वैष्णवी वैद्य, गायत्री हसबनीस
सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा, कठोर प्रशिक्षण सगळय़ाला तरुण मुलं जिद्दीने सामोरी जाताना दिसतात. दोन आठवडय़ांपूर्वी केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसह अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेंर्तगत सशस्त्र दलांमध्ये जास्तीत जास्त तरुणांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खरं तर पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही तिन्ही दलांमध्ये खांद्याला खांदा लावून देशसेवा करत आहेत. तरीही या योजनांना तरुणींचा प्रतिसाद फारसा दिसत नाही. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? त्यांना सैन्यात भरती करून घेण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले जातात का? अशा वेगवेगळय़ा मुद्दय़ांचा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न..
काही दिवसांपूर्वीच ‘अग्निपथ’द्वारे चार वर्षे सैन्यदलात सेवा देणारी नवी योजना तरुणांसाठी केंद्र सरकारने जाहीर केली. त्यावर कडाडून टीकाही झाली. १७ ते २१ वयोगटातील तरुण सैन्यात भरती होऊ शकतात आणि चार वर्षे सेवा देऊन निवृत्त होऊ शकतात. निवृत्त होताना हे अग्निवीर पंचविशीचे असतील, त्यांनी पुढे काय करायचे? याने बेरोजगाई वाढेल, असा कंठशोषही झाला. मात्र या योजनांमध्ये अग्निवीरांगनांची निवड किती प्रमाणात आणि कशा पद्धतीची असेल, याबाबतीत फारसे बोलले गेले नाही. सध्या तरुणींना संरक्षण दलांमध्ये संधी आहेत, मात्र अजूनही सैन्यात भरती होण्याचे त्यांचे प्रमाण अल्प आहे. त्यांना यासंदर्भात मिळणारे मार्गदर्शन, माहिती यात कुठे खंड पडतो का? त्यांना घरातून काही समस्यांना तोंड द्यावे लागते का? हे जाणून घेण्यासाठी ‘व्हिवा’ने तरुणींशी संवाद साधला.
वास्तविक तरुणींमध्ये सैन्यात भरती होण्याची इच्छा आजकाल प्रबळ होताना दिसते आहे. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्यावर हा प्रभाव पडताना दिसतो. ‘नॅशनल कॅडेट कॉप’ म्हणजेच ‘एनसीसी’ आणि ‘एनएसएस’ नॅशनल सव्र्हिस स्कीम या दोन विभागांत त्यांचा सहभाग वाढला आहे. धाडसी देशसेवेची ओढ ही इथेच लागते, त्याची बीजे इथे रुजतात. तिन्ही संरक्षण दलांमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात, मात्र महिला लढाई विभागात क्वचितच पाहायला मिळतात. ‘अग्निपथ’ योजनासुद्धा याला अपवाद नाही. या योजनेच्या माध्यमातून तरी आपल्याला सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची संधी मिळेल का? असा प्रश्न सध्या तरुणींसमोर आहे. मात्र मुळात संरक्षण दलांमध्ये स्त्रियांनी जायलाच हवे, यासाठी घरातूनच कित्येकदा पाठिंबा मिळत नाही, किंबहुना त्यासाठी पालकांकडून पाठपुरावा केला जात नाही, असे अनेकींशी बोलल्यावर लक्षात येते. पुण्याची श्रावणी देसाई सांगते, ‘‘शाळेतही आम्हाला स्काऊट गाईड हा उपक्रम असायचा. तेव्हा बऱ्याशा गोष्टी समजल्या होत्या. कुठल्या वेळी कुठलं शस्त्र वापरलं जातं वगैरे.. पण ते फक्त माहितीपर असायचं. तेव्हापासूनच यातलं प्रात्यक्षिक शिकावं असं वाटत होतं, म्हणून पुढे कॉलेजमध्ये ‘एनएसीएसी’मध्ये सहभागी झाले. ‘अग्निपथ’ ही योजना ऐकून खूप आनंद झाला, पण खरोखरच या योजनेतून तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढायची संधी मिळेल का, अशी शंका येते. मुलींची कठोर प्रशिक्षण करायची तयारी असते, पण त्यांना पुरेशी संधी मिळायला हवी. तसेच शाळा- महाविद्यालयांतून त्यांना या क्षेत्रातील संधींबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी.’’
