प्रश्न – मी २१ वर्षांची असून बरीच सडपातळ दिसते. माझं वजन ४२ किलो आणि उंच ५.२ फूट आहे. पुढच्या महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न आहे. त्यामध्ये घालायला मला अनारकली पॅटर्नचा ड्रेस विकत घ्यावासा वाटतोय. तो पॅटर्न मला सूट होईल का? मी कसा ड्रेस निवडावा?
– रश्मी, मुंबई
अनारकलीची फॅशन सध्या खूपच लोकप्रिय झाली आहे. लग्नासारख्या समारंभात घालण्यासाठी अनारकली हा उत्तम पर्याय आहे. पण तू ज्याप्रमाणे वर्णन केलंयस त्यावरून वाटतंय की तू बरीच सडपातळ आहेस. अनारकलीचा फॉल अशा प्रकारे असतो की, व्यक्ती त्यात आहे त्याहून बारीक दिसते. तुला अनारकली घालायचाच असेल तर जाड कापडाचा पर्याय निवड. म्हणजे वेल्वेट, कोटा, ब्रोकेड वगैरे कापडांचा अनारकली घे. जॉर्जेट किंवा शिफॉनसारखा कपडा घेणे टाळ. त्याने तू आणखी बारीक दिसशील. लेअर्ड किंवा टीअर्ड अनारकली.. म्हणजे थोडय़ा झालरीसारखा पॅटर्न असलेला अनारकली तुझ्यावर छान दिसेल. अनारकलीचा घेर जास्त असेल असे बघ. अनारकलीला कळ्या जेवढय़ा जास्त तेवढय़ा चांगल्या. त्यामुळे ड्रेस आणखी फुगीर दिसतो. गळ्याशी भरगच्च काम असलेला आणि वेलवेट बेस असलेला सूट तुला चांगला दिसेल. तुझे दंड आणि हातही खूप सडपातळ असतील तर पूर्ण लांबीच्या चुण्यावाल्या बाह्य़ा अनारकलीला असाव्यात. अशाच स्टाइलचा घागरा किंवा लेहंगासुद्धा तुला सूट होईल.
एक्सपर्ट अॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, आपल्या कांतीला कुठला रंग उठून दिसेल, असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या आऊटफिट्सविषयी, फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.