|| आसिफ बागवान
एप्रिल २००४ मधील ही घटना. अॅण्डी रुबेन, रिच मायनर, नीक सीअर्स आणि क्रीस व्हाइट या चार तरुणांनी डिजिटल कॅमेऱ्यांसाठी तयार केलेल्या एका ऑपरेटिंग सिस्टिमचं कॅलिफोर्नियात सादरीकरण केलं. ही ऑपरेटिंग सिस्टिम कॅमेऱ्यांत इन्स्टॉल केली की कॅमेरा कोणत्याही वायरीविना कॉम्प्युटरशी जोडता येईल आणि इंटरनेटवरील ‘डेटा सेंटर’ नावाच्या सव्र्हरवर हवी तितकी छायाचित्रे साठवून ठेवता येतील, असा दावा ते तरुण करत होते. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रत्यक्ष वापरासाठी आणि त्यातील सुधारणेसाठी निधी उभा करण्यासाठी गुंतवणूकदारांनी पुढे यावं, याकरिता काही मोजक्या गुंतवणूकदारांसमोर हे सादरीकरण करण्यात आलं होतं.
अमेरिकेत नवतंत्रज्ञानाला आर्थिक हातभार लावण्यासाठी अनेक दाते, गुंतवणूकदार नेहमीच तयार असतात, पण दुर्दैवाने या तरुणांच्या ऑपरेटिंग सिस्टिमला तसा कोणीही हातभार लावला नाही. आपण बनवलेली ही ऑपरेटिंग सिस्टिम भविष्यातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अविभाज्य घटक बनेल, याचा अॅण्डी रुबेनला ठाम विश्वास होता. पण आर्थिक पाठबळाअभावी त्याचाही विश्वास डळमळीत होऊ लागला. परिस्थिती इतकी बिकट बनली की भाडे थकवल्याने कंपनीचे कार्यालयही सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली. तेव्हा रुबेनच्या एका मित्राने, स्टीव्ह पर्लमन याने या प्रकल्पासाठी पैसा पुरवला. याचदरम्यान, डिजिटल कॅमेऱ्यांच्या ढासळत्या बाजारपेठेने रुबेनच्या प्रकल्पाभोवती नवीन प्रश्नचिन्ह निर्माण केले. कॅमेऱ्यांनाच मागणी नसेल तर ऑपरेटिंग सिस्टिमचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, रुबेनला या ऑपरेटिंग सिस्टिमच्या वापरासाठी नवीन साधन मिळाले. ते होते मोबाइल. तोपर्यंत ‘स्मार्टफोन’ नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता. जे काही मोबाइल बाजारात होते, ते एकतर सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे किंवा मायक्रोसॉफ्टच्या विंडोजच्या आधारे काम करणारे. पण ‘आम्ही घडवलेल्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वापरकर्त्यांचे ठिकाण आणि सवयी जाणून घेऊन काम करणाऱ्या स्मार्ट मोबाइलची निर्मिती करण्याची क्षमता आहे’, असा दावा रुबेनने केला. तो खराही ठरला. कारण त्यानंतर काही महिन्यांतच ‘गुगल’ या तंत्रक्षेत्रातील अव्वल कंपनीने रुबेनचा तो प्रकल्प आणि कंपनी ताब्यात घेतली. त्या कंपनीचे नाव होते ‘अँड्रॉइड आयएनसी’ आणि मोबाइलला स्मार्टफोन बनवणारी ती ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे ‘अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम’.
