आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.
खवय्येगिरीच्यादेखील आपापल्या पातळ्या आहेत. म्हणजे अगदी थोडासा पदार्थही चवीने खाणारी, खूप सारे पदार्थ एकाच वेळी खाणारी, एकच पदार्थ भरभरून खाणारी, झणझणीत तिखट खाणारी आणि मिट्ट गोड पदार्थ खाणारी मंडळी. यातला हा मिट्ट गोड पदार्थ खाणारा खवय्या डाएटिंगच्या युगात हळूहळू नामशेष होतोय की काय अशी परिस्थिती असली तरी क्वचित, अगदी एखाद वेळी सॉलिड गोड खाणारी मंडळी आजही पृथ्वीतलावर आहेत. म्हणजे ताटभर जिलेबी खाण्याचे किस्से फारसे ऐकू येत नसले तरी वाटीभर रबडी, पाव किलो मैसूर पाक घरी आणून खाणारे खवय्ये नक्कीच आहेत. अशा मंडळींसाठी खास तयार झालेली मिठाई म्हणजे पेठा. आग्रे का पेठा. पेठा शब्द एकटा ऐकवतच नाही किंवा ठसतच नाही. बॉण्ड..जेम्स बॉण्डसारखा पेठा..आग्रे का पेठा.
आग्रा शहराचा या पदार्थाशी असलेला ऋणानुबंध जिवाशिवाइतका घट्ट आहे. याच शहरात या पदार्थाची निर्मिती झाली. आग्य्राचा ताजमहाल जितका जगभरात प्रसिद्ध आहे तितकीच ही मिठाईदेखील या शहराच्या नावानेच ओळखली जाते. या मिठाईच्या जन्माशी दोन कथा आहेत. पहिली कथा असं सांगते की, मुगलसम्राट शहाजहानने आपली बेगम मुमताज महलसाठी ताजमहालचं स्वप्न पाहिलं तेव्हा ते साकारण्यासाठी हजारो मजूर त्या संगमरवरी स्वप्नावर काम करत होते. या मजुरांच्या रोजच्या आहारात डाळ, भात, रोटी सब्जीच असायची. ते खाऊन कंटाळलेल्या मजुरांनी तशी तक्रार केली. शहाजहानने त्याबद्दल एका पीराला आपली समस्या सांगितली. पीराने ध्यान लावले. समाधी अवस्थेत असताना त्याला पेठय़ाची पाककृती गवसली. त्यानंतर जवळपास ५०० खानसाम्यांनी मजुरांसाठी पेठा बनवला. ही पहिली कथा. या कथेबाबतीत अनेक प्रश्न मनात येतात. मोगल काळात मजुरांना रुखंसुखं खावं लागावं अशी परिस्थिती असेल का? मजुरांच्या मागणीवरून शहाजहानला थेट पीराला का गाठावं लागलं? मोगल राज्यकर्त्यांकडे उत्तम बल्लवाचार्य नोकरीला असायचे. त्यांच्यापैकी एखाद्याला शहाजहानने प्रयोग करायला का लावला नाही? या प्रश्नांमुळे ही कथा पटकन स्वीकारायला मन तयार होत नाही.
त्यामानाने दुसरी कथा बरीचशी वास्तवाला धरून आहे. ही कथा असं सांगते की, शहाजहानने मुमताज महलसाठी पाहिलेलं स्वप्न ताजमहालच्या रूपात प्रत्यक्षात साकारल्यानंतर त्याने त्या आनंदाप्रीत्यर्थ आपल्या खानसाम्यास अशी मिठाई बनवण्याचा आदेश दिला जी त्या संगमरवरी ताजमहालसारखीच शुभ्र, पवित्र असेल. त्यातून पेठय़ाची निर्मिती झाली. ही कथा अधिक पटते, कारण पेठय़ाचे ते मूळ स्फटिकासारखे रूप पाहिले की खरेच शुभ्रधवल काही पाहिल्याचे समाधान मिळते. पेठय़ाची मूळ पाककृतीही अशीच आहे. साखर, कोहळा आणि पाणी यांच्या मिश्रणात काहीच कृत्रिम नाही. सर्व घटक नैसर्गिक असल्याने ती ‘पाक’ पवित्र वाटते. देवाच्या नैवेद्यासाठी उत्तरेकडे या पेठय़ाचा अधिकतर वापर होण्यामागे हे कारण दडलेले आहे.
तर या दोन्ही कथा भिन्न असल्या तरी या शहाजहानशी निगडित आहेत हे मात्र खरं ! त्यामुळे पेठय़ाचा जन्म मोगल मुदपाकखान्यातला असं ठामपणे म्हणायला खूपसा वाव आहे.
पेठय़ाचं मूळ रूप शुभ्र स्फटिकासारखं असलं तरी केसर पेठा, अंगुरी पेठा हे त्याचे प्रकार छान रंगीबेरंगी आहेत. यातही या पेठय़ाला अधिक सुगंधी करण्यासाठी साध्या पाण्याऐवजी केवडय़ाचे पाणी वापरले जाते. त्यामुळे ही मिठाई केशराची सजावट, मिट्ट गोडपणा यासह अगदी खासमखास होऊन जाते.
आपल्याकडे लोणावळ्याला गेल्यावर घरी चिक्की येणं जसं अपरिहार्य आहे तसं आग्य्राला गेल्यावर पेठा नही लाए तो भाई क्या लाए! अशी परिस्थिती असते. चिक्की घ्यायला गेल्यावर दुकानदार ऑरेंज, रोज, पाइनअॅपल, चॉकलेट, पिस्ता अमकं ढमकं असे हजार प्रकार सांगून भंजाळून टाकतो. तसंच पेठय़ाच्या बाबतीतही होऊ लागलं आहे. खूप साऱ्या स्वादांमध्ये हा पेठा उपलब्ध होऊ लागला आहे. इथे जसे सगळेच मगनलालची चिक्की विकतात तसं तिथे पंछी पेठाचं प्रस्थ मोठं आहे.
तसं पाहायला गेलं तर भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातली खास व्यंजनं सर्वदूर पोहचली आहेत. आग्रे का पेठा नामांकित आहे पण जितक्या सहज रसगुल्ला वा जिलेबी घरी आणली जाते तेवढं भाग्य आपल्याकडे पेठय़ाला लाभलेलं नाही. उत्तरेकडे गेल्यास वा उत्तर भारतीय खासियत जपणाऱ्या मिठाई दुकानातच पेठा आढळतो. मात्र पेठय़ाची खास आशिक मंडळी त्याचा शोध आवर्जून घेतात.
या पेठय़ाची कथा शोधण्याच्या निमित्ताने मागे आपण पेठा कधी खाल्ला होता, हे आठवून बघण्याचा प्रयत्न केला तर नुसत्या आठवणीनेही तोंड मिट्ट गोड झालं. काही पदार्थाच्या स्वादातच नव्हे तर नावात, दिसण्यात, आठवणीतही गोडवा मुरलेला असतो. आग्य्राच्या पेठय़ाला हे भाग्य लाभलं आहे निश्चित!
-रश्मि वारंग