मितेश जोशी
अस्सल पुणेकर असलेला अभिनेता सौरभ गोखले हा पुणे शहरातील खाद्यप्रेमींपैकी एक! सौरभच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन होते. जिमहोलिक असलेल्या सौरभला अर्थातच चहापेक्षा ब्लॅक कॉफी अधिक जवळची वाटते; पण तीसुद्धा इन्स्टन्ट कॉफी नको. तर ब्लॅक फिल्टर कॉफी प्यायला त्याला जास्त आवडते. रोज दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर सौरभ नाश्त्याला त्या त्या सीझननुसार उपलब्ध असलेली फळं खातो. शूटिंग नसेल आणि घरीच लंच करायचं असेल तर सौरभ लंच न घेता ब्रंच घेतो. जिम आणि व्यायाम अधिक असल्याने तो दिवसाला कमीत कमी दहा अंडी खाल्ली जातील हे कटाक्षाने पाळतो. त्यामुळे सकाळी ब्रंचमध्ये पाच अंडय़ांचं ऑम्लेट व रात्री जेवणात पाच अंडय़ांचं ऑम्लेट अशा पद्धतीचं नियोजन तो करतो. रोजच्या आहाराची काळजी घेताना आपण कशाबरोबर काय खातो आहोत हेही लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे लंचमध्ये ऑम्लेटबरोबर स्टफ फ्राय व्हेजिटेबलची जोड तो देतो. त्याच्या डाएटनुसार त्याला जेवणात साखर व गहू चालत नाही. फळांमधून मिळणाऱ्या साखरेवर तो अवलंबून असतो. डाएट काटेकोर पाळणाऱ्या सौरभला मुळातच पौष्टिक खाण्याची आवड आहे.
सौरभ पुण्यात ‘नूतन मराठी विद्यालय’ म्हणजेच नूमविचा विद्यार्थी. शाळेत दर शनिवारी अध्र्या वेळच्या शाळेची गंमतच न्यारी होती, असं सांगताना तो शाळेतल्या खाबुगिरीच्या आठवणींमध्ये रमतो. ‘शाळेत सोमवार ते शुक्रवार आईचा डबा व दर शनिवारी बाहेरचा काही तरी कोरडा खाऊ हे आमचं ठरलेलं असायचं. मधली सुट्टी झाली रे झाली की आम्ही कँटीनच्या दिशेने अक्षरश: धावत जायचो. पॅटिस, समोसा खाऊन तृप्तीची ढेकर द्यायचो. शिवाय, शाळेच्या बाहेर चिंच, बोरं, बोरकूट, करवंदं खाण्याचीसुद्धा एक वेगळीच मज्जा होती. आम्हाला तेव्हा काही आतासारखा पॉकेटमनी मिळायचा नाही. पंचवीस- पन्नास पैशांत आमची स्वारी खाऊन- पिऊन खूश असायची,’ असं तो सांगतो.
