मितेश जोशी

अभिनेत्री खुशबू तावडे हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आतापर्यंत ती विविध मालिकांमधून झळकली. खुशबू सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे खूप चर्चेत आहेत. खुशबू ही हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असून तिच्या खाण्याविषयीच्या गमतीजमती वाचूयात आजच्या ‘फुडी आत्मा’मध्ये..

ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

बॉलीवूडमधल्या करीना, सैफ, लिसा आणि इतर आघाडीच्या ताऱ्यांना फिटनेसचे प्रशिक्षण देणारी, भारतातील आघाडीची डाएटिशियन आणि फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकरच्या मते  दर दोन-अडीच तासांनी खाल्लं तर दिवसभर कामासाठी लागणारी एनर्जी तुम्हाला सातत्याने मिळते व तुमचं वजन आटोक्यात राहतं. ऋजुताचा हाच कानमंत्र खुशबू पाळते. दर अडीच तासांनी हेल्दी खाण्यावर तिचा भर असतो. खुशबूच्या दिवसाची सुरुवात ड्रायफ्रूट किंवा फळं खाऊन होते, त्यानंतर चहाबरोबर कधी शंकरपाळे,  चिक्की किंवा वेगवेगळे लाडू खायला तिला आवडतं. चहा मात्र तिला आलं, वेलची आणि मसाल्याचा सुगंध असलेलाच आवडतो. न्याहारीला पोहे, उपमा, डोसा असे पदार्थ, तर दुपारच्या जेवणात भाकरी-भाजी खायला तिला आवडतं. कॉफीवर तिचं विशेष प्रेम असल्याने दुपारची झोप ब्लॅक कॉफी पिऊन दूर होते, असं तिचं मत आहे. रात्रीच्या जेवणात वरणभात खाऊन छान झोप लागते आणि रात्री ११ च्या सुमारास गोड खाण्याची हुक्की आली की त्यासाठी खजूर किंवा डार्क चॉकलेट मदतीला येतं, असं ती सांगते.    

‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेच्या सेटवरची खवय्येगिरी कशी रंगते याबद्दल खुशबू सांगते, ‘मालिकेत सगळे नावाजलेले कलाकार असल्याने त्यांच्या घरचे एकापेक्षा एक पदार्थ सध्या खायला मिळतात. त्यामुळे माझं सध्याचं दुपारचं जेवणाचं ताट ही एक ग्रँड थाळी असते. आठवडय़ातून तीनदा सेटवर मी वेगवेगळं प्रोटीन सलाड न्यायचा प्रयत्न करते. अशोक शिंदे उकडलेल्या भाज्या खातात, त्यामुळे त्यांच्या डब्यातही हेल्दी पदार्थ असतात. शशिकांत वेगवेगळय़ा प्रकारचे मासे आणतो. रागिणीताईंच्या हातची भरली कारली, भरली वांगीही सुंदर असतात. काही जण नाश्त्याचे, तर कोणी मधल्या वेळेत खायचे चुरूमुरू पदार्थ आणतात. त्यामुळे सेटवर कोणीही उपाशी राहत नाही आणि बॉण्डिंगही जपलं जातं’. 

खुशबू हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असल्याने तिथली शिस्त तिला खूप महत्त्वाची वाटते. ‘डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला चाकं लावून काम करणं हे हॉटेल मॅनेजमेंट व्यवसायाला अगदी फिट्ट बसतं. हीच गोष्ट मी इंडस्ट्रीत काम करताना लागू करते. शांतपणे आलेल्या स्थितीला सामोरं जाण्याचं बळ आणि पुढच्या काही मिनिटांत समोरच्याचं वर्तन काय असेल किंवा आजूबाजूला काय घडेल याचा अंदाज बांधायला मी शिकले. फ्रंट डेस्कच्या व्यक्तीला लॉबीमध्ये फिरणाऱ्या दहा वेगवेगळय़ा माणसांच्या नजरेतून चटकन लक्षात यायला हवं की, त्यांना नेमकं काय हवं आहे. ही बाब माझ्या अंगात इतकी भिनली आहे की, सेटवर काम करत असताना माझ्याबरोबरच्या लोकांना काय हवं आहे किंवा सीनमध्ये ते कुठे माती खाणार आहेत हे मला बरोबर लक्षात येतं. व्यक्ती म्हणून मला हॉटेल मॅनेजमेंटने खूप घडवलं आहे,’ असं तिने सांगितलं. हॉस्पिटॅलिटीमध्ये करिअर करायचं असेल तर तरुण मुलांनी एक प्रयोग करून पाहावा, असं ती म्हणते. ‘सुट्टय़ांमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये (मोठय़ा हॉटेल्समध्ये वयाची अट असू शकते.) किंवा मोठय़ा कॅटररकडे आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता ट्रेनी म्हणून काम करा. संस्था किंवा व्यक्ती विश्वासू आणि दर्जेदार असली पाहिजे याची काळजी घ्या. हा अनुभवच तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअर तुमच्यासाठी योग्य की अयोग्य हे सांगेल,’ असा सल्ला तिने दिला.

