आदिती काळे – ऑकलंड, न्यूझीलंड
स्वप्नांना सत्यात साकारण्याची जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या धडपडीविषयी सांगतेय, क्लिनिकल रिसर्चचा कोर्स करून न्यूझीलंडमध्ये नोकरी करणारी आदिती.
हाय फ्रेण्ड्स, मी मूळची ठाणेकर. माझं शालेय शिक्षण ए. के. जोशी इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये झालं. पहिल्यापासूनच विज्ञान आणि गणिताची गोडी होती. मग चुलत आणि मामेबहिणींच्या मार्गदर्शनामुळं विज्ञान शाखेतच जायचं निश्चित केलं. पण चांगले गुण मिळूनही मुंबईतल्या कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा थोडी हताश झाले होते. अखेरीस ‘रामनारायण रुईया कॉलेज’मध्ये शेवटच्या यादीत नाव आलं आणि तिथं प्रवेश मिळाला. अभ्यास करताना मनात कुठंतरी आजोबांच्या जाण्याचा सल होता. त्यांना आलेला अर्धागवायूचा झटका आणि ते का बरे होऊ शकले नाहीत, याचं कारण शोधायला हवं.. असा विचार करताना डॉक्टर व्हावंसं वाटलं. पण बारावीत तेवढे गुण न मिळाल्यानं फार्मसीला जायचं ठरवलं. पुण्याच्या भारती विद्यापीठात प्रवेश मिळत होता, पण काळजीपोटी बाबा मला तिथं पाठवायला तयार नव्हते. मग शहापूरला आत्याकडं चार र्वष राहून आसनगावच्या ‘शिवाजीराव एस. जोंधळे कॉलेज ऑफ फार्मसी’मधून बी.फार्म. झाले.
पुढचं शिक्षण घ्यायला घरून पूर्णपणं पाठिंबा मिळाला. आम्हाला चौथ्या वर्षांला क्लिनिकल रिसर्च हा विषय होता. क्लिनिकल रिसर्चमध्ये बाजारात येणाऱ्या औषधांची चाचणी आधी प्राण्यांवर केली जाते. ही चाचणी माणसांवर घेताना सगळ्या गोष्टींची स्पष्ट कल्पना देऊन त्या संबंधित व्यक्तीची पूर्वपरवानगी घेऊन फॉर्म भरून घ्यावा लागतो. या विषयात मला अधिक रस वाटू लागला. म्हणून याच काळात ठाण्यात मी क्लिनिकल रिसर्चचा अॅडव्हान्स डिप्लोमा केला. शिवाय परदेशी अभ्यासक्रमांच्या दृष्टीनं आवश्यक परीक्षांची तयारीही सुरू केली. मी कएछळर ची परीक्षा दिली. सगळ्या परीक्षा क्लिअर झाल्यानंतर परदेशातले अभ्यासक्रम शोधू लागले. कॅनडात फार्मसीला खूप संधी असल्यानं तो माझा पहिला पर्याय होता. दरम्यान, फार्मसीचा निकाल लागला असला तरी गुणपत्रिका हातात मिळाली नव्हती. म्हणून कॉलेजकडून तात्पुरती गुणपत्रिका घेऊन अर्ज केला. मी सगळी तयारी केली होती. पण मला व्हिसा नाकारला गेला. मला धक्काच बसला. त्यानंतर पुन्हा अर्ज केला, पण तेव्हाही व्हिसा नाकारण्यात आला. मधल्या काळात दोन इंटरव्ह्य़ू दिले होते. माझी निवडही झाली होती. पण कॅनडाचा व्हिसा मिळून तिथं शिकायला जाता येईल, असं वाटल्यानं मी नोकरीची संधी नाकारली. या प्रकारात माझे सहा महिने फुकट गेले. फार निराश वाटत होतं. आत्या आणि बाबांनी माझी समजूत काढली. मग पुन्हा नोकरी शोधता शोधता ‘टीसीएस’मध्ये नोकरी मिळाली.