शाळेनंतरची कॉलेज जीवनातली खाबुगिरीही तितकीच साठवणीतली होती, असं तो म्हणतो. ‘शाळेपेक्षा कॉलेजची खाबुगिरी अर्थातच थोडीशी अपग्रेडेड होती. मी मॉडर्न कॉलेजला होतो. त्या वेळी रुपाली आणि वैशाली हे तर आमचे ठरलेले अड्डे होते. या हॉटेलचा इतिहास व या हॉटेलचे पुण्याच्या खाद्यसंस्कृतीतील योगदान लाखमोलाचे आहे. मराठी मनांना चार-पाच दशकं चहा-कॉफीसारख्या सुलभ पेयांचाही महोत्सव साजरा करायची सवय लावणारे हे हॉटेल आहे. सत्तरच्या दशकापासून सांस्कृतिक पुण्याला नाका आणि कट्टय़ांचे छंदोव्यसन जडवणारे, नवकवी-नवकथाकार आणि प्रगटोत्सुक रंगकर्मीच्या चर्चा-फडांची बैठक घडवणारे आणि नंतर राजकीय नेते, सिनेकलाकार महाविद्यालयीन युवक-युवती यांच्यासह पेन्शनर व भिशीतील महिलांचेही हक्काचे खाद्यपीठ बनलेले हॉटेल वैशाली हे पुणेकरांचे भेटीचे हक्काचे ठिकाण आहे. आम्ही या हॉटेलमध्ये पडीक असायचो. हॉटेल वैशाली आणि रुपाली आजही एकाच घरातील दोन-तीन पिढय़ा येथे रमण्याचा आणि बागडण्याचा वारसा पुढे चालवत आहेत,’ असं तो म्हणतो. या दोन हॉटेल्सबरोबरच इतरही हॉटेलची खाबुगिरी कॉलेजच्या दिवसांत त्याने केली आहे. त्याच्याही आठवणी त्याने सांगितल्या. ‘वेगवेगळय़ा हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलची खासियत असलेले पदार्थ चाखून पाहणं हाही आम्हा मित्रमंडळींचा आवडता उद्योग होता. पुण्यात भवानी पेठेमध्ये मिळणाऱ्या पर्शियन खाद्यसंस्कृतीतले पदार्थ खायलाही आम्ही आवर्जून जायचो,’ असेही त्याने सांगितले.
ईटीव्ही वाहिनीवरील ‘मेजवानी’ या कार्यक्रमाचे सौरभने सूत्रसंचालन केले होते. त्यानिमित्ताने त्याची ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांच्याशी ओळख झाली. विष्णूजींच्या अनेक गोष्टी मी हेरल्या, असं तो म्हणतो. ‘अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेल्या शेफ विष्णू मनोहरांच्या जेवणातल्या मी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘चुलीवरचं जेवण’. माझ्या पिंपरीच्या बंगल्यातल्या मागच्या अंगणात मी स्वत: एक चूल तयार केली आहे. त्याच्यावर मी अनेक पदार्थ स्वत: बनवतो. त्यासाठी लागणारी लाकडंसुद्धा मी गोळा करतो. चुलीवरच्या जेवणासाठी लोक विविध शहरांमध्ये जाऊन हजारो रुपये मोजतात; पण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेचा वापर करून चूल मांडून आपण सहज जेवण बनवू शकतो, ही गोष्ट मी विष्णूजींकडून शिकलो,’ असं त्याने सांगितलं. याशिवाय, ‘कमी तसंच उपलब्ध जिन्नस वापरून जेवण बनवण्याची सवयही मी त्यांच्याकडूनच लावून घेतली,’ असं तो म्हणतो. कोणत्याही साहित्यावाचून अडून राहायचं नाही, ही त्यांची शिकवण आहे. एखादा पदार्थ बनवताना ते अक्षरश: तल्लीन होतात. कोणाशीही बोलत नाहीत की गप्पा मारत नाहीत. त्यांचा हा गुण आजच्या नवीन मुलामुलींनी आत्मसात करायला हवा. बऱ्याच मुलामुलींना जेवण बनवताना फोनवर बोलण्याची, गाणी ऐकण्याची वा काही तरी खात जेवण बनवण्याची सवय असते. तुम्ही दिवसातून मोजून एक तास जेवणाला द्या, पण तो मनापासून द्या.. ही विष्णूजींची शिकवण आपण सगळय़ांनी आत्मसात करायला हवी असं आपल्याला वाटत असल्याचंही तो नमूद करतो.
खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या अशा जागा पुणे शहरभर पावलोपावली सापडतात. मग अगदी हातगाडीवरच्या चाटपासून ते हॉटेलमधल्या फॅन्सी खाण्यापर्यंत अनेक ठिकाणी या खवय्यांची गर्दी लोटलेली आपण पाहत असतो. बटाटावडा, मिसळची दुकानं यांच्याभोवती सगळय़ात जास्त खवय्यांचा गराडा पडलेला असतो. सौरभही अशाच खवय्यांपैकी एक आहे. त्याला पुण्यात खादाडी करायला तर आवडतेच, पण मिसळवरही त्याचा विशेष जीव आहे. मिसळ म्हणजे मराठी माणसाच्या रसनेला पडलेलं झणझणीत स्वप्न, असं वगैरे म्हटलं तर ते फारच गुळगुळीत वाटेल; पण ती अगदीच कविकल्पना ठरणार नाही. वस्तुस्थितीच तशी आहे. मिसळ या पदार्थात अशी काही र्तीदार जादू आहे की तिच्या नुसत्या दर्शनमात्रेच मुखात पाचकरसाचे पाझरतलाव फुटतात. मिसळीचं नाव घेतलं की सौरभची अवस्था ही अशी होते. त्याला तुळशीबागेतल्या ‘श्रीकृष्ण भुवन’ची मिसळ मनापासून आवडते. ‘लहानपणापासून मी ही मिसळ खातो आहे. अनेक वर्ष झाली, पण या मिसळीची चव काही बदललेली नाही. पुणे आणि कोकण या दोन्ही शहरांचा मिलाप म्हणजे ही मिसळ,’ असं तो म्हणतो.
‘सिम्बा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला असताना खास तिथल्या पदार्थाची आठवण त्याने सांगितली. ‘शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ या भागात पाहायला मिळत असले तरीही ‘मियाँ सामने बिर्यानी हो तो, शाकाहार को छुएगा कौन..’ असाच काहीसा मिजाज असणारी कट्टर हैदराबादी मंडळी आपली शाही खादाडीची सवय जोपासताना दिसतात. मसालेदार आणि गोडाच्या पदार्थाबरोबरच हैदराबादमधील नेकलेस रोडवर चटपटीत खाण्याची चंगळही पाहायला मिळाली. हा भाग हैदराबादमधील मरिन लाइन्सचा भाग म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे कॉलेजियन्सची इथे बरीच गर्दी असायची. हैदराबादमध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे या लज्जतदार पदार्थाची चव चाखण्यासाठी बरीच गर्दी होते. त्यापैकीच काही महत्त्वाची ठिकाणं म्हणजे ‘पॅराडाइज बिर्याणी’. याव्यतिरिक्त बेगमपेठ आणि सिकंदराबाद या ठिकाणीसुद्धा सुरेख बिर्याणीची चव चाखता येते. खिशाला न झोंबणारे दर हा हैदराबादमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचा विशेष गुण आहे,’ असं सौरभ म्हणतो. सिद्धार्थ जाधव, विजय पाटकरसारख्या अतरंगी विनोदी कलाकारांबरोबर हैदराबादच्या ठेल्यांवर खवय्येगिरी केल्याचंही तो आठवणीने सांगतो.
फिटनेस आणि चमचमीत खाणं यांचा योग्य मेळ साधणं जमायला हवं. सौरभला हे गणित बरोबर जमलं आहे. त्यामुळे जिम करत असलो तरी मी फास्ट किंवा जंकफूडच्या विरोधात नाही, हेही तो आवर्जून सांगतो. असे पदार्थही कधी तरी गंमत म्हणून खायला हवेत, मात्र ते रोजच्या आहाराचा भाग होऊ नयेत, असं तो म्हणतो. अंगाची चरबी किंवा भरमसाट वजन वाढवणारं खाणं दूरच बरं.. त्यासाठी शरीरासाठी आवश्यक ते खाण्याची शिस्त अंगी बाणवायला हवी, खाण्याच्या बाबतीतही संयम राखणं शिकायला हवं, असा मंत्रही त्याने दिला.
डॅशिंग बॉडी, हॉट लुक आणि किलर स्माइलमुळे प्रसिद्ध झालेला गोंडस अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे मराठी माणसांच्या घराघरांत पोहोचलेला, ‘सिम्बा’ व ‘सर्कस’ या बहुचर्चित चित्रपटांतून हिंदी सिनेसृष्टीतून रसिकांच्या परिचयाचा झालेल्या सौरभला खाण्यापिण्याची शिस्त आणि संयम महत्त्वाचा वाटतो.