं, ‘आईच्या हातचं’. आई तिच्या आई-आजीकडून जेवण बनवायला शिकलेली असते, काळाप्रमाणे स्वत: केलेल्या प्रयोगातूनही तिने ते कौशल्य आत्मसात केलेलं असतं. अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा तिच्या हातची चव आवडून जाते आणि मग आपसूकच आपली कॉलर टाइट होते, असं मानणाऱ्या प्रसादला आईच्या हातची बासुंदी प्रचंड आवडते. प्रसादची आई शाळेत शिक्षिका होती. त्या दोन वेगवेगळया शाळेत शिकवायला जायच्या, त्यामुळे सकाळच्या वेळेत त्यांची प्रचंड गडबड असायची. प्रसाद याबद्दल सांगतो, ‘लहानपणी शाळेच्या डब्यात आई कायम पोळीभाजी द्यायची. भाजी वेगवेगळी असायची, पण मला डब्यात तोचतोचपणा वाटायचा. त्यामुळे डबा खायचा प्रचंड कंटाळा यायचा. शाळेच्या बाहेर चमचमीत पदार्थाचे ठेले असायचे, पण त्यासाठी पैसे लागायचे. त्यामुळे मी माझ्या बाबांचे पाय चेपून द्यायचो. माझे बाबा रोज कामानिमित्ताने २५ ते ३० किमीचा प्रवास सायकलवरून करायचे, त्यांचे पाय प्रचंड दुखायचे. त्यांचे पाय दाबून दिले की ते खूश होऊन मला एक रुपया द्यायचे. कधी मूड चांगला असला तर पाच रुपयेसुद्धा द्यायचे. त्या एक-दोन रुपयांवर मी माझी खवय्येगिरी करायचो.’
प्रसादची बायको मंजिरी हीसुद्धा सुगरण आहे. तिच्या हातची कोळंबी, चिकन, स्टफ पापलेट, शिरा, मेथीचे पराठे हे पदार्थ प्रसादला फार आवडतात. त्याचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. पुण्याने सुरुवातीपासूनच आपली जुनी खाद्यसंस्कृती जपत नवीन बदलांनाही स्वीकारलं आहे. पुणे म्हटलं की आजची काही ठिकाणं हटकून समोर येतातच. कयानी बेकरी, माझरेरीन, जॉर्ज रेस्टॉरंट, दोराबजीसारखी पूर्वेकडची ठिकाणं तर बादशाही, प्रभा विश्रांतिगृह, वैद्य मिसळ, चितळेंची बाकरवडी, पुष्करणी भेळसारखी पश्चिमेकडची ठिकाणं आपापल्या खाद्यसंस्कृतीचा वारसा जपत, पुढे नेत आहेत. जगभरातील अनोखे कुझीनस् ते भन्नाट कल्पनांतून साकारलेले भट्टी चाय, तंदुरी चाय, तवा आइस्क्रीमसारखे पदार्थ असोत की पूर्वीचे ‘खवय्ये’ ते अलीकडचे ‘फुडी’ अशा सर्वांना पुण्याने मनमुराद खाऊ-पिऊ घातलं आहे. मी पुण्यात बीएमसीसी कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये असताना फार पैसे जवळ नसायचे. समोसा सांबार, फ्रँकी, बुर्जी हे पदार्थ कॉलेज दिवसांमध्ये सर्रास खाल्ले जायचे. भांडारकर रस्त्याला बुर्जवामधील बिर्याणी खायला मित्रांबरोबर एकच गर्दी करायचो’ अशी आठवण प्रसादने सांगितली.
लवकरच प्रसाद एक फुडी चित्रपट घेऊन लोकांसमोर येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नावच ‘वडापाव’ आहे. ‘एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ असं घोषवाक्य असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरच्या बॅकग्राऊंडलाही ‘प्रेमाच्या कोटिंगला लाख भाव रेङ्घ घमघमीत जसा आपला वडापाव रे’ सारखं धमाल गाणं वाजतं. प्रसाद सांगतो, ‘आमच्या कामाची गरज म्हणून आम्हाला सतत डाएट करावं लागतं, पण आजकाल आहाराबद्दलच्या उलटसुलट मतांमुळे अनेक संभ्रम निर्माण होतात. आपण या वादात न पडता आरोग्याच्या व्याख्येत आपण बसतो ना, हे पाहणं गरजेचं आहे. आरोग्यवान असाल तर आपला आहार योग्य आहे, अनारोग्य असेल तर आहारात हितकर बदल योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने करा. केवळ डॉक्टरच्या औषधांवर अवलंबून राहू नका.’ एखादं लहान मूल नवख्या माणसाला पाहताच बिचकतं, बुजतं आणि मागे फिरतं, पण त्याच्या आवडीच्या माणसाला पाहताच त्याला बिलगतं. हे जे सख्य असतं ते आहारालाही लागू होतं, असं सांगत तुम्ही कोणता आहार कोणत्या ऋतूत घेत आहात त्याच्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही प्रसादने दिला आहे.
आज ‘फुडी आत्मा’ या सदरातील शेवटचा लेख लिहिताना पोटात गोळा आला आहे, कारण मोठा रहस्यमय आणि गुंतागुंतीचा कारभार या पोटात सतत सुरू असतो. या सदराच्या निमित्ताने अनेक छोटया-बडया कलाकारांशी बोलण्याची आणि त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली. खरं तर पारंपरिक खाद्यसंस्कृती, कलाकारांचे अनुभव, किस्से, पूर्वीच्या काळातील उपाहारगृहं, स्ट्रीट फूड ते आजच्या काळातील खाद्यसंस्कृती हा प्रवास वर्षभराच्या सदरात मांडणं म्हणजे पुण्याच्या भाषेत सांगायचं झालं तर या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचं ‘किमान शब्दांत कमाल वर्णन’ करणं तसं कठीणच आहे, पण तूर्तास या गोड-तिखट चवींचा आस्वाद ‘गोड’ मानून घ्यावा. अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. viva@expressindia.com