माझा मावसभाऊ न्यूझीलंडमध्ये आहे. त्यानं तिथल्या अभ्यासक्रमांचे पर्याय शोधायचा सल्ला दिला. मग ऑकलंडच्या ‘युनिटेक इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च’चा अभ्यासक्रम मी निवडला. तिथं ई मेलनं संपर्क साधला. अॅडमिशन लेटर मिळाल्यावर व्हिसासाठी अर्ज केला. व्हिसा मिळाल्यावर मग फी भरली. कॅनडाच्या वेळी आधी फी मग व्हिसासाठी अर्ज करायचा होता. तो नाकारल्यावर पैसे मिळाले, तरी त्यातलं काही शुल्क कापलं गेलं होतं आणि मानसिक त्रास झाला होता तो वेगळाच. जानेवारीत मला न्यूझीलंडचा व्हिसा मिळाला. मग ‘टीसीएस’मध्ये राजीनामा दिला. माझा अभ्यासक्रम सुरू होणार होता मार्चमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांचा भक्कम पाठिंबा होता. शिक्षणासाठी परदेशी गेलेली आमच्या कुटुंबातली मी पहिलीच मुलगी. फेब्रुवारीत न्यूझीलंडच्या विमानात बसताना वाटलं की, मी योग्य निर्णय घेतलाय की नाही.. थोडी एक्साइटमेंट, किंचितशी भीती नि धाकधूक असं कॉकटेल होतं.. दादा आणि त्याच्या कुटुंबासोबत दोन दिवस राहिले. त्यानंतर एका किवी कुटुंबासोबत राहात होते. माझ्या राहण्याच्या सोयीत रात्रीच्या जेवणाचाही समावेश होता. पहिल्याच दिवशी त्यांनी बीफ केलं होतं. मी जेवूच शकले नाही.. लेक्चर्स सुरू होण्याआधी इन्स्टिटय़ूट बघून ठेवावं, म्हणून दोन दिवस आधी मी घरून निघाले. रस्ता जंगलातून जात होता. आज्जींनी मला नकाशा काढून दिला होता. एका टप्प्यावर दोन रस्ते फुटल्यानं मी गोंधळले. सगळा परिसर सुनसान होता. डोळे सारखे भरून येत होते. काहीच सुचत नव्हतं. त्यात पाऊस- चिखलाची भर पडली. तेवढय़ात दोघीजणी कारनं आल्या नि माझी चौकशी केली. दिलासा देत मला कारमध्ये बसवलं. वाटेतल्या लोकांना रस्ता विचारत अखेरीस इन्स्टिटय़ूटमध्ये पोहोचलो. तिथून घराशी जाणारी बस सांगितली. पण मी पैसे वगैरे न घेताच घरून निघाले होते. मग बसवाल्याला सगळी कथा सांगून शेवटी घरी पोहोचले.
इन्स्टिटय़ूटमधले लोक संवादशील आणि सौजन्यपूर्ण वागणारे होते. अभ्यासक्रम सुरू झाल्यावर अधेमधे अडथळा आला तो इमिग्रेशनच्या कॉल्सचा. तो अनुभव माझ्यासाठी फारच वाईट आणि धक्कादायक होता. मी कॅण्टीनमध्ये असताना कॉल आला की, ‘मी इमिग्रेशनमधून बोलतोय.’ त्यांनी माझी माहिती पडताळली. त्यांनी सांगितलं की, ‘इथं लॅण्ड होताना कोणते अन्नपदार्थ सोबत आहेत, ते डिक्लेअर करायचं असतं. तसं केलं नाही, तर दंड भरावा लागतो किंवा त्या संस्थेतून काढून टाकलं जाऊ शकतं.’ मी म्हटलं ‘मी ते तपशील दिलेत.’ त्यावर ते म्हणाले की ‘तू जन्मतारीख चुकीची लिहिली आहे. त्यामुळं तुझ्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात केस नोंदवण्यात आली आहे.’ मी नंबर चेक केला, तर तो इमिग्रेशनचाच होता. मी पार भांवाबून गेले. त्यांनी दोन पर्याय सांगितले. ‘एक सेशन कोर्टात हजर होऊन तुझं स्पष्टीकरण दे, नाहीतर तुझ्याविरुद्ध डिपोर्ट नोंदवू. किंवा दुसरं म्हणजे अमुक डॉलर्सचा दंड लगोलग भरावा लागेल, मग आम्ही तुझ्यावतीनं तिथं बोलू.. त्यांनी सांगितलेली रक्कम होती – पन्नास हजार न्यूझीलंड डॉलर्स. मी थोडय़ा वेळात तुम्हाला कॉल करते’ असं सांगून फोन ठेवला. लगेच भावाला फोन लावला, पण तो मीटिंगमध्ये असल्यानं फोन उचलू शकला नाही. मग सगळी कागदपत्रं घेऊन इमिग्रेशन ऑफिसमध्ये गेले. सगळी कथा सांगितल्यावर उलगडा झाला की, हा फेक कॉल होता. मी हतबुद्ध झाले. त्यानंतर पुन्हा दोनदा असेच कॉल्स आले. त्यांना ठोस उत्तर दिल्यावर कॉल कट केला जायचा.
आमचा अभ्यासक्रम नवीनच होता. वर्गात सगळ्यात लहान मीच होते. बाकीचे विद्यार्थी माझ्याहून अनुभवी होते. मला जेमतेम तीन माहिन्यांच्या इंटर्नशिपचा अनुभव होता. त्यामुळं कधी कधी माझा आत्मविश्वास थोडासा कमी व्हायचा. पण मी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. मात्र संस्थेला आमचा अभ्यासक्रम नीट आखता आला नाही. बरेच प्रश्न उद्भवले या काळात. आता ‘आर या पार’ अशा टोकापर्यंत आम्ही विद्यार्थी पोहोचलो होतो. सगळ्या गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या गेल्या. त्यामुळं दुसरं सत्र चांगलं असेल असं आश्वासन आम्हाला देण्यात आलं. त्यानंतर प्रोजेक्टचा भाग म्हणून प्रा. जिलियन व्हॅली यांच्या भारतीय आणि किवी लोकांमधल्या हृदयविकाराशी संबंधित क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होता आलं. एक चांगला अनुभव गाठीशी बांधता आला.
