हळूहळू करत थंडी आता गायब झाली आहे, पण अजून उन्हंदेखील तितकीशी तापली नाही आहेत. कॉलेजला, ऑफिसला आपल्याच वेगात जाताना काही झाडांवरचे लाल, केशरी, पिवळे रंग लक्ष वेधून घेत आहेत. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने निवांत चालताना काही गोड वास दरवाळताना जाणवत आहेत. काही तरी बदललं आहे हे जाणवतंय, पण नेमकं काय ते लक्षात आलं नाही आहे. आणि मग रोजच्या बिझी लाईफमध्ये गर्क असताना अचानक कुऽऽहू अशी कोकीळतान कानी पडते आणि उमगतं अरे कोकीळ गातो आहे म्हणजे वसंत ऋतू आला की … वसंत ऋतू कधी सुरू होतो आहे हे बघायला कॅलेंडरची गरज नसते. कालिदास म्हणतो तसं ‘द्रुमा: सपुष्पा: पवन: सुगन्धि: – सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते’, झाडा झाडांवर बहरलेली फुलं आणि हवेत पसरलेला त्यांचा मधाळ गंध खुणावू लागला की खुशाल समजावं वसंत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भौगोलिकदृष्ट्या साडेतेवीस अंशानी कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने पृथ्वीवर विलक्षण ऋतुचक्र निर्माण झाले आहे. पाश्चात्त्यांनी स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर या चार भागातच हा ऋतुसोहळा संपवून टाकला. भारतीयांनी मात्र निसर्गातील बदल अलवार टिपत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंचे ऋतुचक्र मानले. वर्षेतील पाऊसधारा असो की शरदाचे टिपूर चांदणं, ग्रीष्माचा वैशाखवणवा असो की शिशिराची गुलाबी थंडी… प्रत्येक ऋतूत निसर्गाचं रूप वेगळं असतं, पण निसर्गाचं लावण्य खऱ्या अर्थाने बहरतं ते वसंत ऋतूत. आणि म्हणून वसंत ऋतूंचा राजा, ‘ऋतुपती’, ‘ऋतुराज’ ठरतो. माउली म्हणतात तसं जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी ।।

शिशिराच्या कडाक्याच्या थंडीमुळे सृष्टी गारठलेली असते. पर्णहीन झाडं वठलेल्या म्हातारपणासारखी निस्तेज दिसत असतात. सूर्याचं उत्तरायण सुरू होताच दिवस मोठा होत जातो आणि ऊबदारपणा वाढू लागतो. उदासीनतेचं मळभ दूर होत चैतन्याची चाहूल लागते. पानगळीमुळे बोडक्या दिसणाऱ्या झाडांना नवी पालवी फुटू लागते. कोवळ्या पानांतून कोकिळेचा पंचम स्वर ऐकू येऊ लागतो आणि सृष्टी वसंततारुण्य ल्यायला सज्ज होते.

या सुमारास अर्जुन, ताम्हण, सीताअशोक, कुसुंब, बेल अशा बहुतांश झाडांना नवी पालवी फुटू लागते. ऋतुराजाच्या आगमनाने पुलकित होऊन फळांचा राजा आंब्याला मोहोर फुटतात. पिवळ्या धमक फुलांचं झुंबर हवेत फडकवत अमलताश बहरू लागतो. पळस अंगभर केशरी फुलं माळून त्याच्या स्वागताला सज्ज होतो. पर्णहीन फांद्यांवरच्या या भडकरंगी फुलोऱ्यामुळे दुरून जंगलात जणू वणवा पेटला आहे की काय असा भास होतो. त्याचं ‘वनाग्नि’ किंवा इंग्लिश मधलं ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ हे नाव सार्थ ठरतं. या केशरी पिवळ्या रंगांच्या उधळणीत नीलमोहोर, ताम्हणी, अंजनी यांची निळसर फुलं लक्ष वेधून घेतात. एरवी रूक्ष वाटणारी काटेसावर लालचुटुक फुलांनी सजते. शेतात मोहरीच्या फुलांनी पिवळ्या रंगाची उधळण केलेली असते. सकल बन फुललेली सरसो, डार-डार बहरलेला अम्बवा आणि टेसू यांची भुरळ आमिर खुस्रोलाही पडते.

