मितेश जोशी
मराठी ‘बिग बॉस सीझन ४’ तसेच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सोयराबाई या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर. पौष्टिक आणि पोटभर खाण्याची आवड असणाऱ्या स्नेहलतासाठी मासे म्हणजे जीव की प्राण आहेत.
ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना मिळालेली लोकप्रियता, बोल्ड फोटोशूट अन् रोखठोक स्वभावामुळे छोटय़ा पडद्यावर व समाजमाध्यमांवर कायम लोकप्रिय असलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘मराठी बिग बॉस’च्या चौथ्या सीझनमध्ये स्नेहलताने केलेला कल्लाही आपण पाहिलेला आहे. नकारात्मक भूमिकेची छटा असलेली तिने साकारलेली सोयराबाई सगळय़ांनाच भावली. अशा या स्नेहलताला ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ या म्हणीनुसार पोटभर पण पौष्टिक खायला आवडतं. कॉफी लव्हर असलेल्या स्नेहलताच्या दिवसाची सुरुवात कॉफी, प्रोटीन किंवा पीनट बटरच्या साथीने होते. दिवसभर कामासाठी एनर्जी मिळावी म्हणून पोटभर खाणं गरजेचं असतं, हे तिचं मत. त्यामुळे सकाळचा नाश्ता तसंच दुपारच्या जेवणात मोजकंच न खाता पोटभर खाण्याला प्राधान्य देते. दिवसभर आपली कामाच्या निमित्ताने हालचाल होत असते त्यामुळे सकाळचं जेवण सहज पचतं. रात्री तसं होत नाही. रात्री उशिरा घरी आल्यानंतर आणखी उशिरा जेवण केल्याने पचनक्रियेला त्रास होतो, त्यामुळे दिवसा पोटभर खा.. असा खादाड सल्ला ती आपल्या चाहत्यांना देते.
जेवणाच्या ताटात वरणभात, तूप आणि लोणचं हा तिचा प्रिय मेनू आहे. त्याचबरोबर तिला कच्च्या भाज्या, रताळं, अंडी, पनीर आणि चिकन खायला आवडतं. हा डाएटचा भाग असला तरी मी ते मनापासून खाते, असं ती सांगते. सगळय़ा भाज्या आवडीने खाणारी स्नेहलता कारलंदेखील आवडीने खाते. तिला तिच्या आईच्या हातचे कारल्याचे काप आवडतात. तिचं हे कारलं प्रेम व्यक्त करताना ती म्हणते, ‘आईच्या हातचे सगळेच पदार्थ गोड लागतात. त्याला कारलंही अपवाद नाही. आईच्या हातचे कारल्याचे काप मला खूप आवडतात. सर्वप्रथम आई कारलं सोलून, त्याचे एकसमान तुकडे करते. ते तुकडे मिठाच्या पाण्यात उकळवते. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट लावून, रव्यात घोळवून श्ॉलो फ्राय केलेले कारल्याचे काप जेव्हा आई पुढय़ात पेश करते तेव्हा मनात आनंदी आनंद असतो. आईकडे गेल्यावर बऱ्याचदा ताटात डाव्या बाजूला हे काप असतातच. कारल्याच्या कापाबरोबरच आईच्या हातची पुरणपोळी, मेथीचे लाडू, वरण, चिकनदेखील आवडतं.’ खरंतर लग्नानंतर मुलींना आईच्या हातच्या अशा कितीतरी पदार्थाची आठवण येत असते. सासरी मी खूप मिस करते ते म्हणजे आईच्या हातच्या गरमागरम पोळय़ा! शाळेत असताना सकाळी आई कपभर दुधात मध किंवा साखर घालून द्यायची. सोबतीला साजूक तूप लावलेली गरमागरम पोळी असायची. सकाळच्या शांततेच्या वातावरणात किचनच्या ओटय़ाजवळ उभी राहून पोळय़ा बनवणाऱ्या आईचं तेज तेव्हा अधिकच खुलायचं. मी तिच्याचजवळ खाली बसून गरमागरम आठ ते नऊ पोळय़ा फस्त करायचे. आता धावपळीच्या वेळेत शूटिंगला जाताना हा क्षण मी खूप मिस करते आहे, असं स्नेहलता सांगते.
