– वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘असुर’ या वेब सीरिजमधून हिंदूी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणारा आणि त्यामुळे बहुभाषीय घरांमध्ये पोहोचलेला अस्सल मराठीतला कलाकार म्हणजे ‘अमेय वाघ’. संपूर्ण मराठी प्रेक्षक वर्गाला, घराघरातल्या तरुणाईला अमेयची ओळख झाली ती ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून! अमेयच्या ‘कैवल्य’ने प्रत्येकाच्या मनात घर केलं ते कायमचंच! अमेयची दुसरी हिंदी वेब सीरिज ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ नुकतीच प्रदर्शित झाली, त्याचा ‘झोंबिवली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘मी वसंतराव देशपांडे’ या मराठी चित्रपटाच्या रिलीजचीही घोषणा झालेली आहे. ‘फास्टर फेणे’पासून ते ‘मुरांबा’मधल्या आलोकपर्यंत प्रत्येक भूमिका मनापासून करणाऱ्या अमेयने त्याच्या निवडीमध्ये सातत्याने वैविध्य राखलं आहे.
अभिनयात करिअर करायचं आहे अशी महत्त्वाकांक्षा न बाळगता, केवळ ‘मला चांगलं काम करायचं आहे’ या उद्देशाने आपल्या करिअरकडे बघणारा अमेय त्याच्या अॅिक्टगच्या पहिल्या अनुभवाबद्दल सांगतो, ‘लहानपणी आमची मोठी जॉइन्ट फॅमिली होती. सगळी मिळून पंचवीस-तीस भावंडं होती. प्रत्येक जण अभ्यासाव्यतिरिक्त काही ना काही अॅक्टिव्हिटीज करत असायचा. कोणी तायक्वांडो करायचं, कोणी अजून कोणते स्पोर्ट्स करत असायचं. मला मात्र स्पोर्ट्समध्ये कधी फारसा रस नव्हता. मी शाळेच्या स्नेहसंमेलनात नाटक वगैरे करायचो. एकदा नातेवाईकांपैकीच कोणी तरी माझ्या आई-बाबांना नाटय़ शिबिराबद्दल सुचवलं. आई-बाबांनाही ते पटलं किंवा आवडलं, आणि त्यांनी मला उन्हाळय़ाच्या सुट्टीत बालनाटय़ प्रशिक्षण शिबिराला पाठवलं. तेव्हा मला स्टेजवर काम करायला मजा यायला लागली. एकदा असं झालं की, यांच्या बालनाटय़ाच्या ग्रुपचं एक नाटक होतं आणि त्यात बरीच सीनियर मंडळी होती. त्या नाटकात मी नव्हतो. तेव्हा त्या नाटकात मध्यंतरानंतर ज्या मुलाचा मोठा रोल होता, तो मुलगा आलाच नव्हता. त्या वेळी नाटकाच्या सरांनी मला आयत्या वेळी स्टेजवर जायला सांगितलं. मला नाटकाची गोष्टसुद्धा माहिती नव्हती, संवाद माहिती नव्हते. पण सरांनी सांगितलं की एक गावाकडचा, जंगलात राहणारा मुलगा आहे. त्यांनी गोष्टही थोडक्यात सांगितली आणि मला स्टेजवर उत्स्फूर्त अभिनय करायला पाठवून दिलं.’ आयत्या वेळी रंगमंचावर उभं राहून स्वत: इम्प्रोव्हाईज केलेल्या भूमिकेला ज्या वेळी प्रेक्षकांची दाद मिळाली तेव्हा अमेयला स्वत:मधल्या अॅिक्टगबद्दल आत्मविश्वास वाटायला लागला. आपण काही तरी बरं करू शकतोय याची जाणीव अमेयला या घटनेने झाली. हातात स्क्रिप्ट नसताना वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी थेट भरलेल्या थिएटरला सामोरं जाणं ही सोपी गोष्ट नव्हती. या प्रसंगानंतर अमेयच्या मनात या क्षेत्राची दिशा पक्की झाली.
अमेयने डिग्रीचं शिक्षण कॉमर्समध्ये आणि मास्टर्सचं शिक्षण मास कम्युनिकेशनमध्ये घेतलं आहे. कॉलेजच्या वर्षांत प्रायोगिक नाटकांमध्ये अमेयने खूप काम केलं. त्याचं काम पाहून अनेक संधी समोर आल्या, मात्र स्वत:वर मेहनत घेण्याच्या उद्देशाने अमेयने त्या नाकारल्या. ‘मालिकांच्या ऑफर्स मला येत होत्या, ऑडिशनसाठी फोन येत होते. मात्र मला इतक्या लवकर त्या चक्रात अडकायचं नव्हतं. एकदा त्या पैशांच्या मागे धावायची सवय लागली की मग शिकणं, स्वत:वर मेहनत घेणं, स्वत:च्या कामाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं मागे पडतं. ते मला होऊ द्यायचं नव्हतं. तसंच मला त्याच त्या सरधोपट मालिकांमध्ये फारसा रसही नव्हता,’ असं अमेय सांगतो. मात्र त्याच वेळी त्याला ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या ऑडिशनसाठी फोन आला. ‘त्या वेळी मात्र मी हा विचार केला की, जर मला टिपिकल सीरियल करायच्या नाहीयेत तर वेगळा रोल करण्याची ही चांगली संधी आहे. अर्थात ही सीरियल म्हणजे थोडासा गॅम्बल होता. कारण विषय अगदीच नेहमीपेक्षा वेगळा होता. त्यात मालिकांचा ठरलेला प्राइम टाइम सोडून रात्री साडेदहाची वेळ होती. ती सगळय़ांनी मिळून घेतलेली रिस्कच होती, पण ती मालिका लोकांना खूपच आवडली. माझी थोडीशी ओळख निर्माण झाली. या मालिकेनेच मला घराघरांत पोहोचवलं’, असं तो म्हणतो. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेला केवळ तरुणांनीच नव्हे तर सगळय़ाच वयाच्या प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नुसती पॉप्युलॅरिटी नव्हे तर प्रत्येक पात्राने स्वत:चं स्थान निर्माण केलं, प्रत्येक कलाकाराने त्या त्या पात्रामध्ये जीव ओतला. ‘कैवल्य’शी अनेक जण स्वत:ला रिलेट करू शकले म्हणून ती अमेयची ओळख बनली.
ही मालिका संपताना मात्र अमेयकडे अनेक चित्रपटांच्या संधी चालून आल्या होत्या. पण समोर आलेल्या चौदा ते पंधरा चित्रपटांतून अमेयने फक्त ‘फास्टर फेणे’ आणि ‘मुरांबा’ हे दोनच चित्रपट करायचे ठरवले. ज्या वेळी त्याला ‘असुर’च्या ऑडिशनसाठी फोन आला तेव्हा मात्र त्याने तो प्रयत्न करायचं ठरवलं. ‘असुरच्या ऑडिशनला कॅरक्टरचं स्क्रिप्ट मी बघितलं. मला त्याची तयारी करण्यासाठी वेळ हवा होता. हिंदी वेब सीरिजच्या ऑडिशनला साधारण सगळे जण लगेच काही वेळातच तयारी करतात, मात्र हे थोडं निगेटिव्ह छटा असलेलं पात्र होतं. मी असं आधी केलं नव्हतं, त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ मागितला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन ऑडिशन दिली. त्यांनी सिलेक्ट केलं तर यात काम नक्की करायचं हा निर्णय माझा झाला होता. ‘असुर’ ही वेब सीरिज केल्यानंतर वेगळी पद्धत, वेगळं क्षेत्र अनुभवायला मिळालं आणि काही अंशी त्या क्षेत्रात काम मिळण्याच्या संधीही वाढल्या,’ अमेय म्हणतो. मराठीकडून हिंदीकडे प्रवास केलेले अनेक कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहेत. एकदा हिंदी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर पुन्हा मराठी पडद्यावर न दिसणारेही अनेक आहेत. याबद्दल मात्र अमेयचं म्हणणं वेगळं आहे. तो म्हणतो, ‘हिंदीमध्ये काम करायचं असा माझा अंतिम हेतू कधीच नव्हता. उलट नाटकाचे प्रयोग असले किंवा कोणत्या मराठी चित्रपटाचं शूटिंग आहे, अशा कारणांसाठी मी हिंदी प्रोजेक्ट्सना नकारही दिलेला आहे. मी हिंदूीत काम करतो कारण माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मला स्वत:ला काही तरी करून पाहायला मिळतं. मराठी माझी भाषा आहे, त्यात माझं कल्चर आहे, त्यामुळे तिथे मी अगदी सहज वावरतो. मात्र हिंदीचा माहौल वेगळा असतो, मला फार कोणी ओळखत नसतं, हिंदी भाषेशी माझा फारसा संबंध नाही, या सगळय़ातून आपली कला दाखवणं आणि आपलं काम उत्तम करणं हे चॅलेंजिंग आहे. या उद्देशाने मी हिंदीत काम करतो. मराठी हेच माझं प्रेम आहे आणि हिंदीत एकदा काम केलं म्हणजे आता मराठीला रामराम वगैरे असं काही करण्याचा माझा विचार नाही, भविष्यातही नसेल.’ हिंदीत काम मिळालं म्हणजे यश मिळालं अशी यशाची परिभाषा अमेयच्या मनात नसल्यामुळे त्याची ही मतं तो उघडपणे मांडतो.
घरच्यांनी आणि आपल्या माणसांनी सातत्याने दिलेली सकारात्मक ऊर्जा अमेयला करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर बळ देत आली आहे. अमेय म्हणतो, ‘माझ्या घरच्यांनी मला कधीच अडवलं नाही, उलट घरची गडगंज श्रीमंती नसतानाही अशा अन-सेटल्ड क्षेत्रात मी करत असलेल्या कामाचं त्यांनी नेहमी भरभरून कौतुक केलं.’ करिअरसाठी कोणताही ऑप्शन ‘बी’ न ठेवणारा अमेय पुढच्या जन्मी मात्र शास्त्रीय गायक व्हायला आवडेल म्हणतो आणि संगीत नाटकांचा वारसा जपण्याचीही स्वप्नं बाळगतो.