लोणचं मुरतं तेव्हा त्याच्या चवीची बहार वाढते. पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीत हीच उपमा वाइनला देतात. वाइन जितकी जुनी तितकी चांगली. तसंच काही जुन्या चॉकलेट निर्मात्यांच्या बाबतीत म्हणता येईल. या जुन्या- जाणत्यांच्या चॉकलेटची चव दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतेय. या मुरलेल्या निर्मात्यांच्या निर्मितीविषयी..

स्मरणरंजन.. मागचं आठवायचं म्हणजे अगदी काही क्षणांपूर्वी हातावेगळं केलेलं काम वा विधान, लिखाण झालंच तर एखादी घटना. हे सारे क्षणाक्षणाने भूतकाळात जमा होत असतात. गेल्याच आठवडय़ातला ‘उडता पंजाब’चा वाद अनुराग कश्यपने उच्च न्यायालयात आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात नेला. हा वाद मी लिहीत असलेला लेख छापून येईस्तोवर संपलेलाही असेल; पण चित्रपटाच्या नावात ‘पंजाब’ आहे म्हणून मला पंजाबचं आठवलं. माझ्या स्मरणरंजनाची येथून सुरुवात होते. दिल्लीत किचन मॅनेजमेंट या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्ही अमृतसरला जाण्याचा बेत आखला. शिखांच्या सुवर्णमंदिरात जाऊन माथा टेकायचा आणि मंदिरातील कलाकुसरीच्या दर्शनाने धन्य व्हायचं, या कल्पनेनंच माझं मन भरून आलं होतं. सुवर्णमंदिर ही कलाकृतीच इतकी श्रेष्ठ की त्याचं प्रतिबिंब आम्हा सर्वाच्या मनावर उमटलं. तो प्रभाव अजूनही कायम आहे. मनाच्या ओंजळीत एक साठवून घ्यावं आणि त्यात सामावण्यासाठी दुसरं काहीतरी विलक्षण त्यात सज्ज असावं, अशी काहीशी परिस्थिती पंजाबमध्ये पाहायला मिळाली. भारतीय जवान आणि पाकिस्तानी लष्करात वाघा सीमेवर होणारा तो सोहळाही असाच!
‘बिटिंग रिट्रिट’ अर्थात सूर्य अस्तास जाताना भारत-पाक सीमेवर ध्वजवंदन. ते करत असताना एकमेकांना दिली जाणारी सलामी. दोन्हीकडील जवान शक्य तितक्या उंच हवेत पाय घेऊन नंतर तो तितक्याच वेगाने जमिनीवर आपटण्याची कृती म्हणा हवं तर! ताकदीचा आविष्कार. असं सारं उदात्त काही मनात साठवत असताना पंजाबमधील सीमेवरील गावांनी आम्हाला बेसिक जाणिवांची आठवण करून दिली. संपूर्ण दिवस प्रवास सुरू असल्याने पोटात भुकने कावळे ओरडायला लागले. घराघरांतल्या तंदूरमध्ये वा चुलींवर रटरटणाऱ्या रश्श्याचा मसालेदार सुगंध आम्हाला बेधुंद करीत होता.
भुकेने अक्षरश: काहूर माजवलं. माझा हात खिशाकडे आपसूकच गेला. हाताला स्वाभाविक ‘कॅडबरी डेअरी मिल्क’चे काही बार लागले. आता हे मला विचारू नका की ते तुझ्या खिशात कसे काय? माझ्या चॉकलेट प्रेमाची मी आधी सांगितली आहेच. तर वेळी अवेळी उपयोगी पडतं हे प्रेम. माझ्या खिशात कायम माझ्या त्या वेळचा आवडीचा डेअरी मिल्कचा बार असायचाच. पोटोबाला तात्पुरता दिलासा द्यायला हे चॉकलेट बार कामी आले. आजही अमृतसर म्हटलं की, ती भूक आठवते आणि मग खिशातली डेअर मिल्क. आताही माझी खिशात चॉकलेट बार ठेवायची आवड कायम आहे. पण निवड जरा बदललेय. आता ‘लिंड्ट क्रिएशन’चे बार खिशात असतात. आता हेही मिल्क चॉकलेटपासूनच बनलेले. पण फ्लेवर वेगवेगळे. ‘मोल्टन लावा केक’, ‘क्रिमी ब्रूली’, ‘हेजलनट टार्ट’ आणि याहून वेगळं म्हणजे डार्क चॉकलेटसाठी जीभ आतूर झाली की, मग ‘मिंट कूली फ्लेवर’ हा माझा आवडता असतो.
