|| आसिफ बागवान
तुम्ही आपल्या घरात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत अतिशय खासगी चर्चा करत आहात आणि अचानक तुम्हाला कळतं की, कोणी तरी दाराला कान लावून तुमचं संभाषण ऐकतोय, तर कसं वाटेल? बेडरूममध्ये पती-पत्नीच्या रोमँटिक गप्पा सुरू आहेत आणि हे सगळं कुठे तरी रेकॉर्ड होतंय, असं कळलं तर? तुम्ही एखाद्याला महत्त्वाचा निरोप दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवण्यासाठी सांगता, पण तो निरोप तिसऱ्याच व्यक्तीकडे पोहोचवला गेला, तर काय होईल?
राग, चीड, संताप हेच वाटेल ना? अगदी असाच काहीसा प्रकार काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतात घडला. या प्रांतातील सर्वात मोठं शहर असलेल्या पोर्टलँडमध्ये एका पती-पत्नीत सुरू असलेलं संभाषण रेकॉर्ड करून तिसऱ्याच व्यक्तीला ईमेल केलं गेलं. ही तिसरी व्यक्ती म्हणजे त्या पतीच्या कंपनीतील एक कर्मचारी होता. त्याने तातडीने आपल्या बॉसला फोन करून कळवलं की, ‘तुमचं संभाषण हॅक होतंय!’ क्षणभर त्या दाम्पत्याला काहीच लक्षात येईना. मग त्यांच्या डोक्यात उजेड पडला. ही किमया केली ‘अलेक्सा’ने. होय, अॅमेझॉनच्या ‘एको’ या ‘स्मार्ट स्पीकर’ची व्हच्र्युअल असिस्टंट ‘अलेक्सा’. पती-पत्नीमध्ये झालेलं संभाषण अलेक्साने भलत्याच व्यक्तीला धाडल्याची बातमी दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांत आली आणि ‘व्हॉइस असिस्टंट’च्या हेरगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेला आता सात-आठ महिने लोटले असले तरी गेल्याच आठवडय़ात ‘ब्लूमबर्ग’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनंतर ‘व्हॉइस असिस्टंट’बाबतच्या शंकांचे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या बातमीनुसार, अॅमेझानचे कर्मचारी आणि कंत्राटदार कंपन्या ‘अलेक्सा’च्या वापरकर्त्यांचे तिच्याशी होणारे सर्व संभाषण ऐकत असतात. केवळ या कामासाठी अॅमेझॉनने हजारो कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचेही ‘ब्लूमबर्ग’च्या तपासात आढळून आले. खुद्द अॅमेझॉननेही याला दुजोरा देत आपले कर्मचारी ‘अलेक्सा’वरील संभाषण ऐकतात व वापरकर्त्यांचे प्रत्येक संभाषण रेकॉर्ड केले जात असल्याचे कबूल केले. हे सगळं करण्यामागे ‘अलेक्सा’ला अधिक भाषासमृद्ध, वापरकर्तास्नेही आणि माहितीपूर्ण बनवण्याचा हेतू असल्याचे स्पष्टीकरणही अॅमेझॉनने दिले आहे. काहीही असो, ‘अलेक्सा ऐकतेय’ हे मात्र खरं आहे.
आता थोडं विस्ताराने. २०१४ मध्ये अॅमेझॉनने ‘अलेक्सा’ या व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने ‘एको’ हे स्मार्ट स्पीकर बाजारात आणले, तेव्हा ‘व्हॉइस असिस्टंट’ हे नजीकच्या भविष्यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान असेल, असे बोलले जात होते. एका अर्थाने ते खरेही आहे. कारण त्याच सुमारास ‘स्मार्ट होम’ ही संकल्पना आकार घेऊ लागली होती. अवघ्या घराचे तंत्रज्ञानामार्फत संचालन करायचे म्हणजे मानव आणि उपकरणे यांच्यात कोणी तरी दुवा हवाच. ‘अलेक्सा’सारखे व्हॉइस असिस्टंट हा दुवा बनतील, असे चित्र उभे राहिले. तसं तर ‘अलेक्सा’च्या आधी २०११ मध्ये अॅपलने ‘सिरी’च्या माध्यमातून ‘व्हॉइस असिस्टंट’च्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवली होती. अगदी गुगलचाही ‘व्हॉइस असिस्टंट’ ‘ओके गुगल’ म्हणताच स्मार्टफोनमधील एखादे अॅप उघडण्यापासून ‘मॅप’द्वारे दिशादर्शन करण्यापर्यंतची कामे करत होता; परंतु ‘अलेक्सा’ने सज्ज असलेला ‘एको’ हा पहिलाच असा स्पीकर होता, जेथे केवळ तोंडी हुकूमच देता येत होते. त्यामुळे अॅमेझॉनच्या ‘एको’ला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ‘अलेक्सा, व्हॉट इज द स्कोअर?’पासून ‘अलेक्सा, गिव्ह मी अ क्लॅप!’पर्यंतच्या आवाजी आज्ञांची तातडीने अंमलबजावणी करणारी ‘अलेक्सा’ साऱ्यांनाच पसंत पडली. अॅमेझॉनने अलेक्सा एको, एको डॉट अशा उत्पादनांसोबत स्मार्टफोनवर अलेक्साचे अॅप विकसित करून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत ‘स्मार्ट स्पीकर’च्या बाजारात केवळ अलेक्साचा दबदबा आहे. अॅमेझॉनच्या आकडेवारीनुसार, २०१९च्या सुरुवातीपर्यंत ‘अलेक्सा’शी संलग्न असलेल्या उत्पादनांची संख्या २८ हजारांच्या घरात गेली आहे, तर अशा दहा कोटी उत्पादनांची विक्री झाल्याचा दावा अॅमेझॉनने केला. भारतातही अलेक्साशी संबंधित उत्पादने (एको, एको डॉट, अॅमेझॉन फायरस्टिक) आता ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागली आहेत.
‘अलेक्सा’ सांगितलेलं सगळं ऐकते, विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देते, याचं अनेकांना अप्रूप वाटतं; परंतु तीच ‘अलेक्सा’ जेव्हा आपलं सगळंच संभाषण ऐकतेय, हे उमगताच तिच्याबद्दलच्या कौतुकाची जागा भीतीने घेणं स्वाभाविक आहे. पोर्टलँडमधील घटनेचंच घ्या ना. त्या रात्री पती-पत्नीत जो संवाद सुरू होता, ते संभाषण अलेक्साने तिला कोणतीही आज्ञा दिली नसतानाच रेकॉर्ड केलं आणि भलत्या व्यक्तीला पाठवूनही दिलं. कोणत्याही व्हॉइस असिस्टंटला आज्ञा देण्यापूर्वी एक परवलीचा शब्द उच्चारावा लागतो. गुगलच्या व्हॉइस असिस्टंटला ‘ओके गुगल’ अशी ‘हाक’ मारल्यावर तो जागा होतो आणि तुमच्या आज्ञा स्वीकारतो. ‘अॅपल’च्या ‘सिरी’मध्ये ‘हे सिरी’ असं म्हणावं लागतं. तसंच ‘अलेक्सा’ला ‘अलेक्सा’ अशी हाक मारल्यावर ती ‘जागी’ होते; पण पोर्टलँडच्या त्या घरात कोणतीही आज्ञा नसताना ‘अलेक्सा’ने पुढचा सर्व कारभार केला. यावर अॅमेझॉनने खुलासा दिला की, कदाचित पती-पत्नीच्या संभाषणात ‘अलेक्सा’, ‘रेकॉर्ड’, ‘सेंड ईमेल’ असे शब्द आले असावेत आणि ते टिपून अलेक्साने आज्ञा पाळल्या असाव्यात. आता क्षणभर ही शक्यता गृहीत धरली तरी ‘अलेक्सा’च्या कानावर आपलं सर्व संभाषण पडतंय, हे स्पष्ट होतंच. हे फारच गंभीर नाही का? म्हणजे, उद्या आपल्याच घरात ‘अलेक्सा’च्या भीतीने बोलायची चोरी!
‘अलेक्सा’चं तंत्रज्ञान अधिक समृद्ध करण्यासाठी वापरकर्त्यांचं संभाषण रेकॉर्ड करण्याची अॅमेझॉनची सबबही तशीच. ‘आमचे कर्मचारी सरसकट सर्व संभाषणं ऐकत नाहीत, तर त्यातील निवडक संभाषणं ऐकतात,’ असं अॅमेझॉनचं म्हणणं असलं तरी वापरकर्त्यांचं प्रत्येक संभाषण ‘रेकॉर्ड’ होत असल्यामुळे त्यांच्या खासगीपणावर बाधा येतेच. तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे नागरिकांचं व्यक्तिगत आयुष्य बऱ्याच प्रमाणात सार्वजनिक होऊ लागलं आहे. तुम्ही दिवसभरात जेथे जेथे जाता, त्याची माहिती तुमचा स्मार्टफोन आपोआप साठवून ठेवतो. ‘गुगलच्या टाइमलाइन’मध्ये जाऊन अमुक तारखेला तुम्ही कुठे होतात, हे तुम्हाला सहज पाहता येतं आणि जसं ते तुम्हाला दिसतं तसंच ते इतरांनाही जाणून घेता येतंच. थोडक्यात काय, तर ‘अलेक्सा’ही त्यातलाच एक प्रकार. इथे तुमच्या बोलण्यातून तुमचं व्यक्तित्व, तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या सवयी अशा गोष्टींचा सहज उलगडा होऊ शकतो.
असं असलं तरी ‘व्हॉइस असिस्टंट’ला लगेच खलनायक ठरवणं चुकीचं ठरेल. सध्या ‘व्हॉइस असिस्टंट’च्या माध्यमातून ‘स्मार्ट होम’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. घरातील दिवे बंद – सुरू करण्यापासून तुमच्या अनुपस्थितीत घराची निगराणी करण्यापर्यंतची असंख्य कामे ‘व्हॉइस असिस्टंट’ने सुसज्ज उपकरणांद्वारे करता येतात. आवाजी सूचनांवर चालू शकणाऱ्या कारची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेच. पाश्चात्त्य देशात गुगलने तसा प्रयोगही करून पाहिला. भविष्यात शस्त्रक्रिया करण्यासाठीही ‘व्हॉइस असिस्टंट’चा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान उपयुक्त नाही, असं म्हणता येणार नाही. अर्थातच, त्याचा वापर कुठे आणि कसा होतो, यावर ही उपयुक्तता ठरेल.
viva@expressindia.com