आज जगभरातील बहुतांश स्मार्टफोनचा ‘प्राण’ असलेल्या अँड्रॉइडच्या जन्माची ही कथा. अँड्रॉइडचा जन्म २००३चा. पण या प्रकल्पाने बाळसे धरले २००५ मध्ये. रुबेनच्या प्रकल्पाची उपयुक्तता ओळखून गुगलने त्याची कंपनी तब्बल ५ कोटी डॉलर मोजून खरेदी केली आणि रुबेनसह त्याच्या सहकाऱ्यांनाही आपल्या कंपनीत सामावून घेतले. परंतु, त्यानंतरही अँड्रॉइडवर आधारीत स्मार्टफोन बाजारात यायला सप्टेंबर २००८ उजाडले. तोपर्यंत ब्लॅकबेरी, मायक्रोसॉफ्टचे विंडोज आधारित मोबाइल आणि नोकियाचे सिम्बियन सिस्टिमवर चालणारे मोबाइल बाजारात वर्चस्व गाजवून होते. अँड्रॉइडचा बाजारात प्रवेश झाला आणि म्हणता म्हणता या साऱ्यांचे अस्तित्व शेवटच्या घटका मोजू लागले. अल्फा, बिटा अशा प्राथमिक अवस्थेतील आवृत्त्यांनंतर अँड्रॉइडने कपकेक, डोनट, इक्लेअर, फ्रोयो, जिंजरब्रेड, हनीकोम्ब, आइस्क्रीम सँडविच, जेलिबिन, किटकॅट, लॉलिपॉप, मार्शमेलो, नोगट, ओरिओ आणि पाय अशा इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने आवृत्त्या बाजारात आणल्या. या सर्व आवृत्त्यांनी स्मार्टफोनच्या दुनियेत जी क्रांती घडवली, त्या क्रांतीचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. आजघडीला केवळ मोबाइलच नव्हे तर, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट कार, स्मार्ट होम, व्हॉइस असिस्टंट, स्मार्ट वॉच अशा प्रत्येक गॅजेटमध्ये अँड्रॉइड आहे. जगभरात दोन अब्जांहून अधिक मासिक वापरकर्ते यापैकी कशा न कशाने तरी अँड्रॉइडशी जोडले गेले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
अँड्रॉइडच्या यशाचं गमक तिच्या लवचीकतेमध्येच आहे. ही लवचीकता या प्रणालीच्या जन्मापासूनचीच. कॅमेऱ्यांसाठी जन्मलेली ही प्रणाली मोबाइलमध्येही चपखल सामावली आणि विस्तारलीही. याचं प्रमुख कारण आहे, त्यातील ‘ओपन सोर्स’ यंत्रणा. ‘ओपन सोर्स’ ही अशी यंत्रणा असते जिच्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याची, सुधारणा करण्याची, नवीन अंतर्भाव करण्याची किंवा अनावश्यक काढून टाकण्याची सुविधा पुरवलेली असते. आज ‘अँड्रॉइड’ची एकच आवृत्ती वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलवर झळकते तेव्हा, त्यातील प्रत्येक मोबाइलमध्ये तिचे स्वरूप थोडेफार वेगळे असते. अँड्रॉइड फोनच्या अॅपचे भांडार असलेल्या ‘प्ले स्टोअर’वरदेखील कोणीही आपले अॅप थेट अपलोड करून ते वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे प्ले स्टोअरवरील अॅपची संख्या अब्जाच्या घरात आहे. यातील असंख्य अॅप हे अगदी व्यक्तिगत बनवलेलेही आहेत, पण तरीही त्या अॅपचा वापर होत असतो.