मालवणी लोक आणि मासे हे एक अविभाज्य समीकरण आहे. अर्थात त्यामुळे मालवण किंवा कोकण पट्टीतील लोक फक्त मासेच खातात, असा गैरसमज आजही आहे. स्नेहलतालाही मासे खायला आवडतात. वाराला भरपेट मासे खाणाऱ्या स्नेहलताला प्रत्येक प्रकारचा मासा खायला आवडतो. रस्सा, फिश फ्राय, चटणी, बिर्याणी अगदी कोणत्याही प्रकारचा व कशातलाही मासा ती आवडीने खाते. ‘हॉटेलमध्ये जी मालवणी फिश करी किंवा मासे मिळतात ते १०० टक्के मालवणी पद्धतीचे असेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे बाहेर खाण्यापेक्षा घरीच पोटभर खावं या मताची मी आहे,’ असं सांगणाऱ्या स्नेहलताचं सासर रेवदंडा आणि माहेर राजापूर दोन्ही कोकण प्रांतातलेच आहे. पण तरीही दोन विभिन्न चवींमधली मत्स्य खाद्यसंस्कृती तिला अनुभवायला मिळाल्याचं ती सांगते. ‘मालवणी जेवणाबद्दल असा गैरसमज आहे की ते खूप खोबराळ असतं. पण खरंतर तसं नाही. मासे बघून आणि ऋतू पाहून त्यानुसार त्याचं काय करायचं हे मालवणी घरात ठरवलं जातं. ओलं खोबरं, चिंच, धणे, मिरी, सुक्या लाल मिरच्या, किंचित कांदा हे मालवणी मासे आमटीचे मुख्य साथीदार आहेत. काही घरांमध्ये कोळंबी असेल तर त्यात शेवगा शेंग, कैरी किंवा बटाटा पडतो, पण अन्य माशाची आमटी करताना मासा आणि वाटण याच कलाकारांवर पूर्ण प्रयोग तोलला जातो. मालवणी आमटीचा पोत फार घट्ट कधीही नसतो. तिखटपणा अंमळ. घट्ट कालवण असतं त्याला तिखलं म्हणतात. त्यातील मासे बहुतांशी छोटे असतात. टोमॅटो, लिंबू यांना इरसाल मालवणी स्वयंपाकघरात मासे करताना मज्जाव असतो. नारळाचं दूध वापरून केलेली मत्स्य आमटी अधिक चविष्ट आणि क्रिमी असते. हे झालं माहेरचे मत्स्यपुराण! सासरी रायगड, अलिबाग भागात कणभर खोबरं न घालता कोंबडी किंवा मासे केले जातात. अलीकडे हॉटेल्समध्ये जे मिळते त्यालाच ऑथेंटिक मालवणी समजले जाऊ लागले आहे हे दुर्दैव आहे,’ असं ती म्हणते.
साठे महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या स्नेहलताची कॉलेज विश्वातली खादाडी अविस्मरणीय होती. आठवणींच्या या कप्प्यात डोकावत ती म्हणाली, ‘मी कॉलेजमध्ये असताना आमच्या साठे कॉलेजच्या बाहेर एक आजी वडापाव विकायला बसायची. त्यांच्या हातचा वडापाव जगात भारी असायचा. त्याचबरोबर कॉलेजच्या मागे मिळणारी चिचीची मिसळ (म्हणजे छान चवदार मिसळ) आम्ही मैत्रिणी एकत्र येऊन खायचो. त्या वेळेला ती मिसळ आमच्यासाठी महाग असायची. पैसे आठवडाभर साठवून वन बाय टू मिसळ खाण्यात मजाच काही और होती. त्याचबरोबर कॉलेज सुटताना पार्ले स्टेशनच्या समोर वेगवेगळय़ा फ्लेवरच्या लस्सी प्यायचो. त्यातल्या त्यात रोझ लस्सी माझी फेवरेट होती. लस्सी पिऊन ट्रेनमध्ये डुलकी काढण्याचा आनंद वेगळाच होता.’
