मितेश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदेश बांदेकर या नावाची महाराष्ट्रात एक वेगळीच हवा आहे. जून महिन्याचा तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ असतो. त्यानिमित्ताने बांदेकर कुटुंबाच्या तीन पिढय़ांची खवय्येगिरी वाचूयात आजच्या ‘फुडी आत्मा’मध्ये.

अखिल महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे आदेश बांदेकर! महाराष्ट्राच्या या लाडक्या भावोजींच्या दिवसाची सुरुवात हळद आणि मिरपूड मिश्रित गरम पाणी पिऊन होते. साखरेचे पदार्थ न खाण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. ‘होम मिनिस्टर’साठी चित्रीकरण करताना स्वागत करणाऱ्या वहिनींनी जर पेढा दिला तर तोही अगदी थोडासा अथवा साखर दिली तर केवळ एक-दोन दाणे खाण्याचं बंधन ते पाळतात. आदेश बांदेकर यांचं बालपण गिरणगावात गेल्यामुळे त्यांना चहा चपाती, चहा खारी खाण्याची सवय लागली आणि ती अजूनही आहे. दुपारच्या जेवणात स्पेशली बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मासे खायला त्यांना आवडतात. एरवी कोशिंबीर, भाजी-पोळी आणि आमटी भाताचा आस्वाद ते घेतात. संध्याकाळी सहाच्या सुमारास लागलेली भूक भेळेसारख्या हलक्या पदार्थावर भागते. तर रात्रीच्या जेवणात जे असेल ते जेऊन दिवसाची सांगता बांदेकर करतात.

कोकणात सिंधुदुर्गजवळील वाडोस हे बांदेकरांचं गाव. विस्तीर्ण सागरी किनारा लाभल्यामुळे अर्थातच मासे हा जेवणाचा अविभाज्य भाग आहे. लहानपणीच्या मत्स्य आठवणी सांगताना बांदेकर म्हणाले, ‘माझ्या लहानपणी माझे बाबा दर रविवारी लालबागच्या मच्छी मार्केटमध्ये जायचे. त्यांची दर रविवारची सकाळची वारी ठरलेली असायची. त्या त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते ते मासे आमच्या घरी यायचे. करली हा मासा मला प्रचंड आवडतो. त्यात खूप काटे असतात. माझ्या बाबांना बोंबील, बांगडा, मांदेली आवडते. सगळय़ांना पुरवठय़ाला येतील व खिशाला परवडतील असे हे मासे पूर्वी आमच्या आयुष्याचा भाग होते. कोकणात गावी गेल्यावर नदीतले मासे खाण्याची लज्जतच काही वेगळी असते. बाबांनंतर मलाही मासे खरेदीचा नाद लागला. आता मी जिथे जाईन तिथून मासे आणतो. पालघर, डहाणू किंवा सातपटी या भागात जर गेलो तर मी आवर्जून पापलेट घेऊन येतो. रायगड पट्टय़ात गेलो तर खेकडे घेऊन येतो’. 

वडापाव कुठेही दिसला की डाएटचा शोध लावणाऱ्या व्यक्तीचा मला प्रचंड राग येतो, असं सांगत बांदेकर पुढे सांगतात, ‘वडापाव मला प्रचंड आवडतो. जसं आपण एखाद्या व्यक्तीचा यशोशिखरावर जाण्याचा प्रवास पाहतो, तसं मी वडापावचा प्रवास पाहिला आहे. १९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. मुंबईच्या चाकरमान्यांना केवळ बटाटय़ाची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाटय़ाच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरुवात तेव्हा झाली. माझे बाबा सांगतात अगदी सुरुवातीला वडापाव  १० पैशाला विकला जायचा. आजघडीला १० रुपयाला केवळ सिंगल वडा येतो. पावासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. मॉलमध्ये, विमानतळावर, पंचतारांकित हॉटेलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत आता वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव माझ्या लहानपणी केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठपर्यंतच ती गाडी सुरू असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावडय़ाला हक्काचं घर मिळालं’. बटाटेवडय़ाच्या आठवणी इथेच संपत नाहीत. ‘सुरुवातीला बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळय़ा पदार्थाला चांगलंच उचलून धरलं. आता चीज वडापाव, नाचो वडापाव, शेजवान वडापाव, मसाला वडापाव, स्वीटकॉर्न वडापाव, मेयोनीज वडापावसारखे भन्नाट कॉम्बिनेशन्स मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवू लागले असले तरी मुळात वडापाव म्हणजे स्वर्गसुखच! टोलनाक्यावर गेल्यावर ज्याप्रमाणे आपण टोल भरून पुढे जातो तसं मी काळाचौकी अभ्युदय नगरला गेल्यावर माझ्या मित्राच्या ठेल्यावर जाऊन वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही. वडापावच्या अवतीभोवती प्रचंड आठवणी आहेत. दादरच्या रुपारेल कॉलेजमध्ये असताना एकांकिकेचे दिग्दर्शन असू दे किंवा मुंबई विद्यापीठ युथ फेस्टिव्हलसाठी दिग्दर्शन असू दे.. कायम वडापावाने रात्री उशिरापर्यंतसुद्धा साथ दिली. मुंबईकर असल्याने वडापावविषयी विशेष प्रेम आहे’ असं ते सांगतात. 

