|| उत्कर्ष भुजबळ
आरा इन्स्टिटय़ूट ऑफ कँटरबरी ख्राईस्टचर्च, न्यूझीलंड
माझ्या अभ्यास विषयाचा रिपोर्ट लिहिता लिहिता मन जवळपास गेल्या वर्षांत पोहोचलं. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमधील ‘आरा इन्स्टिटय़ूट ऑफ कँटरबरी’मध्ये मी ‘ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट’ या वर्षभराच्या डिप्लोमाला (पदविका) प्रवेश घेतला आहे. येत्या महिन्याभरात माझा अभ्यासक्रम संपेल. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आम्हाला एक विषय असतो इंडस्ट्री प्रोजेक्ट. त्यात एका कंपनीच्या समस्येवर आम्हाला उपाय शोधायचा असतो. आम्ही एक सर्वेक्षण केलं. त्याची निरीक्षणं आणि निष्कर्षांचा अहवाल कंपनीला द्यायचा आहे. न्यूझीलंडमधील एक विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांला करिअर मार्गदर्शन केलं जातं. आमच्या अभ्यासाचा भाग असणारी ही कंपनी हायस्कूल विद्यार्थी, युनिव्हर्सिटी स्कूल्समधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. कंपनीच्या या मार्गदर्शनाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे, त्याची गरज कशी आहे हे त्यांनी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतलं. ही कंपनी रेझ्युमे, कव्हरिंग लेटर लिहिण्यासाठी आणि जॉब शोधण्यासाठी, परदेशी शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करते. या सर्वेक्षणात हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा आणि हायस्कूल व युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी यांचा समावेश होता. जवळपास दीडशे लोकांनी दिलेल्या या प्रतिसादाचा अहवाल आम्ही लिहितो आहोत. तो कंपनीला पाठवणार आहोत. कंपनीच्या मार्के टिंगच्या दृष्टीने निर्णय घेण्यात या अहवालाचा फायदा होऊ शकतो. हे सर्वेक्षण करण्यासाठी तीन भारतीय विद्यार्थ्यांचा (पंजाब, हरयाणा आणि महाराष्ट्र) ग्रुप आहे.
इथे आपल्यासारखी परीक्षापद्धती नाही. क्रेडिट सिस्टीम आहे. सगळ्या असाइनमेंट असतात. उदाहरणार्थ, एका असाइनमेंटचा विषय असा की, एका कंपनीच्या वार्षिक अहवालाचा अभ्यास करून त्यावर आधारित उत्तरं लिहायची असतात. त्यात कंपनीचा इतिहास, त्यांच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज, त्यांचं व्हिजन आणि मिशन, त्यांच्या कामाची पद्धत, अचिव्हमेंट आदी संदर्भ अभ्यासावे लागतात. ही असाइनमेंट एका विशिष्ट फॉरमॅटमध्येच लिहावी लागते. मात्र त्यात आपल्याकडे अनेकदा सर्रासपणे चालणारी कॉपी-पेस्ट संस्कृती अजिबात खपवून घेतली जात नाही. त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर वापरलं जातं. त्यामुळे असाइनमेंटमध्ये स्वत:चंच लिखाण असणं अपेक्षित असल्याने लिखाणात दक्षता घ्यावी लागते. सुरुवातीला वाटलं की, अशा प्रकारे असाइनमेंट लिहिणं सोप्पं असेल, पण प्रत्यक्षात ते तितकं सोप्पं नव्हतं.
