तिचं मूळ गाव मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातलं- पवारपाडा. वारली आदिवासी समाजात जन्मलेली ही लहानाची मोठी झाली दहिसरच्या रावळपाडा भागात.. या सगळ्या पाश्र्वभूमीवर तिचं वेगळेपण कशात आहे तर तिच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात! तिचं नाव अनिता काशिनाथ हाडळ.
विशीतली अनिता शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करते. ती दहिसरमधील एका प्रतिष्ठित पॉवर बिल्ड जिम्नॅशियममध्ये प्रशिक्षक आहे. शालेय वयात तिने कराटेचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. आणि या सगळ्या कामाच्या धबडग्यातून अनिता ‘झाडं लावा- झाडं जगवा’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवते.
अनिताचं बारावीपर्यंतचं शिक्षण रुपारेल महाविद्यालयात वाणिज्य शाखेत झालं. त्यानंतर दापोलीच्या कृषी महाविद्यालयातून तिने दोन वर्षांची पदविका आणि त्यानंतर चार वर्षांचे हॉर्टिकल्चरमधील पदवी शिक्षण पूर्ण केलं. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून कृषी पत्रकारितेचं शिक्षणही तिने घेतलंय. शेतीची उपजत आवड असलेल्या अनिताने मात्र शेती करत त्यातच करिअर करण्याचं पक्कं केलं.
त्याआधी ठाणे जिल्ह्य़ातून जिल्हा परिषदेच्या तलाठी, ग्रामसेवक यासारख्या स्पर्धा परीक्षा अनिताने दिल्या होत्या. त्यातील लेखी परीक्षांमध्ये तिने उत्तम यश संपादन केलं होतं. मात्र मुलाखतीच्या वेळेस नाव आणि गाव कुठलं, इतका साधा प्रश्न तिला विचारला गेला.
तरीही, मुलाखतीच्या फेरीत निवडल्या गेलेल्या यादीत मात्र तिचा क्रमांक झळकला नाही. त्या यादीत नाव लागण्यासाठी ‘वेगळी अर्हता’ संपादन करावी लागते, हे लक्षात आल्यानंतर अनिता हिरमुसली झाली खरी, पण त्याचवेळी तिने आपल्या शेतीच्या आवडीला आणि शिक्षणालाच करिअरचं रूप द्यायचं पक्कं केलं.
अनिता मोखाडय़ात रीतसर शेती करते. ट्रॅक्टर चालवण्यापासून इतर बारीकसारीक शेतीची ढीगभर कामं ती उत्साहाने करते. भातशेती, नाचणी, भुईमूग, तुरीचे उत्पादन ती घेते. वसई-विरार भागातील काही फार्महाऊसेसच्या निगराणीची कामंही तिच्याकडे आहेत. नाशिकजवळ कांदे लागवड, द्राक्षं उत्पादन ती घेते. मूरघास, मकासंबंधित चाऱ्याची शेती ती करून देते. गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेणखत ती बनवते. वाईजवळच्या एका गावातील काही शेतक ऱ्यांना तिने शेळीपालनाचे धडे दिले, तर दुग्धपालन, कुक्कुटपालनासंबंधी तिच्या आदिवासी गावातील लोकांच्या अनेक शंकांचे तिने निरसन केले आहे. मोखाडा तालुक्यात काकडीचे उत्पादन, मोगरा उत्पादन, गुलाबशेतीत वेगवेगळे प्रयोग तिने केले आहेत. प्रशासनाची मदत मिळाली तर तिथल्या शेतीच्या प्रयोगांना अधिक बळ मिळेल, अशी आशा ती व्यक्त करते. तिचे शेतीचे प्रयोग पाहून तिच्या गावातल्या शेतक ऱ्यांनाही असे वेगवेगळे प्रयोग करण्यास हुरूप आला आहे. अशा शेतकऱ्यांना ती लागेल ती सर्व मदत करते. उत्पादन प्रक्रिया समजावून सांगते. गायी-गुरांच्या आजारासंबंधी मार्गदर्शन करते. नाशिकजवळच्या काही गावांमध्ये पॉलिहाऊस शेती, जरबेरा, गुलाब उत्पादन, वाईन उत्पादनासंबंधी ती मार्गदर्शन करते. शहापूरजवळच्या एका आश्रमशाळेत कृषी विस्तार शिक्षणाअंतर्गत ती तिथल्या मुलांना पर्यावरणाचा अभ्यास शिकवते. त्यासोबतच अनिष्ट चालिरीतींविरोधात या मुलांना तसेच गावक ऱ्यांना अनिता मार्गदर्शन करते. छोटय़ा छोटय़ा आदिवासी पाडय़ांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी आवश्यकता आहे, हे तिच्या बोलण्यातून वारंवार व्यक्त होते.
बोन्साय करणे हा तिचा लाडका छंद. बोन्सायची प्रात्यक्षिके दाखवून त्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचे तिचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात.
आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रस्त्याच्या कडेला, सोसायटय़ांच्या कुंपणालगत अनेकदा पिंपळासारखी अनेक रोपटी उगवलेली दिसतात. अनिता ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करते. ही रोपटी दुधाच्या रिकाम्या पिवश्यांमधून घरी आणत त्यांना जगवते. ही रोपटी थोडी मोठी झाली की बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जवळच्या शाळा, आश्रमं, देवळं यासारख्या ठिकाणी ती लावते. ट्रेनचा प्रवास करताना अनेक जण फळं खाऊन बिया तिथेच टाकत असतात. त्या गोळा करून अनिता त्यातून उगवणारी रोपटी जगवते. तिने लावलेली अनेक फळझाडे आज अनेक ठिकाणी डवरलेली आहेत. अनिताला यातच आनंद आहे.
अनिताचे बाबा सातवी पास, तर आईचं शिक्षण दुसरीपर्यंत झालेलं. पण त्यांनी मुलांना मात्र शिक्षणासाठी नेहमीच उत्तेजन दिलं. तिची एक बहीण रंजना गोल्ड जिममध्ये प्रशिक्षक आहे, तर दुसरी बहीण अलका कल्याणच्या आदिवासी आश्रमशाळेत शिक्षिका आहे. मोठा भाऊ अनिल पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
एक यशस्वी जिम प्रशिक्षक आणि शेती मार्गदर्शक असलेली हिरव्या हातांची अनिता आज तिच्या वारली आदिवासी समाजासाठी तसेच इतर अनेकींसाठी ऊर्जेचा स्रोत नक्कीच ठरेल.
छाया : वसंत प्रभू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा