शिव्या म्हणजे ज्यांना अपशब्द म्हटलं जातं असं काही.. अपशब्द म्हणजे अर्थात जे उच्चारणं योग्य नाही किंवा शोभनीय नाही असे शब्द.. सामान्यत: सर्वसाधारण घरांमध्ये अपशब्द उच्चारले जात नसत. एकमेकांना तर नाहीच नाही, पण बाहेरच्या जगाचा कितीही राग आला तरीही त्याबद्दल अपशब्द काढणं म्हणजे अगदीच न स्वीकारण्याजोगी गोष्ट होती. बाहेरचा माणूस असो नाही तर घरातला, परका असो वा आपला, अपशब्द नाही म्हणजे नाहीतच! मात्र या अपशब्दांच्या हळूहळू शिव्या झाल्या. ‘हलकट, नालायक’ यांसारख्या अपशब्दांच्या अर्थातलं गांभीर्य कालांतराने कमी होत गेलं आणि त्यांची जागा नवीन शब्दांनी घेतली. मात्र ते शब्द आधी अस्तित्वात असणाऱ्या अपशब्दांपेक्षा खालच्या दर्जाचे असल्याने त्यांना शिव्या म्हटलं गेलं.
या शिव्यांचा उगम कुठे झाला, असा प्रश्न पडला तर त्याबद्दल एक म्हण आहे; ‘जशा जात्यावर बसल्यावर ओव्या येतात, तशा चाकावर (म्हणजे स्टीअरिंगवर) बसल्यावर शिव्या येतात’. कोणास ठाऊक, पण खरोखरच शिव्यांची सुरुवात तिथून झालीही असेल! तर या शिव्या ‘च’कार, ‘म’कार आणि ‘भ’कार यांनी सुरू होणाऱ्या आहेत. हलकट, नालायक वगैरे शिव्या आता ‘आऊटडेटेड’ झाल्या आहेत. शिव्या केवळ मराठीतच नाही तर हिंदीत आणि अगदी इंग्रजीतसुद्धा आहेत. समोरच्याला इंग्रजी कळत नसेल तर बिनधास्त इंग्रजीत शिवी देऊ न मोकळं व्हायचं हा नवीन ‘फॉम्र्युला’! बाकी कितीही ठिकाणी अनेकांचे भाषावाद आड आले किंवा भाषाभिमान वगैरे जागृत झाले तरी शिव्यांच्या बाबतीत सगळे भेदाभेद विसरून सगळ्या भाषांनी आपापलं योगदान दिलेलं आहे आणि आपण ते खूपच खुल्या दिलाने स्वीकारलेलं आहे.
यात पुन्हा फक्त काळानुसार आणि समानतेनुसार झालेला बदल म्हणजे पूर्वी सामान्यत: मुलांच्या तोंडी असणाऱ्या शिव्या आजकाल सहज मुलींच्याही तोंडी ऐकू येतात. या शिव्या म्हणजे खरं तर आता शिव्या राहिल्याच नाहीत, तर त्या बोलण्याचा भाग होऊन बसल्या आहेत. अनेकांची वाक्यं सुरू शिव्यांनी होतात आणि त्याचा शेवटही शिव्यांनीच होतो. अनेकदा या शिव्या सहज संबोधन म्हणून वापरल्या जातात. आता त्या शिव्या तरुणाईच्या अंगी इतक्या भिनल्या आहेत की, त्या ‘शिव्या’ आहेत हे कोणाच्या लक्षातही येत नाही आणि नकळत पालकांच्या समोरही सहजपणे फोनवर ‘अरे भावा’ म्हणण्याऐवजी भलतंच काही तरी म्हणून आपण मोकळे होतो.
बाकी ‘मुलीच काय, मुलांच्याही तोंडी कारण नसताना शिव्या बऱ्या दिसत नाहीत’ किंवा ‘कारण नसताना कशाला शिव्या घालायच्या’ किंवा ‘बोलताना नीट बोलावं आणि वेळ पडली तर चार शिव्या घालायची तयारी असावी’ असलं तथाकथित ‘लेक्चर’ वगैरे काही नाही खरं तर, पण कमीत कमी या कारणासाठी तरी हे शिव्यांचं वेड कमी करायला हरकत नसावी!
viva@expressindia.com