निसर्गाचं हे तारुण्य फक्त दिसतच नाही तर चक्क ऐकूदेखील येतं. वसंत हा बऱ्याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम. वसंताच्या कामबाणांनी विव्हळ नर पक्ष्यांनी माद्यांना घातलेली साद वनात गुंजत राहते. कोकीळ हा तर वसंताचा उद्घोषक. फुलाफुलांवर फिरणाऱ्या भुंग्यांचा गुंजारव ही देखील एक वसंतधून.

भूगोलाच्या पुस्तकाप्रमाणे फाल्गुन आणि चैत्र हे वसंतांचे महिने मानले गेले आहेत. फाल्गुन पौर्णिमेच्या सुमारास वसंताने यावं अशी अपेक्षा केली आहे, पण अशा कृत्रिम बंधनात अडकेल तो वसंत कसला. ऋतूंचा राजा असल्याने तो आपल्या मर्जीने येतो. माघ महिन्यामध्येच वसंताची लक्षणं दिसू लागतात. नवी पालवी, फुलांचा बहर, पक्ष्यांचा किलबिलाट निर्धारित वेळेआधीच वसंत ऋतू आल्याची चाहूल देतात. संस्कृत कवी हे मुळातच रसिक आणि निसर्गवेडे. वसंताच्या अशा वेळेआधीच येण्याबद्दल ते सुंदर स्पष्टीकरण देतात. ऋतुराजाच्या सन्मानार्थ इतर पाच ऋतूंनी आपले आठ दिवस काढून एकूण ४० दिवसांचा नजराणा त्याला जणू भेट दिला आहे. आणि म्हणून माघ शुद्ध पंचमी हा वसंताच्या आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. ऋतुराजाच्या स्वागताचा हा सण म्हणजे वसंतपंचमी.

वसंत हा प्रेम आणि प्रणय यांची देवता कामदेवाचा परममित्र मानला जातो. वसंत ऋतूत फुलांचा बहर, सुगंधी वातावरण, पक्ष्यांचं कुजन, फुललेली उपवनं-उद्यानं यांच्यात मदनाचा वास असतो असं म्हणतात. वसंतातील अशोक, अरविंद (पांढरं कमळ), आम्रमंजरी(आंब्याचा मोहोर), नवमल्लिका (चमेली), नीलोत्पल (निळं कमळ) ही पाच प्रमुख फुलं म्हणजे जणू मदनाचे पाच पुष्पबाण आहेत. या बाणांनी मदन तरुणाचं मन घायाळ करतो. निसर्गातला वसंत हृदयात फुलताना प्रेमास रंग येणं स्वाभाविक आहे. आणि मग या प्रेमरंगात दुनियेला विसरून जाणंही ओघाने आलंच. वसंताचे सुंदर रंग आणि मधाळ गंध अनुभवत मानवी मनदेखील झुलू लागतं.

कवयित्री इंदिरा संत ही सुखद मनोवस्था नेमकी टिपतात…

आला वसंत, वसंत आला, तनमनाचा झाला हिंदोळा

रंग नहाळी, गंध जिव्हाळी, कोऱ्या फांदीला धुंद कोवळी

आणि म्हणून वसंताच्या आगमनाच्या दिवशी – वसंत पंचमीला कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचं पूजन करण्याचं विधान आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ वगैरेंच्या अनेक शतकं आधीपासून आपल्या ‘प्रिय’सोबत जीवनातील प्रेमाचे गुलाबी रंग अधिक गडद करण्यासाठी ही प्रथा प्रचलनात आहे. हे पूजन झाल्यावर प्रियकर प्रेयसींनी निसर्गात जात वसंताची शोभा अनुभवावी हेही ओघाने आलेच. वसंत प्रणयाची उत्कटता वाढवतो, प्रेमाची वीण अधिक घट्ट करतो.