नागपूरच्या ‘कर्मवीर दादासाहेब कन्नमवार कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग’मध्ये माझं शिक्षण सुरू असताना माझ्या ताईला कंपनीतर्फे अमेरिकेत जायची संधी मिळाली होती. तिच्याकडून कळलं की, इंजिनीअरिंगनंतर परदेशी शिकायची संधी मला मिळू शकते. मलाही एमबीए करायचं होतं. त्यासाठी क्लासलाही जात होतो. मग परदेशी शिक्षणाची थोडी माहिती काढली. मला जीबी या संस्थेकडून मार्गदर्शन मिळालं. तिथल्या मार्गदर्शकांनी पुढच्या शिक्षणासाठी न्यूझीलंडमध्ये शिकण्याचा पर्याय सुचवला. त्यादृष्टीने कएछळरची परीक्षा दिली. अर्ज करण्याआधी पहिल्यापासून व्यवस्थित आखणी केल्याने गोष्टी सुरळीत झाल्या. माझ्या वडिलांची इच्छा होती की, दोन्ही मुलांनी परदेशात शिकावं. शक्यतो एकाच देशात असतील तर अधिक बरं. मला वाटलं की ताईकडेच राहिलो तर स्वत:च्या पायावर कधी उभं राहणार? त्याच त्या नेहमीच्या सुखी चौकटीत अडकण्यापेक्षा न्यूझीलंडला जायचा निर्णय पक्का झाला. हा माझा पहिलाच परदेश प्रवास होता. मुंबई ते सिंगापूर या पहिल्या टप्प्यात तेरा तासांचं वेटिंग होतं. त्या भल्यामोठय़ा एअरपोर्टवर फिरून टाइमपास करत माझ्या विमानाची वाट बघण्यापलीकडे हाती काहीच नव्हतं. पुढे न्यूझीलंडला मुक्कामी पोहोचल्यावर ओळखीचा एक दादा घ्यायला आला होता. तपासणीत भरपूर वेळ गेल्यानंतर एअरपोर्टबाहेर पडल्यावर खूप थंडीने स्वागत झालं. पाहावं तिथे एकदम स्वच्छता आणि छान वातावरण होतं.
आपल्यापेक्षा इथले नियम-कायदे वेगळे आहेत. नागरिक ते कसोशीने पाळतात. अगदी सुरुवातीच्या काळात आठवतंय, की पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करायचा असेल तर एक बटण दाबायचं म्हणजे सिग्नल लागून गाडय़ा थांबतात आणि आपण क्रॉस करू शकतो. मात्र ते फार माहिती नसल्यामुळे मी तसाच क्रॉस करायला लागलो. तेव्हा मला एकदोघांनी बटनाची व्यवस्था समजावून सांगितली. रस्ता क्रॉस करणं असो, कामाची जागा असो किंवा कॉलेज असो लोकांच्या सुरक्षेला आणि स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. इथे विविध शिष्टाचार उदाहरणार्थ थँक्यू.. सॉरी.. इत्यादी कटाक्षाने पाळले जातात. या शिष्टाचार पाळण्याच्या चांगल्या सवयी मलाही लागल्या आहेत. मध्यंतरी भारतात आलो होतो तेव्हाची एक गोष्ट सांगतो. एका फास्टफूड सेंटरमध्ये गेलो असताना ऑर्डरच्या काऊंटरसमोर उभा होतो. न्यूझीलंडमध्ये काऊं टरसमोर उभं राहिल्यावर किमान ‘हाय, हाऊ आर यू?’ असं ग्रीट करूनच ऑर्डर घेतली जाते. मोकळ्या स्वभावाने माणसं बोलतात, वागतात. आपल्या एअरपोर्टवर उतरल्यावर तिथल्या वाय-फायचा पासवर्ड एअरपोर्ट काऊंटरवर विचारला असता डेस्कपलीकडच्या व्यक्तीचं उद्धट वागणं मला खटकलं. तेव्हा ताईही कॅनडाहून लॅण्ड झाली होती. तिलाही हे जाणवलं. आम्हाला वाटलं की, आपण आता परदेशात शिकतो, राहतो आहोत तरी आपल्याला हे वागणं वावगं वाटलं, तर परदेशस्थ लोकांना कसं वाटत असेल?