बेकिंगने मला अजून आपलंसं केलेलं नाही, असं सांगणाऱ्या खुशबूने तिच्या फसलेल्या पदार्थाच्या आठवणी सांगितल्या. ‘मी आई-बाबा दोघांकडून स्वयंपाक शिकले, मला हाताच्या अंदाजाने पदार्थ मोजण्याची सवय आहे. मी भाजीत मीठ घालतानाही हाताचाच वापर करते. बेकिंगमध्ये याच्या अगदी विरुद्ध आहे. तिथे अगदी मोजूनमापून चमच्याचा वापर करावा लागतो. एकदा कॉलेजमध्ये शिकत असताना मी घरी कुकीज बनवण्याचा घाट घातला. बाबाही खूश झाले, आज लेकीच्या हातचं बिस्कीट खायला मिळणार. हळूहळू वास यायला लागला. मीही अभिमानाने व्हॅनिलाचा वास आहे, असं सांगितलं; पण हळूहळू वास बदलला. नेहमीप्रमाणे माझं काही तरी मोजमाप चुकलं आणि कुकीज चांगल्याच करपल्या. घरभर धूर आणि वास पसरला होता. सुधारित आवृत्तीही काही करता येणार नाही इतक्या त्या करपल्या. त्या वेळी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची फी एक लाख रुपये होती. माझे बाबा अजूनही या फसलेल्या कुकीजची आठवण देऊन चिडवतात, तू माझे एक लाख वाया घालवलेस. एक बिस्कीट तू माझ्यासाठी करू शकली नाहीस,’ अशी आठवण तिने सांगितली.

समाजमाध्यमांवर खुशबू नवनवीन पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ व त्याची रेसिपी शेअर करत असते. मार्च महिन्यात तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात तिने एका बाजूला फोडणीचा भात तर एका बाजूला मॅगी बनवली आणि चक्क दोन्ही पदार्थ एकत्र केले. फोडणीच्या भातामध्ये मॅगी एकत्रित करत ‘फ्युजन फोडणीचा भात’ असं नामकरण तिने दिलं. लोकांना अघोरी वाटतील असे फ्युजन पदार्थ आम्ही करत असतो, असं ती गमतीने सांगते. ‘पूर्वी नवरा स्वयंपाकात मदत करतो, हे सांगायला स्त्री काहीशी बिचकायची आणि पुरुषांनाही ते कमीपणाचं वाटायचं. हल्ली पुरुषही सर्रास स्वयंपाकघरात मदत करताना दिसतात. आमच्याकडेही माझे बाबा आईला मदत करायचे. अधूनमधून का होईना थोडे पदार्थ पुरुषांना यायलाच हवेत, या मताचे ते आहेत. सासरी गेल्यावर पहिल्यांदा एकटय़ा बाईचा किचनमधला वावर मी सासूबाईंकडून अनुभवला. आईचं प्रेम मला त्यांच्याकडून मिळालं. संग्राम माझ्या घरी आल्यावर बाबांना किचनमध्ये पाहून त्यानेही किचनमध्ये एन्ट्री घेतली. आता तोही छान छान पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घालतो,’ असं ती सांगते. आनंदाने स्वयंपाकघरात रमणाऱ्या तरुण वा मध्यमवयीन पुरुषांचीच नव्हे तर अगदी आजोबा पिढीतल्या पुरुषांचीही संख्या वाढताना दिसतेय, असं तिने सांगितलं.

खुशबूच्या मते, स्वयंपाक करणं ही सर्जनशील गोष्ट आहे. तुम्ही त्यात इतके प्रयोग करू शकता, की आयुष्य पुरं पडणार नाही. गॅसवर एखादा पदार्थ शिजायला लागला, की हळूहळू मसाल्यांचा त्यात उतरत जाणारा स्वाद दरवळायला लागतो. तो मला प्रचंड आवडतो. त्यात काय कमी आहे आणि ते नीट शिजलंय ना हे मला फक्त वासावरून कळतं आणि जेव्हा पदार्थ तयार होतो तेव्हा भांडय़ावरचं झाकण काढून स्वाद जाणवणारी ती वाफ मी माझ्या रोमारोमांत भरून घेते आणि थेट वाफाळता पदार्थ घरच्यांच्या ताटात पडतो. पहिल्या घासानंतर ‘खुशबू, मस्त जमलंय,’ असं म्हणतात तेव्हा मला केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं, असं सांगणाऱ्या खुशबूने या वर्षी गणेशोत्सवात केलेल्या उकडीच्या मोदकांचा किस्साही सांगितला. ‘सासरी उकडीच्या मोदकांची परंपरा नाही. इथे कोणताही सण असला की पुरणपोळी आणि कटाची आमटी ही जोडगोळी फिक्स असते. लग्न झाल्यावर सासरच्या गणपतीत मी उकडीच्या मोदकांचा घाट घातला. ते सगळय़ांना इतके आवडले, की दरवर्षी गणेश चतुर्थीला मी हमखास मोदक बनवते. या वर्षी मी लेट नाइट शूट करून पहाटे घरी आल्यानंतर मोदक केले. आपल्या एका पदार्थाने जर घरातील वातावरण आनंदी राहणार असेल तर तो पदार्थ घरी नक्की बनवा. आनंद हा असाच वाटून मिळतो आणि टिकतो,’ असं ती म्हणते.

viva@expressindia.com

Story img Loader