मितेश रतिश जोशी
पारंपरिक चौकटीबाहेरचं पर्यटन करायचं असेल तर तुम्हाला पर्यटनस्थळ गाठून साहसी खेळ खेळायला हवेत. साहसी खेळ हे आनंददायी अनुभव देणाऱ्या पर्यटन प्रकारात गणले जात आहेत.
सोसाट्याचा वारा, खळाळते प्रवाह, खोल दऱ्या आणि केव्हाही बदलत जाणारं वातावरण या पार्श्वभूमीवर केलेला कोणताही क्रीडाप्रकार हा साहस या प्रकारात मोडतो. हे सारेच साहसी खेळ मुक्त निसर्गात- जल, स्थल आणि अवकाश अशा तीन क्षेत्रांत खेळले जातात. तेथे निसर्ग हाच तुमचा प्रतिस्पर्धी, सहकारी, सखा असतो. त्यामुळे केवळ आवड असून चालत नाही, तर शारीरिक ताकद आणि कौशल्य हादेखील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला या खेळाची आवड असो अथवा नसो, नेत्रसुख अनुभवण्यासाठी तुम्ही काही काळ या खेळाचे साक्षीदार होऊ शकता. आज भारतात जे साहसी खेळ आहेत, त्यात प्रामुख्याने गिर्यारोहण, पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग, सेलिंग, रॅपलिंग यांचा समावेश होतो. नुसतेच पर्यटनाला जाणारे प्रवासी निसर्गसौंदर्याबरोबर त्या स्थळाच्या प्रेमात पडतात आणि त्यापैकी काही जण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत साहसी खेळ खेळून आपला आनंद शतगुणित करतात.
गिर्यारोहण
उंचच उंच कडे, मनाला प्रसन्न करणारी वृक्षराजी, ऐतिहासिक गडकिल्ले सगळ्यांनाच भुरळ घालतात. गिर्यारोहण मनाला अपार आनंद देणारे आहे. गिर्यारोहण हा फार पूर्वापार चालत आलेला आणि उत्साही, धाडसी गिरिप्रेमींनी जोपासलेला साहसी खेळातला प्रकार आहे. अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या डोंगरांवरच्या चढायांच्या मागील उद्देश बरेच वेगळे होते. आता मात्र शास्त्रीय निरीक्षण, अस्तित्वात असलेल्या हिमनद्या, हिमपर्वत अनुभवणे अशा नानाविध कारणांसाठी गिर्यारोहण केले जाते. या प्रकारात शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लागतो. सरळसोट डोंगरकडे चढण्यासाठी गरज भासते ती प्रचंड धैर्याची, संयमाची, सतर्कतेची आणि उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची. डोंगरचढाई कितीही रोमहर्षक वाटली तरी शिखरांच्या वाढत्या उंचीनुसार कमी होत जाणारा प्राणवायू, थंड हवामान आरोहकांसाठी मोठी अडचण ठरू शकते. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे गरजेचे ठरते. त्यातून बर्फाळ प्रदेशातील चढाईसाठी इतर बरीच व्यवधाने पाळावी लागतात. गिर्यारोहण ही समूहाने करण्याची गोष्ट आहे. अर्थात, यातूनच नेतृत्वगुण, अचूक व सत्वर निर्णयक्षमता या गुणांचा आपोआप विकास होतो. सुरक्षित व जलद चढाईसाठी हल्ली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा प्रगत उपकरणांशी जुळवून घेणेही महत्त्वाचे ठरते. भारताच्या पर्वतीय भागात परदेशी गिर्यारोहकांची संख्याही वाढते आहे. महाराष्ट्रात या साहसी खेळाला पर्यटनाच्या व मेंटल ब्रेकच्या निमित्ताने का होईना सुगीचे दिवस आले आहेत.
हेही वाचा >>> विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे
स्कुबा डायव्हिंग
समुद्राच्या आत जाणं हा एक मस्त अनुभव आहे. ही सफर स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते.