पहिल्यांदाच घराबाहेर पडलो होतो. स्वत:ची कामं स्वत:च करायचा उत्साह अगदी सुरुवातीच्या काळात होता. आता आपण स्वावलंबी झालो, वगैरे वाटलं. तरीही आपण घरीच असतो, तर जास्त बरं झालं असतं असं वाटून घरची आठवण आल्याशिवाय राहात नाही. अर्थात आता भारतात आल्यावर आपण न्यूझीलंडमध्ये आहोत तेच बरं आहे, असं वाटलं. मी सध्या डोअर टू डोअर मार्केटिंगचा पार्ट टाइम जॉब करतो आहे. विद्यार्थ्यांना काही ठरावीक तासच काम करण्याची परवानगी आहे. सध्या दोन दिवस कॉलेज, पाच दिवस ठरावीक तास काम आणि आणि उरलेला सगळा वेळ असाइनमेंट पूर्ण करण्यात जातो. अनेकदा कॉलेजमध्ये थांबून आम्ही रात्रभर असाइनमेंट पूर्ण करतो. कितीही म्हटलं तरी जेवणाचा थोडा प्रश्न येतोच. इथल्या भारतीय दुकानांत सगळ्या गोष्टी मिळतात. रेस्टॉरंटही आहे, पण ते महाग असल्यामुळे पैसे वाचवण्याच्या दृष्टीने स्वयंपाक घरीच करतो. कॉलेज घरापासून सहा किलोमीटरवर आहे. या घरात दाक्षिणात्य विद्यार्थी, किवी (स्थानिक) विद्यार्थी मिळून राहतो.
कॉलेज कॅम्पसमध्ये सतत काही ना काही इव्हेंट सुरू असतात; मात्र त्यात वेळेअभावी फार सहभागी होता येत नाही. त्यात अधिकांश सहभाग किवी विद्यार्थ्यांचा असतो. त्यांना गव्हर्न्मेंटकडून शिक्षणासाठी पैसे मिळतात. त्यामुळे त्यांना पार्टटाइम काम करावं लागत नाही. इथे माओरी आणि किवी संस्कृती आहे. त्यातही माओरी भाषेचं वर्चस्व जाणवण्याजोगं आहे. इथले फलक इंग्रजी आणि माओरी भाषेत लिहिलेले असतात. भाषेला खूपच महत्त्व दिलं जातं. आता इथला अॅक्सेंट समजायला लागला आहे. त्यासाठी मदत झाली ती विद्यापीठातील इंग्लिश कोर्सची. त्या अॅक्सेंटचा आम्हाला सराव व्हावा म्हणून सतत व्हिडीओच्या माध्यमातून कॉलेजतर्फे आम्हाला इथल्या अॅक्सेंटचं इंग्रजी मोफत शिकवलं गेलं. त्याचा खूप फायदा झाला. सुरुवातीच्या काळात मला एक असाइनमेंट लिहायची होती. तेव्हा एका जर्मन विद्यार्थ्यांने मला मदत केली. एवढंच कशाला, ग्रंथालयातील संदर्भ कसे बघायचे, कसे वापरायचे याबद्दल मार्गदर्शन करणारा कोर्सही केला होता. इथल्या प्राध्यापकांना ईमेलवरच आपल्या शंका विचाराव्या लागतात. ते अगदी प्रोफेशनल आहेत. आपली उत्तरं वाचून त्यात काही हवं-नको ते सांगतात. योग्य ते मार्गदर्शन आणि मदत करतात. आणखी एका असाइनमेंटसाठी एका विद्यार्थिनीची मदत झाली होती. त्यासाठी मला शंभरपैकी सत्त्याऐंशी गुण मिळाले होते. तिची कंपनी वेगळी असल्याने तिनं मला तिची असाइनमेंट दाखवली होती. या असाइनमेंटमुळे टय़ूटर्सना काय अपेक्षित आहे ते कळलं. वर्गात प्रश्नांची उत्तरं सांगताना त्या उत्तरात काय लिहायचं किंवा काय करावं लागेल, ती कल्पना दिली जाते. एक विषय होता त्यासाठी मी टायटल घेतलं होतं, ‘टाटा गॅलेक्सीचं मार्केट सेगमेंट’. माझं लिखाण वाचून मार्गदर्शकांनी मला बरेच प्रश्न विचारून बोलतं केलं. त्यावर अधिक विचार करायला सांगून ते लिहायला सांगितलं. विषयांनुसार वर्गातील विद्यार्थी बदलतात. त्यात भारतीय, चीनी विद्यार्थी जास्त आहेत. भारतीयांमध्येही पंजाबी विद्यार्थ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. जर्मनीतले