अँड्रॉइडची हीच लवचीकता अनेकदा धोकादायक ठरली आहे. अॅपना असलेल्या ‘मुक्त द्वारा’चा गैरफायदा घेऊन वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेलाच धक्का पोहोचवणारे अॅप्स ‘प्ले स्टोअर’वर सर्रास घुसवले जातात. वरकरणी मनोरंजक वाटणारे हे अॅप एकदा फोनमध्ये इन्स्टॉल करण्यात आले की ते वापरकर्त्यांची माहिती चोरतात, मोबाइलच्या कार्यप्रणालीत लुडबुड करतात, स्मार्टफोनमधील डेटा लंपास करतात किंवा मोबाइल निकामीही करतात. यावरून अँड्रॉइड ‘बदनाम’ही आहे. अशा अॅपना ‘पोटेंशियली हार्मफूल अॅप्स’ (पीएचए) असे म्हणतात. ट्रोजान, एसएमएस फ्रॉड, स्पायवेअर, टोलफ्रॉड, बॅकडोअर, होस्टाइल डाउनलोडर, फिशिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे धोके निर्माण करणारे अॅप ‘पीएचए’ म्हणून गणले जातात. अँड्रॉइड सुरक्षेसंदर्भात गुगलने नुकताच वार्षिक अहवाल प्रकाशित केला. असा अहवाल गेल्या पाच वर्षांपासून नियमित प्रसिद्ध करण्यात येतो. तर, या अहवालानुसार गुगलच्या प्ले स्टोअरवरून २०१८मध्ये डाऊनलोड करण्यात आलेल्या एकूण अॅप्समध्ये ‘पीएचएं’चा वाटा जेमतेम ०.०४ टक्के इतका आहे. हा इतका कमी असल्याबद्दल गुगलने स्वत:ची पाठही थोपटवून घेतली आहे. अर्थात ०.०४ टक्के हा आकडा वाटताना नगण्य वाटत असला तरी ‘प्ले स्टोअर’वरून अॅप डाऊनलोडची एकूण संख्या जवळपास ७४ अब्जांच्या आसपास आहे. त्यानुसार जवळपास साडेतीन कोटी डाऊनलोड हे ‘पीएचए’ वर्गातील आहेत. हा आकडा चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘पीएचए’चे प्रमाण ०.०२ टक्क्यांनी वाढले आहे, हे विशेष. ‘पीएचए’च्या वर्गवारीत ‘क्लिक फ्रॉड’चा समावेश करण्यात आल्याने हा टक्का वाढल्याचे गुगलचे म्हणणे आहे. म्युझिक, व्हिडीओशी संबंधित अॅपवर होणारा जाहिरातींचा मारा हा ‘क्लिक फ्रॉड’च्या प्रकारात मोडणारा आहे. अशा प्रकारे वापरकर्त्यांची इच्छा नसतानाही त्यांना जाहिरातींवर ‘क्लिक’ करावे लागते आणि जास्त जाहिरातींवर ‘क्लिक’ झाले हे दाखवून अॅप बनवणारे जाहिरात कंपन्यांकडून उत्पन्न मिळवतात. अशा ‘क्लिक फ्रॉड’चे प्रमाण सध्या सर्वाधिक असल्याचे गुगलचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे भारत आणि ब्राझील या देशांत ‘थर्ड पार्टी अॅप’ डाऊनलोड करण्याचे प्रमाण जास्त असल्याचेही हा अहवाल सांगतो. ‘प्ले स्टोअरखेरीज अन्य संकेतस्थळे किंवा अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केलेल्या अॅपना ‘थर्ड पार्टी अॅप’ म्हटले जाते. भारतात हे प्रमाण कमी होत असले तरी अन्य देशांच्या तुलनेत ते अजूनही जास्त आहे.
धोकादायक अॅपवर नियंत्रण आणण्यासाठी गुगलची यंत्रणा सातत्याने प्रयत्न करते आहे. वेळोवेळी अँड्रॉइडच्या आवृत्त्यांना पूरक असलेले ‘सिक्युरिटी पॅचेस’ हा या सुरक्षा मोहिमेचाच भाग असतो. मात्र, वापरकर्त्यांनीही अॅप इन्स्टॉल करताना त्याची पाश्र्वभूमी तपासणे आवश्यक आहे. विशेषत: ‘प्ले स्टोअर’खेरीज अन्य ठिकाणचे अॅप डाऊनलोड करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. अँड्रॉइड आपली सुरक्षा करत आहेच, पण आपणही आपल्या सुरक्षेची खबरदारी घ्यायलाच हवी ना!
viva@expressindia.com