स्कुबा डायव्हिंग म्हणजे पाण्याखाली डायव्हिंग करण्याचा एक खास प्रकार आहे. स्कुबा डायव्हर्स पाण्यामध्ये जाताना आपल्यासोबत ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन जातात. नाकात पाणी जाऊ नये आणि उघड्या डोळ्यांनी समुद्राखालचं सौंदर्य पाहता यावं यासाठी चेहऱ्यावर मास्क लावला जातो. इन्स्ट्रक्टरच्या निर्देशांचे पालन करत पाण्याखालच्या विश्वात मार्गक्रमण केलं जातं. रंगीबेरंगी मासे, एनसीसीच्या परेडप्रमाणे समान रंगाचे घोळक्याने फिरणारे मासे, रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणाऱ्या माशांबरोबर पोहण्याची संपूर्ण सफर डोळ्यांत भरून ठेवण्यासाठी नक्कीच हा पर्याय निवडायला हवा. भारतात अंदमान हे स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्राच्या तळाशी नेत्रदीपक कोरल रीफ्स, जहाजांचे तुकडे आणि विविध प्रकारचे समुद्री जीव पाहण्याचा एक वेगळा आनंद घेता येतो. जर तुम्हाला समुद्री कासव, स्टिंग रे आणि अगदी व्हेल, शार्क पाहायचे असतील तर कर्नाटकातील नेत्राणी बेटावर स्कुबा डायव्हिंग करता येईल. पाँडिचेरीमध्ये स्कुबा डायव्हिंग वर्षभर सुरू असते. तसेच हे भारतातील सर्वोत्तम अंडरवॉटर डायव्हिंग डेस्टिनेशनमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, अंदमान-निकोबार बेटे, महाराष्ट्रात मालवण, लक्षद्वीप, कर्नाटकमधील तरानी बेट किंवा पिझन आयलंड आणि गोव्याच्या ग्रँड आयलंडमध्ये स्कुबा डायव्हिंग केलं जातं. विशेष म्हणजे काही देशांमध्ये स्कुबा डायव्हिंगला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे.
पॅरासेलिंग
पक्ष्याप्रमाणे गगनात स्वच्छंदी फेरफटका मारायचा असेल तर तुम्हाला पॅरासेलिंग अनुभवायला हवं. पॅरासेलिंगमध्ये पॅराशूटच्या साहाय्याने व्यक्तीला बांधले जाते आणि इलेक्ट्रिक बोटीतून वेगाने ओढले जाते. हा मजेदार साहसी खेळ जगभर खूप पसंत केला जातो आहे. समुद्रकिनारी हा खेळ आवर्जून अनुभवण्यासारखा आहे. पॅरासेलिंग करण्यास गेलेल्या व्यक्तीला बोटीत बसवून आत समुद्रात नेलं जातं. विशेष म्हणजे बोटीवरून आकाशात वर जाण्यापासून ते अगदी बोटीवर परत येईपर्यंत प्रशिक्षक नजरेआड होऊ देत नाहीत. पॅरासेलिंगसाठी चांगली हवा मिळावी म्हणून समुद्रात भर वेगात बोट फिरवली जाते. जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेला अथांग सागर आणि आकाशातल्या स्वच्छंदी सफारीने मन प्रसन्न होतं. घार जशी सुरुवातीला थोडंसं हिंदोळे घेऊन नंतर पंख पसरवून मोकळ्या आकाशात स्थिर होते. तसंच काहीसं पॅरासेलिंगचा पॅराशूट आकाशात स्थिर झाल्यावर होतं. भारतात गोवा, केरळ आणि लक्षद्वीपसारख्या किनारी भागांमध्ये पॅरासेलिंगचा उत्तम आनंद घेता येऊ शकतो.
रिव्हर राफ्टिंग
डोंगरउतारावरून खळाळत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून ‘बोटिंग’ करणं हा एक विलक्षण साहसी अनुभव असतो. उत्तराखंडात गेलेला प्रत्येक पर्यटक हा गंगा नदीवरील प्रवाहावर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी आसुसलेला असतो. बहुतांश वेळा तो खळाळता आनंद घेण्यासाठीच हृषीकेशला भेट देतो. रिव्हर राफ्टिंगची राजधानी म्हणून ही हृषीकेशला ओळखले जाते. देवप्रयागपासून हृषीकेशपर्यंतचा प्रवाह रिव्हर राफ्टिंगसाठी अगदी योग्य आहे. लडाखच्या झंस्कार आणि सिंधू नदीवरदेखील राफ्टिंग करण्याची मजा असते. रिव्हर राफ्टिंगसाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. वॉटर स्पोर्ट्सपैकी एक असलेले हे रिव्हर राफ्टिंग करायला अतिशय आव्हानात्मक असते. ज्या लोकांना साहस करायला आवडते, त्यांनी आयुष्यात एकदा तरी रिव्हर राफ्टिंगचा आनंद जरूर घ्यावा.
नव्या पिढीतील नव्या विचारांच्या अनुषंगाने विचार केला असता हौसमौज म्हणून अशा प्रकारच्या क्रीडाप्रकारांत सहभागी होणाऱ्यांची संख्यादेखील खूप मोठी आहे. त्यांना दोन घटका या साहसाचा आनंद घ्यायचा असतो. आनंदासाठी केल्या जाणाऱ्या या क्रीडाप्रकाराने सध्या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी जमिनीवरील साहस खेळांपुरत्या मर्यादित असलेल्या या प्रकाराने पर्यटनातही मोलाची जागा पटकावली आहे.
viva@expressindia.com