बांदेकरांच्या शालेय जीवनातील खवय्येगिरीच्या आठवणीही तितक्याच सुंदर आहेत. ‘शाळेच्या समोरच घर असल्याने मी आतासारखा शाळेत डबा घेऊन कधी गेलो नाही. मधल्या सुट्टीत जेवायला घरी हे माझं रुटीन होतं. शाळेची पिकनिक जायची तेव्हा आई डब्यात पुरी आणि बटाटय़ाची भाजी द्यायची. त्या भाजीला त्या दिवशी एक वेगळीच चव असायची. शालेय सहल आणि पुरीभाजी याचं एक वेगळं नातं माझ्या आयुष्यात होतं. आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा..’ असं सांगत त्यांनी आईच्या हातच्या पदार्थाच्या आठवणी सांगितल्या. ‘वडिलांबरोबर आईसुद्धा नोकरी करायची. ती नर्स होती. त्यामुळे तिच्या दिवसाची सुरुवात आमच्यापेक्षा अधिक लवकर व्हायची. सकाळी साडेपाच वाजता आमच्या घरात भाज्यांना फोडणी दिली जायची. त्या घमघमाटातच आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची. सगळा साग्रसंगीत स्वयंपाक बनवून ती हॉस्पिटलकडे धाव घ्यायची. आम्ही तेव्हा चाळीत राहायचो. नऊ खोल्यांचा एक मजला असल्याने नऊ कुटुंबं एकत्र नांदायची. सगळय़ांच्याच घराचं आणि किचनचं दार हे सताड उघडं असायचं. त्यामुळे आईची बस लेट झालीच तर कोणाच्याही घरी डायरेक्ट गेलो तरी आम्हा भावंडांना मायेने जेऊ घातलं जायचं. हीच खरी मुंबईतली श्रीमंती’ हे सांगताना त्यांच्या शब्दांतूनही आठवणींचा तो आनंद जाणवतो.

जून महिन्यातला तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ असतो. तुमच्या वडिलांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी व एक वडील या भूमिकेतून तुम्हाला सोहमने घातलेली बंधनं नेमकी कशी आहेत? असा प्रश्न बांदेकरांना विचारला असता ते म्हणाले, ‘माझ्या मुलाच्या सोहमच्या आणि माझ्या नात्यात खाण्याच्या बाबतीत तो माझा बाबा आहे. गेल्या आठवडय़ातलाच किस्सा आहे. फ्रिजमध्ये चॉकलेट होतं. रात्री जेवण झाल्यावर मला मुखशुद्धीसाठी चॉकलेट खाण्याची तलफ आली. रात्री कोणीच चॉकलेट खायचं नाही असं सोहमचं म्हणणं असतं. त्यामुळे आमच्या खाण्यापिण्यावर त्याची नजर असते काय.. दहशत असते. मी फ्रिजमधून चॉकलेट घ्यायला गेलो आणि तेवढय़ात सोहम समोर आला. मी चॉकलेट बाजूला ठेवलं आणि चटकन फ्रिजमधली पाण्याची बाटली उचलली. खाण्याच्या बाबतीतला हाच प्रेमळ दरारा माझ्या वडिलांचासुद्धा आहे’. त्यांनी पुढे वडिलांचा किस्साही सांगितला. ‘चांगलं खाणं मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे या विचारांचे माझे वडील आहेत. आयुष्याच्या सुरुवातीला कोकणातून मुंबईत येऊन स्थिरावलेले माझे वडील शासकीय सेवेत होते. माझ्या मुलाच्या मते आजोबा म्हणजे जादूची पोतडी आहे. त्यांच्याकडे एकावेळी पाच वेगळे पदार्थ मिळतातच. त्यांना नामांकित ठिकाणी जाऊन तिथले फेमस चटकदार पदार्थ खायला व समोरच्याला खिलवायला आवडतात. गिरगावमध्ये गेलो तर ते अनंताश्रममध्येच जेवायला घेऊन जातात. ‘गोमंतक बेकरी’मध्ये जाऊन वाइन बिस्कीटं खरेदी करायचा त्यांचा हट्ट असतो. केक खायचा तर कयानीचाच. खायचं तर तुपाशी नाहीतर मग उपाशी हे तत्त्व मी माझ्या वडिलांकडून शिकलो. खाण्याच्या बाबतीत सोहम माझा बाबा आहे आणि माझे बाबा सगळय़ांचे गॉडफादर आहेत’ असं ते गमतीने सांगतात.