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झालेली खाबूगिरीही स्पेशल होती, असं म्हणत तिने त्याही आठवणी सांगितल्या. ‘मालिकेमधील सर्व स्त्री कलाकार कायम एकत्र असायचो. त्यामुळे सतत खाण्यापिण्याच्या गप्पा असायच्या. प्रतीक्षा लोणकर या वरणफळं खूप सुंदर बनवतात. माझ्या हातचे नारळाचे लाडू, शिरा, कॅरॅमल कस्टर्ड असे गोड पदार्थ सगळय़ांना आवडायचे. तेव्हा सेटवर खूप पाटर्य़ा व्हायच्या. त्यामुळे सतत खाबूगिरी चालायची. सोयराबाई या व्यक्तिरेखेसाठी मला वजन वाढवायचं होतं, पण मला फास्ट फूड खाऊन फुगायचंही नव्हतं. वजन उतरवताना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको म्हणून डाळी आणि तुपाचा आधार घेऊन वजन वाढवण्याचा मी निश्चय केला. मला यात साथ द्यायला पल्लवी वैद्य पुढे आली. तिने मला नारळाच्या दुधातली गुळाची रव्याची खीर बनवायला शिकवली. मला ती खीर प्रचंड आवडली. त्यानंतर ती आणि मी आम्ही दोघीही रोज ती खीर वजन वाढवण्यासाठी प्यायचो. बऱ्याचदा सगळय़ांसाठी आणलेली दोन लिटर खीर आम्ही दोघीच फस्त करायचो,’ असं तिने सांगितलं.
तूप हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या जेवणाची चव वाढवतो. आपण अनेकदा खिचडी, वरणभात तसंच पोळीवर तूप लावून खातो. तुपाचं सेवन केल्याने अनेक आजारांवर आपोआप उपचारही होतात. तूप खाल्ल्याने वजन वाढतं, असं कित्येकांना वाटतं, परंतु तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. त्याचबरोबर पोटाची चरबी कमी होण्यासाठीही त्याची मदत होते. हे सगळे फायदे लक्षात घेता काही वर्षांपूर्वी स्नेहलताने तुपाचं डाएट केलं होतं. त्याविषयी ती सांगते, ‘मी रोज पंचवीस ते तीस चमचे तूप काही वर्षांपूर्वी दिवसभरातून प्यायचे. मला एक तक्ता दिला होता ज्यात कधी किती चमचे तूप पिणे योग्य राहील याविषयी मार्गदर्शन केलं होतं. तुपाच्या या नियमित सेवनाने माझी दुपारची झोप उडून गेली. शरीरात ऊर्जेचा साठा तयार झाला. माझे केस काळे व हेल्दी झाले. तुपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्व ए, के आणि ई सारखे पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. आयुर्वेदानुसार तुपाचे सेवन शरीरात औषधासारखे काम करते. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि झोपेची कमतरता यांमुळे आपली पचनक्रिया अनेकदा खराब होते. तुम्ही माझ्यासारखं तूप जरी प्यायला नाहीत, तरी तुपाचा वापर जेवणात करू शकता. भाजी तेलाऐवजी तुपात करा. तुपात वरण शिजवा. कोणतेही खास पदार्थ बेक करण्यासाठी लोण्याऐवजी तूप वापरा. तुम्ही घरी पॉपकॉर्न, ओटमील, पॅनकेक बनवत असाल तर लोणी आणि चीज ऐवजी तूप वापरा,’ असं ती सांगते. अगदी सकाळच्या चहा किंवा कॉफीबरोबरच सूप, डाळ, शिजवलेला भात, क्विनोआ किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थात तूप घालून तुम्ही अतिरिक्त चव आणि पौष्टिकता वाढवू शकता. त्यामुळे तुपाचा वापर जेवणात नक्की करा, हे ती आग्रहाने सांगते.