लढाई एकटय़ाचीच असते, पण सभोवताली निसर्गातले असंख्य जण आपल्याबरोबर असतात. इंटरनेटरूपी मायाजाल, थ्रीजी-फोरजी, पेनड्राइव्ह, हेडफोन या गॅझेट्समध्ये आपण गुंतलोय. हे गुंतताना आपल्या जगण्याची इंटेन्सिटीही डाऊनग्रेड झालीय. प्राणीमात्र या आक्रमणापासून सुदैवाने दूर आहेत. आपलं जगणं सुकर केलेल्या आणि व्हायरल झालेल्या ‘त्यां’ची कहाणी.
बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना..
हर कुत्ते के दिन आते है..
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच..
अखिल भारतीय श्वानप्रेमी संघटनेकडून धिक्कार होईल अशा स्वरूपाची ही वाक्यं. कुत्रा म्हणजे इमानी प्राणी, कुत्रा म्हणजे माणसाचा मित्र अशा निबंधातल्या ‘अमन की आशा’ मोडपासून ते ‘अँटी डॉग’ स्वरूपाच्या कोट्सपर्यंत प्रवास कसा झाला हे अँथ्रॉपॉलॉजी तज्ज्ञांनाच विचारावं लागेल. तमाम चिवित्र गोष्टींसह माणसांमधले पशूपण दरदिवशी समोर येत असताना, या आठवडय़ात दोन श्वानवीरांनी मायाजालात ‘व्हायरलत्व’ पटकावलं. आपल्या कोअर व्हॅल्यूंना चिकटून राहूनही मोठं होता येतं याचा एक डेमोच या दोघांनी आपल्या करिअरमध्ये सातत्याने दाखवला.
ही गोष्ट आहे १२ वर्षांच्या ल्युकाची. जर्मन शेफर्ड प्रजातीच्या या पठ्ठीने यूएस मरिन कॉर्प्स या अतिविशिष्ट लष्करी सेवेसाठी सहा वर्ष काम केलं. काम जोखमीचं- शत्रूपक्षांनी पेरलेली स्फोटकं हुंगून काढण्याचं. हिंसाग्रस्त इराक आणि अफगाणिस्तान प्रांतात तब्बल ४०० मोहिमांमध्ये ल्युकाने सहभाग घेतला. आपल्या सैन्याच्या वाटचालीतले अडथळे अचूकपणे हुडकत तिने भरीव मदत केली. मात्र २०१२ मध्ये अफगाणिस्तानमधल्या एका मोहिमेदरम्यान एक बॉम्ब फुटला आणि ल्युकाला एक पाय गमवावा लागला. मात्र तिच्या अतुलनीय योगदानाची नोंद म्हणून प्रतिष्ठेच्या मानाच्या डिकिन्स मेडलसाठी निवड झाली. लष्करी युद्धात शौर्य गाजवणाऱ्या प्राण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना प्रतिष्ठेच्या व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात येतं. त्याच धर्तीवर डिकिन्स मेडल प्राण्यांना दिलं जातं. यूएस मरिन कॉर्प्स अंतर्गत काम करणाऱ्या प्राण्याला हे पदक मिळण्याची पहिलीच वेळ आहे. सरजट ख्रिस विलिंघम यांनी ल्युकासह लंडनमध्ये शानदार सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारला. ‘ल्युका अत्यंत हुशार, निष्ठावान आहे आणि स्फोटकं शोधण्यातलं तिचं कौशल्य वादातीत आहे. तिच्यामुळेच युद्धजन्य परिस्थितीतून मी सुखरूप घरी परतू शकलो. तिच्या निवृत्तीनंतर सन्मानजनक सांभाळ करणे हे माझे कर्तव्य आहे’, अशा शब्दांत विलिंघम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १९४३ पासून हे पुरस्कार देण्यात येतात आणि आतापर्यंत ३१ कुत्रे, ३२ कबुतरं, ३ घोडे आणि एका मांजराला सन्मानित करण्यात आलं आहे.
ल्युकाप्रमाणे जोखमीचं काम करणारा मुंबई पोलिसांचा मॅक्स परवा गेला. २६/११च्या मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात गेटवे ऑफ इंडियासमोरच्या ताज हॉटेलबाहेर ठेवलेलं ८ किलो आरडीएक्स मॅक्सनेच हुडकून काढलं. त्याच्या धैर्यामुळेच अनेकांचे प्राण वाचले. २००१ झवेरी बाजारमध्ये झालेल्या स्फोटा वेळीही मॅक्सने स्फोटकं शोधली होती. मुंबई पोलिसांचा शान असलेल्या मॅक्सला सुवर्ण पदकाने गौरवण्यात आलं. १० वर्षांच्या अथक सेवेनंतर गेल्या वर्षी मॅक्स निवृत्त झाला. मुंबईच्या परिघावर असणाऱ्या विरारमधल्या एका फार्महाऊसमध्ये मॅक्सने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या अंत्यदर्शनाला त्याचा सांभाळ करणारे फिझाझ शाह आणि त्याला प्रशिक्षण देणारे सुभाष गावडे उपस्थित होते. पोलिसांना सदोदित साथ देणाऱ्या मॅक्सला शेवटचा अलविदा करायला एकही पोलीस हजर नव्हता. मात्र फार्महाऊसमधले त्याचे साथीदार मॅक्सला निरोप देण्यात आला तिथे शांतपणे बसून होते. माणुसकी जिवंत असल्याचं मॅक्सच्या श्वान साथीदारांनी सिद्ध केलं.
आपल्याकडे कुत्रा हे ‘विशेष नाम’ साला या प्रेफिक्ससह शिवी म्हणून वापरलं जातं.
आपल्याकडे काही राज्यात कुत्रा खाल्ला जातो. आणि आपल्याकडेच मोकाट वाढलेली कुत्री चावून इंजेक्शनचा कोर्स घ्यावा लागणाऱ्यांची संख्याही वाढतेय.
आपण अजूनही थर्ड वर्ल्ड कंट्री अर्थात विकसनशील का आणि ते विकसित का याची उत्तरं दोन प्रसंगांनी आपसूकच मिळाली आहेत. धर्माचा बाजार मांडणाऱ्या देवस्थानांची उभारणी, रथयात्रा, फटाके, देशप्रेमी घोषणा, चमकोगिरी लाँचिंग इव्हेंट्स यापेक्षा मनुष्याप्रति लॉयल असणाऱ्या श्वानवर्गाचा ठोस उपयोग करून घेता येईल आणि त्यांचंही भलं होईल अशा स्वरूपाचा सार्वजनिक उपक्रम काळाची गरज आहे. तुपाशी असणारा वर्ग आपल्या टॉमीसह सेल्फी काढून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात मग्न असताना ल्युका आणि मॅक्स यांनी प्रसिद्धीचा हव्यास न धरता आपलं काम सुरू ठेवलं. त्यांच्या व्हायरल होण्यातून आपल्याला मिळालेली ही शिदोरी महत्त्वाची!