अशा या ऋतुराजाच्या स्वागतासाठी वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. कालिदास भारवी, वात्स्यायन, माघ, भवभूती इत्यादींच्या साहित्यात सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, अनंगोत्सव, दोलोत्सव अशा वसंत उत्सवांचे उल्लेख वारंवार आढळतात. यानिमित्त त्या काळी वसंतातील फुलांनी तोरणं माळा गुंफून घरं सजवली जात असत. सुवासिक पाणी शिंपून रस्ते सुगंधित केले जात असत. नागरिक अंगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रं लेऊन, आम्रमंजिरी आणि वसंतातील इतर फुलं माळत उपवनात एकत्र जमत असत. तिथे वसंतात फुललेल्या निसर्गाचा आस्वाद घेतला जाई. उपवनात वनविहार, तलावात जलक्रीडा असे मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात. झाडांवर हिंदोळे बांधून प्रियजनासोबत त्यावर झुले घेतले जात असत.

वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून अशोकोत्सव साजरा होत असे. वसंतोत्सवात सुंदर ललनेच्या पदस्पर्शाने अशोक बहरतो आणि तिच्या मुखातल्या मद्याच्या चुळीने बकुळीचे झाड अधिक फुलून येते अशी लोकमान्यता होती. परिणामी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करण्याचा खास सोहळा पार पाडला जात असे. म्हणून शांताबाई शेळकेंच्या मेघदूताचा भावानुवादातील यक्ष परसदारातील अशोक – बकुळेविषयी म्हणतो,

एक मजसवें तव वहिनीच्या वामपदाची करी प्रतीक्षा

चूळ मिळावी तिच्या मुखांतिल मद्याची – दुसऱ्याची वांछा

‘सुखा: प्रदोषा: दिवसाश्च रम्या:’ या कालिदासाच्या उक्तीप्रमाणे वसंताचे दिवस जितके सुखद त्यापेक्षा संध्याकाळ अधिक रमणीय. म्हणून उन्हं उतरणीला आली की रम्य संध्याकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढऱ्या शुभ्र बैठकी मांडल्या जात. इथे बसून नाट्य, गायन, वादन, नृत्य यांचा आस्वाद घेतला जात असे. निसर्गाचं तारुण्य साजरं करायची यापेक्षा सुंदर परंपरा काय असणार!!

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सवाची रसाळ वर्णनं वाचताना आपल्या पूर्वजांच्या रसिकतेची जाणीव होते, पण आपलं निसर्गापासून दुरावणंसुद्धा अधोरेखित होतं. आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात ऋतूंचे हे सोहळे अनुभवण्यासाठी वेळ मिळत नाही. सिमेंटच्या जंगलात बंद दाराआड वसंत कधी येऊन जातो हेही कळत नाही. एसीसाठी सतत बंद असणाऱ्या खिडक्यांमुळे कोकिळेची तान कानी पडत नाही. फ्लॅटच्या सतत बंद दारातून वसंताची झुळूक अंगी लागत नाही, पण बंद असणाऱ्या दारांपेक्षा मनाची मिटलेली कवाडं हा अधिक चिंतेचा विषय. थोडं बाहेर पडलं तर बहरलेला निसर्ग दिसेलही, कोकीळगान ऐकू येईलही. ‘स्क्रीन टाइम’मधून मिळणाऱ्या डोपामाइनची सवय लागलेल्या आपल्या मनाला हे सगळं भावायला तर हवं. पानाफुलात मन रमायला तर हवं

मनाची दारं घट्ट लावून बसलेल्यांना रवींद्रनाथ टागोर साद घालतात,

ओ रे गृह बाशी द्वार खोल, लागलो जे ढोल

स्थले जले बनतले लागलो जे ढोल

रंग हाशी राशि-राशि अशोके पलाशे

रंग नेशा मेघे मेशा प्रभात आकाशे

नबीन पथय लागे रंग हिल्लोल, द्वार खोल… द्वार खोल

या हाकेला ओ देत मनाची दारं सताड उघडली तर सगळ्या सृष्टीत बहरलेला वसंत हृदयातही फुलेल यात शंका नाही.

viva@expressindia.com