इथं जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं पैसे असायला पाहिजेत. कोणत्याही स्वरूपाच्या नोकरीत कामाच्या अनुभवाला प्राधान्य दिलं जातं. कस्टमर सव्र्हिसला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. एका फ्रेण्डच्या ओळखीनं मी फिश अॅण्ड चिप्स आणि सबवेमध्ये काम केलं. त्यासाठी मला प्रशिक्षण दिलं गेलं. बर्गर करण्यापासून सव्र्ह करण्यापर्यंत अनेक कामं शिकले. त्यानंतर काही महिने माझ्याकडं जॉबच नव्हता. ऑकलंडमध्ये मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी फिरले होते. खूप नैराश्य आलं होतं. पण त्यातून बाहेर पडून मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, ही गोष्ट मनाशी सतत घोकत राहिले. लिंक्डइनवरून फार्मासिटिकल्स कंपन्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. ‘बायोमेड एलटीडी’मध्ये रेझ्युमे पाठवला. सुरुवातीला तिथं पार्टटाइम जॉब नव्हता. नंतर संध्याकाळच्या शिफ्टसाठी इंटरव्ह्य़ूचा कॉल आला. तेव्हा आकलनक्षमता, नेतृत्वगुण, संवादकला, कामाचा अनुभव, व्यावहारिक गोष्टींचं ज्ञान आदी गोष्टी तपासल्या गेल्या. अभ्यासक्रम चालू असताना नियमांनुसार विद्यार्थिनी म्हणून अर्धवेळ काम केलं. कोर्स संपल्यावर आता मी पूर्णवेळ प्रॉडक्शन टेक्निशियन (मॅन्युफॅक्चरिंग) म्हणून काम करते आहे. आम्ही हॉस्पिटल्समध्ये वापरले जाणारे आयव्हीज आणि तोंडावाटे घ्यायच्या औषधांचं उत्पादन करतो. माझा जॉब मी एन्जॉय करते आहे. वर्ककल्चर खूप चांगलं असून लोक मोकळ्या स्वभावाची आहेत. रोखठोक बोलतात. मूळचे किवी लोक चांगले आहेत. ते चटकन मदतीचा हात देतात. इथले समुद्रकिनारे अतिशय सुंदर आहेत. एकदम नितळ आणि स्वच्छ. मी ऑकलंड झू, डेव्हनपोर्ट, बे बीच, पिहा बीच, टाकापुना बीच आदी अनेक ठिकाणी फिरले आहे. इथे आल्यापासून स्वत:च्या जबाबदारीची जाणीव झालेय. आत्मविश्वास खूप वाढलाय. स्वतंत्र झाले असून, स्वयंनिर्णय घेते आहे. मध्यंतरी ठाण्यात आईबाबांच्या लग्नाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या सेलिब्रेशनला येऊन गेले. त्यांना झक्कास सरप्राइज दिलं.
सध्या शेअरिंग अपार्टमेंटमध्ये एका कुटुंबासोबत राहतेय. सध्या या कामाचा अनुभव घेऊन नंतर क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करायची इच्छा आहे. त्यासाठी खूप अनुभव गाठीशी असणं आवश्यक आहे. पुढं मला इथंच स्थायिक व्हायचं आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. इथं राहिले तर ड्रायव्हिंग येणं गरजेचं आहे, त्यामुळं तेही मला शिकून घ्यायचं आहे. मला नृत्याची खूप आवड आहे. शाळेत चार र्वष भरतनाटय़म् शिकले आहे. मात्र अभ्यासामुळं आणखी शिकणं राहूनच गेलं. इथे वीकएण्डला घरकामं वाट बघत असतातच. रात्री अनेकदा फ्रेण्ड्ससोबत क्लबमध्ये किंवा भटकायला जाते. अपरात्री बाहेर राहिलं तरी असुरक्षित वाटत नाही. सुरक्षाव्यवस्था सजग आहे. माझ्या नि बाबांच्या वाढदिवसाची तारीख एकच आहे. गेल्या वर्षी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय माझा वाढदिवस साजरा केला. त्या दिवशी त्यांना खूपच मिस केलं. फार एकटंएकटं वाटत होतं.. ‘कोणत्याही गोष्टीत सकारात्मकता शोध. भोवतालच्या व्यक्तींचे चांगले गुण घे,’ आत्याचा हा सल्ला मी कायम फॉलो केला. सो, बी पॉझिव्हिट.
शब्दांकन : राधिका कुंटे
(या सदराला देश-विदेशातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक विदेशिनींनी त्यांचे अनुभव कळवले. त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.)
(समाप्त)