तिच्या आयुष्यात योगायोग खूप आहेत. काम मिळत गेलं तसं ती करत गेली.  अभिनयाखेरीज नृत्य, विज्ञान, स्काऊट-गाईडमध्येही ‘ती’ सहभागी झाली. भेटूया, आयुष्य भरभरून नि समरसून जगणाऱ्या ‘या सुखांनो या’ मधल्या चिमुरडीला – म्हणजे श्रद्धा रानडेला !
एक दिवस ‘ती’ गेली होती नाट्यशिबिरातर्फे शुटिंग बघायला. शुटिंगदरम्यान शॉट देणारी मुलगी घाबरलेली  बघून ‘हे तर किती सोप्पंय. मी लगेच करू शकते,’ असं ती म्हणाली. त्यावर तिला ‘मग करून दाखव’, असं सांगण्यात आलं. ‘ती’ पटकन बोलून तर गेली होती, आता करून दाखवण्याची वेळ आली होती. अजिबात न घाबरता ‘तिनं’ तसं करून दाखवलं होतं. आपण पहिलावहिलाच शॉट एकदम सहजपणं दिलाय नि त्या मुलीच्याजागी आपल्यालाच घेण्यात आलंय, हे नंतर ‘तिला’ कळलं. २००३ च्या वर्ल्ड कपसाठी ‘पीस मेसेज’ देणारी ती जाहिरात होती ड्रिम प्रॉडक्शनची आणि त्यात अरबाज खान होता. ही जाहिरात तिनं केली तेव्हा ‘ती’ – म्हणजे श्रद्धा रानडे फक्त ‘ज्युनिअर केजी’त होती.
लहानपणापासून श्रद्धाला नृत्य नि अभिनयाची आवड आहे. घरी या कलांची पाश्र्वभूमी नसली तरी ते जोपासायला कायमच प्रोत्साहन दिलं गेलं. लहानपणी सुट्टीत चांगलं शिकायला- ऐकायला मिळेल या दृष्टीनं ती त्या नाट्यशिबिरात सहभागी झाली होती. तिथं तिची आवड छान प्रकारे डेव्हलप झाली. हा ‘पीस मेसेज’ पाहून तिला प्रतिमा कुलकर्णी दिग्दíशत ‘झी मराठी’वरील ‘अंकुर’ मालिकेत छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर ‘या सुखांनो या’ या मालिकेत चॅनेलकडून तिला रेकमेंडेशन मिळालं. हा एक मोठा ब्रेक होता. या मालिकेमुळं तिचा चेहरा लोकांपर्यंत पोचून तिला प्रसिद्धी मिळाली. ‘ज्ञानदीप कलामंचा’तर्फे ‘केल्याने होत आहे रे’, ‘गाढव बनले करोडपती’ ही बालनाट्यं केली.
कलागुण जोपासण्यासाठी श्रद्धा ‘पृथ्वी थिएटर’मध्ये रामनाथ थरवळ यांच्याकडं शिकली. तिला तिथल्या संमिश्र सांस्कृतिक वातावरणात शिकता आलं. नाटकांत काम करता आलं. स्टेज एटीकेटस् शिकायला मिळाले. भाषिक ज्ञान वाढून िहदी भाषेचा खरा लहेजा आत्मसात करता आला. सुरुवातीला तिला िहदी बोलणं जमत नव्हतं. पण तिनं ठाणे-अंधेरी प्रवासात िहदीचा सतत सराव केला. पुढं मालिका मिळत गेल्यावर नाटक थोडं मागं पडलं. श्रद्धा सांगते की, ‘मालिकेत शॉट देणं वेगळं नि नाटक असतो लाईव्ह परफॉरमन्स. त्यामुळं मालिकांनंतर पुन्हा बालनाटय़ स्पर्धेसाठी नाटक करताना थोडंसं दडपण आलं होतं. आता जमेल की नाही असं वाटलं. फारसा वेळ मिळायचा नाही. पण प्रयत्नांती परमेश्वर, हे खरंय. दिसायला ती बालनाट्य स्पर्धा असली तरी तीही अखेर स्पर्धा असते नि स्पध्रेचं टेन्शन येतंच.’ त्यानंतर तिला ‘ई टीव्ही मराठी’ची ‘भाग्यविधाता’ मालिका मिळाली. मधल्या काळात खूप ऑडिशन्स देता देता तिला ‘झी टीव्ही’ची ‘ममता’ मालिका मिळाली. कधी ऑडिशनमध्ये सिलेक्शन झालं नाही तरी निराश न होता ती ऑडिशन्स देत राहिली. ‘आता सिलेक्शन नाही झालं, ओके. पुढल्या वेळी मस्तच करेन’, असं ती मनोमन म्हणत राहिली. पहिल्या ऑडिशनच्या वेळी तिला थोडं टेन्शन आलं होतं, पण ते कॅमेऱ्याचं नव्हे तर ती ऑडिशन घेणाऱ्यांचं आलं होतं. ऑडिशन देताना सुरुवातीला त्यातले ‘प्रोफाईल’ वगरे टिपिकल शब्दही तिला माहिती नव्हते. या ऑडिशन्सदरम्यान तिला खूप काही शिकायला मिळालं.
