विनय नारकर
गेल्या लेखात साडी कशी कालजयी ठरली हे आपण पाहिले. साडीच्या दोन समांतर रेषांच्या या अवकाशात रंगांचे, पोताचे, रचनांचे, नक्षीचे, परंपरांचे विलक्षण विश्व सामावले आहे. अशा या साडीची व्युत्पत्ती शोधायची म्हटलं तर विविध काळातील संदर्भाचे काही तुकडे हाती लागतात. ते जोडून एक पुसटसं चित्र साकारतं.
हिंदू धर्मशास्त्रांनुसार अखंड, म्हणजे ‘न शिवलेले’ कपडे घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच ‘कासोटा’ किंवा ‘काष्टा’ घालण्यालाही तितकेच महत्त्व आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनीही ‘द्विवस्त्र’ आणि ‘त्रिकच्छ’ असणे शास्त्रानुसार गरजेचे होते. पुरुषांसाठी धोतर आणि उपरणे तर स्त्रियांसाठी साडी आणि बांधलेली चोळी व शेला अशा जोडय़ा यातून निर्माण झाल्या. चोळीसाठी सुती किंवा रेशमी वस्त्राची पट्टी पाठीवर गाठ बांधून वापरली जायची. दासींसाठी ‘कंचुलिका’ आणि बाकीच्या स्त्रियांसाठी ‘स्तनम्सुका’ असे या वस्त्रास म्हटले जाई.
आधी स्त्रिया साडीसारखे अखंड वस्त्र नेसत नसत. वैदिक साहित्यामध्ये ‘द्रपि’ या ऊध्र्व शरीरासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्तरीयाचा उल्लेख येतो. यात जेव्हा सोन्याच्या तारांचा वापर होई, तेव्हा त्याला ‘हिरण्य द्रपि’ असे म्हटले जाई. त्याचबरोबर अधो शरीरासाठी ‘चंदातक’ या लपेटण्याच्या, स्कर्टसारख्या दिसणाऱ्या वस्त्राचा वापर होत असे.
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात पतंजलीने ‘शातक’ (उत्तरीय) आणि ‘शाति’ किंवा ‘शाटी’ (अंतरीय) अशा दोन वस्त्रांचा उल्लेख केला आहे. ही नावं ‘शात’ किंवा ‘शाट’ या शब्दापासून बनली आहेत. मोनीएर- विलीएम्स शब्दकोशानुसार याचा अर्थ अखंड वस्त्र किंवा कमरेला बांधण्याचे वस्त्र असा होतो. हाच ‘शाटी’ हा शब्द, ‘साडी’ या शब्दाचा उगम समजला जातो.
साडी नेसलेल्या स्त्रीचं इसवी सन पूर्व १००च्या दरम्यानचं एक शिल्प इंग्लंडच्या अश्मोलीयन संग्रहालयात पाहायला मिळते. साडीतल्या स्त्रीचं उपलब्ध असलेलं हे पहिलं शिल्प असं आपण म्हणू शकतो. हे एक उत्तर भारतीय, टेराकोटामधे बनवलेले शिल्प आहे. हे शुंग काळातील (इ.स.पू. २००-५०) शिल्प आहे. या शिल्पातील स्त्रीने पूर्ण अंगाभोवती साडी घट्ट गुंडाळलेली आहे. तिने साडीचा कासोटा घातला आहे आणि पदर डाव्या खांद्यावर घेतला आहे.
गांधार संस्कृतीत (इ.स.पू. ५० ते इ.स. ३००) वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रियांची शिल्पं पाहायला मिळतात. तरी मुख्यत्वाने कासोटा आणि डाव्या खांद्यावर पदर, हीच पद्धत पाहायला मिळते. त्यानंतर गुप्त काळापासून साडीतील स्त्रियांच्या शिल्पात बऱ्यापैकी वाढ होत जाताना दिसते. अजिंठा लेण्यांमधील काही चित्रातही साडी नेसलेल्या स्त्रिया पाहायला मिळतात. या साडी नेसणाऱ्या स्त्रियांच्या चित्रातील स्थानावरून या दासी किंवा सामान्य स्त्रिया असल्याचे लक्षात येते. यावरून असे म्हणता येते की, राजस्त्रिया किंवा महाजन स्त्रिया नंतर साडी नेसू लागल्या. तामिळ साहित्यात, पाली साहित्यात, जैन साहित्यातही साडीचे उल्लेख येतात.
समाजातील बदलत्या नैतिक मूल्यांमुळे हे बदलही होत गेले. आधीच्या काळात नाभी हे ऊर्जा स्रोत मानले गेल्यामुळे ते उघडे ठेवणे हिताचे मानले गेले होते. नंतर समाजातील नैतिकतेचा निकष बदलला. नाभी आणि पोटाचा भाग झाकला जाईल अशा वस्त्राची गरज निर्माण झाली. मग उत्तरीय व अंतरीय ही दोन्ही वस्त्रे एकच होऊ न आजची साडी जन्माला आली.
काळाच्या ओघात भारतातल्या निरनिराळ्या भागात साडी नेसण्याच्या अनेक पद्धती विकसित होत गेल्या. महाजन संस्कृतीत आणि काही जनसंस्कृतीतही, साडी नेसण्याच्या बाबतीत एक गोष्ट सामान्य होती, ती म्हणजे कासोटा. पोषाख हा ‘द्विवस्त्र’ असणे जसे गरजेचे होते, तसेच ‘त्रिकच्छ’ असणेही महत्त्वाचे होते. ‘त्रिकच्छ’ म्हणजे धोतर किंवा साडी हे तीन ठिकाणी खोचलेले असले पाहिजे. मणक्याच्या खाली, नाभीच्या खाली आणि कमरेच्या डाव्या बाजूला, अशा तीन ठिकाणी ही वस्त्रे खोचली असली पाहिजेत. हिंदू धर्मशास्त्रांप्रमाणे, द्विवस्त्र व त्रिकच्छ असल्याशिवाय स्त्री आणि पुरुष हे नग्न समजले जातात आणि वेदांमधील व इतर धर्मशास्त्रांमधील कोणतेही विधी नग्न व्यक्तींच्या हस्ते होऊ शकत नाहीत, अशी स्पष्ट समज शास्त्रांत देण्यात आली आहे.
मागच्या म्हणजे मणक्याच्या खालच्या बाजूला खोचण्याला तर अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले होते. गंमत म्हणून उदाहरणासाठी एक संस्कृत श्लोक पाहू या.
अमुक्त-कच्छको भुत्वा प्रस्रवयति यो नर:।
वर्णे पित्री-मुखे दद्यात दक्षिणे देवता-मुखे॥
म्हणजे पुरुषाने जर त्याच्या धोतीचे मागचे खोचणे न काढता जर मूत्रविसर्जन केले, तर ते पितर किंवा देवतांच्या मुखात जाते. आज आपल्याला हे मनोरंजक वाटेल, पण अशा नियमांमुळेही काही वस्त्र परंपरा व नेसण्याच्या पद्धती विकसित होत गेल्या. पुढच्या लेखात या अनुषंगाने साडी नेसण्याच्या पद्धतींबद्दल जाणून घेऊ या.
viva@expressindia.com