‘होम मिनिस्टर’ हा जगातला एकमेव कार्यक्रम आहे, जो सलग १९ वर्षे अविरत सुरू आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी बांदेकर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या घरांमध्ये जात असतात. त्यामुळे सहभागी होणाऱ्या प्रत्येक माऊलीला असं वाटत असतं की भावोजी आपल्या घरी येत आहेत तर त्यांनी आपल्या घरी चार घास खायला हवेत. इथे ‘झी मराठी’ वाहिनीने व आदेश बांदेकरांनी एक शिस्त पाळली की कोणाच्याच घरी काहीच खायचं नाही. कार्यक्रमात सहभागी होणारी माऊली ही त्या दिवशी कार्यक्रमाची नायिका असते. तीच जर स्वयंपाकघरात ओटय़ाजवळ उभी राहिली तर तिचा दिवस साजरा होणारच नाही. तो दिवस तिचा आहे. त्यामुळे काहीकाळ तिला किचनपासून लांब ठेवण्यात बांदेकर यशस्वी झाले. बांदेकर सांगतात, ‘एकदा आम्ही अकोल्यावरून चित्रीकरण पूर्ण करून  ट्रेनने मुंबईत परत येत होतो तेव्हा एक चांगलाच किस्सा घडला. रात्रीची वेळ होती. आम्हाला एकमेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी माहिती असल्यामुळे बिनधास्तपणे कोणीतरी खायला घेतलं असेल असा एकमेकांवर फाजील विश्वास ठेवून आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यावर लक्षात आलं कोणीच काही खायला घेतलं नाही. ट्रेन सुटली आता करायचं काय? पाणी पिऊन झोपू असं आम्ही आपापसात ठरवलं. त्या ट्रेनमध्ये जे टीसी होते त्यांनी आमचा हा गोंधळ पाहिला. ते मला म्हणाले, अहो बांदेकर असं कसं चालेल? माझी बायको तुमची प्रचंड फॅन आहे. तुम्ही आज माझा डबा खा. माझ्या बायकोने स्वत: जेवण बनवलं आहे. तुम्ही तिच्याशी फोनवर बोला आणि तिला नंतर सांगा डब्यातला पदार्थ कसा झाला आहे? जेवता जेवता त्यांनी बायकोला व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्या माऊलीच्या डोळय़ात आनंदाने पाणी आलं. त्या कुटुंबाने त्यांच्या घासातला घास मला दिला. ‘होम मिनिस्टर’मुळे हे नि:स्वार्थ प्रेम आणि विश्वास एकोणीस वर्षांत मी संपादित करू शकलो याचा आनंद आहे’. सलग १९ वर्षे दौरे आखत चित्रीकरण करत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातले खासियत असलेले  चहाचे ठेले, हॉटेल, वडापावची गाडी माहिती झाली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी या हॉटेलमध्ये जेवायला थांबू.. असं आम्ही आधीच ठरवतो, असंही त्यांनी सांगितलं.     

‘शेगडीपासून ओव्हनपर्यंत, फडताळापासून फ्रिजपर्यंत, स्वयंपाकघराच्या रूपात होत असलेला बदल माझ्या वडिलांनी पाहिला आहे. पाटावर खाली बसून निवांत जेवणारे माझे वडील आज नातवाबरोबर आलिशान डायिनग टेबलवर बसून जेवत आहेत. लग्नाच्या पंगतीत वडिलांबरोबर जेवणारा मी आज माझ्या मुलाबरोबर पार्टीत उभं राहून जेवतो. हे सगळे काळानुसार बदल होत गेले आणि अजून होतीलसुद्धा.. पण पिढय़ानपिढय़ा खाणं मात्र अजरामर राहील’ असं ते म्हणतात. लहानपणीपासून आतापावेतो कित्येक आठवणी या अशा आवडत्या खाण्याभोवती घुटमळत राहतील, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.

viva@expressindia.com