मालिकांत काम करताना सगळ्याच सहकलाकारांचं खूप सहकार्य मिळालं. ती म्हणते की, ‘या सुखांनो या’च्या वेळी मी तिसरीत इंग्लिश मिडियमला असल्यानं मराठी वाचनाचा फारसा सराव नव्हता. स्क्रिप्ट रििडगसाठी आम्ही गोल करून बसायचो. तेव्हा सगळ्यांनी ‘तू वाचायचंस. कितीही वेळ लागू दे’, असं म्हणून मला खूप सपोर्ट दिला होता. हे खूप छान वाटायचं. मी लहान म्हणून कुणी माझ्याकडं दुर्लक्ष केलं नाही. आज मी जे छान मराठी वाचू शकते, ते त्यामुळंच. सेटवर अभ्यास घेतला जायचा. विक्रमकाकांना (विक्रम गोखले) रिपोर्टकार्ड दाखवायला लागायचं. सेटवरची माणसं शाळा-अभ्यासाबाबतीत खूप स्ट्रिक्ट असायची. असे सगळ्याच मालिकांच्या शुटिंगचे कितीतरी छान अनुभव आहेत.. किती सांगू.. ते मी मिस् करत्येय. ही सारीच मंडळी खूप चांगली आहेत.’ सध्या तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘मी मराठी’वरील ‘खेळ मांडला’चं पुनप्रसारण सुरू आहे.
पहिल्याच ऑडिशनमध्ये मिळालेल्या ‘मंथन – एक अमृत प्याला’ या चित्रपटात तिनं पद्मिनी कोल्हापूरे नि मििलद गुणाजी यांच्यासोबत काम केलं. ‘झूम झ्ॉम झॉम्बी’ या बालचित्रपटातही तिनं काम केलं. ‘अक्कड बक्कड’ या व्हीसीडीमध्ये श्रद्धानं गाण्यांवर अभिनय केला होता. ‘डिन्से’च्या ‘पेटपूजा’ शोमध्ये आणि ‘झी मराठी’वरील ‘आम्ही सारे खवय्ये’च्या चिल्ड्रेन स्पेशल भागाचं प्रमोशन केलं होतं. ‘सह्याद्री’वरील ‘दमदमादम’ मालिकेचं सूत्रसंचालन तिनं केलं होतं. सतीश राजवाडेदिग्दíशत ‘होप ऑफ काíनव्हल’ ही टेलिफिल्म तिनं केली. त्या सुमारास गोव्याच्या काíनव्हलमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं केलेल्या या पाच भाषांतल्या टेलिफिल्ममध्ये तिनं जॉनी लिव्हरसोबत काम केलं होतं. ‘हमाम सोप’, ‘अमर पेस्ट’, ‘डॉ. फिक्स इट’, ‘अँम्बी व्हँली’ आदी जाहिराती आणि कॅटलॉग फोटोसेशनही केलंय.  
गेली दहा वर्ष ती भरतनाट्यम शिकत्येय. त्याचे पहिले धडे तिनं ‘नालंदा’त के. शोभना यांच्याकडं गिरवले. सध्या ती ‘गांधर्व’ करत्येय तमन्ना नायर नि पूनम मुर्डेश्वर यांच्याकडं. नववीत ती ‘नँशनल कॉंग्रेस ऑफ सायन्स’मध्ये सहभागी झाली होती. त्यांचा ग्रुप राष्ट्रीय स्तरावर पहिला आला होता. दहावीत ओरिसात सेमिक्लासिकलच्या राज्यस्तरीय स्पध्रेत, पंजाबमधल्या स्काऊट-गाईडच्या स्पध्रेत नि ‘रविकिरण’ स्पध्रेतील ‘गेट सेट गो’ या नाटकालाही प्रथम पारितोषिक मिळालं होतं. तिला अभ्यास करायला खूप आवडतो. तिनं थेट दहावीतच गणिताला क्लास लावला होता. तिच्या मत्रिणींच्या सपोर्टमुळं अभ्यासाचं दडपण कधीच आलं नाही. नववी-दहावीच्या महत्त्वाच्या वर्षांत तिनं मोठी प्रोजेक्टस् फारशी स्वीकारली नाहीत. सध्या ती ‘डी. जी. रुपारेल कॉलेज’मध्ये एफवायजेसी कॉमर्सला आहे. तिला कॉलेजलाईफ एन्जॉय करायचंय. कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीत सहभागी व्हायचंय. ती म्हणते की, ‘माझ्या दृष्टीनं ज्या गोष्टींत आनंद मिळतो, ते मी करते. डान्स नि अभ्यास चालू आहे. पुढं सी.ए. व्हायचा विचार आहे. एखादं चांगलं प्रोजेक्ट आल्यास त्यात काम करायचा विचार करणारेय..’

Story img Loader