विद्यार्थी बऱ्याचदा एक्सचेंज कोर्सअंतर्गत एका सेमिस्टरसाठीच येतात. कोरियन विद्यार्थीही आहेत. एकत्र जेवायला गेल्यावर जो तो आपापलं बिल भरतो. कारण महागाई खूप असल्याने आपल्या भार दुसऱ्यावर टाकणं योग्य वाटत नाही. त्यामुळे साहजिकच आपण भारतीय कुणाचं बिल भरायला लागलो किंवा आपला डबा शेअर करणं, हा त्यांच्या कुतूहलाचा विषय ठरतो. एक किस्सा आठवतो आहे. एकदा मी आणि एक पाकिस्तानी विद्यार्थी गप्पा मारत बसलो होतो. दोन्ही देशांविषयी माहिती असलेल्या किवी विद्यार्थ्यांने आम्हाला विचारलं की, तुम्ही सोबत कसे काय? त्यावर मी त्याला म्हटलं की, दोन देशांत मतभेद आहेत, ते सामान्य माणसांमध्ये नाही. ते सगळं राजकारण आहे. सामान्यांमध्ये मित्रत्वाची भावना अधिक आहे. काही अफगाणिस्तानचे विद्यार्थीही आहेत. मध्यंतरी माझ्या एका मित्राचा अपघात झाला असताना एका पाकिस्तानी मित्राने आम्हाला परोपरीने मदत केली होती. एका पाकिस्तानी माणसाकडून काही काळ टिफिन येत होता. आमच्या घरमालकिणीचं आणखी एक घर लेक टेकॅपोजवळ आहे. तिने आम्हाला अगत्यानं बोलावल्यानं आम्ही तिथं गेलो होतो. निळं नितळ पाणी, भोवतालचे डोंगर आणि घनदाट झाडी पाहून फारच भारी वाटलं होतं..
इथे आल्यापासून माझ्या वागण्यात खूपच बदल जाणवले. बालिशपणा पार पळून गेला. माझं क्रिकेट बंद झालं आहे, कारण खेळायला वेळच मिळत नाही. इतकंच कशाला सध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अपडेट बघायलाही फारसा वेळ मिळत नाही. इन्स्टाग्राम किंवा अन्य समाजमाध्यमांतून हे अपडेट कधी तरी पाहिले जातात. मध्यंतरी न्यूझीलंडमध्येच भारत-न्यूझीलंड मॅच सुरू होत्या; पण त्याही वेळेअभावी बघता आल्या नाहीत. सध्या खेळत असलेल्या दोन्ही टीमची तुलना करता भारतीय टीम जास्त चांगली वाटते. ती जिंकावीशी वाटते. इथल्या लोकांना क्रिकेटपेक्षा रग्बी खेळाची आवड अधिक आहे. कॉलेजमध्ये वेळ मिळेल तसा आम्ही टेबल टेनिस, बॅडमिंटन वगैरे खेळतो. भारतात असताना जिमला जायचो. इथले लोक फारसे फिटनेसप्रेमी दिसत नाहीत. सध्या मी साऊ थ आयलंडला ख्राइस्टचर्चमध्ये राहतो. २०१४ मध्ये झालेल्या भूकंपानंतर इथल्या अनेक कंपन्या नॉर्थ आयलंडला विशेषत: वेलिंग्टन आणि ऑकलंडला स्थलांतरित झाल्या. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वेलिंग्टनला जावं लागेल. त्या सुमारास माझ्या वर्क व्हिसाचा कालावधी सुरू होईल. त्यामुळे नोकरी शोधून तिथेच शिफ्ट होण्याचा विचार सुरू आहे. त्यादृष्टीने रिक्रुटमेंट एजन्सीमध्ये नोंदणी केली आहे. वेलिंग्टनमध्ये बऱ्याच चांगल्या कंपन्या असून तिथे काम मिळण्याची शक्यता अधिक आहे. बघा, या त्रिकाळाची सफर करता करता किती वेळ गेला, ते कळलंच नाही. आता लगेच पुढचा रिपोर्ट लिहायच्या कामाला लागतो. चलो, बाय!
कानमंत्र
- इथं सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा आर्किटेक्ट शिका, कारण त्यांना इथं खूपच मागणी आहे.
- साऊथ आयलंडमध्ये जायची संधी मिळाल्यास नक्की जा आणि आपलं करिअर चांगल्या पद्धतीनं साकारा.
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com