एकदा व्हिएतनामच्या एका चॉकलेट परिषदेस ग्रीन टीचा स्वाद असलेला चॉकलेट बार चाखला आणि आपल्या देशातील वैशिष्टय़पूर्ण चवींचं चॉकलेट बनवण्याचा विचार मनात आला. त्यातून उमटले देशी ‘बारकोड’..
चॉकलेटला ‘बार’चा साचा आहे. म्हणजे ‘बार’ आणि ‘चॉकलेट’ची युती फार जुन्या काळापासून आहे. चॉकलेटची ‘बार’सारखीच घडण हवी, अशी ग्राहकांची खास मागणी म्हणा हवं तर, पण चॉकलेटचं हे सौष्ठव बहुतेकांना खूपच आवडतं. आज भारतीय बाजारपेठेत वा परदेशात उपलब्ध असलेले चॉकलेट बार्स हातोहात खपतात, ही त्याच्या लोकप्रियतेची पावतीच म्हणावी लागेल.
भारतात उपलब्ध असणाऱ्या अमूल, कॅम्पको, नेस्ले, कॅडबरी आणि मार्स या नामवंत कंपन्यांनी विविध आकारांत आणि रूपांत चॉकलेटला ओतलं; पण त्यांच्या बारची किमया अन्यांना साधता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. उत्तरोत्तर बारचे रूपडे अधिक आकर्षक करण्यासाठी नवनवीन प्रयोग करण्यात आले. खूप आधी तो अगदीच साधासरळ. म्हणजे एखाद्या समांतर चित्रपटातल्या हिरोसारखा. नंतर थोडा सजलेला, मग त्याच्या रूपातलं अष्टपैलुत्व चोखंदळांसमोर हळूहळू उलगडलं. आता तर तो कृष्ण-धवल आहे. म्हणजे ‘डार्क आणि व्हाइट चॉकलेट’ अशा दोन रूपांची मोहिनी अनेकांवर आहे. याशिवाय चॉकलेट बारमध्ये भरपूर व्हरायटी दिसते. तांदळाचा वापर करून याला कुरकुरीतपणा आणला तो ‘कॅडबरी कॅ्रकल’ने आणि वेफरच्या मदतीने ‘नेस्ले किटकॅट’ची निर्मिती झाली. भाजलेल्या नट्सपासून ‘कॅडबरी फ्रुट आणि नट’ तयार झाला. असो..
व्हिएतनाम येथे नुकत्याच झालेल्या ‘व्हिएतनाम कोको रिव्होल्यूशन’ परिषदेस मी भारताच्या वतीने उपस्थित होतो. परिषदेच्या ठिकाणी मी आणि माझ्या पत्नीने ‘ग्रीन टी’ फ्लेवर असलेले किटकॅट चॉकलेट पाहिले अन् काही काळ अचंबित झालो. चॉकलेटमध्ये चहा अशा पद्धतीने मिसळला जातो, हे आमच्यासाठी नवीनच होते. पुन्हा मोह आणि मोहच. ग्रीन टी फ्लेवर्ड चॉकलेटचे मोठाले बॉक्स आम्ही भारतात घेऊन आलो. कारण ते भारतात मिळणार नाही, हे उघड होते.
मुळात भारत हा कोको बियांच्या उत्पादनासाठी फारसा प्रसिद्ध नाही. कोको बिया उत्पादित करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव झळकायचे असेल तर भरीव प्रयत्नांची गरज आह. भारतीय चॉकलेट्स जगभरात पोचवायची असतील तर आपल्या देशाचे फ्लेवर्स त्यात आले पाहिजेत. चॉकलेट बारची क्लिशेड इमेज मोडली पाहिजे. हा विचार करत असतानाच माझ्या सहा वर्षांच्या संशोधनाचा वापर करण्याचे मी ठरवले. देशातील २९ राज्यांतील वैशिष्टय़पूर्ण पदार्थ वापरून २९ फ्लेवर्सचे चॉकलेट बार बनवायचा घाट घातला – बारकोड नावाने यातल्या सहा फ्लेवर्स लाँच झाले आहेत. गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, सिक्कीम, पंजाब आणि झारखंड यांचे बार आले आहेत.
या राज्यांमध्ये पिकणाऱ्या फळांचा या फ्लेवर्समध्ये समावेश आहे. निव्वळ चॉकलेट हा भाग अनेकांच्या ओळखीचा आहे; पण त्यात अनेक स्वादांचा विशेष बारची चव ठरवतो. देशी स्वादांचा समावेश ही गोष्ट नवीन आहे. याबाबत चॉकलेटच्या प्रांतातील जाणकारांशी माझीसविस्तर चर्चा झाली. भौगोलिक परिस्थितीनुसार भारतीय जीवनपद्धती बदलत जाते, तशी खाण्याच्या आणि चवीच्या पद्धतीही बदलत जातात. म्हणजे महाराष्ट्राची स्ट्रॉबेरी घ्या वा आसामची जाडसर ‘भूत झोलाकिया’ मिरची घ्या, भारतात निसर्गाने भरभरून दिलेल्या या मेव्याचा स्वाद अन्य कशासही पर्याय ठरू शकत नाही, माझ्या चॉकलेटमधील कारागिरीने मी फक्त या साऱ्यांचा चॉकलेटशी संयोग घडवून आणला. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या नावाने चॉकलेटचा वेगळा स्वाद अर्थात बारकोड बनायला सुरुवात झाली आहे.
बारकोडच्या वेगळेपणाचे उदाहरण द्यायचे तर त्यातल्या दोन चॉकलेट्समधील साहित्य सांगतो. कोकोचा सर्वाधिक अंश असलेला म्हणजे जगातल्या अस्सल चॉकलेटचा वापर यात करण्यात आला आहे. सिक्कीममधील काळे वेलदोडे (ब्लॅक कार्डमम) एकात तर दुसऱ्यात पंजाबमध्ये पिकवलेला ओवा, किन्नू फळ, ७० टक्के इक्व्ॉडोरियन डार्क चॉकलेटमध्ये बेमालूमपणे मिसळले आणि हे अफलातून बारकोड तयार झाले.
बारकोड ही भारतीय चॉकलेटची ओळख बनू शकेल. त्यासाठी पर्यटन महामंडळं आणि पर्यटन क्षेत्रातील इतरांकडून पाठिंबा मिळण्याची आशा आहे. भारतीय भूमीतील अशा विशेष स्वादांची चव चाखायची असेल तर चॉकलेटचे हे कलात्मक बारकोड चाखायला हवेत. चॉकलेटच्या विश्वातील एका अर्थाने ही क्रांतीच म्हणावी लागेल. कारण व्हिएतनाममधील चॉकलेटमधील ‘ग्रीन टी’चा वापर पाहून जसे आम्ही अचंबित झालो, तसेच ‘बारकोड’मधील चॉकलेटच्या रेसिपी अचंबित करणाऱ्या ठरतील.
(अनुवाद : गोविंद डेगवेकर)