सैन्यात भरती होण्यासाठी केंद्र सरकारने खरं तर अशा काही योजना आणल्या पाहिजेत, ज्यात सैन्यभरतीचे फायदे सांगणारे अनेक पैलू असतील आणि खास करून ही योजना कायमस्वरूपी सैन्यात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुण-तरुणींच्या पालकांना समजावून सांगण्यासाठीही काही प्रयत्न करायला हवेत. घरातूनच सैन्यात जाण्यासाठी अधिक मार्गदर्शन मिळायला हवं. मुलींकरिता त्यांच्या करिअरच्या दृष्टीने दृढ विचार व्हायला हवा. सैन्यात जाण्याची तिची इच्छा असेल तर त्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी, असं आग्रही मत पुण्याच्या प्रज्ञा देशपांडेने मांडलं.
काही बाबतीत समाजाकडूनही मुलींनी संरक्षण दलाचा पर्याय करिअर म्हणून निवडू नये असं अप्रत्यक्ष का होईना सांगण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी किमान घरातून त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयापासून मुलींना प्रशिक्षण, माहिती, शारीरिक स्वास्थ्याचे धडे दिले गेले पाहिजेत. मला स्वत:ला ‘अग्निपथ’ योजनेतून सहभागी व्हायचं आहे, परंतु वय २१ वर्षांपुढे गेल्याने मला यात सहभागी होता येणार नाही. ही योजना खूप चांगली असून तरुण-तरुणींनी यात सहभागी व्हायला हवं, असं औंरगाबादच्या काजल देशमुखने सांगितलं.
राज्यातल्या छोटय़ा छोटय़ा भागांत एनएसएस व एनसीसीमार्फत मुलींची ‘अग्निपथ’ योजनेसाठी जोमाने तयारी सुरू आहे. शारीरिक प्रशिक्षण, बंदूक चालवणे, पोहणे, नेमबाजी अशा अनेक प्रकारे मुली स्वत:ला सिद्ध करू पाहत आहेत. या क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी वय, शारीरिक स्वास्थ्य, उंची, वजन अनेक विविध गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळाव्या लागतात. शहरी भागातही मुली हिरिरीने यात सहभागी होताना दिसतात, परंतु त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असं बदलापूरची अवनी मुकादम सांगते. ‘‘आपण कितीही प्रगती केली तरी मुलींच्या मर्यादा हा कळीचा मुद्दा अजूनही सुरूच आहे. त्यातलीच ही मर्यादा म्हणजे मुलींचं सैन्यातलं स्थान. मुली सैन्यात कशा जातील किंवा मुली कशा लढू शकतील ही पारंपरिक गैरसमजूत अजूनही जोर धरून आहे. सैन्यात भरती झाली, तरीही फ्रंटलाइनला न पाठवता ऑफिसमध्ये भरती केली जाते. तिथेही चांगला पगार असतो, अशी सफाईसुद्धा दिली जाते. मुळात सैन्यात भरती झालेली व्यक्ती पगार, पैसे यासाठी गेलेलीच नसते. आपल्या समाजातच या अजब रूढी, परंपरा असताना आपण प्रशासन आणि सरकारवर कसे बोट ठेवू शकू? माझ्या मते सद्य:स्थितीत तिन्ही दलांतील महिला आरक्षण काढून त्यांना पूर्णपणे प्रवेश खुला करावा,’’, असा आग्रह अवनी धरते.
अनेक वेळेला योग्य वयात आणि योग्य व्यक्तींकडून यासाठी मार्गदर्शन मिळायला हवे, प्रोत्साहन मिळायला हवे, मात्र तसे होत नाही. त्याउलट मुलींच्या बाबतीत समाजात असलेल्या अनेक समजुती-प्रथा, पारंपरिक विचार त्यांना संरक्षण दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळे आणतात. यासाठी ‘अग्निपथ’सारख्या योजना मोठय़ा प्रमाणावर गावागावांत पोहोचल्या पाहिजेत. त्यात तरुणींना नेमक्या कशा प्रकारे सेवा बजावता येईल? त्यांना प्रशिक्षण कसे घ्यावे लागेल? यासंबंधीची जागरूकता पालकांमध्येही व्हायला हवी. शाळा- महाविद्यालयातूनही यासाठी जनजागृती व्हायला हवी, जेणेकरून स्त्रियांना समाजाकडूनच सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, प्रेरणा मिळेल, अशी आशा तरुणी व्यक्त करताना दिसतात.
viva@expressindia.com