स्वरा : हाय! काय म्हणतेस अगं किती बारीक झालीस तू. अभ्यासाच्या टेंशनमुळे बारीक झालीस की काय? परीक्षेची तयारी कशी चालू आहे?
नीता : तयारी कसली गं.. चाललीये अपली. अभ्यास कधी होतो का? वर्गात पेपर वाटेपर्यंत काही ना काही वाचायचं लिहायचं बाकीच असतं.
   हे संवाद सध्या शाळा कॉलेजमधील मुलांच्या तोंडी असतात. कारण हा आहे एक्झाम सीझन. कितीही आधीपासून अभ्यास करायचा ठरवला तरी तो काही परीक्षा जवळ येईपर्यंत संपतच नाही. परीक्षेचं टेंशन आल्याशिवाय अभ्यासाला सिरियसनेसही येत नाही. हा एक कॉमन फॅक्टर आहे समस्त विद्यार्थ्यांमधला. ही गोष्ट जरी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सारखी असली तरी अभ्यास करायच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात. काही जणं रात्री जागून अभ्यास करतात तर काही सकाळी लवकर उठून. काहींचा घरी चांगला अभ्यास होतो तर काहींचा लायब्ररीत. मित्र मैत्रिणी मिळून एकत्रपणे अभ्यास करणारी मुलं आहेत तर काहींना एकटय़ाने अभ्यास केलेला आवडतो.
सकाळी लवकर उठून अभ्यास करणं योग्य मानायची आणि तो पण रोजच्या रोज झालाच पाहीजे असा नियम असायचा. संध्याकाळी मात्र उजळणी व पर्वचा म्हणणे असायचे. ही गोष्ट आहे आपल्या आजी आजोबांच्या काळातली. अर्थात तेव्हाच्या अभ्यास पद्धतीत किंवा शिक्षण पद्धतीतसुद्धा किती फरक होता. भरपूर वेळ कॉलेज किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटीज नसायच्या आणि हो, शिक्षण घेणाऱ्या लोकांची संख्यापण तशी कमीच होती. आपल्या आधीच्या पिढीत कॉम्पिटिशनपण जास्त नव्हती. असाइन्मेन्ट्सची भानगडदेखील नव्हती म्हणून अभ्यासाचा किंवा परीक्षेचा बाऊ केला जात नव्हता, पण तेच आजकाल बघितले की असे वाटते की आयुष्यात शाळा-कॉलेजच्या परीक्षेपेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. म्हणजे एका अर्थाने ते बरोबरदेखील आहे, कारण जितके जास्त मार्क तितके चांगले कॉलेज व तितकीच चांगली नोकरी. आजकाल बहुतेक सर्व मुलांकडे मोबाइल असतोच व परीक्षेच्या काळात मुलांचे मोबाइलपण बंद ठेवण्यात येतात.   मुलांबरोबर घरचेही अभ्यासाचे टेंशन घेतात, आपल्याकडून होईल तितकी मदत घरातील प्रत्येकजण करत असतो. आई ऑफिसला सुट्टी घेते तर खाण्यापिण्याचे लाड आजी पुरवते. नातेवाईकांचे शुभेच्छांचे फोन बाबा घेतात व मुलं अभ्यास करताहेत असे सांगून मोकळे होतात. म्हणजे मुलांची तितकीच दोन मिनिटे वाचतील. यामुळे घरी असे चित्र तयार होते की ही परीक्षा किंवा परीक्षेची तयारी ही एकटय़ा मुलाची किंवा मुलीची नसून ती सगळ्या परिवाराची आहे. अर्थात स्पर्धेच्या युगात हे सगळे करणे तितकेच अपरिहार्य झाले आहे.
 तर मित्रांनो कसाही केव्हाही कुठेही केलात तरी चालेल, पण परीक्षा आली म्हणजे अभ्यास मात्र करायलाच हवा, नाही का? ऑल द बेस्ट!!

Story img Loader