ज्यांना चॉकलेटमधलं फारसं काही कळत नाही, त्यांच्यासाठी सांगतो.. लिंड्ट या स्वीस चॉकलेटिअरनं ही चॉकलेट निर्मितीची प्रक्रिया १८४५ साली सुरू केली. या मास्टर चॉकलेटिअरचा हा आविष्कार तेव्हापासून अनेकांच्या जिभेचा ठाव घेतोय. तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी यांची चॉकलेट्स जगभरातल्या चॉकलेट प्रेमींची लाडकी आहेत. मी कधी पहिल्यांदा लिंड्टची चव पाहिली आठवतो.. हां. माझ्या मामानं लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या डय़ूटी फ्री शॉपमधून ती माझ्यासाठी खरेदी केली होती. ९० च्या दशकातली ही गोष्ट.. त्या वेळी ही दैवी चव जिभेवर प्रथम घोळवली ती कायम स्मरणात राहिली. आता आपल्या शहरांमध्येही हायपरमार्केट, मॉल्समधल्या चॉकलेट विभागात लिंड्ट दिसते.
आता आठवणींच्या गोतावळ्यातच बसलोय तर आणखी एक आठवणीत राहणाऱ्या ब्रॅण्डबद्दल बोललंच पाहिजे. बेल्जियन गोदिवा चॉकलेट्स. १९२६ पासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘गोदिवा’ चॉकलेट्सची गोडी काही औरच. गेली सुमारे ९० वर्षे जगातील चॉकलेट चाहते या ब्रँडच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. विविध प्रकारच्या प्रीमियम चॉकलेट्सची निर्मिती हे करतात. लिमिटेड एडिशन सीझनल चॉकलेट्स ही त्यांची वैशिष्टय़ याशिवाय ऑर्डरप्रमाणे बनवलेली टेलर मेड गिफ्ट बास्केट याशिवाय चॉकलेटपासून बनवलेली इतर काही स्वीट्स, चॉकलेट लिकर, डिप्ड फ्रूट्स हे बनवण्यात ‘गोदिवा’चा हात धरणारे कोणी नाही. हा सारा खजिना जगभरातील ६०० रिटेल आउटलेट्समधून आणि चॉकलेट बुटिकमधून उपलब्ध असतो.
गोड आठवणींचा ठेवा निर्माण करणाऱ्या चॉकलेटच्या विश्वात ‘घिरारडेली’ कंपनीचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. १८५२ पासून चॉकलेटची निर्मिती करणारी ही कंपनी. चॉकलेट उत्पादनातली सर्वात जुनी कंपनी म्हणून ‘घिरारडेली’चा दबदबा आहे . वाइन जितकी जुनी होत जाईल, तितका त्याचा स्वाद वाढतो, तसं कंपनीच्या उत्पादनांची चव दिवसेंदिवस रंगत वाढवत आहे.
जुन्या- जाणत्या चॉकलेट्सविषयीची चर्चा कॅडबरीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. डेअरी मिल्कविषयीची कथा मी याआधीच्या लेखात लिहिली आहे. भारतात जन्मलेल्या प्रत्येकाच्या मनात कॅडबरीविषयीच्या आठवणी आहेत. १९४८ साली या ब्रिटिश कंपनीने तिची भारतात स्थापना केली. म्हणजे भारतीय कॅडबरी आणि स्वतंत्र भारत यांचं वय साधारण सारखंच. कॅडबरीचा प्रभावच इतका जबरदस्त की, २०१० मध्ये ‘मॉन्डेलीझ इंटरनॅशनल’ने ताब्यात घेतल्यानंतरही त्यांनी या कंपनीचे नाव बदलण्याचे धाडस केले नाही. कॅडबरी नावानेच ही अद्यापही या कंपनीची उत्पादने तयार होत असतात.
चॉकलेटच्या स्मरणरंजनाचा हा सारा खेळ फक्त मी एकटय़ानेच खेळण्यात काही अर्थ नाही. याला तुमचीही साथ हवीच. चॉकलेटविषयीच्या तुमच्या आठवणी तुम्ही आमच्या ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवर किंवा फेसबुक पेजवर शेअर करा किंवा viva@expressindia.com या पत्त्यावर पाठवा. म्हणजे मलाही त्या आठवणींचा आस्वाद घेता येईल.
(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

Story img Loader